आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranjit Rajput About Bull Beauty Parlour In Nandurbar

सातपुड्यातलं बुल ब्यूटी पार्लर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणतेही शहर अथवा खेडे असे नाही, जेथे आज लेडीज व जेंट्स ब्यूटी पार्लर नाही. परंतु ज्याच्या कष्टसाध्य परंपरागत जीवनशैलीने मानवी जीवन-संस्कृती अक्षरशः समृद्ध झाली, बहरली, फुलली त्या बैल या पाळीव प्राण्याचेही ‘बुल ब्यूटी पार्लर’ सातपुड्याच्या डोंगरराजींमध्ये आहे; तेही मानवी उत्क्रांतीच्या इतिहासाप्रमाणे समृद्ध परंपरा लाभलेले आहे.

सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या नंदुरबार शहरालगत मिरचीच्या पथारीचे दृश्य जसे डोळ्यांना सुखावते, तेवढेच किंबहुना त्याहून अधिक नेत्रसुखाचा आनंद शहरापासून अवघ्या दहा किलोमीटरवर असलेल्या बंद्रिझिरा या गावाला भेट दिल्यावर मिळू शकतो. मिरची ही तर नंदुरबारची खास ओळख. परंतु बंद्रिझिरा गावाची ओळख अधिकच वेगळी. बैल सजविण्यासाठी लागणाऱ्या लोकरीच्या रंगीबेरंगी गोंड्यांची आणि पूरक साहित्य-साजाची निर्मिती या ठिकाणी घराघरात केली जाते. अनेक पिढ्यांपासून अव्याहतपणे चालत आलेल्या या पारंपरिक व्यवसायाला किती वर्षांची परंपरा आहे, याबाबत अधिकृत कुठेही नोंद नाही. गावातील बुजुर्गांकडून दोन-तीन पिढ्यांपासूनचे संदर्भ मिळतात, तेही अत्यंत त्रोटक. परंतु भारतातल्या पहिल्या कृषी संस्कृतीचे व मानवी वसाहतींचे सर्वात जुने अवशेष नंदुरबार जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्यात बैल या प्राण्याचेही अवशेष आढळून आल्याने, बंद्रिझिराच्या या परंपरेचा त्या संस्कृतीशी काही संबंध आहे का, याचाही शोध घेण्याचे मोठे आव्हान संशोधकांपुढे आहे.

आपल्या व्यावसायिक परंपरेचा इतिहास, भूगोल, वर्तमान, भविष्य काहीही असो; मात्र बंद्रिझिरा गावाच्या कुटुंबातील सदस्य पोळा सणाची चाहूल लागली की आपल्या कारागिरीत गढून जातात. या गोंड्यांनी आणि साजाने जिल्ह्याची, राज्याची सीमा कधीच पार केली असून महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश व राजस्थान राज्यांतील अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांची ख्याती पसरलेली आहे.
बंद्रिझिरा गावामध्ये बंजारा समाजाची लोकसंख्या अधिक आहे. या समाजातील लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंतच्या सर्वांना लोकरीचे सुंदर गोंडे तयार करण्याचे कौशल्य आत्मसात आहे.

परंपरागतपणे गोंडे, साज तयार करण्याच्या व्यवसायामुळे ‘गोंडेवाला बंद्रिझिरा’ अशी गावाची ओळख बनली आहे. आजी-आजोबा, आई-वडील यांना रंगीबेरंगी लोकरीचे गोंडे सफाईदारपणे विणताना पाहून लहान मुलांचे औत्सुक्य कृतीमध्ये रूपांतरित होते. मग चिमुकल्या हातांनाही गोंडे, साज तयार करण्याचे प्रशिक्षण सहजपणे मिळू लागते. या गावातील ५० ते ६० कुटुंबांचा हा गेल्या शेकडो वर्षांपासूनचा परंपरागत व्यवसाय. पूर्वी हा व्यवसाय बाराही महिने तेजीत असायचा, परंतु अलीकडच्या काळात शेतीव्यवसायातील मंदी, आधुनिक शेतीमुळे बैलांची जागा यंत्र-अवजारांनी घेतल्याने या गोंडे आणि साज निर्मितीच्या व्यवसायाला थोडी उतरती कळा आली असली, तरी या गोंड्यांची-साजाची विक्री केवळ नंदुरबार जिल्ह्यात नव्हे तर राज्याबाहेरही होते. गोंड्यांसाठी लागणारी रंगीत लोकर कारागीर सुरतमधील व्यापाऱ्यांकडून खरेदी करतात. त्यापैकी काही जण या व्यापाऱ्यांकडून मजुरी ठरवून त्यांना गोंडे-साज बनवून देतात. गोंडे अतिशय आकर्षक बनविले जात असले तरी, सध्या लोकरीच्या वाढलेल्या कमितीचा फटका कारागिरांना अस्वस्थ करतो आहे.

ज्या बैलजोडीकडून आपल्या उदरनिर्वाहाची कामे करवून घेतली जातात, त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलांना पोळ्याच्या दिवशी सकाळपासून रानात मनसोक्त चरायला सोडतात. त्यांना नदीत, तलावात अथवा गावकुंडात अंघोळ घालतात. त्यांना घरी आणल्यावर सजवले जाते. बैलांच्या शिंगांना रंग लावले जातात. ऑइल पेंटचे रंग सर्वदूर सर्रास वापरले जात असले तरी, पारंपरिक रंग म्हणून ‘गेरू’ अथवा ‘ढाव’चा वापर काही ठिकाणी केला जातो. जुन्या ‘नाथां’ना काढून नवीन ‘नाथ’ बैलांच्या नाकात ओवली जाते. गोंडे, आरसे, पायात तोडे, गळ्यांत घागरमाळा, चंग, गेठा, घोगर, घंटी, पितळाची साकळी, शिंगाला फुगे, कणकेचे शेंगाळे, फुले, पायाला केसारी, तोडे, पाठींवर लोकरेपासून बनवलेली मखमली झुल, माथोटी, दोर आदी लावले जातात. बैलांच्या डोळ्यांत सुरमा भरला जातो. रुईच्या फुलांच्या माळादेखील घातल्या जातात. सजवलेल्या बैलांना घरांसमोर आणले जाते. घरोघरी शेतीच्या साधनांची, अवजारांची पूजा केली जाते. खाटेवर ‘दुसर’ ठेवून विविध कडधान्ये, डाळींच्या मूठ मूठ राशी ठेवल्या जातात. धान्यांच्या सात प्रकारच्या राशींना ‘शिधा’ म्हणतात. बैल ज्या धान्याला सर्वप्रथम तोंड लावेल ते पीक चांगले येईल, असे मानले जाते. घरमालकीण बैलांचे औक्षण करते. गावातला मानाचा बैल वेशीपर्यंत वाजतगाजत परतल्यावर गावातले इतर बैल वेशीपर्यंत जातात. त्यालाच ‘पोळा फुटणे’ असे म्हणतात. ही शेकडो वर्षांपासूनची परंपरा कायम टिकून आहे. पोळ्याच्या दिवशी घरोघरी कुंभाराकडून आणलेल्या मातीच्या बैलांचे पूजन होते. त्यांनाही नैवेद्य दाखवला जातो. इतर जनावरांनाही अंघोळ घालून त्यांचे औक्षण केले जाते. मानाच्या बैलाची गावभर मिरवणूक निघते. त्यालाच ‘बाशिंग्या बैल’ म्हणतात. त्याच्या माथ्यावर शिंगांमध्ये मोठे बाशिंग बांधले जाते. त्याला अंगभर सजवले जाते. संध्याकाळी ‘तोरण तोडण्या’ची स्पर्धा आयोजित केली जाते. गावाबाहेरच्या मैदानात अथवा महादेव मंदिरासमोर नारळांचे तोरण लावले जाते. गावातले तरुण शेतकरी एकेक करून आपापल्या बैलासमवेत धावत जाऊन उडी मारत तोरण तोडण्याचा प्रयत्न करतात. गावागावात, घराघरात आनंद आणणारा ‘पोळा’ सातपुड्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा सण आहे.

सध्या हा व्यवसाय ठरावीक काळापुरता मर्यादित असल्याने मेहनतीच्या मानाने होणारे अर्थार्जन समाधानकारक नसल्याची खंत कारागिरांकडून व्यक्त होत आहे. शेतीची कामे सांभाळून आपल्या कौशल्याला न्याय देण्यासाठी लोकरीची कमी दरात उपलब्धता अथवा लोकर खरेदीसाठी आर्थिक मदत अनुदान म्हणून द्यावी, अशी कारागिरांची अपेक्षा आहे. एका वेगळ्याच ऊर्मीने संपूर्ण कुटुंब गोंडे-साज तयार करण्यासाठी झटत असते. अशा वेळी संस्कृतीचे जतन करण्यासाठी गोंडे व साज निर्मितीच्या या व्यवसायाला परंपरेने पुढे चालविणाऱ्या कारागिरांना आर्थिक बळ देण्याची, या परंपरेच्या इतिहासाचा शोध घेण्याची खरी गरज आहे. नाहीतर सातपुड्याच्या कृषी संस्कृतीची शान असलेले हे बुल ब्यूटी पार्लर येणाऱ्या पिढीसाठी दंतकथा बनून राहील.
(ranjitrajput5555@gmail.com)