आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्राणीचे अरण्यरुदन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतवर्ष आणि ब्रिटिश काळाच्या पूर्वीपासून थेट राजस्थानपर्यंत पाचशे वर्षांच्या इतिहासाचा बुलंद साक्षीदार असलेला ‘अक्राणी महल’ हा निश्चितच आगळा आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात असलेला अक्राणी महल त्याच्या अंगावर, कुण्या ‘अक्काराणी’ नामक स्वामीनिष्ठ राजपूत सुभेदारणीच्या वास्तव्य खुणांची अद्यापही अस्फुट बोलकी करणारी सुबक, आकर्षक आणि नक्षीदार ‘देवळी’ (राणी काजल मंदिर) अजूनही मिरवत आहे.
मात्र सातपुड्याच्या अजस्र पर्वतरांगानी भक्कम मजबुती प्रदान केलेल्या आणि महाराणा प्रतापच्या राजवंशाशी असलेली नाळ सांगणा-या पुण्यपावन असलेल्या, अक्राणी महलचा इतिहास हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. नुकताच डॉ. नरसिंह परदेशी यांचा ‘खान्देशातील राजपुतांचा इतिहास’ हा संशोधन ग्रंथ प्रसिद्ध झाला त्यातही ‘अक्राणी महल’चा ओझरता उल्लेख झाला आहे. निवृत्तीनंतर 2006 पासून या महालावर संशोधन करणारे शहाद्याचे साहित्यिक (जि.नंदुरबार) प्रा. दत्ता वाघ यांच्यासोबत नुकताच हा महाल पाहायचा योग आला.
हळदी घाटाच्या युद्धात राणा प्रतापचा पराभव झाला. त्या वेळी मुस्लिमांच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी महाराणा प्रतापांची बहीण ‘अक्काराणी’सह काही स्वामीनिष्ठ राजपुतांनी आपला वंश, धर्म सुरक्षित ठेवण्यासाठी सातपुड्यातील या भागाचा आश्रय घेतल्याचे प्रसिद्ध इतिहास संशोधक एल. के. भारतीया यांनी त्यांच्या शोधनिबंधात सातपुड्याच्या या संस्थांनबद्दल लिहिले आहे. ‘महाराष्ट्र ज्ञानकोश खंड-6’ मध्ये 17 व्या शतकात राणा गुमानसिंग याने अक्राणीचा किल्ला बांधल्याचा उल्लेख आहे. हे राणा गुमानसिंग काठीचे संस्थानिक होते. तर आर. ई. एन्थोव्हेन यांच्या मतानुसार उदयपूरच्या राणाने तेथून काही राजपुतांना हाकलून लावले, त्या राजपुतांनी पावागडचा आश्रय घेतला, कालांतराने तेथून ते जंगलाच्या आश्रयाने अक्राणी परिसरात आले व तेथेच रहिवास करू लागल्याचे नमूद केले आहे.
धडगावपासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात या महालाचे अवशेष दृष्टीस पडतात. डॉ. नरसिंह परदेशी यांच्या मते या महालाचे बांधकाम सुमारे पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाले असण्याची शक्यता आहे. किंबहुना अक्काराणीच्या नावानेच या परिसराचे नाव अक्राणी महाल पडले आहे, अशी या भागातील लोकांची मनोधारणा आहे. तथापि, अक्काराणी नामक खरोखरच राणा प्रतापांची बहीण होती का? व अक्राणी महाल हे नाव या परिसराला तिच्याच नावावरून पडले का? हा संशोधनाचा विषय असल्याचेही ते नमूद करतात. तत्कालीन भिल्ल लोकांच्या आक्रमणापासून तळोद्यासह सुलतानपूर व इतर जिल्ह्यांना संरक्षण द्यावे, या अटीवर राणा कुटुंबाचे मूळ संस्थापक प्रतापसिंग यांना औरंगजेबाने अक्राणी महल परगणा दिल्याचीही शक्यता गॅझेटमध्ये वर्तवली आहे. अक्राणी हे संस्थान असून महल म्हणजे सुभा किंवा प्रांत. महलचा दुसरा अर्थ तालुक्याचा पोटभाग असाही होतो. धुळे जिल्हा गॅझेटप्रमाणे 1634 मध्ये शहाजहानने खान्देशातील सुलतानपूर आणि नंदुरबार हे जिल्हे माळवा प्रांताला जोडले आणि त्यांचे मुख्य केंद्र ब-हाणपूर ठेवले होते.
भग्नावस्थेत संपूर्ण विटांमध्ये बांधलेल्या या महालाचा बुरुज, प्रवेशद्वार ब-यापैकी सुस्थितीत असल्यासारखे आहेत. महालाच्या दक्षिण, पूर्व व पश्चिम दिशेच्या भिंती उभ्या आहेत. कुठे-कुठे पडझड झाली असली तरीही हे अवशेष तेथील राजेशाही थाट, त्यांचा डामडौल याची साक्ष देतात. या महालात एक भुयार आहे ते कोठे निघते याची माहिती अद्यापही उपलब्ध नाही. जुन्या काळातील दगडात घडवलेल्या फुटलेल्या वस्तू आज तेथे दिसतात. डॉ. नरसिंह परदेशी यांना या महालाच्या अवशेषांमध्ये उदयपूर, मेवाड संस्थानच्या मुद्रा (नाणी), राजस्थानी बनावटीच्या वास्तूचे अवशेष आढळले आहेत, तर तेथील आदिवासींना चांदीची, तांब्याची नाणी सापडली आहेत. आदिवासींनी दिलेल्या जुजबी माहितीवरून प्रतापपूर, गोपाळपूरचा उल्लेख आला. त्याचा धागा पकडून सध्या गुजरातच्या नवसारी येथे स्थायिक झालेले प्रतापपूरच्या राणांचे तरुण वारसदार राणा यज्ञदेवसिंग यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी या भेटीत सादर केलेल्या कागदपत्रांवरून तेच या किल्ल्याचे खरे वंशज असून ब्रिटिशांनीच त्यांच्या पूर्वजांना ‘राणा’ ही पदवी आणि इनामात प्रतापपूर, गोपाळपूर ही दोन गावे दिली होती. या सर्व कागदपत्रांवरून अक्राणीचा सारा इतिहास समोर येतो. यज्ञदेवसिंग यांच्या मातोश्री हर्षेद्रकुमारीजी यांच्या म्हणण्यानुसार तर ‘हमारे खांदान मे अक्कारणी नामकी कोई राणी नहीं थी.’
खान्देशात महंमदी सत्ता असताना त्यात धडगांवचाही समावेश होता. त्या वेळी प्रत्येक भाग स्थानिक मुख्य माणसांच्या ताब्यात असायचा. तेच तेथील कारभार बघत असत. परंतु इ.स. 1700मध्ये महंमदी ºहास झाल्यानंतर या परगण्यास कुणी वारस राहिला नाही. त्यानंतर नर्मदेपलीकडील धुश्वयी येथील छावजी राणा यांनी या संस्थानचा ताबा घेतला. आपण मूळचे धार येथील ‘पवार’ असल्याचे राणा यज्ञदेवसिंग सांगतात. धार येथील पवार घराण्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. तेथील आनंदराव पवार यांनी दौलतराव शिंदे यांना अप्रत्यक्ष मदत केल्याचा इतिहास आहे. छावजी राणा यांच्या मृत्यूनंतर अक्राणी हा सुभा त्यांचा मुलगा राणा गुमानसिंग यांच्याकडे वंशपरंपरेने आला. त्यांनीच हा महालवजा किल्ला बांधला व परिसरात शांतता प्रस्थापित केली. त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र हिम्मतसिंग यांनी अक्राणी येथे 28 वर्षे राज्य केले. हिम्मतसिंग यांना राणाबाबू व गुमानसिंग हे दोन पुत्र होते. त्यातील राणाबाबूचा वडलांच्या अगोदर मृत्यू झाला. त्यामुळे गुमानसिंग हा वारस ठरला. त्याने अक्राणीवर 12 वर्षे राज्य केले. गुमानसिंगनंतर कुणीही वारस नसल्याने तेथे अराजकता माजली. त्यामुळे तेथील सैन्य व नातेवाईक छोटा उदयपूरला निघून गेले.
पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असलेल्या आणि असणा-या गड-किल्ल्यांसोबतच इतर सर्व वास्तूंजवळ विभागाच्या मालकीचा ठरावीक आकाराचा आणि ठरावीक मजकूर लिहिलेला एक लाल-निळ्या रंगसंगतीत फलक असतो. खूप शोध घेऊनही तो फलक अक्राणी महलावर दिसून येत नाही. त्यामुळे वैभवशाली इतिहास आपल्या भूतकाळाच्या उदरात साचवून बसलेला अक्राणी-महल तसा अस्पर्शित राहिला आहे. या ठिकाणी राणांच्या पूर्वजांच्या समाध्याही आहेत. पुरातन बारव, अत्यंत घोटीव, घडीव दगडात साकारलेले एक सुंदर छोटसे मंदिर आहे. प्रवेशद्वारावर श्रीगणेशाची मूर्ती आहे. मंदिराखालून अखंड पाण्याचा झरा आहे. जो उन्हाळ्यातही या परिसराची तृष्णा भागवतो. हे पाणीच इथल्या आदिवासींचे जीवन आहे. या मंदिरावर ठळक अक्षरात लिहिले आहे ‘राणी काजल मंदिर’. तेथील आदिवासी मात्र ते ‘राणी का जल-मंदिर’ असल्याचे सांगतात. तर यज्ञदेवसिंग मात्र हे मंदिर त्यांची कुलदेवता कालिकामातेचे असल्याचे सांगतात व तेथे असलेल्या समाध्याही त्यांच्याच पूर्वजांच्या आहेत, याला ते दुजोरा देतात. मध्य प्रदेशमधील धर्मराय येथील सोलंकी कुटुंबाची अक्राणीला ‘खिमज माता’ ही कुलदेवता आहे. खिम म्हणजे क्षेम. परंतु तेथील मूर्ती चोरीस गेल्याचे सांगितले जाते.
अक्राणी महलात तेथील आदिवासी बांधवांना सापडलेल्या एका नाण्यावर ‘शाह’ तर दुस-यावर ‘कुतबद्दिन’ असा उल्लेख दिसून येतो. त्यावरील सन, वर्ष कापले गेले आहे. तर डॉ. नरसिंग परदेशी यांना राजस्थानातील चितोडगडच्याही अगोदरच्या आहड संस्कृतीतील एक खापराचे नाणे व दुसरे 17व्या शतकातील मेवाड संस्थानचे तांब्याचे नाणे सापडले आहे. या महलापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर शिन्दाई टेकडी आहे. या टेकडीवरून शहादा, तळोदा, नंदुरबार, अक्कलकुवा परिसराचे लोभस दर्शन होते. ही अतिउंच टेकडी म्हणजे त्या काळातील टेहळणीसाठीचा बुरुज असावा. तेथे खापराची एक चौकी असून त्यातच ‘शिन्दाई देवी’ची स्थापना केली गेली आहे. या परिसरात सध्या अस्तित्वात असलेल्या अवशेषांचे व्यापक संशोधन झाल्यास इतिहासाने दखल न घेतलेल्या महान वारशाची माहिती जगासमोर येईल. अक्राणी-महलला जाण्यासाठी तीन रस्ते आहेत. त्यातील पहिला तळोदा तालुक्यातील बोरद मार्गे 18 किलोमीटर अंतर आहे. दुसरा बंदरामार्गे जातो. हे दोन्ही रस्ते खडतर आहेत. तिसरा रस्ता धडगाव तालुक्यातील काकडदा जवळील खामला गावापासून जातो. हा रस्ता नुकताच तयार झाल्यामुळे कोणत्याही वाहनाने अक्राणी-महलला भेट देता येते. पूर्वी हा परिसर अत्यंत घनदाट जंगलांनी वेढलेला होता. फक्त घोड्यावरूनच या परिसरात दळणवळण करता येत होते. अशा या दुर्गम भागातील ही वास्तू म्हणजे एक निबिड अरण्यातील आश्चर्यच म्हणावे लागेल. परंतु पाचशे वर्षांच्या या सा-या आठवणी आपल्या अंगाखांद्यावर जोपासत बेवारस स्थितीत डोळे मिटून पडलेला अक्राणी-महल राणांच्या तीन पिढ्यांच्या शौर्यकथांची उजळणी, कुण्या राजपूत सुभेदारणीच्या स्वामीनिष्ठेचा अस्पष्ट इतिहास, अशा अनेक गोष्टी अद्यापही आपल्या काळजाच्या काजळी कोप-यात सांभाळून उभा आहे.