आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्यकन्या'तापी'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तापी. सातपुडा पर्वताच्या दक्षिणेची मोठी पश्चिमवाहिनी नदी. लांबी 702 किमी., जलवहन क्षेत्र सुमारे 65,300 चौ. किमी. पैकी महाराष्‍ट्रात हिचा मार्ग 208 किमी व जलवहन क्षेत्र 31,360 चौ. किमी. आहे. भारताच्या दख्खन पठारावरून वाहणा-या इतर सर्व मोठ्या नद्या पूर्ववाहिनी आहेत; फक्त तापी आणि नर्मदा या मात्र खचद-यांतून पश्चिमेकडे वाहतात. तापी मध्य प्रदेश, महाराष्टÑ व गुजरात या राज्यांतून वाहते. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्याच्या पठारी भागात मुलताई (मूळ तापी) येथील तलावातून तापी उगम पावते, असे मानतात.
मूळ उगम तेथून सुमारे 3 किमीवर आहे. प्रथम सपाट प्रदेशातून काही अंतर गेल्यावर ती उत्तरेस कालीभीतचे डोंगर व दक्षिणेस गाविलगड मेळघाट रांगेची शाखा यांमधील जंगलव्याप्त तीव्र उताराच्या खडकाळ निदरीत वेगाने उतरते. पश्चिमेकडे थोडे अंतर जाऊन ती नैर्ऋत्येस वळते, महाराष्‍ट्राच्या अमरावती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून 48 किमी वाहत जाते. ती तशीच पुढे मध्य प्रदेशाच्या खंडवा जिल्ह्यातून निमाड भागातून ब-हाणपूरला येते. येथे तिने 32 किमी रुंदीचे पूरमैदान बनविले आहे. मग महाराष्‍ट्राच्या जळगाव जिल्ह्यात शिरून ती भुसावळजवळ पुन्हा पश्चिमेकडे वाहू लागते. येथे रेल्वेपुलाच्या दोन्ही बाजूंस तिच्यावर दोन छोटे धबधबे आहेत. जळगाव व धुळे-नंदुरबार जिल्ह्यांच्या सुपीक प्रदेशातून जाऊन तापी नंदुरबार व तळोदे यांदरम्यानच्या गुजरातच्या चिंचोळ्या पट्ट्यात जाते व अरुंद, खडकाळ मार्गाने पठार उतरून सुरत जिल्ह्याच्या सपाट भागात येते. मांडवीवरून पुढे गेल्यावर वाघेच्या जवळ राजपीपला टेकड्याही दूर राहून ती वळणे घेत घेत सुरतेस येते. येथून 8 किमी अंतरावर ती खंबायतच्या आखातास मिळते. मुखापासून 50 किमीपर्यंत भरतीचे पाणी येते. तेथे लहान नौकांची वाहतूक चालते; परंतु ब-याच भागात गाळ साठल्यामुळे मोठी तारवे चालत नाहीत. अखेरच्या भागात तिच्या पात्रात काही बेटे बनलेली आहेत.
तापीच्या खो-याचा उत्तरेकडील भाग अरुंद आणि सातपुड्याकडे एकदम चढत गेलेला असल्यामुळे तिला उत्तरेकडून मिळणा-या नद्या लहान आहेत. तिच्या महत्त्वाच्या उपनद्या दक्षिणेकडून येणा-या पूर्णा, वाघूर, गिरणा, बोरी, पांझरा या आहेत.
पूर्णा ही सर्वांत महत्त्वाची उपनदी पूर्वेकडून गाविलगडच्या डोंगरातून निघून अमरावती, अकोला, बुलढाणा जिल्ह्यांतून जाऊन जळगाव जिल्ह्यात चांगदेव येथे तापीला मिळते. पुष्कळदा तापी-पूर्णा खोरे असा उल्लेख करतात. गिरणा, बोरी, पांझरा, बोराई या उपनद्या पश्चिमेकडून सह्याद्रीच्या उत्तर भागातून येतात. गुजरातेत राजपीपला टेकड्यांतून आलेली वारेली. ही एकच महत्त्वाची उपनदी तापीला उजवीकडून मिळते.
तापीच्या खो-यात जलोढाचा जाड थर आहे; त्याचे तापीने व तिच्या उपनद्यांनी क्षरण केल्यामुळे प्रदेशाला उत्खातभूमीचे स्वरूप आलेले ब-याच ठिकाणी दिसते. नाळी, घळ्या, काठावरील उंच उंच दरडी सर्वत्र विशेषत: पूर्व भागात दिसतात. पश्चिमेकडे गाळाचा थर जास्त विस्तृत आहे. तथापि जलरेषा बरीच खोल व अनिश्चित असल्यामुळे ज्वारी, कापूस, तेलबिया, कडधान्ये इ. कोरडवाहू पिकेच मुख्यत: होतात. दक्षिणेकडील उपनद्यांच्या खो-यात काळ्या मातीचा खोल थर असल्यामुळे खान्देश-व-हाडचा प्रसिद्ध कापूस उत्पादक प्रदेश निर्माण झाला आहे. अधिक पश्चिमेकडे सह्याद्रीचे फाटे व पावसाचे अधिक प्रमाण यांमुळे भाताचे पीक येते. गुजरातेत पूर्वेकडील 66 टक्के भाग कमी लागवडीचा, तर पश्चिमेकडील उरलेला प्रदेश सधन लागवडीचा आहे. या भागात तापीचे पात्र 500 ते 1,000 मी. रुंद होते व तिच्या तीरांवर 25 ते 55 मी. उंचीच्या दरडी आहेत. त्यांत घट्ट, पिवळसर गाळमाती, चुनखडक व सुमारे एक मीटर जाडीचा काळ्या मातीचा थर दिसतो.
तापी खो-यातील जंगलात इमारती लाकूड, जळण, बांबू, डिंक, तेंदू इ. जंगली उत्पन्ने मिळतात. वाघ, हरिण, रानडुक्कर, तरस, कोल्हा इ. वन्यपशू व अनेक जातीचे पक्षी, सर्प वगैरे आढळतात. नद्यांत व समुद्रात मासे पुरेसे मिळतात. सुरतेचे बंदर गाळाने भरून आल्यामुळे आणि मुंबईचे महत्त्व वाढल्यामुळे सुरतेला पूर्वीचे महत्त्व राहिले नाही. तापीच्या खो-यातून जाणारा सुरत-भुसावळ हा लोहमार्गही तितकासा महत्त्वाचा राहिलेला नाही. त्यापेक्षा मुंबई-नाशिक-मनमाड-भुसावळ हा मार्ग अधिक रहदारीचा व उपयुक्त झाला आहे. त्याचा जळगावच्या पूर्वेचा काही भाग काही अंशी तापी-पूर्णा खो-यातून जातो. तसेच तापी खो-यातील धुळे, जळगाव, भुसावळ, अकोला, अमरावती इ. शहरांवरून राष्‍ट्रीय महामार्ग जातात. तापी खो-यात जलसिंचनाची आवश्यकता असल्यामुळे तापीच्या उपनद्यांवर अनेक सिंचन प्रकल्प झाले आहेत. गुजरातेत सुरतपासून 80 किमी. वर उकाई येथे तापीवर धरण बांधून जलसिंचन व जलविद्युत उत्पादन केले आहे. उकाईच्या पश्चिमेस काक्रापारा येथे तापीला बांध घातला आहे.
तापीला धार्मिक महत्त्वही आहे. हिंदू पुराणांत तिचा उल्लेख ताप्ती, तापिका, तापिनी इ. नावांनी आढळतो. सूर्याने आपला दाह कमी करण्यासाठी ही नदी निर्माण केली, अशी आख्यायिका आहे. तापीच्या काठी सुमारे 180 तीर्थक्षेत्रे आहेत. त्यांपैकी तापी-गोमाई संगमावरचे प्रकाशे, पूर्णा संगमाजवळचे चांगदेव व गुजरातेतील बोधान ही विशेष प्रसिद्ध आहेत. सुरत शहर, तेथील किल्ला, थाळनेरचा किल्ला यांसही अनन्यसाधारण ऐतिहासिक महत्त्व आहे.
ranjitrajput5555@gmail.com