आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्वली भय आणि जंगलची सच्चाई !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अस्वलाने अनेकदा माणसांचा जीव घेतला असला तरी तो वाघाप्रमाणे नरभक्षक होण्याचं प्रमाण अपवादात्मकच आहे. सातपुडा-मेळघाटातील जारिदा गावात 2010मध्ये ज्याप्रमाणे एकाच वेळी चार लोकांचा जीव घेतला, त्याप्रमाणे म्हैसूरच्या जंगलात स्वातंत्र्यपूर्व काळात एका अस्वलाने 13 जणांचा जीव घेतल्याचे कॅप्टन विलियम्सनने आपल्या ‘ओरिएंटल फिल्ड स्पोर्ट्स’ या पुस्तकात लिहून ठेवले आहे. या अस्वलाला केनेथ अँडरसन नावाच्या शिकार्‍याने गोळी घालून ठार केले होते. मरण्यापूर्वी त्या अस्वलाने 23 लोकांना जखमीही केले होते. चंद्रपूरच्या जंगलातही एका अस्वलाने दोघांचा जीव घेतल्याची घटना, पन्नासच्या शतकात घडली असल्याच्या नोंदी आहेत.

साधारणत: एखाद्या घटनेमुळे चिडलेलं वा पिसाळलेलं अस्वल माणसांचे बळी घेतं, हा अनुभव आहे. मात्र ते कशामुळे चिडतं या विषयावर फार माहिती मिळत नाही. अस्वलाचा हल्ला ही सातपुड्याच्या जंगलातील नियमित घटना आहे. शेजारच्या छत्तीसगडच्या जंगलात गेल्या 20 वर्षांत 900 पेक्षा अधिक लोकांवर अस्वलाने हल्ला केल्याच्या नोंदी आहेत. अस्वलाचा, असा हा भयप्रद इतिहास असल्याने जंगलातही त्याच्या वाटेला कोणी जात नाही. एक प्रकारे अस्वलही जंगलाचा राजाच असतो. सातपुड्यातील वनक्षेत्रात अस्वलांची संख्या पाहिल्यानंतर मात्र या स्थूल, केसाळ, बेंगरुळ आणि मेळघाटातील विशिष्ट त-हेने डुलत चालणार्‍या, पण तरीही मनाला आकर्षित करणार्‍या प्राण्याविषयी अनेक गोंधळ मनामध्ये निर्माण होतात.

सातपुड्याच्या जंगल व्यवस्थापनासाठी अस्वल हा प्राणीच काहीसा अनाकलनीय आणि आव्हानात्मक बनून राहिला असला, तरी अश्मयुगापासून मानवी संस्कृतीवर आपली छाप पाडून असलेला हा प्राणी आहे. अस्वलांसंबंधी कुतूहल निर्माण होण्याचे दुसरे एक कारण थोडे विचित्रही आहे. मराठी कथा साहित्यात वन्यप्राणी आणि त्यांच्याविषयीची मानवी स्पंदने टिपणारे लेखन जवळजवळ नाही म्हणण्याएवढे दुर्मीळ आहे. दुर्गा भागवत यांनी त्यांच्या ‘अस्वल’ या पुस्तकातून अस्वलासंबंधी भू-शास्त्रीय माहितीसह, पुरातत्त्वकालीन शास्त्रीय माहिती, प्राचीन व मध्ययुगीन काळ आणि वाङ्मयातील माहिती, मानववंशशास्त्रीय माहिती पुरातत्त्वकालीन अस्वल प्रतिमांसह देऊन वेदकाळापासून अकराव्या शतकापर्यंतचा वेध घेऊन अस्वल आणि माणूस यांच्या साहचर्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता.

या पुस्तकातील ‘लोकसाहित्यातील अस्वल’ आणि ‘अनुभव व सत्यघटना’ या प्रकरणांचा अभ्यास करूनही अस्वलासंबंधीचे समज-अपसमज आणि अस्वल-माणूस यांच्या साहचर्याचा संबंध स्पष्टपणे उलगडत नाही. उलट जगात आढळणार्‍या अस्वल प्रजातींतील खास भारतीय असलेल्या ‘उर्सुस लॅबिएटस’, ‘मोलुर्सुस उर्सिनस’ उर्फ ‘स्लॉथ कृपया’ या भारतात सर्वत्र आढळणार्‍या काळ्या अस्वलांसंबंधी सर्वत्र असलेली भीतीच व्यक्त होते. प्रसिद्ध शिकारी अर्जुनसिंग याचा चुकीचा दाखला देत अनेक जण वाघाप्रमाणेच काळे अस्वलदेखील हिंस्रवृत्ती दाखवते, असे मानतात. प्रत्यक्षात, अस्वलाची वृत्ती चंचल असते. त्याची दृष्टी अधू असल्याने त्याला लांबचे दिसत नाही. त्यामुळे माणसाची दृष्टिभेट अचानक झाली की ते बावचळते. त्या वेळी ते बेताल होऊन हल्ला करते. हे वास्तव अर्जुनसिंग यांनी अधोरेखित केले होते. पण एवढाच एक दाखला अस्वलाच्या बाजूने किंवा अस्वलाला सहानुभूती देणारा दिसतो. तरीही अस्वलासंबंधी एक भीती आणि दहशत सर्वत्र आढळून येते.

सातपुड्याच्या उंच पठारावरील रस्त्यांवर आणि शासकीय उद्यानांच्याही आसपास जेव्हा ‘सायंकाळी सहा वाजल्यानंतर अस्वलापासून सावध राहा’ अशा पाट्या लावल्या गेल्या, आणि चिखलदरा परिसरातून सातत्याने अस्वलांच्या शिकारीच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या, तेव्हापासून अस्वलांविषयीचा गोंधळ अधिक वाढीस लागला. त्यात अस्वलांचे हल्ले वाढले असल्याने अस्वल आणि माणूस असा संघर्ष निर्माण होईल काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. सातपुड्यात अस्वले सर्वत्र दिसत असली तरी तोरणमाळ, पाल, अनेर, मेळघाटाच्या चिखलदरा, माखला आणि बोरखेडी अशा 2500 फूट किंवा त्यापेक्षा जास्त उंचीवरील पठारांवर अस्वलांचे प्राबल्य आणि संख्या जास्त प्रमाणात असून जांभूळ, आंबा, उंबर, वड इत्यादी फळझाडांची सहज उपलब्धता असणारी पठारीय क्षेत्रे, उन्हाळ्यासह सर्वच ऋतूत तुलनात्मकरीत्या अधिक थंड असल्याने अस्वलांची ती आश्रयस्थाने आहेत. अस्वल हा समाजशील किंवा कळप करून राहणारा प्राणी नसून तो कधी जोडीने तर कधी पिलांसोबत आढळतो.

अस्वलांच्या स्वभाव वैशिष्ट्यांनुसार त्यांची पिलेही जंगलक्षेत्रातील अत्यंत गोंधळ घालणारी, द्वाड असतात. गुरगुरणे, रेकणे किंवा डुरकणे, कर्कश किंचाळणे, चिडचिड आणि जोराने घेतल्या जाणार्‍या श्वासांचे आवाज अस्वलांचे अस्तित्व असणार्‍या जागांजवळ सहज ऐकू येतात. अस्वले ही अत्यंत कष्टाळू, मेहनती असतात. सायंकाळपासून सकाळपर्यंत वाळवीचा शोध घेण्यासाठी सातत्याने हुंगत आणि जमीन उकरत, खेकडे, वाळवीचा लाडू, पाण्यातील मासे यांचा शोध घेत हिंडताना दिसतात. अस्वलांच्या खाद्यात त्यांना आवडणारा मध हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. झाडावर चढून आडव्या फांदीवरील मधमाश्यांची पोळी (घरटी) पंज्याच्या तडाख्याने खाली पाडणे आणि त्यानंतर डुलत खाली येऊन मध आणि मधमाश्यांची अळी यांचा मनसोक्त भोग घेणे अस्वलाला अत्यंत आवडते. अस्वलांच्या खाद्यात मेळघाटात कुसुम्ब, अमलताश, गोंदण, सालई, कुंभी, बोर, आवळा, जांभळे, आंबा, उंबर, वड, कसई, चुरणी, तेंदू, गुरगुटी, रायमुनिया, चारोळी, मोह यांच्या फळफुलांचा प्रामुख्याने समावेश असतो. अस्वले झाडांच्या फळाफुलांशिवाय आणि मध, वाळवी व इतर कीटकाशिवाय काही विशिष्ट झाडांची मुळे आणि कंदही खाताना आढळली आहेत; परंतु त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

अस्वले माणसांची शत्रू आहेत काय? अस्वले पहाटे आपल्या घराकडे परतताना किंवा तिन्हीसांजेला भक्ष्य शोधण्यासाठी जंगलात जाताना माणसांवर हल्ले झाल्याची टक्केवारी सुमारे 80 टक्क्यांच्या वर आहे. यात आपल्या चारही पायांनी धडक घेतल्यागत अस्वले माणसांकडे धाव घेतात आणि जवळ येताच मागच्या दोन्ही पायांवर एकदम उभे राहून माणसांना नखांनी ओरबाडून, त्यांच्या डोक्यांना चावे घेतात.

उभे होणारे अस्वल हे सर्वसाधारण साडेचारपासून सहा फूट उंचीचे प्रचंड काळे धूड असते; त्यामुळे अस्वलांनी घेतलेले चावे आणि जखमा माणसाचे डोळे, चेहरा आणि वरच्या डोक्याच्या भागावरच असतात.

खरे म्हणजे अस्वले ही वाचाळ व गोंधळी स्वरूपाची असल्यामुळे ती चालताना आणि भक्ष्य शोधतानाही काहीतरी आवाज करीत राहतात. अशा वेळी जागरूक असला तर माणूस अंधारातही अस्वलाचे अस्तित्व जाणून घेऊ शकतो, शिवाय माणसाचे अस्तित्व अस्वलाला आधी जाणवले, तर संघर्षाचा पवित्रा घेण्यापूर्वी काढता पाय घेऊन अस्वल माणसापासून दूरही जाते. हादेखील सातपुड्यातील अनुभव आहे आणि म्हणूनच मेळघाटातील अस्वलांचे माणसांवरील हल्ले भल्या पहाटे किंवा तिन्हीसांजेला अवघड जागी आणि माणसाशी अकस्मात टकराव झाल्याच्या अपरिहार्यतेतून होत असलेल्या निष्कर्षाप्रत मेळघाट व्याघ्र प्रकल्प आला आहे.