आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranjit Rajput Article About Chikhaldara, Divya Marathi

चित्तवेधक चिखलदरा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरपूर पाऊस असूनही चिखलदर्‍याच्या एकंदर विकासात पाण्याचा तुटवडा हा फार मोठा अडथळा ब्रिटिश काळापासून तो आजपावेतो चालत आलेला आहे. त्या काळी यावर मात म्हणून, ब्रिटिशांनी काही तलावांची निर्मिती केली. कालापाणी तलाव, शक्कर तलाव, तसेच मुल्हरेन टँक म्हणजे आजचा बीर तलाव, याला खालच्या अंगाला आजही ब्रिटिशकालीन लोखंडी पाटी लागलेली आहे. या तलावातून बैलगाडीने बंगल्यांना पाण्याचा पुरवठा केला जात असे. अशातच डेप्युटी कमिशनरने हायड्रो इलेक्ट्रिक योजना राबवण्याचा प्रयोग करून बघितला; परंतु ही योजना खर्चाचा विचार करता निरुपयोगी ठरली. यावर उपाय म्हणून, दीड लाख गॅलन क्षमतेच्या दोन प्रचंड भूमिगत टाक्या बांधण्यात आल्या. यात तहसील ऑफिस आणि फॉरेस्ट ऑफिसच्या छपरावरील पावसाचं पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था केली गेली.

आजही ही ब्रिटिश वॉटर हार्वेस्टिंग स्कीम आपल्याला अप्पर प्लॅटूला बघायला मिळते. मेळघाटाचं एकंदरीत हवामान इतर सपाट प्रदेशाच्या मानाने बरचंसं भिन्न असल्याने, ब्रिटिशांनी चिखलदर्‍यात हवामानशास्त्रविषयक वेधशाळेची निर्मिती केली होती. या प्रयोगशाळेचा तीस वर्षांचा अहवाल उपलब्ध आहे. त्यात उष्ण तापमान, पाऊस, वार्‍याचा वेग, आर्द्रता यांच्या नोंदीसह इतरही भूगर्भविषयक बाबींच्या नोंदी केलेल्या आढळतात. कलकत्ता येथील जिऑलॉजिकल म्युझियममध्ये उत्कृष्ट प्रतीच्या दगडी कोळशाचा एक ब्लॉक प्रदर्शनार्थ ठेवलेला आहे. हा चिखलदरा नजीकच्या कुठल्या तरी दरीत सापडला, अशी नोंद 1881च्या ‘म्यॅनुअल ऑफ द जिऑलॉजी ऑफ इंडिया’ यात पान क्र. 331वर आढळते.

1870च्या बेरार गॅझेटियरमध्ये ‘मंजिरा’ गावाचा उल्लेख, तेथील दोन गुहेसंदर्भात आलेला आहे. आजचं किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं हे ‘मोझरी’ गाव. येथील आठ फूट उंच आणि सोळा चौरस फूट क्षेत्रफळाच्या गुहेत महादेवाचं मंदिर आहे, तर दुसर्‍या गुहेत अनेक वर्षांचा काडीकचरा साठल्याने ती पूर्णत: बंद झाली आहे. त्या काळीही या गुहेचा शोध घेण्याचे बरेच प्रयत्न झाले, तेव्हा आजच्या घडीला हा शोध परत घ्यायचा म्हटलं, तर फारच कठीण आणि साहसाचं काम ठरेल.

चिखलदरा आणि मेळघाटचं जंगल हे अतूट नातं ब्रिटिश काळापासून ते आजतागायत एकसंध राहिलेलं आहे. म्हणून चिखलदर्‍याचा इतिहास मेळघाटाविना ओकाबोका आहे. 1864-65मध्ये कर्नल पीअरसनने मेळघाटच्या जंगलाची तपासणी करून एक प्रपोजल तयार केलं, त्यानंतर 1865-66मध्ये असिस्टंट कमिशनर कॅप्टन मॅकेन्झीच्या अधिपत्याखाली फॉरेस्ट डिपार्टमेंटची विधिवत सुरुवात झाली. एडिनबर्ग स्कूल ऑफ फॉरेस्ट्रीचा प्रथम पदवीधर बॅलेंटाइन मेळघाटात रुजू झाला. 525 चौरस मैलाच्या बरागड फॉरेस्टचं सीमांकन केलं गेलं. कामाच्या दृष्टीने याचे 40 विभाग पाडले. नंतर 1876मध्ये 300 चौरस मैलाचं गुगामल फॉरेस्ट त्यात सामील केलं गेलं. 1877मध्ये सर डी ब्रँडीस यांनी संरक्षित जंगलातील अनिर्बंधित शेतीवर प्रतिबंध लादून, जंगल संरक्षणाच्या दृष्टीने पावले उचलली. 1885-86मध्ये जंगल संरक्षणाच्या दृष्टीने ‘बेरार फॉरेस्ट लॉ’ म्हणून काही कायदे बनविले गेले. 1883 ते 86 या कालावधीत ‘इंपिरियल फॉरेस्ट सर्व्हे डिपार्टमेंट’द्वारे संपूर्ण मेळघाटाचा सर्व्हे केला गेला. 1892मध्ये फ्रान्सिस डायरेक्टर ऑफ लॅण्ड रेकॉर्ड यांनी मेळघाटातील गावठाण व शेती यांचा सर्व्हे केला. 1870मध्ये वणवा प्रतिबंधक युनिटची स्थापना झाली आणि 1872मध्ये हे फायर प्रोटेक्शन युनिट संपूर्ण संरक्षित जंगलासाठी अनिवार्य करण्यात आलं.

चिखलदर्‍यातील आज जे पॉइंट्स आपण बघतो, हे सर्व ब्रिटिशांनी नामकरण केलेले आहेत. तेथवर जाण्यासाठी रस्तेसुद्धा त्यांनीच बनवलेले आहेत. इको पॉइंट म्हणजे आजच्या पंचबोलचं नाव, तेव्हा डेव्हिल्स पंचबोल; तर जनमानसातलं नाव ‘अंधेरा खोरा’ असं आढळतं. मंकी पॉइंट, बेलाव्हिस्टा पॉइंट, लाँग पॉइंट, प्रॉस्पेट पॉइंट, बॅलेंटाइन पॉइंट, लेन पॉइंट, हरीकेन पॉइंट... या पॉइंटजवळच म्हणजे, आजच्या वायरलेस सेंटरमध्ये बंगल्याचा जोता बांधलेला आढळतो. हा बंगला दोनदा बांधला गेला आणि दोनदा त्यावर वीज पडली. शेवटी ब्रिटिशांनी बंगला बांधण्याचा नाद सोडून दिला, तो विटांचा जोता आजही तेथे बघायला मिळतो. शेवटी, सातपुड्याचं नंदनवन असलेल्या चिखलदर्‍याची ही बखर संपविताना मला एका महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे; तो म्हणजे, चिखलदर्‍याला हिल स्टेशनचा दर्जा देता येईल का? चिखलदर्‍याचं ब्रिटिशकालीन वैभव परतून येईल का?