आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरण्यगर्भातील गूढरम्य नरनाळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातपुडा पर्वतराजीच्या मोठ्या पठारावर बांधण्यात आलेला अकोला जिल्ह्यातील नरनाळा किल्ला. अकोटपासून तो २२ किलोमीटरवर आहे. १४२५मध्ये अहमदशहा बहामनीने तो डागडुजी करून दुरुस्त केल्याची नोंद गॅझेटियरमध्ये असली तरी त्याची प्रथम शिळा कोणी ठेवली, याची माहिती नाही. जवळपास एक हजार वर्षांपूर्वी तो बांधण्यात आला असावा. गोंड, यादव, अहमदशहा बहामनी, रघुजी भोसले, निझाम व नंतर इंग्रजांकडे असा या किल्ल्यावर क्रमवारीने अंमल असावा, असा तेथील काही पुराव्यांवरून अंदाज येतो. जाफराबाद, नरनाळा, तेलीयागड या तीन भागांत तो विभागला गेला आहे. नरनाळा किल्ल्यावरील ३७ फूट उंचीचा महाकाली दरवाजा, भव्य असा अंबर महल, दिल्ली दरवाजा, २१ फूट लांबीची आणि दोन माणसांच्या हाताच्या कवेत न बसणारी नवगज तोफ, तेलतुपाचे टाके, अंबर महल, भव्य असा राणी महल, घोडपाग आदी वास्तूंवरील दगडातील अचंबित करणारे कोरीव शिल्प पाहून आपण थक्क होतो. किल्ल्यावर त्या काळी असलेल्या नागरी वसाहतींसाठी गडावरील तलावांना जोडण्यात आलेल्या पुरातन पाणीपुरवठा व्यवस्थेचे भग्नावशेष बघून मात्र मन सुन्न होते.

गडावर असलेल्या अरण्यात नानाविध प्रकारच्या वृक्षलता, तृणमळे आदींमुळे येथे वाघ, सांबर, सायाळ, अस्वल, विविध पक्षीकुळं आश्रयास आहेत. म्हणूनच इ. स. १९९७मध्ये ‘नरनाळा वन्यजीव अभयारण्य’ म्हणून घोषित झाले. त्यामुळे किल्ल्यावरील वन्यप्राण्यास मुक्त आश्रय मिळाला आणि किल्ल्यावरील हजार वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक वास्तूंच्या रक्षणासही मोलाची मदत झाली. नरनाळा वन्यजीव अभयारण्याच्या प्रवेशद्वारातून डांबरी रस्त्याने दोन-तीन किलोमीटर पुढे गेल्यावर रस्त्याच्या उजवीकडे एका महाप्रचंड दरवाजाचे पुसटसे दर्शन होते. जवळ जाताच त्याचा इतिहास उलगडतो. याचे नाव ‘शहानूर दरवाजा’- यालाच ‘महाकाली दरवाजा’ म्हणून ओळखले जाते. नरनाळा किल्ल्यावरील सर्वात सुंदर, आकर्षक, भव्य आणि शिल्पकारागिरीचा अतिउत्कृष्ट नमुना येथे पाहावयास मिळतो. या दरवाजाच्या कारागिरीचे निरीक्षण करणारा अचंबित झाल्याशिवाय राहत नाही. ‘महाकाली दरवाजा’ केवळ दरवाजा नसून ती एक प्रचंड इमारतच आहे. या दरवाजाचे बांधकाम हे वालुकापाषाणातील आहे.

हा संपूर्ण दरवाजा व आजूबाजूचे झरोके, खिडक्या अतिशय बारीक कलाकुसरीने सुशोभित करण्यात आले आहेत. कमळपुष्पं आणि कमलपात्राची कोरीव आणि सुबक कारागिरी थक्क करणारी आहे. दरवाजावर एकूण दोन पारशी शिलालेख कोरलेले असून एक दरवाजाच्या सर्वात वरच्या भागात, तर दुसरा प्रवेशद्वाराच्या कमानीमध्ये आहे. दरवाजाच्या आतमध्ये द्वारपालांसाठी चावड्या असून दर्शनी भागात दोन्ही बाजूस सुंदर नक्षीकाम असलेले सज्जे आहेत. येथील कुशल कारागिरी ही लाकडी कोरीव कामाला लाजवेल अशीच आहे. सज्ज्यापर्यंत पोहोचण्यास दरवाजाच्या मागील बाजूने पायर्‍या, तर समोरून सहा दगडी पायर्‍या असून त्यासमोर चौकाप्रमाणे मोकळी जागा आहे. या जागेसभोवती तिन्ही बाजूने दगडी बांधकाम असून दगडी कमानी बांधलेल्या चावड्या आहेत. यामध्ये एक भुयारी मार्ग असून त्याची दुरवस्था झाली आहे. दरवाजासमोरची म्हणजे दक्षिणेकडील भिंत बाहेरून जवळपास शंभर फूट उंच असून या भिंतीजवळून किल्ल्यावर जाणारी मुख्य डांबरी सडक जाते. महाकाली दरवाजाच्या खालील भागातील पर्शियन शिलालेखात ‘ईश्वराच्या अस्तित्वाशिवाय जीवन अपूर्ण आहे.’ या आशयाचा मजकूर दिसून येतो.

महाकाली दरवाजाचे बांधकाम फतेउल्ला इमादउलमुल्कने इ.स.१४८७मध्ये करून घेतल्याचे शिलालेखावरून स्पष्ट होते. काही आख्यायिकांनुसार या किल्ल्याच्या बांधकामाचा संबंध इलीचपूर (एलिचपूर) या ‘इल’ नावाच्या जैन राजाशी जोडला जातो. महाकाली दरवाजाची कारागिरी ही यावनी बांधणी आणि यावनी नक्षीकाम (शिल्पकला) कामाचा अत्यंत उत्तम असा नमुना आहे. सध्या या वास्तूची पडझड आणि दगडी ढिगारे, वटवाघळांचे आश्रयस्थान, त्यामुळे महाकाली दरवाजाचे अद््भुत असे सौंदर्य विलोपास चालले आहे. किमान आहे तसे सौंदर्य राखले गेले, तर पुढच्या पिढ्यांशी तो काहीतरी बोलू शकेल. गर्द वृक्षराजीने वेढले आहे. त्यामुळे असंख्य पक्षीकुळं इथे दिसून येतात. स्थलांतरित पक्ष्यांचे थवेही येथे हेमंत ऋतूत दिसून येतात. किल्ल्यातील अंबा महालाच्या पूर्वेस दक्षिण टोकावर अठरा फुटी प्रचंड तोफ इतिहासाची साक्ष देत उभी आहे. यालाच नवगजी तोफ असे म्हणतात. दोन माणसांच्या हाताच्या रिंगणातही तिची गोलाई बसत नाही. यावरून त्या तोफेची भव्यता लक्षात येते. तोफेच्या मागील भागात एका पुरातन भग्न वास्तूजवळ उंच भागावर एक सुंदर असा लोखंडी निरीक्षण मनोरा बसविला आहे. वर चढून मी सभोवताल एक नजर टाकली. पूर्व-उत्तरेकडची सातपुडा पर्वताची विस्तीर्ण रांग येथून दिसत असून जवळपास ५०-६० मैलाचा प्रदेश दृष्टीस पडतो.

नरनाळा अभयारण्यातील वन्यजीव सृष्टीचे निरीक्षण येथून सहज शक्य होते. जाफराबाद तलावाच्या डावीकडच्या काठावरच्या चिखलात सांबराचं लोटण नजरेत पडतं. शरीरात वाढलेली चरबी कमी करणे, माज येणे, शिंग घासणे इत्यादी कामासाठी सांबर असं लोटण पाणवठ्याकाठी तयार करीत असते. मग अशाच ठिकाणी व्याघ्रराज शिकारीसाठी गवतात दबा धरून बसलेले असतात. नरनाळा अभयारण्यात मण्यार, नाग, धामण, परळ इत्यादी सापांचे वास्तव्य असल्याचे कळले. जलाशय, गवती वनस्पती, वृक्षराजी आणि भग्न झालेल्या काळ्याशार शिळांच्या वास्तू, हे सर्व पोषक वातावरण या अभ्यारण्यात दिसून येतं. १२.३५ चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या नरनाळा अभयारण्याच्या व किल्ल्याच्या उत्तरेकडच्या दिल्ली गेटमधून उत्तरेकडच्या सातपुडा पर्वतराजीतील विस्तीर्ण परिसरातील शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असावे. आज या भग्न वास्तूत वटवाघळांचं(Bats) वास्तव्य असून या द्वारामधून अभयारण्यातील जैविक विविधतेचं, वन्यजिवांचं निरीक्षण केलं जातं. नरनाळा किल्ल्यावरील सर्व ऐतिहासिक वास्तूंना पुरातत्त्व खात्याने संरक्षण दिले आहे.

हजारो वर्षांपूर्वीच्या ‘मानव’ प्राण्याचा इतिहास पाहिला तर असे लक्षात येते की, सुरुवातीच्या अश्मयुगीन मानवाने पर्वतावरील दगडी गुहांमध्ये आपली आश्रयस्थानं निवडून पहिला ‘पडाव’ टाकला. अन्न म्हणून कंदमुळे आणि वन्यप्राण्यांची शिकार केली. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी भाषा म्हणून गिरीपर्वताच्या कडेकपारीत ‘गुहाचित्रे’ काढलीत. हाच खरा मानवी संस्कृतीचा उगम असावा. कालांतराने शस्त्र आणि अग्नीचा शोध लागल्यानंतर पुढे जसजशी मानवाची संख्या वाढत गेली, तसतसा भाषेचा विकास झाला असावा. त्यानंतर तो अस्तित्वासाठी हुकमत गाजवण्यासाठी राज्यसत्तेकडे वळला आणि गडांवर किल्ल्याच्या स्वरूपात प्रचंड बांधकाम करून राहू लागला. येथे माणसाच्या कलेला अधिक वाव मिळाला आणि बांधकामाच्या विशिष्ट रचनेतून, दगडांवरील कोरीव शिल्पांतून तो आपल्या संस्कृतीची छाप पाडत गेला.
ranjitrajput5555@gmail.com