आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठगांच्या इतिहासाचे वर्तमान...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवास करणार्‍यांच्या जथ्यात मिळून मिसळून त्यांचा विश्वास संपादन करायचा, सावज हेरायचं आणि योग्य वेळ साधून, ठरलेल्या एकाने परवलीच्या शब्दाची हाळी द्यायची आणि त्याच क्षणी सगळ्यांचे गळे एकसाथ रुमालांनी आवळायचे. एका वेळेला शंभरावर माणसे मारून, गाडून टाकल्याचे पुरावे मागाहून ब्रिटिश सरकारला मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. अत्यंत शिस्तबद्ध आणि चोख पद्धतीने ही सर्व कामे होत असत. कोणत्या मुक्कामावरती किती माणसे मारायची आहेत, याची पूर्वसिद्धता झाल्यावर, खड्डे खोदणारे ‘लघ्घे’ हे काम आधीच करून ठेवत असत. जेथे ही प्रेते गाडली जात, त्या जागेला ‘भिळ’ म्हणत. पुढे चौकशीदरम्यान अशा अनेक नामांकित भिळींचा शोध, सगळ्या हिंदुस्थानभर ब्रिटिश सरकाने घेतल्याचा उल्लेख आलेला आहे. कोणाकडे काय धन द्रव्य आहे? कोण कोठे जातो आहे? त्याची अंगरक्षक म्हणून किती माणसे आहेत? याची खबरबात जाणून घेण्यासाठी ‘सोदे’ असत.

हे सोदे वेष पालटून गावात जात आणि उद्या गावातून कोण असामी, कशासाठी कोठे जातो आहे? त्याच्या संगतीला कोण कोण आहेत? शस्त्रसाठा काय आहे? या सगळ्या बाबींची बारीक चौकशी करून, त्यानुसारच सगळी व्यूहरचना केली जात असे. रात्रीच्या भोजनानंतर अंमळ मनोरंजन करणारे व गाणे बजावणे करणारे स्पेशल कलाकारही ठगांच्या या टोळीत असत. कधी कधी कार्यक्रम रंगात आला, की ठरलेल्या खाणाखुणा आणि पूर्वनियोजनानुसार शमसे, भटोटी आपआपली जागा धरीत आणि त्याच क्षणी आवाज येई, या गूढ संकेताला ठगांच्या भाषेत झीरणी म्हणत असत. ‘हुक्का लाव’, ‘पान लाव’, किंवा ‘तंबाखू लाव’ बस! पडलेच समजा रुमाल गळ्यात आणि खेळ खल्लास. अत्यंत शिस्तबद्ध आणि वेळेचं काटेकोर नियोजन करूनच हा सगळा खेळ चालत असे.

देवीच्या आज्ञेनुसार ठगीच्या या खेळातून मदारी, भाट, शीख, धोबी, फकीर, नाचे, गवय्ये, तेली, लोहार, बळाई, लुळे-पांगळे, महाव्याधीने ग्रस्त, मुलं व स्त्रिया या लोकांना मारण्याचा अधिकार नसे. ठगीला निघण्यापूर्वी देवीच्या आज्ञेनुसार शकून पाहणे हे अनिवार्यच; त्याखेरीज कोणतेही काम हाती न घेण्याचा नियमच होता. कॅप्टन मेडोज टेलरजवळ अमिरअलीने या सगळ्याचे तपशीलवार वर्णन केलेले आहे. अमिरअलीने दिलेल्या माहितीवर आधारलेले ठगांच्या कार्यपद्धतीवर प्रकाशझोत टाकणारे ‘कन्फेशन्स ऑफ ए ठग’ कॅप्टन मेडोज टेलरने कालांतराने लिहिले. या सगळ्या ठगांच्या टोळ्यांच्या काही खाणाखुणा वर्तमानात सापडतात का, याचा शोध घेण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देईना. एचलापूरला आल्यानंतर अमिरअलीने बर्‍याच घटनांचा ऊहापोह केलेला आहे. तसेच काही स्थळांचाही विशिष्ट घटनासंदर्भात उल्लेख केलेला आहे. हा सगळा परिसर अमरावती जिल्ह्यातीलच असल्याने बघू या तर अमिरअली म्हणतो ते कितपत सत्य आहे, म्हणून ज्येष्ठ मित्र ज्ञानेश्वर दमाहे, प्रदीप हिरुरकर यांच्यासह संशोधनार्थ निघालो.

हैदराबादेहून परतीच्या प्रवासात नांदेड अकोलामार्गे एलिचपूर लागतं म्हणजे हल्लीचे अचलपूर. या परिसराच्या आसपास पूर्ण दिवस बरीचशी खेडीपाडी पालथी घालून, तत्कालीन भौगोलिक आधारावर चौकशी करीत करीत, संध्याकाळी आम्ही अमिरअलीने कथन केलेल्या घटनेच्या ठिकाणी पोहचलो.

अमिरअलीचा अचलपूरातला मुक्काम, सगळ्या लवाजम्यासह बाबा रहिमानशहा दुलाच्या दर्ग्यानजीक चिंचेच्या झाडाखाली होता. शहराच्या परकोटाबाहेरील या जागेवर आजही चिंचेची भरपूर झाडं आहेत. येथे ठगीच्या दृष्टीने कोणी ‘घोगे’ हाती लागतात काय, म्हणून अमिरअली आणि त्याच्या सोद्यांनी तेथे नमाजासाठी जमलेल्या मुल्लांकडे चौकशी आरंभली. कारण तत्कालीन एलिचपूर म्हणजे गर्भश्रीमंत शहर. चौकशीतून कोणी ‘सब्जिखान’ नावाचा एक नबाब, भोपाळच्या गादीवर असलेल्या आपल्या भाच्याकडे जाण्यास लवाजम्यासह उद्या पहाटेला निघणार आहे, असं कळलं. अमिरअलीने लगेचच त्याची भेट घेऊन आपली किमती तलवार त्याला नजर केली आणि त्याचा विश्वास संपादन करून घेतला. ठरलेल्या कार्यक्रमानुसार दुसर्‍या दिवशी पहाटेसच प्रवासाला सुरुवात झाली. पुढे संधी साधून येताच एका सुनसान नदीच्या पात्रात सब्जिखान आणि त्याच्या अंगरक्षक सैनिकावरती ठगांचे रुमाल पडले. क्षणार्धातच सगळं काही शांत झालं. तेव्हा सब्जिखानच्या सोबत असलेली त्याची सौंदर्यवती सेविका ‘करिमा’ आक्रोश करू लागली. सहसा स्त्रिया, लहान मुले यावरती हात टाकू नये, हा ठगांचा शिरस्ता. पण ती तर सब्जिखानच्या शोकात पागल झालेली.

अमिरअलीचा उजवा हात असलेला ‘सर्फराजखान’ याने तिला नाना परीने समजावण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. अशातच तो तिच्या सौंदर्यावर मोहित झाल्याने तिला लग्नाची गळ घालू लागला. पण ती काहीच ऐकेना. या सगळ्या प्रेतांची विल्हेवाट लावल्यानंतर सर्फराजखान आपल्या घोड्यावर पुढ्यातच तिला बसवून घेऊन बर्‍याच दूरवर तिची समजूत काढत राहिला. पण ती काहीही ऐकेना. हिला जर जिवंत ठेवली तर ही गोपनीयता भंग पावून सगळ्यांनाच फासावर लटकावे लागेल, म्हणून शेवटास मोठ्या अनिच्छेने त्या सौंदर्यवतीवर सर्फराजखानचा रुमाल पडला आणि क्षणार्धात ती गतप्राण झाली. रस्त्याच्या लगतच गडबडीने खड्डा खणून तिचा निकाल लावल्यानंतर लवाजम्यासह मुक्कामी पोहोचल्यानंतर सर्व लुटीची वाटणी केली गेली. यात सर्फराजखानच्या वाट्याला आलेलं सगळं द्रव्य त्याने साधू-फकिरांत वाटून टाकलं आणि विरक्ती आल्यागत तो वागू लागला.

जेवणखाण यावरूनच नाही तर सर्व ऐहिक सुखावरून त्याचं मन उडालं. शेवटी अंगाला भस्म फासून तो कोठेतरी निघून गेला. कित्येक दिवस त्याचा काहीही ठावठिकाणा लागला नाही. पुढे असं कळलं, की जिथे करिमेला माती दिली होती (सुपूर्दे-खाक) त्या तिच्या मजारीच्या बाजूलाच निर्मनुष्य जंगलात झोपडी बांधून तो राहू लागला. पुढे या सर्फराजखानचं काय झालं, ते त्या परवरदिगारलाच माहीत; ती माता भवानीच त्याचा प्रतिपाळ करो, असं अमिरअली पुस्तकात म्हणतो. करजगावहून पुढे निघाल्यानंतर बहीरम घाटात एक छोटंसं गाव लागतं, तिथे थोडी चौकशी करून मोटरसायकल पुढे काढली. कोठे काही दर्गा, मठ, समाधी, मजार वगैरे दिसते की काय, यासाठी नजर सतत भिरभिरत होती. पुढे काही अंतर गेल्यानंतर एक नाल्याच्या काठावर काही कबरी दिसल्या. पुढे काही अंतरावर एक दर्गा लागला. अगदी रस्त्याच्या कडेला भर जंगलात हा छोटासा खोलगट दर्गा आहे. तिथे मोरपंखाची झाडणी घेऊन फकीर बसलेला. त्याला अडवून चौकशी आरंभली. तो इतकंच बोलला, ‘‘साहेब ये करीमशा बाबा का दर्गा है और बाजू मे जो देख रहे है, ये मजार है, अनेक शागीर्द शान बाब की, मै निकलता हूं साहेब, ये जंगल में यहां कोई नही रुकता, वैसा रात को ट्रॅफिक भी कम रहता है।’’

अंगावर सरसरून काटा आला. आमचा अंदाज खरा ठरला होता. सर्फराजखान आणि करिमा ही जोडी इथेच विसावली होती. त्या मजारीवर दिवा लावून तो फकीर त्याच्या गावाकडे गेला आणि आम्ही परतीच्या प्रवासास माघारी परतलो. येताना घोड्याच्या चालीच्या अंतराचा अंदाज घेता नाल्यावरच्या कबरी म्हणजे सब्जिखान आणि त्याची माणसं ज्या जागेवर ठगांच्या रेशमी रुमालांची बनिज झाली ती हीच जागा, हे लक्षात आलं. तो आजचा नाला म्हणजे तेव्हाची नदी असावी. तिथे सब्जिखानची मोठी कबर बाजूलाच असल्याचं कळलं. आता रात्रीच्या गडद अंधारात आणि जीवघेण्या कडक थंडीत आमचं सगळं संशोधन पार थिजलं होतं. बरं झालं आजच्या या घडीला अमिरअली आणि त्याचे ते ठग नाहीत....