आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलकासची रानभूल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावतीच्या अंतर्यामातून शहराबाहेर निघणार्‍या एका उड्डाणपुलावरून गाडीने अचलपूरच्या दिशेने मार्गक्रमण केले. अचलपूर ओलांडले आणि मेळघाटी सातपुड्याच्या रानावनातून आमचा प्रवास सुरू झाला. नागमोडी वळणं, चढ-उतार यांच्या संगतीत आम्ही एका शिखरावर असलेल्या वनविश्रामगृहावर येऊन पोहोचलो. या विश्रामगृहासमोर राखीबल्डाच्या दूरवर पसरलेल्या हिरव्यागार टेकड्यांची एक छोटी माळ दिसून येते. या उंच पहाडाच्या उताराशी पुन्हा एक छोट्या टेकड्यांची गर्दी आणि गर्द हिरवे जंगल. पाचूसारखे आणि पायथ्याशी नागमोडी आकारात खळाळत वाहणारी सिपना नदी. ही सिपना जाडापाटी भागातून चंद्राकार वळण घेत राखीबल्ड्याला खेटते आणि इंग्रजी ‘एस’चा आकार घेऊन पुढे सरकते. राखीबल्ड्याच्या उजव्या हाताला सिपनेचा एक भला मोठा डोह. या डोहावरून या टेकाडाला राखीबल्डा म्हणून ओळखले जाते. राखीबल्डा आपल्याभोवती असलेल्या हिरव्याकंच वनक्षेत्राला आणि लहानमोठ्या टेकड्यांना एका छोट्याशा बेटाचे स्वरूप देतो. इथल्या आदिवासी कोरकूंच्या भाषेत रबांग आकिवर्डाचे जंगल आणि भौगोलिकदृष्ट्या याचं नाव आहे मेळघाटचं हृदयस्थान कोलकास! कवी कुसुमाग्रजांनी चंद्रकोरी वळणाच्या ज्या मेळघाटी सातपुड्यातील सिपनेचे मनभरून वर्णन केले, ती जागा कोलकास. मेळघाटातील स्वर्ग किंवा मेळघाटच्या हिरव्या पाचूतलं गर्भसौंदर्य!
दिया डोह ते राखी डोह या प्रवासात सिपना नदीला चार डोह आहेत आणि ते बारमाही भरलेले असतात. राखी डोह खोल आणि रुंद आहे, तर दिया डोह खडकाळ. राखी डोहासारखा पसरट असला तरी वेगळा. नदीच्या डाव्या काठाकडून या डोहाला उतरण्याची एक सुरक्षित वाट आहे. रुंद परंतु बांधेसूद पात्र आणि नागमोडी वळणे घेत जाणारी सिपना या संपूर्ण प्रदेशात एक सुस्मिता मुग्धा जाणवते. विशेषत: सप्टेंबर-ऑक्टोबरच्या पुढे. मेळघाटातील पिली ते केली या दोन गावांमधील पर्वत टेकड्यांतून सिपनेने केलेला संपन्न नागमोडी प्रवास आणि आपल्या दोन्ही तीरांवर उभारलेले सुमारे 10 कि. मी. अंतराचे नदी परिक्षेत्राचे एक संपन्न वनऐश्वर्य म्हणजे कोलकास.
मेळघाटात आढळणार्‍या सार्‍याच वन्यजिवांचे आणि पक्ष्यांचे कोलकास हे एक नैसर्गिक अभयारण्य आहे. एरवी मेळघाटातील वाघ दर्शनदुर्लभ असतात. परंतु सुदैवी असलात तर कोलकासच्या वनविश्रामगृहात थांबून मेळघाटाचा वाघ पाहणे सहज शक्य आहे. मेळघाटातल्या संपन्न आणि भक्कम सागवानासोबत सालई, मोईन, धावडा, हलदु, कुंकू, लेंडिया, उंबर, वड, मोह, फेफर, आंबा, बेल, कुंभी,अर्जुन आणि कितीतरी वृक्ष, स्वर्गीचा पारिजातक आणि माहुलवेल यांसारख्या अनेक वृक्षवेलींनी कोलकासचा परिसर नटलेला दिसतो आणि जागोजागी वन्यप्राण्यांच्या अस्तित्वखुणा विखुरलेल्या दिसतात.
कोलकास हे अद्यापही एक अनाघ्रात निसर्गशिल्प असले तरी मानवी उपद्रवांचा अनुभव आणि इतिहास कोलकासलाही आहे. ब्रिटिश काळात कोलकास हा एक साधा पडाव होता आणि याच काळात केव्हातरी निदान सुमारे 80-85 वर्षांपूर्वी कोलकासला वनविश्रामगृह बांधण्यात आले. कोलकासातील वृक्षतोडीसोबत कोलकासला शिकारीही सुरू झाल्या आणि मुळात कोलकास शिकारीसाठी म्हणून समोर आला. परंतु सिपनेने निर्माण केलेल्या परिसंस्थेचे आणि मेळघाटचे सामर्थ्य म्हणूनच या संपन्न वनक्षेत्राचे ऐश्वर्य कमी झाले नाही. 1935च्या सुमारास तर ब्रिटिशांनी कोलकासला ‘ढाकणा कोलकास गेम सॅन्क्च्युरी’ दर्जा देण्यात येऊन या क्षेत्रात शिकारीचे कायदेशीर परवाने देण्याची पद्धत अवलंबली. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळातही अनेक गाजलेल्या शिकारी कोलकास क्षेत्रात झाल्या आणि नामवंत लेखकांच्या शिकारकथांची प्रेरणाही कोलकासने दिली.
कोलकासची वैशिष्ट्ये जाणून घेऊन सन 1969च्या सुमारास महाराष्ट्र शासनाने या परिसराला संरक्षण देऊन ‘ढाकणा कोलकास अभयारण्याची’ निर्मिती केली आणि कोलकासचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले. पुढे कोलकास खर्‍या अर्थाने प्रसिद्धीस आले ते तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या भेटीमुळे. त्या वेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कोलकासच्या राखीबल्ड्याचे सपाटीकरण करून या टेकडीवर एक सुंदरसे वनविश्रामगृह 1970मध्ये बांधले. कोलकासच्या निसर्गशिल्पाची कल्पना या विश्रामगृहात थांबणार्‍या प्रत्येकाला यावी, ही संकल्पना डोळ्याासमोर ठेवून या विश्रामगृहाची रचना करण्यात आली. मेळघाटच्या वन्यजिवांच्या दर्शनाचा आनंद येथे घेता येतो, मात्र कोलकासचे जुने विश्रामगृह आणि नवे 1970मध्ये बांधलेले विश्रामगृह यातील कोलकासच्या जुन्या विश्रामगृहाची उपेक्षा पुष्कळ दिवस सुरू राहिली. तत्कालीन मुख्यमंत्री कै.सुधाकरराव नाईक यांच्या पुढाकाराने कोलकासच्या सौंदर्यीकरणाला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आणि तेथील ब्रिटिशकालीन जुन्या विश्रामगृहाच्या नूतनीकरणासोबत परिसराच्या सौंदर्यीकरणाचे काम करण्यात आले. पर्यटनाच्या सोयी उपलब्ध करून देतांना पर्यटकांसाठी म्हणून कोलकासचा विचार झाला. खरे म्हणजे सिपनेच्या एका विशिष्ट परिसंस्थेतला हा जंगल तुकडा अभ्यासक व संशोधकांसाठी एक अत्यंत उपयुक्त भाग आहे. वनविश्रामगृहात मेळघाटाची बरीचशी माहिती संग्रहित आहे आणि राखीबल्ड्यावरून मेळघाटातला हा हिरवा पाचू मेळघाटची अमर्याद वैशिष्ट्ये पर्यटकांसमोर मांडतो. याचे उदाहरण कविश्रेष्ठ ‘कुसुमाग्रज’ वि. वा. शिरवाडकर यांच्या 30 एप्रिल 1988रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखातच सापडते. केवळ या वनविश्रामगृहातील बागेत बसून घेतलेल्या निसर्गशिल्पाचा आस्वाद सांगताना म्हणतात की, ‘तेथील दोन दिवसांचा मुक्काम म्हणजे सर्व प्रश्नांच्या अतीत असलेल्या एका हिरव्या निरामय जगातील मुक्काम होता. पलीकडे राहिलेले विचार, विकारांचे विश्व त्या अथांग शांततेत आणि सोलीव समाधानात पार बुडून गेलेलं होतं... बागेच्या पलीकडे 100-150 फूट खोल असलेल्या दरीतून चंद्राकार वाहणारी नदी आणि ‘चहुबाजूला ओमशांती:’ मंत्राचा नादहीन उद्घोष करणारं जंगल... कोलकास कायमचं मनात राहिलं...’ प्राथमिकता वन्यजीव आणि निसर्ग संरक्षणाला असेल तरच हा परिसर अबाधित राहू शकतो, हे महत्त्वाचे!
ranjitrajput5555@gmail.com