आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranjitsingh Rajput Article On Farmer Who Allowed Experiment In His Farm

जत्र्याबाबा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेमार्फत चालणा-या नंदुरबारच्या कृषी विज्ञान केंद्राने दत्तक घेतलेल्या अनेक गावांपैकी धनाजे खुर्द हे एक गाव. या गावातील शेतक-यांशी प्रयोगांबद्दल चर्चा करायची, तर कोणी पुढे येत नसे. अशा स्थितीत साधारण 10 वर्षांपूर्वी अशिक्षित ‘जत्र्याबाबा’ पुढे आले, जोखीम पत्करून स्वत:च्या शेतात त्यांनी प्रयोग करण्यास अनुमती दिली. आज या परिसरात दिसणा-या परिवर्तनाच्या लाटेचे ते ख-या अर्थाने निर्माते-शिल्पकार ठरले.

जत्र्याबाबांची धनाजे खुर्द येथे साधारण अडीच एकरांची कोरडवाहू शेती. म्हणायला ती नदीकाठावर आहे, पण नदीला पाणी असते तरी किती दिवस? सातपुड्याच्या रांगांतील या छोट्याशा खेड्यात प्रगतीच्या पाऊलखुणा कधी उमटलेल्याच नव्हत्या. त्यामुळे ‘मागील पानावरून पुढे चालू’ अशी इथली जीवनपद्धती. जत्र्याबाबाचे आई-वडीलसुद्धा शेतीच करीत आणि तीच शेती परंपरेने जत्र्याबाबाकडे आलेली. सारा परिवारच अशिक्षित. त्यामुळे कुणाच्याही जन्मतारखेची नोंद नाही. लिंबा कुट्या पावरा आणि कालीबाई यांच्या पोटी जन्माला आलेले जत्र्याबाबा 2013मध्ये आपले वय 61 वर्षे असल्याचे सांगतात. पत्नी गुकाबाई, मुले वसंत, दिलवरसिंग, विजय, ईश्वर आणि अर्जुन, तर मुली रविबाई आणि कलिता असे हे कुटुंब. रविबाई लग्न होऊन सासरी गेलेली.

साधारण 1988-89पासून जत्र्याबाबांनी आपली शेती स्वतंत्रपणे कसण्यास सुरुवात केली. ही शेती पारंपरिक होती. दादर, हरभरा, तूर अशी पिके ते घेत. पण या शेतीला चेहरामोहरा नव्हता. बियाणे पेरणी उधळणी म्हणता येईल अशा पद्धतीची होती. कोणतीही प्रगत साधने त्यांच्याकडे नव्हती. त्या शेतीत जे पिकेल त्यात समाधान मानायचे, गरजेनुसार कोंबड्या वगैरे पाळण्याचा जोडधंदा करायचा, असा त्यांचा क्रम. हा क्रम साधारण 2003-04 पर्यंत चालला. या वर्षी काही वेगळे घडले. नंदुरबार येथे केंद्र सरकारच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेमार्फत कृषी विज्ञान केंद्राची सुरुवात झाली होती. केंद्राच्या वतीने जिल्ह्याच्या सर्वांगीण शेती विकासाचा आराखडा तयार करून त्यानुसार कार्यवाही सुरू झालेली होती. या अंतर्गत धनाजे खुर्द हे गाव या केंद्राने दत्तक घेतले होते. या गावी कामाच्या प्राथमिक पाहणीसाठी केंद्राचे पथक पोहोचले; पण या गावात नव्या तंत्राचा स्वीकार करण्यास कोणीच तयार नव्हते. योगायोगाने जत्र्याबाबांची या पथकाशी गाठभेट झाली आणि तेथून परिसरातील बदलांना प्रारंभ झाला.
त्या काळात परिसरात तुरीवर ‘केशरअळी’चा प्रादुर्भाव होत असे. शेतक-यांवर आलेले हे संकट कृषी विज्ञान केंद्रासमोर शेतक-यांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी संधी ठरणार होते. या केसाळ अळीचा प्रादुर्भाव तीन वर्षांपासून चालू होता. एका विशिष्ट गंधद्रव्याकडे केशर अळी आकर्षित होते, हे लक्षात आल्यानंतर कृत्रिम पद्धतीने तसे गंधद्रव्य तयार करून त्या सापळ्यात अळीला अडकवण्याचा प्रयोग यशस्वी झाला. या प्रयोगासाठी जत्र्याबाबांनी आपल्या शेतातील उभ्या पिकात जाण्याची परवानगी दिली. पण हे तंत्रज्ञान ग्रामीण भागापर्यंत पोहोचवायचे कसे? तोवर व्हिडिओ-सीडीचे तंत्रज्ञान सर्वत्र पसरलेले होते. केंद्राने या प्रयोगाची व्हिडिओ सीडी तयार करण्याचे ठरवले. पण मराठी किंवा हिंदीतील सीडी सामान्य आदिवासी ग्रामस्थांना कळणार कशी? त्यांच्या बोलीभाषेत ही सीडी तयार व्हायला हवी. कुंटे यांनी पुन्हा एकदा जत्र्याबाबांसमोर हा विषय ठेवला आणि त्यांनी पर्याय सुचवला. मराठीतील वाक्ये पावरी या बोलीभाषेत कशी उच्चारायची, याचे मार्गदर्शन त्यांनी केले आणि स्थानिक बोलीभाषेतून अशी सीडी तयार करण्यात, नंतर केशरअळीस आळा घालण्यात केंद्राला यश आले.

इथून जत्र्याबाबा कृषी विज्ञान केंद्राच्या अधिक संपर्कात आले. त्याच सुमारास भाभा अणुसंशोधन केंद्राच्या वतीने काही शेतीविषयक संशोधने सुरू होती. धडगाव परिसरातील हवामानाला अनुसरून चांगली वाढ होणारी आणि चांगले उत्पन्न देणारी भुईमुगाची एक जात ‘भाभा’ने विकसित केली होती. शेतीतील अल्पस्वल्प उत्पन्नात वर्ष चालविणारा हा समाज या बेभरवशाच्या पिकाची जोखीम घेण्यास तयार नव्हता. अशा पेचप्रसंगी जत्र्याबाबा पुन्हा एकदा मदतीला धावले. त्यांनी आपली एक एकर शेती या प्रयोगासाठी दिलीच; पण केंद्राच्या सूचनेनुसार पेरणी केली आणि मशागतीची काळजीही घेतली. या नव्या प्रकारच्या भुईमुगाच्या वाणाने आपला चमत्कार दाखवला आणि जत्र्याबाबांच्या पदरात भरघोस उत्पन्न टाकले.

त्या नंतरच्या काळात तिथे विविध प्रयोगांची लाटच आली. कृषी विज्ञान केंद्राने ठरवायचे आणि जत्र्याबाबांनी अमलात आणायचे, असा क्रम सुरू झाला. या घटनाक्रमात संयुक्त राष्ट्रांच्या विकास प्रकल्पांचा एक भाग म्हणून ‘यूएनडीपी’ अंतर्गत सामाजिक प्रक्रिया केंद्र (कम्युनिटी प्रोसेसिंग युनिट) धनाजे खुर्द येथे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी गावात जागा कोण देणार? इथेही जत्र्याबाबा पुढे आले. आपल्या राहत्या घराच्या अंगणातील रस्त्यालगतचा कोपरा त्यांनी या केंद्रासाठी नावावर करून दिला. हे केंद्र उभारल्यानंतर तेथे ‘भाभा’तर्फे डाळीवरील प्रक्रिया, तांदळाच्या साळीवरील प्रक्रिया, हळद किंवा इतर पदार्थांचे दळण आणि मोहफलांचे अर्क काढण्याचे यंत्र पुरवण्यात आले.
ज्या परिसरात शिक्षणाचा स्पर्श नव्हता आणि त्यामुळेच जे स्वत: अशिक्षित राहिले होते ते आदिवासी या निमित्ताने प्रगतीच्या वाटेवर येऊ लागले आहेत. या माध्यमातून विकासाची गंगा आता सातपुड्याच्या द-याखो-यातून संपन्नतेचा संदेश देत खळाळू लागली आहे.

ranjitrajput5555@gmail.com