आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साप म्हणून भुई धोपटणे (शाहू पाटोळे)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘या देशातील अल्पसंख्याकांनी देशाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हायला हवं!’ अशा प्रकारची वाक्ये दशकानुदशके ऐकायला येतात. या देशात बौद्ध, जैन, झोराष्ट्रीयन, यहुदी, शीख, अँग्लोइंडियन्स आणि मुसलमान इतक्या धर्माचे लोक अल्पसंख्याक या श्रेणीत समाविष्ट असताना; वरील वाक्य फक्त मुसलमानांसाठीच उद्देशून म्हटल्यासारखे का वाटते?
भारतात आलेल्या ब्रिटिशांनी व्यापाराबरोबरच भारतात शिक्षणाच्या विविध शास्त्र-शाखा रुजवल्या. कारण, इथल्या शिक्षणाचा त्यांच्या व्यापारवृद्धीसाठी आणि प्रशासकीय व्यवस्थापनासाठी उपयोग नव्हता, याची त्यांना जाणीव होती. ब्रिटिशांचा जम बसल्यावर ज्या एतद्देशीय व्यवस्थेनं मूळ निवासीजनांना शिक्षणाचा हक्क नाकारलेला होता, अशा वर्गासाठी परकीय संस्कृतीतील सरस्वतीने शिक्षणाची दारं किलकिली केली. फुले-शाहू-आंबेडकरांच्या वैचारिक-कृतिशीलतेमुळे या वर्गातील लोकांना शिक्षणाचं महत्त्व कळलं. बळ मिळालं. या वर्गातील पहिल्या पिढीनं शिक्षण घेताना भोगलेला त्रास आणि मानसिक यातना तेच जाणोत! अर्थात, नंतरच्या पिढ्यांनासुद्धा त्यातून अपरिहार्यपणे जावे लागले आहे. शस्त्र आणि शास्त्र बदलली म्हणून मानसिकता बदललेली नव्हती.

गावात चौथी किंवा सातवीपर्यंत शाळा असत. काही चिवट आईबापांचे चिवट जीव पास होऊन पुढच्या शिक्षणासाठी त्यांच्या गावाहून मोठ्या गावातील मोठ्या शाळेत जात. पैशांची वानवा असे. कुणाच्या तरी शेतावर राबण्यासाठी वयात आलेला कष्टकरी कमी होऊन शिक्षणाच्या ‘नादी लागलेला’ असायचा. ‘शिकून काय सगळेच बाबासायब व्हत नसत्यात!’ हे टोमणे सर्रास ऐकायला येत. शिक्षणासाठी सवलती असल्याने गुरुजनांकडून ‘आले सरकारचे जावई’ हे उघडपणे बोललेले खाली मान घालून कोडगेपणाने ऐकण्याच्या सवयी लावून घेतलेल्या होत्या. ज्या काही खासगी, सरकारी बोर्डिंग होत्या, त्यात या सगळ्यांना सामावून घेण्याची क्षमता नव्हती. बोर्डिंगात राहणारे ज्या काही ‘सोयी-सुविधा’ मिळत, त्यातच राहण्याच्या सवयी लावून घेत. सरकारी अनुदानात सगळ्यांचे हिस्से असल्याने यांच्या तक्रारींची कोण दखल घेणार? इथून पास होऊन अजून ‘पुढं-वरच्या’ शिक्षणासाठी तालुक्यांची ठिकाणं गाठली जात. इथंही तेच. सगळ्यांची राहण्याची सोय वसतिगृहात होत नसे.
मग असेच समशिक्षणेच्छू सुहृद भेटायचे. आणि मग त्या गावात राहण्यासाठी खोल्या बघणं सुरू व्हायचं. ‘खोली/खोल्या किरायाने/भाड्याने देणे आहे/आहेत’ अशी खपटं लटकविलेल्या घरांच्या कड्या वाजविल्या जायच्या. कुठल्याही वेळी जा; त्या घरमालक वा मालकिणीच्या चेहऱ्यावर अत्यंत त्रासिक भाव असत. रंग, रूप, पेहराव, भाषा यावरून हे विद्येचे उपासक ‘कोण आहेत’ हे ताडलं, तर लगेच ‘रूम गेली किंवा खोली खाली नाही’ असं अपेक्षित उत्तर मिळायचं. समजा आडनाव ‘समसामायिक’ असेल; तर गाव कोणतं? नातेवाईक कोण आहेत? त्यांची आडनावं काय? असे प्रश्न विचारून जातीचा माग काढला जायचा. थेट जात विचारण्याऐवजी ही आडवळणं खूप मानसिक छळ करायची. जात कळली की, मग नकार ठरलेलाच असायचा. किंवा मग भाडं काहीच्या बाही सांगितलं जायचं. कधी अमुक भागात तुमचे लोक आहेत; तिकडं रूम बघा, असा मानभावी सल्ला दिला जायचा.

‘उघड्यापाशी नागडं गेलं अन् सारी रात हिवानं मेलं’ या म्हणीप्रमाणे, यांच्या जातीच्या शहरातील वस्त्या तरी गावातील वस्तीपेक्षा मोठ्या असण्यापेक्षा काही फरक नव्हता. कुठल्या मंदिराच्या ओवरीत काही दिवस काढून किंवा कुणाच्या पडवीत रात्र काढून ‘वार लावून’ जेवावं, अशी ‘किंचितानुकूलस्थिती’ यांच्यासाठी नव्हती. ज्यांची रोजच्या जेवणाची भ्रांत होती; तिथं कुठले दिवस आणि वार होते? ज्या जातीच मातीत खपणाऱ्या होत्या, ते ‘जातीसाठी अजून कोणती माती खाणार होते?’ मग कुणी जुनानुभवी मुसलमानांनाही खोल्या भाड्याने देतात, अशी माहिती पुरवीत. मग हे ‘विद्यावेडे’ तिकडे मानसिक दडपणाखाली ‘विद्याशियाना’ शोधायला निघत. हे न जाणे का ‘बागवानी हिंदीत’ चौकशी करीत. समोरून मराठीत उत्तर मिळे. इथे बहुतेक आर्थिक डिल एखादी ‘बुबू’ करे. त्यांच्या माजघराला प्रायव्हसीसाठी बाहेरच्या दाराला ‘चवाळं’ लटकवलेलं असे. या मुख्य घराच्या बाहेरच्या बाजूस फळ्यांच्या वा पत्र्यांच्या भिंती असलेल्या वा तत्सम खोल्या काढलेल्या असायच्या. वर पत्रे. कुठे लाईट असायची, कुठे नाही. पण रात्री अंग टाकायला हक्काची जागा मिळायची. मग कुणी स्टोव्ह वगैरे आणून थोड्याफार भांड्याद्वारे स्वयंपाकाचे प्रयोग करायचे. मुसलमानांच्या वस्तीतलं यांचं बुजरेपण काही दिवसांत निघून जायचं. मग बुबू, चाचा आणि समवयस्कांशी ‘सलाम दुआ’ व्हायचा. खेड्यातून, तालुक्याच्या ठिकाणी मायग्रेट झालेल्या मुसलमानांकडून वागताना थोडीबहुत जातजाणीव व्हायची. पण त्यात तिकडच्यासारखी तीव्रता नसायची. दोन-तीन वर्षांत या मिश्र वस्तीत स्नेहबंध जुळायचे. कधी ईदीला वगैरे आवर्जून बोलवायचे किंवा वाढण यायचं. त्यांना यांच्या शिक्षणासाठीच्या चिवटपणाचं कौतुक वाटायचं. ते अस्पृश्यता पाळणारे नसत. स्नेहबंध वाढले, तर त्यांच्या घरात वावरताना स्पृश्य-अस्पृश्यतेची पुटं नसायची.
आज पन्नाशी-साठीत असलेल्या, शहरात जाऊन शिकलेल्या या जातीतील कित्येकांचे ऋणानुबंध आजही कायम आहेत, असतील. व्यवस्थेच्या जोखडातून बाहेर पडण्यासाठी भूस्थैर्य हवं होतं, ते नकळतपणे ज्यांनी दिलं; शिक्षण घेण्याची शाश्वतता ज्यांच्या नकळत सहकार्यामुळे कायम राहिली; ज्यांच्याशी
संवाद साधता आला; त्यांच्याशी ऋणानुबंध टिकून राहणे, हे नैसर्गिकच असते. म्हणून आजही या जाती आणि मुसलमानांचं जमतं. त्यात कुठलाही दिखावा नसतो. ही पण दोन सामाजिक गटातील सौहार्दाची अकृत्रिम प्रतीकं आहेत. बऱ्याचदा
दुसऱ्याशी परिचय करून देताना ‘अपने अजीज है!’ अशी
ओळख करून दिली जायची.
‘या देशातील अल्पसंख्याकांनी देशाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हायला हवं!’ अशा प्रकारची वाक्ये दशकानुदशके ऐकायला येतात. या देशात बौद्ध, जैन, झोराष्ट्रीयन, यहुदी, शीख, अँग्लोइंडियन्स आणि मुसलमान इतक्या धर्मांचे लोक अल्पसंख्याक या श्रेणीत समाविष्ट असताना; वरील वाक्य फक्त मुसलमानांसाठीच उद्देशून म्हटल्यासारखे का वाटते? अशी काही बीना ‘शिर-पुच्छाची’ वाक्यं उद्धृत करणाऱ्यांचा मुसलमानांशी कधीही जवळून संबंध आलेला नसतो. शिवाय अशा मंचकप्रेमी स्वल्पविचारवंतांना आणखी एक विषाद सातत्याने असतो, याची खंत वाटत असते की, पूर्वाश्रमीचे अनुसूचित जातीचे आजचे नवबौद्ध आणि उर्वरित हिंदूंमधील अनुसूचित जातीचे लोक व मुसलमान बऱ्याचदा एकत्र येतात. त्यांच्यात घडणारा सुसंवाद लगेच कसा काय सुरू होतो. अपवादानेच त्यांचे मुस्लिमांशी झगडे होतात. त्यातही धार्मिक कारणांपेक्षा स्थानिक आणि वैयक्तिक कारणं जास्त असतात. आवाहनं करून आणि दिखाव्यापुरते सामाजिक सलोख्याचे ढोल बडवून ना सुसंवाद साधला जात असतो, ना मैत्री होत असते. ते फक्त बातम्यांपुरते असते. सुसंवाद वाढून तो वृद्धिंगत होत जाणं, ही नकळत अव्याहत घडणारी प्रक्रिया असते; हे त्या मुखंडांना कोण समजावून सांगणार?
अशा शारीरिक, मानसिक खस्ता खाऊन आताशा कुठे यांची तिसरी-चौथी पिढी स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करते आहे. यांचं अजून जुनं सुटलेलं नाही. अजूनही नव्याचा ध्यास आहे. तोवरच या सामाजिक व्यवस्थेच्या रेट्यापुढे रांगणाऱ्या या जातीतील लोकांना ते उभे राहिल्याबरोबर, ‘बघा-बघा ते स्वतंत्रपणे स्वावलंबी होऊन उद्या आमची बरोबरी करतील’ असा ऊरबडवेपणा केला जात आहे. यांच्या आजच्या उभे राहण्यात, सावरण्यात थोडाबहुत मुसलमान समाजाचा पण कळत-नकळत, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा राहिलेला आहे. याची पण ‘त्यांना’ कुणीतरी माहिती करून देणे आवश्यक आहे. दोरीला बघून साप-साप म्हणून भुई धोपटणारांना खरा साप आणि दोरी यातलं अंतर दाखवून देण्याची वेळ आलेली आहे.
ता.क.- या झाल्या खस्ता खाऊन शिक्षण घेतलेल्या अनुसूचित जातींमधील शिक्षितांच्या मुसलमानांबद्दलच्या भावना. याशिवायही हे दोन सामाजिक घटक जवळ येण्याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे, मुसलमान यांचा बाट पाळत नव्हते. जवळपास समतेची वागणूक देत होते. खाद्यसंस्कृती समान नसली तरी मांसाहारात बऱ्यापैकी समानता होती. आहे. यांच्या शिक्षण घेण्याला मुसलमानांचा आक्षेप नव्हता, किंवा त्याबद्दल कटुता नव्हती. उलट सौम्य कौतुक होतं. दोन्ही समाजात श्रमिकवर्ग बहुसंख्य होता. धर्म वेगळा असला; तरी श्रमिकांच्या पातळीवरील जाणिवा आणि समाजातील सर्व सामाजिक न्यायाच्या पातळ्यांवर डावलले जात असल्याच्या भावना, या दोन्ही सामाजिक घटकांत समसमान आहेत.
बातम्या आणखी आहेत...