आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लता मंगेशकर : इतिहासाच्या पानांतून...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहिलं गाणं

लता मंगेशकरांच्या सांगण्यानुसार त्यांना पार्श्वगायनाची पहिली संधी मिळाली, ती-१९४२ मध्ये.  त्यावेळी सदाशिव नेवरेकर यांनी "किती हसाल'या मराठी चित्रपटासाठी लताबाईंचे एक गाणे रेकॉर्ड केले. मात्र, चित्रपटाच्या संकलनात ते गाणे काढून टाकले गेले. त्यामुळे दृश्य स्वरुपात आलेले "आप की सेवामें' आणि "मजबूर' या चित्रपटांतले गाणे त्यांचे प्रारंभाचे गाणे म्हणून नोंदणे भाग पडले...


अलिकडचं गाणं
प्रकृती अस्वास्थ्यामुळे  अलिकडच्या काळात लताबाईंनी गाणं थांबवलं असलं तरी २०१५ मध्ये त्यांनी `ड्यु नो वाय... ना जाने क्यों' या चित्रपटात `जीना क्या है, जाना मैने.. जब से तुम को जाना है' हे गाणं गायलं होतं. त्याच्या चार वर्षांपूर्वी म्हणजे २०११ मध्ये लताबाईंनी `सतरंगी पॅराश्यूट'या चित्रपटासाठी एक गाणं गायलं होतं. मात्र आता लताबाईंनी पुन्हा गाण्याचा निर्णय घेतला असून येत्या काही महिन्यांत त्यांचे तीन राम रक्षा स्त्रोत्र अल्बम आणि मीराबाईंच्या भजनांचे दोन अल्बम प्रसिद्ध होत आहेत.


कारकीर्दीचा प्रारंभ 
१२ डिसेंबर १९४२ या दिवशी नवयुग पिक्चर्सचा "पहिली मंगळागौर' हा चित्रपट प्रदर्शित झाला.  पुढे ६ मार्च १९४३ रोजी हा चित्रपट "रे मार्केट, पुना सिटी'या पत्त्यावर असलेल्या मिनर्वा टॉकिजमध्ये दाखवला गेला. या बोलपटात कु. लता दीनानाथ मंगेशकर वय वर्षे १४ यांनी "मन्या' या भूमिकेत पडद्यावर पदार्पण केले. तत्पूर्वी २२ नोव्हेंबर १९४२ च्या "चित्रा' साप्ताहिकात लता मंगेशकरांवर मजकूर छापून आला. त्यातले टिपण हे असे होते-"कै. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या कु. लता मंगेशकर ही अतिशय सुरेल आवाज नि अवघड मुरक्या न ताना सहजरीतीने घेणं यामुळे लोकप्रियता संपादन करील असा विश्वास वाटतो..."


एकमेवाद्वितीय लताबाई
माडगावकर हे एचएमव्हीचे एकेकाळचे ज्येष्ठ रेकॉर्डिस्ट. स्वभावाने हा अत्यंत दिलदार माणूस. गाण्याचा दर्दी भेटला की, त्याची चांदी झालीच म्हणून समजा. असेच एकदा १९६५-६६ च्या सुमारास, लताबाईंच्या गाण्यावर निस्सिम प्रेम करणारे दर्दी अभ्यासक अनंतराव सप्रे त्यांच्या काही जाणकार मित्रांसह माडगावकरांना रेकॉर्डिंग स्टुडिओत भेटायला गेले.  रेकॉर्डिंग मशीन कसे काम करते याचे साऱ्यांना कुतूहल होते, ते बघून माडगावकरांनी संबंधित मशीनजवळ सगळ्यांना नेले. म्हणाले, "या मशीनची एक खासियत आहे,  या मशीनला एक डायल आहे. तिचा काटा अतिशय सेन्सिटिव्ह आहे. गाणाऱ्या गायक अथवा गायिकेच्या आवाजातला सूक्ष्म कंप मला त्यात लगेच दिसतो. खरं तर गाणाऱ्याचा आवाज जेव्हा तार सप्तकांतल्या ष़ड्‌जाला स्थिरावतो तेव्हा हा काटा स्थिर राहायला हवा, अशी मशीन बनवणाऱ्या कंपनीची अपेक्षा होती.'  त्यावर सप्रेंनी प्रश्न केला-मग ती अपेक्षा पूर्ण करणारे किती आवाज तुम्हाला मिळाले? त्यावर माडगावकर म्हणाले, फक्त एकच, लता मंगेशकर!!! 


लता ऑन लाइन 
डॉ. मंदार बिच्चू. व्यवसायाने बालरोग तज्ज्ञ, लेखक-स्तंभलेखक वगैरे. वास्तव्य शारजाह. अरबांच्या देशात राहून हा अवलिया आस्वादक लताबाईंच्या गाण्यांवर अतोनात प्रेम करतो. त्याच प्रेमापोटी त्यांनी इंत्यभूत लता मंगेशकर जगाला कळाव्यात म्हणून २०१५मध्ये  www.lataonline.com ही वेबसाइट सुरु केली. पं. हृदयनाथ मंगेशकरांनी दुबईत झालेल्या कार्यक्रमात या वेबसाइटचं प्रकाशन केलं. त्यानंतर जगभरातल्या लाखो लताप्रेमींनी या वेबसाइटला भेट दिली. आजही देताहेत. वस्तुत: ही काही लताबाईंची अधिकृत वेबसाइट नाही. किंबहुना, तशी सूचनाही डॉ. बिच्चू यांनी वेबसाइटवर अपलोड केलेली आहे, पण आपण जणू दीदींशीच थेट संवाद साधत आहोत, अशा भावनेने चाहते अभिव्यक्त होत आहेत. कुणाला लतादीदींनी भेटायचं आहे, कुणाला प्रत्यक्ष भेटून प्रणाम करायचा आहे. द. आफ्रिकेतल्या एका गायिकेला तर दीदींच्या साथीने एक गाणंही गायचंय...


संपादिका-प्रकाशक: लता मंगेशकर
दीनानाथ मंगेशकरांनी एके काळी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबतीने एक प्रकाशन संस्था काढली होती. पण तो व्याप त्यांना पुढे आवरता घ्यावा लागला. पुढे हा वारसा लताबाईंनी चालवला. त्या प्रकाशक बनल्या. ते वर्ष होतं, १९५०. पुस्तकाचं नाव-मा. दीनानाथ स्मृतिदर्शन. संपादिका-कु. लता मंगेशकर, प्रकाशिका-कु. लता मंगेशकर, शंकरशेट मंदिर नाना चौक, ताडदेव रोड. मुंबई नं. ७...

 

(सौजन्य: स्वरप्रतिभा दिवाळी विशेष-२०१७)

बातम्या आणखी आहेत...