आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐपत आणि दानतही...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कच्छी समाजातील नरोत्तम मोरारजी यांनी सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी स्थापून स्वातंत्र्य चळवळीत आर्थिक स्वातंत्र्याच्या (इकॉनॉमिक फ्रीडम) स्वरूपात भाग घेतला. देशप्रेम, स्वातंत्र्य इ.ची शिकवण त्यांना कोण्या ऐर्‍या-गैर्‍याने दिली नव्हती. गोपाळ कृष्ण गोखले व न्या. चंदावरकर त्यांचे शिक्षक होते. जमनादास द्वारकादास व कानजी द्वारकादास हेसुद्धा सधन कच्छी भाटिया व्यापारी होते. त्यांचे वडील द्वारकादास धरमसी यांनी स्वातंत्र्यसंग्रामात उतरलेल्यांना कशी निर्भीडपणे मदत करावी, याचा त्यांच्यासमोर आदर्श घालून दिला. टिळकांना जामीन देण्यास कोणीही पुढे येत नव्हते, अशा वेळी सरकारी अधिकार्‍यांची भीती न बाळगता मोठ्या धाडसाने त्यांनी 1897-1898 या काळात टिळकांना रुपये एक लाखाचा जामीन दिला. टिळकांना जामीन दिल्यामुळे पुढे द्वारकादासना खूपच अडचणींना तोंड द्यावे लागले. जमनादास द्वारकादास गांधीजींबरोबर असत. त्यांना गांधीजींचे मानसपुत्रच म्हटले जाई. गांधीजींची मते ते जनसामान्यांपर्यंत पोहोचवत, म्हणून त्यांना गांधीजींचा ‘माऊथपीस’ म्हटले जाई. कानजी द्वारकादास ‘होमरूल’चे कार्यकर्ते होते. त्यांनी कामगारांसाठीही कार्य केले.

त्या काळी गोकुळदास तेजपाल, लक्ष्मीदास खिमजी यांनी गुजराती समाजसुधारक करसनदास मुलजी यांच्याबरोबर समाजसुधारणेचे कार्य केले. कच्छी भाटिया वल्लभाचार्यांनी सुरू केलेल्या पुष्टीमार्गाचे अनुयायी. कुठल्याही प्रकारचे उपासतापास न करता केवळ आपण बाळकृष्णाची तन-मन-धन अर्पण करून अर्चना करावी, दीन-दुबळ्यांत, रोग्यांत देव पाहून त्यांची सेवा करावी, श्रीकृष्ण म्हणजे आपल्या घरातील एक बाळच आहे, त्याला छान सुगंधी द्रव्याने न्हाऊ-माखू घालावे, ऋतुमानाप्रमाणे मलमलचे, लोकरीचे कपडे घालावेत, सुंदर-सुंदर बाळलेणी घालावीत, उत्तमोत्तम सुग्रास न्याहारी, भोजन घालावे, गोड-गोड गाणी म्हणून झोपवावे व उठवावे. अशा प्रकारे श्रीकृष्णाची ‘सेवा’ करावी, पूजा नव्हे. वल्लभाचार्यांच्या कुटुंबातील व्यक्ती त्यांच्यानंतर त्यांच्या गादीवर येत, परंतु नंतर-नंतरचे ‘महाराज’ (वल्लभाचार्यांचे वारस) श्रीकृष्णाऐवजी स्वत:कडेच भक्तांचे लक्ष वेधू लागले व नंतर नंतर तर ‘महाराज खुश तर देव खुश’ अशी चुकीची प्रथा पडू लागली. त्यातून खूप अनिष्ट गोष्टी घडू लागल्या. त्याविरुद्ध कच्छी समाजातील समाजसुधारक करसनदास मुलजी न्यायालयात गेले. त्या वेळी भाटिया शेठ गोकुळदास तेजपाल व लक्ष्मीदास खिमजी महाराजांविरोधात साक्ष देण्यास कोर्टात गेले. इतर भाटियांनी त्यांच्यावर दगडफेक केली, त्यांच्या विरोधात कोर्टाबाहेर निदर्शने केली गेली, परंतु ते साक्ष देण्यास घाबरले नाहीत. शेवटी महाराजांना त्यांच्या वागण्यात बदल करावाच लागला. इतकेच नव्हे, तर विधवा पुनर्विवाहाला गोकुळदास तेजपालांनी सक्रिय पाठिंबा दिला.

कच्छी भाटिया लोक दानशूर म्हणून ओळखले जातात. ज्या समाजात राहून आपण धन जोडले त्या समाजाचे ऋण फेडावे, गरिबांना मदत करावी, विद्यार्थ्यांना मदत करावी, या हेतूनी भाटिया धनिकांनी ‘ट्रस्ट’ स्थापले. त्यांची संख्या जवळजवळ 388 इतकी आहे. भाटिया दातृत्वाचे उत्तम उदाहरण म्हणजे ना. दा. ठा. महिला महाविद्यापीठाची स्थापना करण्यासाठी सर विठ्ठलदास ठाकरसींनी इ. स. 1916 मध्ये रुपये पंधरा लाखांची एकरकमी केलेली मदत. सर विठ्ठलदास पत्नी प्रेमलीली यांच्याबरोबर जगप्रवासास गेले होते. टोकियोला त्यांनी महिला विद्यापीठ पाहिले. त्यांच्या मनात आले, आपल्याकडे असे फक्त महिलांसाठी विद्यापीठ का नसावे? सनातनी लोक स्त्रियांना शिक्षण, उच्च शिक्षण घेण्यास बिलकुल परवानगी देत नाहीत. परिणामी जवळजवळ 50% लोकसंख्या निरक्षर, अडाणी राहते. असा समाज कधी प्रगती करू शकत नाही. स्त्रियांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे, कोणाच्यापुढे लाचारी पत्करू नये, म्हणून फक्त महिलांकरिता विद्यापीठ का असू नये, या विचारांनी दोहोंच्या मनात काहूर माजवले. म्हणूनच जपानहून मुंबई बंदरात उतरल्या उतरल्या सर विठ्ठलदासांनी पुण्याला महर्षी कर्वेंना निरोप पाठवून बोलावून घेतले, त्यांना स्वत:च्या मनातली गोष्ट सांगितली. पुढे काय झाले हे सर्वांना ज्ञात आहे. शेठ चरणदास मेघजी या भाटिया शेठनी भारतीय विद्याभवनच्या भवन्स कला विज्ञान महाविद्यालयाची मुंबईतील अंधेरी येथे स्थापना करण्यास भरघोस मदत केली. याच महाविद्यालयात भाटिया शेठ गोवर्धनदास खटाव यांनी वाचनालयात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एक मोठा हॉल-रीडिंग रूम बांधण्यासाठी रक्कम दिली व याच समाजातील कानजी खेतसी यांनी भवन्स महाविद्यालयातील संगणक विभागासाठीही मदत केली.

अशा प्रकारे हा समाज आजवर वेगवेगळ्या पद्धतीने समाजाभिमुख काम करत राहिला. भाटिया शेठ नरोत्तम मोरारजी यांनी हास्यचित्रकार (कार्टूनिस्ट) शंकर पिल्ले यांना खूप प्रोत्साहन दिले. त्यांनीच हार्मोनियमवादक गोविंदराव टेंबे यांना सर्व प्रकारची मदत केली. या समाजातील धनिक ठाकरसी, खटाव व इतरांनी महाराष्ट्रातील शिल्पकार म्हात्रे, चित्रकार देवधर, धुरंधर व इतरांना भरघोस मदत केली. हे सर्व कलावंत पुढे आपापल्या क्षेत्रात नावारूपाला आले. खटाव कुटुंबाने प्रसिद्ध शास्त्रज्ञ सर जगदीशचंद्र बोस यांना संशोधनासाठी आर्थिक साहाय्य केले. याच धनिकांनी त्रिभुवनदास के. गज्जर या रसायन शास्त्रज्ञालाही प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी घवघवीत मदत केली. पी. जे. हिंदू जिमखाना हा मुंबईतील जिमखाना याच समाजातील धनिकांच्या मदतीने उभा राहिला. सुप्रसिद्ध कॉमेंटेटर व त्याआधी भारताचे आघाडीचे फलंदाज विजय मर्चंट याच समाजातील ठाकरसी कुटुंबातील. त्याचे असे झाले, विजय ठाकरसी मुंबईतील भडी शाळेत प्रवेश घ्यायला गेला. प्रवेश देणार्‍यांनी त्याला त्याचे नाव विचारले. तो म्हणाला ‘विजय.’ त्याला पुन्हा विचारले ‘तुझे आडनाव काय?’ तो म्हणाला, ‘आम्हाला आडनाव नाही.’ ‘मग तुमचा उद्योग-धंदा काय?’ तो म्हणाला, ‘माझे वडील कापड मर्चंट आहेत.’ झाले, विजयच्या नावासमोर त्याचे आडनाव मर्चंट म्हणून लागले. जगभरात विजय मर्चंट सर्वपरिचित झाला. याच समाजातील आनंदजी डोसा क्रिकेटचे संख्याशास्त्री (Statistician) म्हणून प्रसिद्ध आहेत. आनंदजींचे बंधू म्हणजे जगप्रसिद्ध प्रागजी डोसा. बालरंगभूमीसाठीच्या त्यांच्या कार्याची दखल अमेरिकेच्या सांस्कृतिक खात्यानेही आवर्जून घेतली. त्यांच्या 75व्या वाढदिवसाच्या दिवशी अमेरिकेचा राष्ट्रध्वज ‘कॅपिटल हील’वर फडकवला. अमेरिकन सरकारने तो मानाचा ध्वज व मानपत्र डोसा यांना भेट म्हणून दिले. इंग्लड, जर्मनी, रशिया, अमेरिका, तसेच आशियाई व आफ्रिकी देशांत त्यांचे वाङ्मय खूपच नावाजले गेले. त्यांनी कथा-कादंबर्‍या, नाट्य इ.चे विपुल प्रमाणात लेखन केले. त्यांच्या लेखनावर दोन विदुषींनी प्रबंधही लिहिले. याच कच्छी समाजातील द्वारकादास संपत यांनी गुजराती सिनेसृष्टीसाठी भरीव योगदान दिले. त्यांना गुजराती सिनेसृष्टीचे दादासाहेब फाळके असे संबोधले जाते.

(10 मार्च रोजी प्रकाशित ‘समाजदान’ सदरात अनवधानाने लेखिकेचे चुकीचे छायाचित्र प्रसिद्ध झाले, त्याबद्दल क्षमस्व!)