आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझा तृतीयपंथ...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी राहुल खळदे, पुण्यात राहणारा. मला सर्व जण ‘पायल’ नावाने ओळखतात. घरामध्ये आई, वडील, बहीण व मी असं छोटंसं कुटुंब. माझी बहीण माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी. वडिलांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे घरचा सर्व भार माझ्या आईवर पडलेला. मी थोडा मोठा झाल्यानंतर, माझ्या आईने शिवणक्लास लावला. त्यानंतर क्लास करतच तिने शिवणकाम करण्यासही सुरुवात केली.

लहानपणापासून मला नटायला खूप आवडायचं. घरात कोणी नसलं, की मी साडी नेसून आरशासमोर उभं राहून नटण्याची हौस भासवून घ्यायचो. मी सात वर्षांचा असताना माझ्या एका नातेवाइकाने मला त्याच्या घरी सिनेमा पाहायला नेलं. त्याच्या घरात कोणीही नव्हतं. त्याने दार बंद केलं. आम्ही सिनेमा बघत बसलो. तेव्हा त्याने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. माझा श्वास कोंडायला लागला. मी खूप भ्यायलो, रडायला लागलो, म्हणून त्याने मला सोडून दिलं. मला खूप भीती वाटली. मी घरी जाऊन माझ्या आईला सर्व सांगितलं. माझ्या आईने नातेवाइकाला सांगितलं. खूप भांडणं झाली. तेव्हापासून माझ्या घरचे मला घराबाहेर एकट्याने जाण्यास आडकाठी आणू लागले.

त्या वेळी वर्गात मला मुलं खूप चिडवायची. त्यामुळे शाळेत जायला माझी खूप चिडचिड व्हायची. मी रस्त्याने चालत असताना वस्तीतली मुलं पाठीमागून ‘छक्का’ म्हणायची. वडील पिऊन आले की मला ‘तू घरात राहू नकोस, तू हिजडा आहेस. मला बाहेरून सर्व समजतं’, असं म्हणून शिव्या द्यायचे. त्यामुळे मला खूप एकटं एकटं वाटायचं. मी मनात म्हणे, देवा, मला आता तुझीच साथ आहे. माझी देवावर खूप श्रद्धा होती. बहीण व आई मला नेहमी साथ देत होते; पण आईला माझे हावभाव व बोलणं कळू लागल्यावर मला आईचाही त्रास सहन करावा लागत असे. आत्महत्या करावी असे वाटे.

शाळेत हुशार असूनही मला घरामध्ये बहीण सोडून कोणाचीही साथ नसे. त्यात वडिलांच्या पिण्यामुळे रोज संध्याकाळी अभ्यासाची गैरसोय होत असे. अशा वेळी मी शाळा बुडवून कुठेही जायचो व घरी कळल्यावर खूप मार बसायचा. चिडून आई मला जेवणाचा डबा देत नसे. ‘वडील पितात आणि तू या गोष्टी कर’, असं बोलून ‘मी जीव सोडते’ म्हणत असे. काकांनी मला रोज अभ्यासाला बसवून कशीबशी माझी दहावीची तयारी करवून घेतली. परीक्षेच्या काही दिवस आधी वडिलांनी भांडण करून आम्हा सर्वांना घराबाहेर काढलं. तेव्हा नापास होण्याच्या भीतीने खूप रडायचो. टेन्शन घेऊन मी आजारी पडायचो; पण मी दहावीची परीक्षा 53 टक्क्याने पास झालो.

तशातच वयाच्या सोळाव्या वर्षी माझ्या इथे राहणारे श्रीगुरू यांच्याशी माझी ओळख झाली. श्रीगुरू माझ्यासारखेच होते. त्यामुळे मी एकटाच असा बायकी नाही, हे कळलं. मी त्यांच्याकडून देवाचा (माळ परडीचा) कार्यक्रम करून घेतला. मी जोगता बनलो. माझे गुरू अतिशय मायाळू होते. मला साडी नेसण्याची इच्छा होती. मी आईचा एकुलता एक असल्याने गुरू मला खूप समजून सांगायचे की, साडी नेसू नकोस; पण माझ्यात कोणताही फरक पडला नाही. मी नटून देवाची गाणी गायला व नाचायला जाऊ लागलो. पण बसमध्ये प्रवास करायचो, तेव्हा शेजारी बसल्यावर लोक उठून जायचे. कार्यक्रमांसाठी बाहेर गेल्यावर खूप घाणेरडे अनुभव यायचे.

मुले अक्षरश: जबरदस्तीने माझ्याबरोबर शरीरसंबंध ठेवू पाहायचे. मी नकार दिल्यावर मला जबर मारहाण व्हायची. असे वाईट अनुभव येत असतानाच मी एका कंपनीमध्ये पार्ट-टाइम नोकरी करू लागलो. त्यामुळे घरच्यांना थोडा आधार वाटू लागला. काही दिवसांनी बहिणीचं लग्न ठरलं. हळूहळू माझ्या बहिणीने तिच्या नवर्‍याला कल्पना दिली. त्यांनी हे सर्व समजून घेतलं. पुढे बहिणीच्या सासरकडच्यांनी मला बोलावलं; तेव्हा मी आजारी आहे, असं सांगून जायचं टाळलं. असं दर भाऊबीजेला घडू लागलं. शेवटी जेव्हा माझ्याबद्दल सर्वांना सांगायची वेळ आली, तेव्हा माझ्या बहिणीने सासरच्या सर्व लोकांना माझ्याबद्दल सांगून मन मोकळं केलं. तेव्हा
तिच्या सासरकडच्या सर्वांनी, ‘हे आम्हाला पटत नाही. तो असा नसेल. त्याला आपण व्यवस्थित करू’, ही आशा दिली; पण ‘मी असा आहे, मी असाच राहणार’ असा जेव्हा मी हट्ट केला, तेव्हा माझ्या आईने मला घराबाहेर काढून माझे सर्व कपडे रस्त्यावर फेकले. तेव्हा कैलास नावाच्या एका व्यक्तीने मला आधार दिला.

थोड्या दिवसांनी मी हिजडा समाजाची रीत घेतली. हिजड्यात लुंगी, शर्ट, पठाणी, साडी/पंजाबी ड्रेस ही वस्त्रं घालायची पद्धत आहे. हिजडा समाजात गेल्यावर केस वाढवणं व नाक टोचणं या दोन महत्त्वाच्या गोष्टी. म्हणून मी केस वाढवणं सुरू केलं. तेव्हाही माझे गुरू मला खूप ओरडायचे; पण त्यांचं न ऐकून शेवटी मी नाक टोचलं, कारण मला पूर्ण स्त्रीसारखं राहावंसं वाटायचं. मी माझ्या गुरूंना विचारून पोटासाठी दुकानं मागायला जायला लागलो. असं करून मी त्यांच्या घरी महिन्याला काही पैसे देऊ लागलो. या गुरूंनी सतत चांगलं शिकवून आम्हाला चांगलं वळण लावलं. या प्रवासात मला अनेक तृतीयपंथी मित्र भेटले. आम्ही सर्व जण संध्याकाळी एकत्र भेटू लागलो. काही दिवसांनी माझं एका मुलावर प्रेम जडलं. पण तो गावाला जाणार आहे, हे कळताच मी आणि तो खूप रडलो. मला खूप नैराश्य आलं. काही दिवसांनी मला मिलिंद भेटला. आम्ही तृतीयपंथी भेटायचो त्या साइटवर तो समपथिक ट्रस्ट या संस्थेचा पिअर एज्युकेटर म्हणून काम करायचा. तेव्हा आम्हाला एचआयव्ही/एड्स व गुप्तरोग या विषयी माहिती नव्हती. एचआयव्ही म्हणजे काय? गुप्तरोग म्हणजे काय? ही माहिती तो द्यायचा. काही काळाने मीही पिअर एज्युकेटर म्हणून साइटवर काम करू लागलो.

याच काळात मला परिपूर्ण स्त्री व्हावंसं वाटू लागलं. माझी निर्वाणी (लिंगबदल शस्त्रक्रिया) 2010मध्ये पुण्याला एका हॉस्पिटलमध्ये झाली.

आता मी पूर्णपणे तंदुरुस्त झाले आहे. मी पंजाबी ड्रेस घालते आणि निर्वाण हिजडा म्हणून आयुष्य जगते आहे. हे आयुष्य अर्थपूर्ण व्हावं, अशी माझी मनोमन इच्छा आहे. हिजडा समाजात जागृती घडवून आणणे, हे माझे ध्येय आहे.
(टीप : या आत्मकथेत शस्त्रक्रियेनंतर स्त्रीलिंगी शब्दप्रयोग केला आहे. उदा. ‘मी पंजाबी ड्रेस घालते.’)