आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पृथ्वीवरचा नरक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आठ-नऊ वर्षांची मुलं एरवी मनसोक्त हुंदडत असतात. ती मुलं मुंबई-पुण्यातली असतील तर अवाढव्य मॉल्समधून पिझ्झा-बर्गरवर यथेच्छ ताव मारत असतात. पण, याच वयाच्या इराकी मुलांच्या हातात वजनदार मशीनगन्स असतात. या मुलांच्या डोळ्यांदेखत दिवसाढवळ्या मुडदे पडत असतात. ती एरवी अंगावर शहारे आणणारी दृश्यं पाहताना त्यांच्या डोळ्यांत भीती नव्हे एक प्रकारचे खुनशी भाव झळकत असतात...

लग्नाचे वेध लागलेल्या, सुरक्षित वातावरणात वाढलेल्या आपल्याकडच्या सर्वसाधारण मुलींचं जग फुलपंखी म्हणावं असंच असतं. मस्तपैकी मित्र-मैत्रिणीबरोबर मौज-मजा करणे, सोशल मीडियावर मुशाफिरी करणे, आपल्या मतांचा कुणाची भीडभाड न ठेवता जाहीर पुकारा करणे, हा त्यांच्या स्वच्छंद जगण्याचा एक भाग झालेला असतो. पण इराकमधल्या मोसूल प्रांतात राहणार्‍या तरुण मुलींच्या नशिबी यातलं काहीही नसतं. या मुली येणारा प्रत्येक दिवस जीव मुठीत घेऊन जगत असतात. कारण, कोणत्याही क्षणी दहशतवादी गटाचे लोक येऊन त्यांचे अपहरण करतात. त्यांचं त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न लावून शारीरिक, मानसिक छळ करतात. ‘जिहाद मॅरेज’ झालेल्या मुलींवर बलात्कार होणं ही तर तिथे खूपच नित्य बाब असते. ज्या मुली मनाने कमकुवत असतात त्या आत्महत्या करतात, पण आपल्या बहिणीवर बलात्कार होणं ही इराकी समाजात शरमेची बाब मानली जात असल्याने कित्येक मुलींचे भाऊसुद्धा आत्महत्या करून जीवनयात्रा संपवून टाकतात. अलीकडेच अशा प्रकारे एका आठवड्यात 18 स्त्रियांनी आणि त्यातल्या एकीच्या भावाने आत्महत्या केल्याचे ‘दी ऑर्गनायझेशन ऑफ विमेन्स फ्रीडम’ नावाच्या संस्थेचे म्हणणे आहे...

आपल्याकडे कायद्यापुढे सगळे समान नसले आणि पोलिस यंत्रणा भ्रष्ट आहे, असं आपण म्हणत असलो तरीही सहसा माणसाच्या आयुष्याची किंमत केली जाते. मात्र, या घटकेला सूडचक्रात भरडल्या जाणार्‍या इराकमध्ये तुमचा दोष असो वा नसो; तुम्ही गुन्हेगार असो वा नसो; विरोधी गटातले आहात, या एका ओळखीवर माणसांना ट्रकमध्ये कोंबलं जातं आणि निर्जनस्थळी नेऊन अत्यंत थंड डोक्याने शरीराची चाळणी केली जाते... तेही एकटा-दुकटा नव्हे, तर शे-पन्नास लोक एकाच वेळी मारले जातात.

तेलसंपन्न असल्याची जितकी मोठी किंमत आजवर इराकने चुकवली, तितकी क्वचितच दुसर्‍या कुणा देशाने चुकवली असेल. आज उद््ध्वस्त इराकमध्ये जे काही घडतंय, ते भारतासारख्या उदारमतवादी लोकशाही देशात मुक्तपणे वावरणार्‍यांच्या कल्पनेपलीकडचं आहे. जगण्याची शाश्वती नसणं म्हणजे काय आणि जगणं पराधीन असणं म्हणजे काय, याचा प्रत्यय आज मनाने-शरीराने खचलेली इराकमधली जनता घेतेय. बगदाद, तिक्रित, मोसूल ही शहरं इराकी लष्कर आणि ‘दि इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया’(आयएसआयएस) यांच्यातल्या वर्चस्वासाठी सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षात अक्षरश: होरपळून निघताहेत. यात अर्थातच आयएसआयएसने अमानुषतेचा कळस गाठलाय. युनायटेड नेशन्सने केलेला दावा खरा मानायचा तर इराकमधल्या दुसर्‍या क्रमांकाचे मानले जाणार्‍या मोसूल शहरातल्या जवळपास 5 लाख लोकांनी जिवाच्या भीतीने पलायन केलं आहे. आयएसआयएस ही सुन्नी मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करणारी दहशतवादी संघटना पंतप्रधान नूरी-अल-मलिकी यांचे सरकार उलथवून इराकवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. अल कायदाचं समर्थन असलेली ही 14 हजार कोटींची संपत्ती बाळगून असलेली संघटना शिया पंथाच्या (मुख्यत: इराकी लष्करातल्या आणि प्रशासनातल्या) लोकांना वेचून वेचून ठार मारण्यात सध्या आघाडीवर असल्याचं लपून राहिलेलं नाही. याच संघटनेच्या माथेफिरूंनी एकाच वेळी 1700 शिया तरुणांना ठार केल्याच्या बातम्या पसरल्या आहेत. इराकी लष्कराने आयएसआयएसचा कमांडर अब्दुल रहमान अल बेलवीला ठार मारल्याचा सूड घेण्याचे सत्र सध्या सुरू असल्याचंही अनेकांचं म्हणणं आहे. आयएसआयएसचे बुरखाधारी कमांडर इराकी लष्करातील शिया सैनिकांवर हल्ला करताहेत. हिटलरचे नाझी सैनिक ज्यूंना रेल्वेच्या डब्यात भरून जसे छळछावण्यांमध्ये नेत, त्याप्रकारे त्यांना हातपाय बांधलेल्या अवस्थेत ट्रकमध्ये भरून सद्दाम हुसेनचं जन्मठिकाण असलेल्या तिक्रित शहराच्या बाहेर नेलं जातंय. तेथे निर्दयीपणे त्यांच्या शरीरावर कॅलाशनिकोव्ह रायफलमधून गोळ्या झाडल्या जाताहेत. काहींना सद्दामच्या जुन्या राजवाड्यात नेऊन ठार केलं जातंय.

सध्या इराकमधील शियापंथीय लोक भयभीत असले तरीही यापूर्वी मोसूल शहरातल्या सुन्नी नागरिकांवर इराकी लष्करातील शियापंथीय सैनिकांनी अत्याचार केल्याच्या घटनाही नोंदल्या गेल्या आहेत. पण आता आयएसआयएसने मोसूलवर ताबा मिळवला आहे. ‘तुम्ही आजवर सेक्युलर राजवट अनुभवली, पण त्या राजवटीने तुम्हाला वेदनाच दिल्या. आता इस्लामी राजवटीची वेळ आली आहे...’ अशा प्रकारचे संदेश आयएसआयएसच्या वतीने प्रसारित केले जाताहेत. पण या संघटनेची राजवट मान्य करणे म्हणजे, मद्य आणि धूम्रपानावर स्वत:हून बंदी लादून घेणं आहे. महिलांनी सार्वजनिक ठिकाणी बुरख्यात येणं मान्य करणं आहे. चोरी करणार्‍यांच्या हातपाय छाटण्याला तसंच विवाहबाह्य संबंधात अडकणार्‍यांना दगडाने ठेचून ठार मारण्याला मान्यता देणं आहे. पण आजवर अनिर्बंध अत्याचार होत होते, आता शिया इराकी सैनिक शहरात नाहीत, हीच मोसूलमधल्या सुन्नी नागरिकांसाठी समाधानाची बाब ठरली आहे. त्याच समाधानापोटी आयएसआयएस आणि कट्टरपंथी अल कायदा या कट्टरपंथी संघटनांची हुकुमत या समाजाने मान्य केली आहे. अमेरिकेला इराकी जनतेच्या भल्यापेक्षाही तिथल्या आयएसआयएसच्या ताब्यात जाऊ पाहणार्‍या मौल्यवान तेलविहिरींशी देणंघेणं आहे. इराकी जनता जिवंत राहिली काय नि मेली काय, याच्याशी ना अमेरिकेला देणंघेणं आहे, ना विद्यमान इराक सरकारला, ना हे सरकार उलथवून देशावर ताबा मिळवू पाहणार्‍या अल कायदा पुरस्कृत आयएसआयएसला..

या साठमारीत सद्दामच्या हुकुमशाहीत राहूनही सुखाचे क्षण-दोन क्षण नशिबी आलेल्या इराकी समाजाच्या नशिबी आज मात्र सर्वार्थाने नरकयातना आल्या आहेत...