आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरखरीत ते गुळगुळीत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्क्रांतीच्या ज्या टप्प्यावर माणूस ‘सिव्हिलाइज्ड’ होऊ लागला तेथूनच दाढी करण्यासाठी अथवा ती छानपैकी कोरण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली. अर्थातच बहुसंख्य पुरुषांना दररोज अथवा आठवड्याकाठी किमान तीन-चार दिवस ज्या रेझरला हात घालावा लागतो त्याचे संदर्भ थेट त्या काळापर्यंत जाऊन भिडतात. आज अगदी पाच मिनिटांत फटाफट ‘क्लीन शेव्ह’चा जमाना असला आणि त्यासाठी थ्री अथवा फाइव्ह शेव्हिंग सर्फेस ब्लेडचे अत्याधुनिक रेझर्स उपलब्ध असले तरी कोणे एके काळी गारगोटीचे पाते, प्राणी वा माशांचे दात, काच, विविध धातूची पाती असे अनेक धारदार प्रयोग स्वत:च्याच चेह-यावर करून घेणे माणसाला भाग पडले आहे.
आपण इतर प्राण्यांहून भिन्न आणि वरचढसुद्धा आहोत हे गुहेत राहणा-या, शिकार करणा-या माणसाच्या ध्यानात आले अन् तो आपले वेगळेपण जपण्याकडे लक्ष देऊ लागला. त्यातूनच दाढी करण्याची गरज त्याला भासू लागली असावी. त्या दृष्टीने खटपट करताना प्रथम त्याच्या हाती आले गारगोटीच्या दगडाचे धारदार पाते. इसवी सनाच्या तब्बल तीस हजार वर्षे अगोदरचा पुरुष दाढी करण्यासाठी गारगोटीच्या दगडाची कड वापरत असे. एवढेच नव्हे तर या दगडाने गोंदणसुद्धा करण्याची कला त्या काळच्या मानवाला अवगत होती. काही कालावधीने तो मृत मासे अथवा प्राण्यांचे दात त्यासाठी वापरू लागला. समुद्र किंवा नदीकाठी आढळणारे मोठे शिंपले, करवंट्या हेदेखील जोखून झाले. दरम्यान, त्याच्या हाती ज्वालाकाच आली. या काचेची धार दाढी करण्यासाठी तुलनेने अधिक उपयोगी पडत असल्याचे लक्षात आल्यावर त्याने त्याच्या आधारे विविध प्रयोग सुरू केले व काचेला हँडल बसवण्याची कल्पना त्याला सुचली. ही आयडिया त्याने साकारली, ती काचेला पाटीच्या दगडाचे हँडल बसवून. अशा प्रकारे दाढीसाठीचा पहिला रेझर अथवा वस्तरा आकारास आला.
ही सगळी प्रक्रिया खूपच त्रासदायक, जिकिरीची आणि जोखमीचीही असली तरी दाढी करणे माणसाला त्याहून नक्कीच काही तरी अधिक देऊन जाणारे असणार. त्यामागचे कारण मग इतरांपेक्षा वेगळे दिसण्याचे असो अथवा चेह-याचे सौंदर्य खुलवण्याचे. कालांतराने तर दाढी हा पुरुषांसाठी व्यक्तिमत्त्व खुलवण्याचा एक भाग झाला. त्यातून मग दाढी कोरणे, तिला आकार देणे वा अगदी गुळगुळीत दाढी करणे अशा पद्धती रूढ होत गेल्या. ग्रीसमध्ये अलेक्झांडरच्या पुरुषांनी सफाचट राहण्याचा नियमच बनून गेला होता. त्याला कारण होते, ते ‘अलेक्झांडर दी ग्रेट’चे वर्तन. दाढी करण्याच्या बाबतीत तो जणू झपाटून गेला होता, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अगदी युद्धकाळात एवढेच काय, युद्धभूमीवर जातानादेखील अलेक्झांडर वेळात वेळ काढून आवर्जून दाढी करत असल्याचे दाखले आहेत. त्यामुळे तेथे दाढी करणे ही संकल्पना पुरुषांच्या सैंदर्याशी निगडित बनली अन् हळूहळू सगळीकडेच त्याचा प्रसार होत गेला. रोममध्ये त्यासाठी श्रीमंत मंडळी आपल्या पदरी कुशल कारागीर बाळगू लागली. या सगळ्या खटाटोपात दाढी करण्यासाठी वापरावयाचे साधन अथवा उपकरण अधिकाधिक उपयोगी कसे बनेल, त्या दृष्टीने हालचाली सुरूझाल्या. धातूचा शोध लागल्यावर प्रथम काशाचे पाते दाढीसाठी वापरले जाऊ लागले. नंतर पात्यासाठी पोलादाचा उपयोग सुरू झाला आणि सरळसोट पात्याचा वस्तरा लोकप्रिय होऊ लागला. कारण तोपर्यंत माणसाच्या हाती धारेचा दगडसुद्धा आला होता. त्यावर घासून पात्याला धार काढणे सोयीचे झाले आणि वस्त-याचा बोलबाला सर्वत्र झाला.
इ.स. 1500 ते 1700 टोकाकडे पाते अधिक जाड असलेला अगदी एका रेषेतला सरळ असा वस्तरा बनायचा. त्याचे हँडल शिंग, लाकूड अथवा हस्तिदंताचे असे. पण, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन आणून वस्तरा अधिक प्रभावी बनवण्याचे श्रेय ब-याच अंशी दिले जाते बेंजामिन हट्समनला. इंग्लंडमधल्या शेफिल्ड येथे कटलरी उद्योग भरभराटीस येत असताना हट्समनने पात्यांची रेखागणिती रचना करून ती अधिक धारदार कशी होतील हे पाहिले. कालांतराने वस्त-याच्या पात्यासाठी सिल्व्हर स्टीलचा वापर सुरू झाला आणि ते एकदम चकचकीत बनून गेले. शिवाय, त्याची धार जास्त काळ टिकू लागली आणि मजबुतीसुद्धा वाढली. मग वस्त-याला पोकळ खाचा ठेवणे, डबल व्हील ग्राइंडर लावणे अशा सुधारणा होत गेल्या. तो जरा छोटा झाला, पात्याला शोल्डर आले, आकार जरासा वक्राकार झाला आणि वस्त-याला साधारणपणे आजच्यासारखे स्वरूप प्राप्त झाले.
जगभरात सर्वत्र या क्षेत्रात अशी स्थित्यंतरे होत असताना भारत त्यात मागे कसा राहील? आपल्याकडेसुद्धा पूर्वापार दाढी करणे वा दाढी-मिश्यांना व्यवस्थित आकार देण्याची परंपरा रूढ झाली होती. एवढेच नव्हे तर, बलुतेदारी पद्धतीमध्ये त्याला एक कुशल व्यवसाय म्हणून मान्यतादेखील मिळाली होती. सरळ पात्याचा वस्तरा भारतात प्रदीर्घ काळापासून वापरात आहे. पोलादी पात्याचा हा वस्तरा विशिष्ट प्रकारच्या दगडावर म्हणजेच शिळेवर घासून त्याला धार काढली जाई. ते एक प्रकारचे तंत्रच असल्याने सर्वांना तितक्याशा सफाईने ते जमायचे नाही. दगडावर पाणी टाकून त्यावर वस्त-याचे हे पाते विशिष्ट पद्धतीने घासले जात असे. त्यानंतर उभ्या चामडी पट्ट्यावर तो घासला जाई. कारण धार लावण्याच्या प्रक्रियेत जे बारीक कण टोकाला चिकटत ते त्यामुळे निघून जात. घाईगडबडीच्या प्रसंगी धार लावण्यात वेळ जाऊ नये म्हणून, ब-याचदा दोन वा चार वस्तरे तयार ठेवावे लागत. हा वस्तरा चालवणे म्हणजे बरेच कौशल्याचे काम होते. तो चालवताना इजा होणार नाही, याची काळजी घेण्याबरोबरच विशेषत: मिश्यांची ठेवण तसूभरही इकडेतिकडे जाणार नाही याची दक्षता घ्यावी लागे. कारण आपल्यासारख्या विविधतेने नटलेल्या देशात व्यवसाय आणि विशेषत: जात वा विशिष्ट समूहाशी मिश्यांची ठेवण निगडीत असे. त्यामुळे प्रथमदर्शनीच संबंधिताविषयी काही बाबी ज्ञात होत असत. पण, कालौघात आपल्याकडे हा ट्रेंड कमी होत गेला आणि दुसरीकडे स्टीलच्या ब्लेडची पाती बसविता वा काढता येतील असे पोकळ खाचेचे वस्तरे आले. दरम्यान, आधुनिक तंत्रज्ञानाने हे क्षेत्रसुद्धा व्यापून टाकले. सुलभपणे कुणालाही हाताळता येईल असे यूजर फ्रेंडली असलेले ‘सेफ्टी रेझर्स’ उपलब्ध झाले.
‘जिलेट’ कंपनीने त्याचे पेटंट घेतले आणि आक्रमक पद्धतीने प्रचार प्रसार सुरू केला. वापरण्यास सोपा, अत्यंत चांगली धार असलेला आणि मुख्य म्हणजे कौशल्याची गरज नसलेला हा रेझर कुणीही वापरू लागला. या युटिलिटीमुळे ती जणू निकडीची वस्तू बनून गेली आणि घराघरात रेझर दिसू लागले. अलीकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाला आर अँड डी म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंटची जोड मिळाली व रेझरमधल्या ब्लेडच्या अँगलवर भर दिला जाऊ लागला. त्यातूनच आताची थ्री वा फाइव्ह ब्लेड शेव्हिंग सर्फेसची रेझर्स विकसित झाली. महिनाभर एकच ब्लेड उपयोगात येऊ लागले व दाढी करण्याची प्रक्रिया अत्यंत कमी त्रासाची झाली. सध्या तर इलेक्ट्रिक शेव्हर्स, हेअर रिमूव्हर साबण वा क्रीम्सही बाजारात ब-यापैकी उपलब्ध आहेत. पण, या सगळ्या आधुनिक उपकरणांमध्ये गालावरून हलक्या हाताने वस्तरा फिरवण्यातली गंमत मात्र हरवत चालली आहे...
abhikul10@gmail.com