आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेक सावित्रीची...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला यायचं आणि ज्या लोकांच्या हाता तोंडाची गाठ पडत नाही, अशा लोकांसाठी जीवन वाहून घ्यायचं. आयुष्याच्या उतारवयात त्यांच्यासाठीच एक ज्ञानयज्ञ निर्माण करण्याचं स्वप्न पाहायचं... ही बाब या काळालाही हलवून सोडणारी आहे. अलका भडके या सावित्रीच्या लेकीने हे साध्य करून दाखवलं आहे...

औरंगाबाद शहरातल्या बन्सीलाल नगरची निस्तेज चेहऱ्यांच्या गरीबाघरच्या मुलांची मनपा शाळा. रंग उदास झालेली, पापुद्रे उडालेली, खिडक्यांच्या काचा तुटलेली... पण या शाळेत एक गोष्ट मात्र वेगळी आहे, ती म्हणजे, या शाळेत जिवंत काळजाची एक मुख्यध्यापिका आहे. जी शाळा टिकावी, मुलं शिकावीत, म्हणून कधी गोरगरिबांच्या वस्तीत जाते, कधी भटक्या विमुक्तांच्या पालावर, तर कधी मागासवर्गीयांच्या घरदारात फिरून पोरं गोळा करते, त्यांना शाळेत आणते, त्यांना नवे कपडे देते, जेवायला देते, येण्या-जाण्यासाठी पैसे देते. आणि महत्त्वाचं म्हणजे जीव तोडून शिकवते... दर महिन्याला पगारातली निम्म्याहून अधिक रक्कम खर्च करते... आजच्या युगातली ही नवदुर्गा आहे, सवित्रीचा वारसा चालवणारी. तिचं नाव आहे, अलका जनार्धन भडके...

मूळची उस्मानाबाद जिल्ह्यातल्या, भूम तालुक्यातील सुकटा या गावाची. माहेर याच तालुक्यातलं, पाथरूड हे गाव, बाप दादासाहेब बोराडे भलताच तालेवार माणूस. शंभर एकर जमीन. जुन्या काळातले दीडशे हातमाग, फर्निचरचा व्यवसाय. जिल्हा बँकेवर सलग ४० वर्षे संचालक, घरदारात सुखाचा झिम्मा. मात्र, ज्या काळात पोरीबळींना शाळेचं तोंडही पाहायला मिळायचं नाही, त्या काळात अनिताच्या ( अलका भडके यांचे हे माहेरचे नाव) बापाने तिला दहावीपर्यंत शिकवलं.पण दुर्दैव असं की, १९७८ ला दहावीची परीक्षा दिल्याच्या १५ व्या दिवशीच तिचं लग्न लावून दिलं. औरंगाबाद महापालिकेत उद्यान अधीक्षक अशा मोठ्या हुद्यावर असलेल्या जनार्धन भडके या एका तालेवार बापाच्या पोराशी. सासरेही गर्भश्रीमंत घरी सव्वाशे एकर जमीन, दूध संघावर तब्बल पन्नास वर्षे अनभिषिक्त सत्ता. नवऱ्यासोबत वरात औरंगाबादला आली. तिकडे दहावीचा निकाल लागला. अनिता बोर्डात पहिली अाली होती. पण नवऱ्याचा दंडक शिकायचं नाही. नोकरी करायची नाही... मग ही बाई शिक्षक होण्याच्या इर्षेने दरवर्षी डीएडचा फॉर्म भरत राहिली. औरंगबादच्या महिला कॉलेजला दरवर्षी मेरिट मध्ये तिचा नंबर लागत राहिला. असं एकदोन वर्षे नाही, तर तब्बल पाच वर्षे घडत राहिलं... पण पाचव्या वर्षी या मानी बाईनं नवऱ्याला न सांगताच, डीएडला प्रवेश घेतला. नवऱ्याची नजर चुकवून आठ दिवस कॉलेजही केलं. आठ दिवसानंतर नवऱ्याला कळलं, पण वैतागून त्यानेही शेवटी दुर्लक्ष केलं. परीक्षेचा निकाल लागला, तेव्हा ही बाई तिथेही बोर्डात पहिली आलेली. आनंद गगनात मावेनासा झाला, पण तोही क्षणिक. कारण पुन्हा घरचा दंडक, कॉलेज झालं पुरे झालं, आता नोकरी करायची नाही.

पुन्हा या बाईला आपल्या स्वप्नांची रांगोळी हवेत उधळावी लागली. पण तिने हट्ट काही सोडला नाही. एक दिवस १९८९ मध्ये नवऱ्याने नोकरी करायची परवानगी दिली. शिक्षक व्हायचं स्वप्न उराशी बाळगणारी ही ‘सावित्रीची लेक’ अखेर जिल्हा परिषदेच्या शाळेत रुजू झाली. जिल्हा परिषदेच्या शाळेतून महापालिकेच्या शाळेत बदली करून घेतली आणि १९८९ पासून ते आजतागायत गेली, अनिता भडके ज्ञानदानाचं कार्य करत आहेत.

गेल्या २९ वर्षांत शिक्षकी पेशाच्या काळात अलका भडके  यांनी किती आणि कसं जीवाचं रान केलं, याचे किस्से थक्क करणारे आहेत. भडके यांची मनपा हद्दीबाहेर कंचनवाडीच्या मनपा शाळेत बदली झाली. या शाळेत फक्त शे- सव्वाशे मुलं होती. गावात   शाळाबाह्य मुलांचं प्रमाण खूप जास्त होतं. ही सगळी मुलं गरीब भटक्यांची, औद्योगिक मजुरांची. भडकेंनीही सगळी मुलं शाळेत आणायचं ठरवलं, मुलांना शिकवण्याची पद्धत बदलली. तसे करताना वर्गातली छडी फेकून दिली. पदरखर्च करून चित्रं आणली. त्याद्वारे मुलांना गाणी, कविता, कथा, गोष्टी असं करत शिकवायला सुरुवात केली. गावात मुलांच्या कानगोष्टी होऊन शाळेत तुडुंब गर्दी झाली. मुलांना वारांड्यातसुद्धा जागा पुरेनाशी झाली. भडकेंनी तात्काळ महापालिकेला वर्ग खोल्या आणि शिक्षक वाढवण्याची विनंती केली. पण या चतुर यंत्रणेने त्याच महिन्यात त्यांची दुसऱ्या शाळेत बदली केली. बदली झाल्याचं कळताच गावकऱ्यांनी बदली रद्द करण्यासाठी शाळेला कुलूप ठोकलं आंदोलनही सुरू केलं... पण बेफिकीर महापालिकेने बदली रद्द केलीच नाही.

पुढे भडके बन्सीलाल नगरच्या मनपा शाळेत रुजू झाल्या. ही शहरातल्या उच्चभ्रू वस्तीतली विद्यार्थ्यांंअभावी ओस पडत चाललेली शाळी. वस्तीतली सगळी मुलं महागड्या इंग्लिश स्कूलमध्ये जाणारी. पण शिक्षकी पेशा हाडांत भिनलेल्या या बाईने शाळा नेटाने चालवायचा निर्णय घेतला. वस्त्या, पालवर फिरून भटक्या विमुक्तांची, दलितांची, गरिबांची, मुस्लिमांची, शाळा सुटलेली, शाळेत न जाणारी अशी सगळी मुलं गोळा केली. शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना गोळा करून दर महिन्याला पगारातून वर्गणी करायचं ठरवलं, आणि त्यातून त्यांनी या मुलांना येण्याजाण्यासाठी वाहनांची सोय सुरू केली. आज या शाळेत शिक्षकांच्या वर्गणीवर, ३० सीट असलेली बस, एक १८ सीट असलेली व्हॅन आणि सहा-सहा सीट असलेल्या दोन रिक्षा इतकी वाहनं सुरू आहेत. थोडं जवळ राहणाऱ्या मुलांना शाळेने सायकली घेऊन दिल्या आहेत. पोरं गरिबांची असल्याने या शाळेतल्या दुपारच्या खिचडीची सोय उत्तम असते. मुलांचा शिकण्याचा रस टिकवण्यासाठी शाळेत कधी जांभळ, बोरं, पेरू, केळं अशी फळ वाटली जातात, शाळेतल्या प्रत्येक मुलाशी भडके व्यक्तिशः बोलतात. कुणी शाळेत आला नाही, तर त्याच्या घरी जाऊन चौकशी करतात. तो मुलगा जर रोजंदारीवर जात असेल, तर त्याच्या घरची रेशनपाण्याची अडचण दूर करून त्याला पुन्हा शाळेत घेऊन येतात. शाळेत शिक्षकांच्या मोटारसायकल मध्ये स्वतः पेट्रोल टाकून शाळेत न येणाऱ्या मुलांना आणायला घरी पाठवतात... 

उन्हाळ्यात या शाळेत दहावीचे क्लासेस सुरू असतात, उन्हाळा असल्यामुळे शाळेतली खिचडी बंद असते. यामुळे मुलांच्या संख्येवर परिणाम होतो. म्हणून या भडके पदर खर्चाने या दहावीच्या मुलांसाठी उन्हाळ्यात जेवणाची सोय करतात. यावर त्या म्हणतात, "दहावी हा मुलांसाठी टर्निंग पॉईंट असतो. ते दहावी पास झाले, तर चांगल्याच मार्गाला लागतात आणि जर दहावी नापास झाले, तर ते आपसूक गुन्हेगारीकडे वळतात. त्यामुळे मी हरएक प्रयत्न करून ही मुलं दहावी कशी पास होतील, यासाठी प्रयत्न करते. उन्हाळी क्लासेसमध्ये कुठे सुट्ट्यांवर न जाता मी मुलांबरोब राहते’.

 विचार इतके सखोल आणि दूरगामी असल्यामुळेच या शाळेची १०० टक्के निकालाची परंपरा कायम आहे. आज या शाळेत ४४७ मुलं आहेत आणि यातली अनेक मुलं नऊ-दहा किलोमीटरपेक्षाही जास्त अंतरावरून शाळेत येताहेत. याच शाळेत परमेश्वर जाधव हा नाथगोंधळी या भटक्या समाजातला सहावीत शिकणारा एक विद्यार्थी आहे. सध्या त्याचा घराण्यातल्या सहावीत गेलेला पहिला मुलगा आहे. तोसुद्धा सांगत होता. की, "मी इथवर शिकू शकलो, ते फक्त मॅडम होत्या म्हणून,’
पण अलका भडके आता निवृत्तीच्या जवळ आल्या आहेत. पुढे काय? या प्रश्नावर त्यांनी उत्तर शोधून ठेवलंय, त्या म्हणतात, "रिटायरमेंटनंतर मला एक शाळा सुरू करायची आहे. जिथं गरीब-श्रीमंत, असा मेळ असणार आहे. त्या शाळेत श्रीमंतांना फी असणार आणि गरिबांना मोफत शिक्षण देणार’ या शाळेसाठी भडके तीस वर्षांपूर्वी अर्धा एकर जमीन घेऊन ठेवलीय, महिन्याला शंभर रुपये असे करून, त्यांनी या जागेचे पैसे फेडलेत, रिटायर झाल्यानंतर त्या येणाऱ्या पेन्शनमधून शाळा निर्मितीचा खर्च भागवणार आहेत. तर गावाकडची दोन एकर शेती विकून शाळेची इमारत उभारणार आहेत. या शाळेत गरिबांच्या मुलांसाठी राहण्याचीही सुविधा असणार आहे. 

सगळीकडे शिक्षणाचं बाजारीकरण सुरू असताना या अलका भडके गरिबांसाठी असा एक ज्ञानयज्ञ उभारण्याचा मनोदय बाळगून आहेत. त्यांनी आजवर बीए, बीएड, एमए, एमड, आणि  एम.फील पूर्ण केलंय, काही दिवसांनंतर, त्या शिक्षणशास्त्रात पीएच. डी करणार आहेत. 

ज्या मुलीचं दहावी झाल्यानंतर पंधराव्या दिवशी लग्न होतं, बोर्डात पहिला क्रमांक येऊन डीएड करायला पाच वर्षे लागतात, डीएडला प्रथम येऊन नोकरी करायला पुढची पाच वर्षे जातात. तीच मुलगी शिक्षकी पेशात आदर्श निर्माण करते. हा प्रवास खरंच थक्क करून सोडणारा आहे. 
 
- दत्ता कानवटे
लेखकाचा संपर्क : ९९७५३०६००१
बातम्या आणखी आहेत...