आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीतले माझे दशावतार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओतूरसारख्या लहानशा गावातून पुण्यात मॉडर्न हायस्कूलला शिकायला यायचं आणि तिथं वसतिगृहात राहायचं, ही माझ्या दृष्टीनं मोठी बाब होती. तिथं राहताना पदोपदी गावाची आणि शहराची तुलना व्हायची. माझ्या गावंढळपणावरून, आडनावावरून माझी चेष्टा व्हायची. त्यातच मी ज्यांच्या संगतीत होतो, ती सारी अट्टल पोरं होती. त्यांनी आधी मला भरपूर छळलं. नंतर मी एकदा रुळल्यावर त्यांच्या संगतीनं मीसुद्धा इतरांना छळू लागलो. रेक्टरला सतावण्यात सारेच पुढे असायचे. त्यातही देशपांडे नावाचे एक असिस्टंट होते. त्यांचं वागणं, बोलणं, चालणं सारं बुळचट असल्यानं आम्ही सारे त्यांना बुळ्या म्हणायचो. मेसमध्ये आम्ही त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या शर्टावर वरण शिंपायचो. त्यामुळे सगळीकडे पांढरेशुभ्र असलेले त्यांचे शर्ट खाली कायम हळदीच्या रंगात रंगलेले असायचे. आमच्या खोलीत एक गुप्ते नावाचा बायकी वळणाचा मुलगा होता. एकदा आम्ही त्याची मेडिकल करायची ठरवली. माझे वडील डॉक्टर असल्याने इथं माझ्याकडे डॉक्टरकीचं काम आलं. मीही मला महत्त्व मिळाल्यामुळे फुशारलो होतो.

एका मुलाची मेडिकल केल्यावर मी गुप्तेकडे वळलो. त्याला त्याची पँट सोडायला सांगितली; पण तो रडायलाच लागला. त्याची ती अवस्था पाहून मी बराच काळ स्वतःच्या नजरेला नजर देऊ शकलो नाही. खोलीतच एक मांढरे नावाचा दांडगट पोरगा होता. तो कायम आमच्या खोड्या काढायचा. एकदा तो गावी गेला असताना आम्ही त्याची गादी उस्कटून त्याच्या सार्‍या सामानाची विल्हेवाट लावली. तो परत आल्यावर मात्र आमची धडधड वाढली होती; पण आश्चर्य म्हणजे, त्याला ते समजल्यानंतर तो एकदमच नरम झाला. एका दांडगटाला असं वठणीवर आणल्यानं आमची हिंमत चांगलीच वाढली. त्याचा पहिला प्रयोग आम्ही बुळ्या देशपांडेंवर केला. मी घरून येताना जुलाबाच्या गोळ्या आणल्या होत्या. त्या मी कुस्करून एका मुलाला दिल्या. त्यानं त्या देशपांडेच्या जेवणात कालवल्या. बुळ्याच्या मग ज्या संडासाच्या फेर्‍या सुरू झाल्या, त्या थांबेचनात.

याच काळात मला पिक्चरचाही नाद लागला; पण त्यासाठी बाहेर जावं लागायचं. आता नेहमी बाहेर जायचं तर काही तरी कारण सांगणं भाग असायचं. माझी मावशी तेव्हा पुण्यातच होती. मी तिच्या नावाच्या चिठ्ठ्याच तयार करून घेतल्या होत्या. त्या दाखवून मी सुटी मिळवायचो. शिवाय आजारी पडण्याचं कारणही होतंच. मी त्यासाठी एक तंत्रच तयार केलं होतं. रेक्टरपुढे जाण्याआधी मी दहा मिनिटं पलंगावरून डोकं खाली लटकवायचो. त्यामुळे डोळ्यांत रक्त चढायचं आणि चेहराही तापायचा. मग केस थोडे विस्कटून रेक्टरपुढे उभा राहायचो. माझं ते आजारपण बघून ते मला हॉस्टेलच्या डॉक्टरकडे पाठवायचे. ते डॉक्टर कोणत्याही आजाराला एकच लाल रंगाच्या औषधाची बाटली द्यायचे. पोरं ती बाटली फेकून द्यायचे, पण मी ती जपून ठेवायचो. पुढे मग रेक्टरकडे जाण्यापेक्षा ती बाटली दिसेल अशा पद्धतीनं मी चालायचो.

त्यामुळे बाहेर जाण्यासाठी कोणाची परवानगी घेण्याची गरजही पडेना. याच्याही पुढचा इलाज म्हणून, मी माझं अ‍ॅपेंडिक्सचं ऑपरेशन झाल्याचं सर्वांना सांगितलं. त्यानंतर रेक्टरसकट सारेच माझ्याशी सहानुभूतीनं वागू लागले; पण पुढे माझं हे बेंड फुटलं. रेक्टरनं मला बोलावून झापलं. पण तेव्हा आणखी एका तंत्रात मी पारंगत झालो होतो. आपण काही न बोलता शुंभासारखे उभे राहिलो तर समोरच्याला बोलणंच सुचत नाही, याचा मला साक्षात्कार झाला होता. मी त्याच तंत्राचा वापर केला. माझे वडील आल्यानंतर त्यांनीही मला झापलं, पण माझ्यावर अर्थातच त्याचा काहीच परिणाम झाला नाही. इतके सारे उपद्व्याप करूनही मला सहामाहीत बरे मार्क्स पडले. कारण मी कॉप्या करण्यातही तरबेज झालो होतो; पण एकदा मात्र हे कॉपीसत्र मनासारखं चालवता आलं नाही. परिणाम, व्हायचा तोच झाला. मी सुटीत घरी आलो आणि काही दिवसांनी पोस्टानं शाळेचा रिझल्ट आला. मला सर्वच विषयांत जेमतेम मार्क्स पडले होते. पण तरीही मला पुढच्या वर्गात ढकलण्यात आलं होतं; पण सोबतच मला होस्टेलमधून रस्टिकेटही करण्यात आलं होतं.

नंतर बराच काळ मी हे दहावीचं वर्ष विसरूनच गेलो होतो; पण नंतर कधी तरी असं जाणवलं की, या वर्षाचे खूप उपकार आहेत आपल्यावर. परत मी तितका कधी वाहवलो नाही. पण वाटतंय, ती आपल्या स्वभावाची एक बाजू आहे. तिला नाकारून चालणार नाही. मला आजही आश्चर्य वाटतं की, मी त्या वेळी असा कसा वागलो आणि त्याची शरमही वाटते. पण आता मी जेव्हा याविषयी विचार करतो, तेव्हा मला असं वाटतं की, मी त्या वेळी बिघडलो ते बरंच झालं. निदान बिघडणं काय असतं, ते तरी मला त्यानिमित्तानं कळलं. त्या वाटेला जावं, असं पुन्हा कधी वाटलंही नाही. ते वर्ष मला खूप काही शिकवून गेलं.

शब्दांकन आणि संपादन - प्रतीक पुरी
(मौज प्रकाशनाच्या ‘स्वतःविषयी’ या अनिल अवचट यांच्या ‘दहावीचं वर्ष’ या लेखावर आधारित संपादित लेख)