आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपला ‘आयर्नमॅन’!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बरोब्बर वीस वर्षांपूर्वी ‘टफ शूज’च्या जाहिरातीने एकच खळबळ माजवली होती. या जाहिरातीमध्ये मिलिंद सोमण आणि मधू सप्रे अनावृत शरीराने उभे होते, दोघांमध्ये भलामोठा अजगर होता. ही जाहिरात खरं तर जोखड झुगारून मुक्त होऊ पाहणाऱ्या नव्या पिढीच्या आशा-आकांक्षांचं द्योतक होती. खऱ्या अर्थाने उदारीकरणानंतर बदलत जाणाऱ्या जीवनशैलीचा तो आरंभबिंदू होता. त्या क्षणापासून भारतीयांचं विशेषत: तरुणाईचं जग बदलत गेलं आणि अर्थातच बदलाचं प्रतीक बनलेला भारताचा पहिलावहिला सुपरमॉडेल मिलिंद सोमणही बदलत गेला... मॉडेल, अभिनेता, धावपटू, चोखंदळ वाचक आणि कला आस्वादक अशी त्याची विविध रूपं त्यानंतर क्रमाक्रमाने दिसत गेली...

त्याच्या या रोमहर्षक प्रवासाची ‘रसिक’ दिवाळी अंकानिमित्त ही खास झलक...
वेळ ठरली होती, सकाळी नऊ-सव्वानऊची. ठिकाण होतं, मुंबईतल्या दादर-शिवाजी पार्कचं ‘बरिस्ता’ कॉफी शॉप. आपण रिलॅक्स होतो न होतो, तोच भारताचा पहिला सुपरमॉडेल आपल्या पुढ्यात उभा. चेहरा हसतमुख, डोळे चमकदार, त्या डोळ्यांत मैत्रीपूर्ण आश्वासक असे भाव. काळे-करडे केस वयाचा अंदाज देत असले, तरीही एखाद्या यशस्वी अॅथलिटला शोभणारी ‘स्लिम अँड ट्रिम’ म्हणता येईल अशी देहयष्टी. अंगात साधासाच टी शर्ट-शॉर्ट. त्यातल्या टी शर्टवर ‘पिंकथॉन अॅम्बेसेडर’ अशी अक्षरं लिहिलेली. पिंकथॉन ही खास महिलांची धावण्याची शर्यत. त्याचा मिलिंद सदिच्छादूत. हेदेखील त्याचा ‘फिमेल फॅनबेस’ पाहता खासच. पायात शूज तर सोडाच, साधी चप्पलदेखील नाही. त्याचे ते अनवाणी काटक पाय बघून आपण भूतकाळात शिरतो. आपलीच आपल्याला गंमत वाटते. आज अनवाणी धावणाऱ्या याच मिलिंदने मधू सप्रेसोबत २० वर्षांपूर्वी केलेल्या ‘टफ शूज’च्या जाहिरातीने केवढा गहजब माजवला होता. त्याला कारणंही तसंच होतं. मिलिंद आणि मधू अनावृत्त देहासह कॅमेऱ्यामोर उभे होते. दोघांच्याही गळ्यात भलामोठा अजगर टाकण्यात आला होता. मात्र पायात ज्याच्यासाठी तो खटाटोप मांडला गेला होता, ते टफ कंपनीचे स्पोर्ट‌्स शूज होते...

भारतीयांनी आपल्याच मातीतले पण आरपार ‘ग्रिको-रोमन गॉड-गॉडेस’ भासावेत, असे मॉडेल्स याची डोळा अनुभवण्याची बहुधा ती पहिलीच वेळ होती. तोवर धर्मेंद्र, दारासिंग यांसारखे पीळदार शरीराचे नट बघण्याची डोळ्यांना सवय झाली होती. परंतु मिलिंद-मधू यांचे ते रूप आणि त्यांनी केलेली न्यूड अॅड सर्वसामान्यांसाठी ‘आऊट ऑफ दी वर्ल्ड’ प्रकारातली होती.
तोवर उदारीकरणाच्या अपरिहार्य निर्णयामुळे जागतिकीकरणाचं वारं भारतात शिरलेलं होतं. बंदिस्त सामाजिक-सांस्कृतिक चौकटींना सरावलेलं मानस ‘एक्स्प्रेशन’च्या शोधात होतं. आपल्याला काय हवंय, कुठे जायचंय, आपल्या इच्छा-आकांक्षा काय आहेत, आपल्याला जगाला काय सांगायचंय, याचा नेमका फैसला होत नव्हता. अशा गोंधळलेल्या-बावरलेल्या अवस्थेत विशेषत: तरुणाईच्या अस्पायरेशन्सना उद‌्गार देण्याचं काम ‘टफ शूज’च्या क्लासी जाहिरातीनं केलं होतं. बंधनं तोडून व्यक्त होऊ पाहणाऱ्या समाजाचं जणू ते प्रतिबिंब होतं. पण बंडखोर मसिहाच्या शोधात असलेल्या समाजाला पहिलेप्रथम बंडखोरी मान्य होत नसते. तसंच या जाहिरातीबाबतही झालं होतं. चौफेर टीका, जाहिरात करणाऱ्यांचा उद्धार, संस्कृतीरक्षक समाजधुरीणांचे शाब्दिक हल्ले, असं सगळं तेव्हा अपेक्षेप्रमाणे घडलं होतं. आरोप अश्लीलतेचा होता, पण खटला प्राणीप्रेमी ‘पेटा’ संस्थेच्या वतीने दाखल झाला होता. अगदी अलीकडे टफ शूजच्या जाहिरातीशी संबंधित सगळ्यांना ‘बा इज्जत बरी’ केल्याचा निर्वाळा कोर्टाने दिला. तसं ते अपेक्षितही होतं म्हणा. ती जाहिरात सोज्ज्वळ वाटावी, असं इंटरनेटवरचं बरंच काही ‘डाइजेस्ट’ करण्याचा हा काळ आहे. विरोधात निकाल गेला असता, तर मिलिंद सोमण-मधू सप्रे नव्हे, त्यांच्या विरोधातले बाष्कळ ठरले असते...

सुपरमॉडेलला भेटल्यानंतर संवादाची सुरुवात आजही ‘टॉप टेन कॉण्ट्रव्हर्शल’ यादीत स्थान कायम असलेल्या त्या जाहिरातीनं होणं स्वाभाविक होतं. झालंही तसंच; पण कोणताही आव न आणता नित्याच्या सरावाप्रमाणे तब्बल सतराएक किमी धावून आलेला, जुलै २०१५मध्ये झुरिचमध्ये (स्वित्झर्लंड) आयोजित १६ तासांची ट्रायथलॉन स्पर्धा (३.८ किमी पोहणे, १८०.२ किमी सायकलिंग आणि ४२.२. किमी धावणे) यशस्वीपणे पूर्ण करून वयाच्या ५०व्या वर्षी ‘आयर्नमॅन ‘ठरलेला मिलिंद एसीऐवजी बाहेरच्या मोकळ्या हवेत बसणं पसंत करून बोलता झाला...

“आजही कोणीही भेटलं की पहिला प्रश्न मला ‘टफ शूज’च्या जाहिरातीबद्दलच विचारला जातो. तेही योग्य आहे म्हणा, एक प्रकारे जगाला माझी ओळख या जाहिरातीतूनच झाली होती. पण गंमत म्हणजे, ‘टफ शूज’च्या जाहिरातीपूर्वी टाइम्स समूहाच्या ‘सॅटर्डे टाइम्स’साठी मी न्यूड फोटो शूट केले होते. अलिबागला काशीद समुद्रकिनारी एका बंगल्यात ‘अॅम्बियन्स’ नावाच्या बड्या जाहिरात संस्थेने टफ शूजची ही जाहिरात शूट केली. ही जाहिरात सिनेब्लिट्झ, मिड डे या नियतकालिकांतून प्रसिद्ध झाली होती. माझ्या आईने पूर्व आफ्रिकेत असताना सिनेब्लिट्झमधली जाहिरात पाहिली आणि जाहिरात अप्रतिम असल्याचा अभिप्राय दिला होता.

लोक मला विचारतात, अशी नग्न जाहिरात करताना अवघडलेपण जाणवलं नाही का? मी म्हणतो, आम्ही सर्व प्रोफेशनल्स अशा प्रकारच्या आव्हानांकडे तटस्थपणे, व्यावसायिकतेच्या नजरेतून पाहात असतो. प्रत्येकाला आपण काय करतोय, काय करायला हवं, कुठे थांबायला हवं, हे पण ठाऊक असतं. एरवी, अशा प्रकारच्या फोटोशूटमध्ये जास्तीत जास्त दहा-पंधरा माणसे असतात. ‘सॅटर्डे टाइम्स’साठी केलेले फोटोशूट तर आम्ही दिल्लीच्या खूप गजबज असलेल्या लोधी गार्डनमध्ये केले होते.

त्या वेळी गदारोळ झाला खरा; पण ‘टफ शूज’मुळे अश्लीलता आणि कला यांमधील द्वंद्व उफाळून आलं, इतकंच म्हणता येईल. प्रांजळपणे सांगायचं तर, ‘टफ शूज’मुळे मला मानसिक-भावनिक पातळीवर अजिबात त्रास झाला नाही, माझ्या कुटुंबीयांनासुद्धा त्याची झळ पोहोचली नाही. मधू सप्रेला थोडाफार मन:स्ताप नक्कीच झाला, मात्र तिच्याही घरात किंवा कुटुंबात खटल्याचा ताण जाणवला नाही. जवळपास १४ वर्षे ही केस कोर्टात चालली. नामांकित वकील मोहन जयकर आमच्या वतीने हा खटला लढवत होते.

खरं सांगायचं, तर मी एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातला आहे. माझ्यावर लहानपणापासून व्यक्तिमत्त्व विकासाचे कळत-नकळत संस्कार झाले. मी वयाच्या दहाव्या वर्षापासून नित्यनेमाने पोहायला जात असे. माझ्या वयोगटातील चार राष्ट्रीय स्पर्धासुद्धा मी जिंकलो होतो. राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला होता. इतर मुलांप्रमाणे मॉडेलिंग आणि फॅशन हे क्षेत्र मला सर्वस्वी नवीन होते. या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी काय करावे लागते, हेसुद्धा मला माहीत नव्हते. माझ्या एका मित्राने त्याच्याएेवजी एका जाहिरातासाठी मला पाठवले होते. परंतु मी सूट परिधान केल्यावर खूपच इमॅच्युअर दिसतो, म्हणून मला नाकारले गेले. परंतु काही महिन्यांनंतर एका मैत्रिणीने ‘ठाकरसी’च्या जाहिरातीसाठी बोलावले. त्या वेळी मी काम करण्यासाठी फारसा उत्सुक नव्हतो, म्हणून उगाचच जास्त पैसे मागितले. आणि चक्क त्यांनी मला मागितलेले पैसे द्यायची तयारी दाखवली. ही १९८७ची गोष्ट असेल. तिथून रोहित बाल, तरुण तहिलयानी, रोहित खोसला या फॅशन जगतातल्या आघाडीच्या डिझायनर्ससोबत मी काम करू लागलो.
नव्वदच्या दशकात, ‘मेड इन इंडिया’ या म्युझिक अल्बममुळे मी प्रकाशझोतात आलो. त्यापूर्वी फॅशन जगतामध्ये माझे नाव असल्यामुळे आलिशा चिनॉयने माझी निवड केली होती. एमटीव्ही चॅनेलने आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बमचा पुरस्कार दिला होता. आताच्या तुलनेत ८०-९०च्या दशकात भारतामध्ये जास्तीत जास्त २० मॉडेल्स होती, त्यामध्ये फक्त दोनच पुरुष मॉडेल होते. आता काळ बदलला आहे. त्या वेळी मधू आणि मला सुपर मॉडेलची ओळख मिळाली. जागतिक फॅशन जगामध्ये सिंडी क्रॉफर्ड, निऑमी कॅम्बेल ही काही नावं त्या वेळी सुपर मॉडेल्स म्हणून गाजत होती. सुपर मॉडेल्स ही फॅशन डिझायनर्सची गरज होती. म्हणून मला आणि मधूला सुपरमॉडेल म्हणून प्रोजेक्ट केले गेले. परंतु आता फॅशन डिजायनर्सना तशी गरज भासत नाही.

मी प्रारंभापासूनच फॅशन विश्वातला माणूस. पण जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला जाणवतं, जगाच्या तुलनेत भारतीय फॅशन कुठेही नाही. आपल्याकडे फॅशन दर्जा सांभाळून सादर केली जात नाही. अजूनही आपण परंपरावादी नजरेनेच फॅशनकडे पाहतो. त्यामुळे आपले डिझायनर्स भारतात नव्हे, तर इतर देशांमधून आपले कार्यक्रम सादर करताना दिसतात. त्याचप्रमाणे फोटोग्राफीतसुद्धा आपण जगाच्या तुलनेने मागे आहोत. थोडक्यात, मॉडेल्समध्ये बदल घडला आहे. परंतु फोटोग्राफर्स आणि फॅशनमध्ये बदल घडलेला नाही. असो.
शब्दांकन- विकास नाईक
(vikas.naik@gmail.com)