आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे पाहुणे येती...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोल्डन ऑरिऑल - Divya Marathi
गोल्डन ऑरिऑल
महाराष्ट्राचे मिनी भरतपूर
महाराष्ट्राचे ‘मिनी भरतपूर’ मानले जाणार्‍या निफाड तालुक्यातल्या नांदूर मधमेश्वर येथील जलाशयाच्या परिसरात विविध जातींचे परदेशी पक्षी दरवर्षी स्थलांतर करून येतात. यासोबतच देशी स्थलांतरित पक्ष्यांसह आफ्रिका, युरोप, सैबेरिया, रशियातून आलेल्या पक्ष्यांचा गंगापूर धरणावरही स्वच्छंदी विहार पाहायला मिळतो.

- फ्लेमिंगो (रोहित पक्षी)-पांढरा-गुलाबी रंग, डौलदार मान, चोच अशी ओळख असलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे जसे मुंबई, नवी मुंबई परिसरात आढळतात, तसेच गंगापूर धरण व नांदूर मध्यमेश्वरच्या बॅक वॉटरमध्ये विहार करतात.

- ग्रे हेरॉन (राखाडी बगळा)- पंखांचा रंग काळा असूनही उठून दिसणारा, पिवळसर चोच, डोकं आणि मान पांढरट असलेला आणि डोक्यावर काळ्या रंगाची पताकांसारखी पिसे असलेला, तसेच डोक्यावर गडद टोपीमुळे रुबाबदार दिसणारा राखाडी बगळा (राखी बगळा) हिवाळ्यात नांदूर मधमेश्वर आणि गंगापूर धरण परिसरात उडताना दिसतो. साधारणत: ९० ते ९५ सेंटीमीटर उंचीच्या ग्रे हेरॉनला पाहण्यासाठी पक्षिमित्र या पाणथळ्यावर गर्दी करतात.

- शोवलर (थापट्या)- शोवलर हा पक्षी ४० ते ५० सेंटीमीटर लांब असतो. त्याची चोच ही चमच्यासारखी लांब असते. त्याचप्रमाणे शोवलर नराचे डोके हे गडद हिरवे, छाती पांढरी आणि शरीराच्या बाजूला काळे, तपकिरी आणि निळ्या रंगाचे पंख असल्याने आकर्षक दिसतो. सध्या नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर या धरण परिसरात गवताळ भाग मोठ्या प्रमाणात असल्याने, अंडी उबविण्यासाठी त्यांना सुरक्षित ठिकाण असल्याने त्यांचा हिवाळ्यात या ठिकाणी अधिक वावर दिसतो.

- स्पून बिल (चमचा बदक)- स्पून बिलची चोच काळी असते, मात्र चोचीचे टोक पिवळे असल्याने स्पून बिल उठून दिसतो. याच्या पिलाची चोच गुलाबी असते.

- कोम डक (नकटा)- कोम डकच्या डोक्यावर काळे टिपके असतात. छातीवर अरुंद काळा पट्टा दिसतो. त्याचप्रमाणे बाहेरील आणि आतील पंख हे काळसर असतात. तर नराच्या चोचीवर फण्यासारखा मांसल भाग असल्याने त्याला आपल्याकडे ‘नकटा’ असे नाव पडल्याचे पक्षिमित्र बी. राहा आणि पक्षी अभ्यासक श्याम रनाळकर सांगतात.