आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोध शाहू छत्रपतींच्या छायाचित्रांचा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘रयतेच्या हिताचा कारभार कैसा करावा!’ याचे उत्तम उदाहरण म्हणजे, राजर्षी शाहू छत्रपतींचा कार्यकाल! शंभर वर्षांपूर्वी करवीर राजाच्या गादीवर आरूढ झाल्यानंतर या राजाने आपल्या कारकीर्दीत बहुजन समाजासाठी आरक्षणाच्या निर्णयासारखे अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले. शाहू महाराजांनी घेतलेले असे निर्णय, दिलेले कल्याणकारी हुकूम आणि त्यांची केलेली प्रभावी अंमलबजावणी यांचा अभ्यास समाजाला, राजकारण्यांना आणि प्रशासनाची धुरा सांभाळणार्‍यांना आजही मार्गदर्शक आहे. खरे तर शाहू महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करूनच सत्तेच्या पायर्‍या चढाव्यात व राज्यकारभाराची सूत्रे हातात घ्यावीत, असा रयतेच्या हिताचा कारभार या राजाने केला होता.

आज शाहूंच्या चरित्रावर, त्यांच्या कार्याच्या अनेक पैलूंवर वेगवेगळ्या विश्वविद्यालयांतून शेकडोंच्या संख्येने डॉक्टरेट (पीएच.डी.) मिळवल्या जात आहेत. शाहूंच्या जीवनावर आजपर्यंत शेकडोंनी पुस्तके लिहिली-प्रकाशित झाली आहेत; पण दुर्दैवाने आजपर्यंत शाहूंची जीवनगाथा छायाचित्रांच्या माध्यमातून (फोटोबायोग्राफी) लोकांसमोर आलेली नव्हती. शाहूंच्या चरित्रसाधनांच्या दालनातील ही चित्रमय चरित्राची जागा रिकामी होती. ती आम्ही आपल्यासमोर आणत असलेल्या ‘राजर्षी शाहू छत्रपती - रयतेच्या राजाचे चित्रमय चरित्र’ या ग्रंथामुळे भरून निघेल, असा आम्हास विश्वास आहे.

या चित्रमय चरित्राचे सर्वात महत्त्वाचे अंग म्हणजे, छायाचित्रे. शाहू महाराजांचा काळ आजपासून शंभर-सव्वाशे वर्षांचा. त्या वेळी आजच्यासारखे डिजिटलायझेशन झाले नव्हते. छायाचित्र काढून घेणे साधी गोष्ट नव्हती. त्यातच शाहू काळापासून आजपर्यंत शाहू महाराजांचे फोटो एकत्रित करण्याचे काम अजूनपर्यंत कोणी केले नव्हते. अशा परिस्थितीत आम्ही हे छायाचित्र संकलनाचे काम सुरू केले.

प्रस्तुत ग्रंथात आलेला सर्वात जुना फोटो म्हणजे, इ. स. १८६६ पर्यंत करवीर गादीवर राज्य केलेल्या बाबासाहेब महाराजांचा आहे. हा फोटो आम्हाला ज्या अल्बममध्ये मिळाला, त्यामध्ये तो अतिशय फिकट-धूसर पडला होता. त्या फोटोवरील शाई बहुतेक करून उडून गेली होती; पण या फोटोचे महत्त्व- दुर्मिळत्व ओळखून मुद्दाम या ठिकाणी दिला आहे. स. १८५७च्या कोल्हापुरात घडलेल्या क्रांतीचे नेते व बाबासाहेब महाराजांचे बंधू चिमासाहेब छत्रपती यांच्या छायाचित्राची दुर्मिळ काचेची निगेटिव्ह(प्लेट)देखील आमच्या संग्रहात आहे. सदरचा फोटोही प्रस्तुत ग्रंथात आम्ही दिला आहे. हा फोटो प्रथमच प्रस्तुत ठिकाणी प्रकाशित होत आहे. यानंतर करवीर गादीवर आलेल्या छत्रपती राजाराम महाराजांचा व त्यानंतरच्या सर्वच छत्रपतींचे फोटो या ग्रंथात दिलेले आहेत. एकाच ग्रंथात छत्रपती घराण्याचे सलग नऊ पिढ्यांचे फोटो पहिल्यांदाच प्रस्तुत ग्रंथामुळे समोर येत आहेत, हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य ठरावे.

शाहू महाराजांना स्वत:लाही छायाचित्राचे महत्त्व समजले होते. त्यासाठी त्यांनी छायाचित्रासाठी येणार्‍या खर्चासाठी एक स्वतंत्र खातेच निर्माण केले होते. शाहू महाराजांनी ए. आर. पठाण यांची ‘रॉयल फोटोग्राफर’ म्हणून नेमणूक केली होती. शाहू महाराजांच्या काळातील बहुतांश छायाचित्रे याच पठाण फोटोग्राफरनी काढलेली आहेत, असे दिसते. पुढच्या काळात जे. एन. लेंगडे, बी. पी. पाटील, डी. बी बराले अशा काही फोटोग्राफरनी काढलेली छायाचित्रे आपणास प्राप्त होतात. यातील बी. पी. पाटील हे शाहूपुत्र राजाराम महाराजांच्या काळात ‘स्टेट फोटोग्राफर’ म्हणून रुजू झाले. या सर्व छायाचित्रकारांनी मिळून हजारोंच्या संख्येने छायाचित्रे काढली असावीत, पण दुर्दैवाने आज ही सर्व छायाचित्रे, त्यांच्या निगेटिव्ह आपणास मिळत नाहीत. एवढेच नाही, तर शाहू महाराजांनी विशेष प्रसंगाच्या छायाचित्रांचे अल्बमही तयार करून घेतले होते. जाड पुठ्ठ्याचे असे तीन अल्बम आमच्या पाहण्यात आले. पण यातील एक अल्बम सोडला तर बाकी दोन अल्बममधील एक, दोन फोटो सोडले तर इतर सर्व फोटो गायब झाले होते. शाहू महाराजांच्या काळातील असे सर्व अल्बम, त्यातील फोटो यांचा शोध घेण्याची गरज आहे. एवढेच नाही, तर शाहू महाराजांच्या काळातील चलचित्रांचा, शाहूंच्या भाषणाच्या रेकॉर्डचाही शोध घेता येऊ शकतो, पण हे फार चिकाटीचे व खर्चाचे काम आहे.

हे शाहूरायांचे चित्रमय चरित्र तयार करताना त्यांची अनेक अप्रकाशित, दुर्मिळ छायाचित्रे मिळवण्यात आम्ही यशस्वी झालो. काही छायाचित्रांच्या निगेटिव्हही मिळाल्या. एवढेच नाही, तर प्रस्तुत ग्रंथात शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी शिवतरकर मास्तरांना लिहिलेल्या पत्राची निगेटिव्हच मिळाली. हे शाहू महाराजांचे अत्यंत महत्त्वाचे पत्र निगेटिव्हच्या स्वरूपात ज्या ठिकाणी मिळाले त्याच ठिकाणी अशाच अनेक मौल्यवान कागदपत्रांच्या छायाचित्रांच्या निगेटिव्ह होत्या, त्याची माहिती मिळाली.

प्रस्तुत चित्रमय ग्रंथ आपल्यासमोर आणतानाच शाहू महाराजांचा जीवनक्रम समजावा, यासाठी या ग्रंथात एक विस्तृत कालपट दिला आहे. एका प्रकारे ही शाहू कालाची शकावलीच तयार करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. यात फक्त घटना नोंदवून न थांबता महत्त्वाच्या घटनांची थोडक्यात माहितीही दिली आहे. शाहू महाराजांच्या जीवनात घडलेल्या बहुतांश सर्व प्रसंगांची नोंद या ठिकाणी घेण्यात आली आहे. या कालपटाचा उपयोग शाहू महाराजांचे क्रांतिकारी जीवन समजण्यासाठी होईल, असा विश्वास आहे.

राजर्षी शाहू छत्रपती - रयतेच्या राजाचे चित्रमय चरित्र
संकलक, संपादक, - इंद्रजित वसंतराव सावंत
लेखक - देविकाराणी शिवाजीराव पाटील
प्रकाशक - इंद्रजित वसंतराव सावंत
मूल्य - ९००/-

इंद्रजित सावंत,देविकाराणी पाटील
indraswords@gmail.com
बातम्या आणखी आहेत...