सोशल मीडियाला चघळायला भाजप व संघ परिवाराने विषय देण्याचा जणू चंगच बांधलाय की काय, अशी शंका येते… कारण केंद्रात नरेंद्र व राज्यात देवेंद्रचे सरकार आल्यापासून
फेसबुक असो वा
ट्विटर-व्हॉट्स अॅप, यूट्यूब असो, अगदी वर्तमानपत्रांच्या इंटरनेट साइट असो; या दोन्ही सरकारांनी लोकांच्या विवेकबुद्धीबरोबर विनोदबुद्धीलाही खाद्य दिले. गेल्या महिन्यात गोवंश हत्याबंदीचा कायदा झाल्यानंतर सरकारच्या कारभारावर सोशल मीडिया तुटून पडला होता. आता बॉम्बे हायकोर्टात अन्य प्राण्यांच्या मांसावर बंदी आणणार असल्याचे सूतोवाच सरकारने केल्यानंतर मांसाहारी मंडळींचा तामसी संताप सोशल मीडियात उफाळून आला. बरं हा संताप सीरियस होत होत अशा काही गमतीशीर वळणावर विसावला की, हसून मुरकुंडीच वळते.
- चिकन, मटण बंद... म्हणजे
बीजेपी स्वतःच्याच शवपेटीवर मारत असलेला फायनल खिळा..!!
पोरांनो घ्या शेवटचं खाऊन,
आता कायमचाच श्रावण..!
- बरं हाय आम्ही शाकाहारी हाय.
- सरकार माणसाचं हाय की जनावरांचं?
- मला भरीत खायचंय, वांगी भाजली तर चालतील का...?
- माणसांनी गाय मारली तर त्याला विरोध.....
.
पण.....
.
‘गाय छाप’ने माणसे मारली तर त्याला समर्थन....?????
अजब नेते आहेत..
- यापुढे पार्ट्या खूप स्वस्तात उरकणार.
वरण-भात, आमटी आणि सोबतीला
‘गाय’ छाप तंबाखू...!
- बीफ बंदीमुळे मी दुधाच्या धंद्यात लावण्यासाठी बाजूला काढलेली रक्कम शेळी आणि मत्स्यपालन व्यवसायात गुंतवायचं ठरवत होतो, पन नाना फडनविसांचं सरकार सगळ्याच मांसाहारावर टप्प्याटप्प्याने बंदी घालनार म्हंटय्।
बरं शाकाहारी कांदा चाळ करावी म्हणत होतो, पण सध्या कांदा ‘जीवनावश्यक’ होऊन बसलेला।
आणि यांचा काही भरौसा नाही, आजचा ‘जीवनावश्यक’ कांदा उद्या लसूण-बटाट्यासह बंदी खाली आला तर काय करा?
त्यापेक्षा असू देत, ठेचिले फडनविसे तैशेचि राहावे, धन पडो द्यावे बिना काम।
फडणवीस सरकारची अशी सुरू असलेली टवाळी एका अतर्क्य अशा बातमीमुळे अधिक चिघळली. बातमी थोडक्यात अशी की, संघ परिवाराशी निगडित असलेल्या अखिल भारतीय गो सेवा संस्थेचे अध्यक्ष शंकर लाल यांनी गायीच्या १०० ग्रॅम तुपापासून दिवा जाळला तरी त्यातून ऑक्सिजन बाहेर पडतो आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवतो, ही गायीची ताकद असल्याचे निरीक्षण मांडले आणि लोक लाल यांच्यावर तुटून पडले. या पोस्ट संकलित आहेत म्हणजे जेवढ्या वेचता येईल तेवढ्या वेचल्या आहेत. त्या एका मागोमाग एक अशा…
- आयला यांच्यापेक्षा तालिबान परवडले, निदान दारूबंदी तर लादतात; पण हे हिंदुस्तानी तालिबानी हसवून हसवून मारतील.
- विज्ञाननिष्ठांनो, निरनिराळ्या इंधनांतून निरनिराळे वायू निघतात की नाही…
-
आपण ज्या देशात राहतोय त्या देशाची परंपरा, संस्कृती पर्यावरणाचं संवर्धन करणारी आहे, ऱ्हास करणारी नव्हे!
- नाडी पाहून तंतोतंत आरोग्यदोष सांगणारे द्रष्टे ऋषी-मुनी, यज्ञासाठी पर्यावरणातील प्रचुर मात्रेत उपलब्ध असलेलेच साधन वापरायचे, त्यांच्यापेक्षा आपण केमिकल लोच्या शिकलेले लोक ज्ञानी आहोत का?
- यज्ञात, देवासमोर तुपाचा दिवा जाळतात. तीच परंपरा आत्ता पण चालू आहे. मग यात सनातन्यांची काय चूक?
- यांची प्रयोगशाळा कुठे आहे? पाहिलं पाहिजे.
- आणि गायीची शेपूट डोळ्यावरून फिरवल्यावर दिव्य दृष्टी प्राप्त होते व बैलाची शिंगे आपल्याही डोक्यावर दिसू लागतात..!!!
- धन्य धन्य! सर्व शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांना गायीचे दूध पाजा. ते सर्व नक्कीच सुसंस्कारित देशभक्त बनतील.