आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅशन गाइड करिनाचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवटी 2000मध्ये मी माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा निर्णय घेतला आणि सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. मी सुरुवातीपासूनच सेट्सवर बिनधास्त होते. नकळतच मला चित्रपट व्यवसायातले सगळे खाचखळगे माहीत झाले होते. लवकरच प्रसारमाध्यमांनी माझ्या पदार्पणाची बातमी केली आणि त्यांनी उघडपणे एक गोष्ट केलीच; माझी माझ्या बहिणीशी तुलना आणि माझे कपूर खानदान. माझी पुढे कारकीर्द कशी असेल, वगैरे गोष्टींची चर्चासुद्धा होतीच. या सगळ्याचा ताण तर होताच; पण अर्थातच माझ्या आईवडिलांनी आम्हाला लहानपणापासून स्वावलंबी बनवले होते, आत्मविश्वास दिला होता, त्यामुळे ही टांगती तलवार कधीच जाणवली नाही. मला आयुष्यात जे काही करायचे होते तेच मी करत होते. त्यामुळे तर मी जगातली सगळ्यात आनंदी मुलगी झाले असेन.

लवकरच ‘रेफ्युजी’ प्रदर्शित झाला आणि म्हणतात ना, तसे बाकी सगळा इतिहास आहेच. मी कायमच सर्व गोष्टी माझ्या मनाप्रमाणे केल्या आणि सिनेमात कामसुद्धा. हे सर्व एखाद्या रोलरकोस्टर राइडप्रमाणेच आहे. माझ्या नशिबाने माझ्या चाललेल्या सिनेमांची यादी पडलेल्या सिनेमांच्या यादीपेक्षा खूप मोठी आहे. आता तर मला ‘100 कोटींची हीरॉइन’ असेच नाव मिळाले आहे. माझ्यासाठी बॉक्स ऑफिसच्या आकड्यांपेक्षासुद्धा माझ्या चाहत्यांचे प्रेम आणि आशीर्वाद जास्त महत्त्वाचे आहेत. माझ्या अभिनेत्री बनण्याच्या प्रवासात स्टाइल आणि फॅशन या गोष्टींची भूमिकासुद्धा किती महत्त्वाची आहे, याचा विचार केला तर आश्चर्यच वाटेल. जेव्हा मागे वळून बघते तेव्हा असे वाटते की, माझी प्रत्येक भूमिका एक खरीखुरी जिवंत व्यक्ती होती. काही काही भूमिका तर गमतीदार होत्या. हल्ली सर्व कॉलेजच्या मुली मी सिनेमात घातल्याप्रमाणेच चिकनची कुर्ती आणि पतियाला पँट्स घालतात; तेव्हा मला पटते की, मी जिथे असायला हवी होते तिथेच आहे.

कभी खुशी कभी गम : लाल टॉप, चकचकीत लाल पँट आणि यू आर माय सोनिया. हीच तर ती झलक होती, जेव्हापासून सर्व सुरू झाले. हृतिक आणि मी एक प्रेमी युगुल म्हणून पुन्हा एकदा परत आलो होतो. माझी भूमिका पूजा शर्मा किंवा ‘पू’ या एका आनंदी, उत्साही मुलीची होती, जिला आयुष्यात फॅशनशिवाय कशाशीच काही देणे-घेणे नाही. करण जोहर आणि मनीष मल्होत्रा दोघांनी माझ्या त्या ‘ट्रेंडी लूक’साठी खूपच मेहनत घेतली होती. प्रत्येकच भूमिकेला साजेसे कपडे त्यांनी बनवून घेतले होते. त्या सर्वांत ‘पू’ही खूपच फॅशनेबल मुलगी होती. खरे तर हिंदी सिनेमात पहिल्यांदाच कोणत्या तरी अभिनेत्रीने ‘डॉल्स अँड गॅबाना’, ‘व्हरसॅशे’सारखे महागडे ब्रँडेड कपडे घातले होते. त्यातला माझा तो लाल ड्रेस म्हणजे एक योगायोगच होता. मला आठवतेय, त्या लाल लेदरच्या पँटमध्ये नाच करणे खूप अवघड जात होते. मनीषला एक कल्पना सुचली. त्याने पँट खालून उभी कापली आणि त्याला एक चीर पाडली, ज्यामुळे नाच करताना त्रास पडेनासा झाला. पण तो एक मोठा फॅशन ट्रेंडच झाला! त्या कपड्यात माझे पोटसुद्धा जरा उघडे राहणार होते. मी अर्थातच सुडौल दिसण्यासाठी खूपच कष्ट घेतले होते. त्यामुळे त्याचा ताण अजिबातच नव्हता. सर्व सिनेमाच खूप स्टायलिश होता; पण माझ्या भूमिकेचा खूपच बोलबाला झाला. मलासुद्धा त्याचे आश्चर्यच वाटले. त्या भूमिकेपासूनच बहुतेक पडद्यावरचा माझा लकी रंग लाल आहे, हे ठरले असावे. या सगळ्यात भर म्हणून त्या वर्षी मला उत्कृष्ट सहायक भूमिकेसाठी फिल्मफेअर अवॉर्डसुद्धा मिळाले. स्वप्नच सत्यात उतरले!

१चमेली : एका वेश्येच्या भूमिकेने मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचे माझे पहिले फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड मिळवून दिले. आयुष्यात जेव्हा तुम्ही धैर्याने तुमचा मार्ग निवडता, तेव्हा तुम्हाला यश निश्चितच मिळते. अभिनेत्याऐवजी अभिनेत्रीची प्रमुख भूमिका असलेला सिनेमा काढल्याबद्दल आणि माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी सुधीर मिश्राची अत्यंत आभारी आहे. मी जेव्हा माझ्या मित्र-मैत्रिणींना या सिनेमाबद्दल सांगितले आणि मी त्यात एका वेश्येची भूमिका करणार असल्याचे सांगितले; तेव्हा त्यांना काय बोलावे, हेच समजेनासे झाले होते. बहुतेकांचे मत मी अशी भूमिका करू नये, असेच होते. त्यामुळे माझ्या करिअरवर वाईट परिणाम होईल, असेही त्यांना वाटत होते; पण अर्थातच मी हट्टी असल्यामुळे कोणाचे ऐकण्याचा प्रश्नच नव्हता. शूटिंगच्या वेळेस आमच्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न होता की, चमेलीचे कपडे कोणते असावेत. कारण पूर्ण सिनेमात चमेलीचे एकच कपडे आहेत. मनीषचा आग्रह होता की, आपण जरा गडद रंगीत कपडेच वापरावेत. तेच अंधार्‍या पार्श्वभूमीवर चांगले उठून दिसतील. त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या रंगीत साड्यांमध्ये फोटो काढून बघितले; पण सगळ्यांची एकमताने पसंती त्या लाल साडीलाच मिळाल्याने शेवटी तीच पसंत केली गेली. माझे ते रंगीबेरंगी ब्लाऊज खारच्या बाजारातून आणले होते. माझ्या वेशभूषाकाराने त्या साडीसारख्याच आणखी सहा साड्या आणल्या होत्या. माझ्या केसांना लाटा लाटा दिल्या होत्या. माझ्या केसांत एका बाजूला फूल असलेली क्लिप लावलेली होती. माझ्या भूमिकेच्या नावाचे ते प्रतीक होते. माझा मेकअप उठून दिसण्यासाठी भडक लाल रंगाची लिपस्टिक दिली होती, जी माझ्या साडीला मॅचिंग होती. माझ्या खोल गळ्याच्या ब्लाऊजबद्दल मात्र मला जरा शंका वाटत होती. पण माझी भूमिकाच तशी होती; ही स्त्री पुरुषांना स्वत:कडे आकर्षित करत असते. मला माझा तो ‘लूक’ अजूनही आवडतो. इतरांच्या मनातही तो कोरला गेला आहे. तो पूर्ण सिनेमात चांगला होता. चांगली पटकथा, अवघड भूमिका आणि पूर्ण सिनेमा तर माझ्याभोवतीच फिरत होता.

पुस्तकाचे नाव : फॅशन गाइड
लेखिका : करिना कपूर/रोशेल पिंटो,
अनुवाद : अश्विनी लाटकर
पाने : 264 + 16 पाने रंगीत छायाचित्रांसह किंमत : रु. 395/-