आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे वर्ष नवे संकल्प !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुख-समृद्धीच्या प्रारंभासाठी दसरा-दिवाळी-एक जानेवारी-गुढीपाडवा हे मुहूर्त प्रत्येकाने स्वत:पुरते निश्चित केलेले असतात; पण हे सगळेच मुहूर्त दरवर्षी टळून जात असल्याचा अनुभव वारंवार येत राहतो. तरीही माणसाच्या मनातली समृद्धीची आकांक्षा काही शमत नाही. तशातच एक दिवस स्वर्गसुखात लोळण घेत असलेल्या गर्भश्रीमंतांच्या भरजरी नि अतिभव्य जगाचे दर्शन घडते. ते जग देश-विदेशातल्या नामचीन डिझायनर्सनी आकारास आणलेले असते. इथे गर्भश्रीमंतांच्या हौसेला मोल नसते आणि डिझायनर्सच्या कल्पनांना मर्यादा नसतात. "हाय लाइफ' हे या जगाचे नामाभिधान असते. कुणाला हे जग चित्ताकर्षक भासते, कुणाला बीभत्स आणि ओंगळवाणेसुद्धा. म्हणूनच जी माणसे स्वर्गसुखात लोळत असतात, त्यांच्याबद्दल एखाद्याच्या मनात नकळत शंकासुद्धा येते. अशा वेळी आपली मती गुंग करणारे हे स्वप्नाचे जग त्या-त्या माणसाने अप्रामाणिकपणे गाठले, याचा जसा आपल्याजवळ पुरावा नसतो; तसेच त्यांनी ते प्रामाणिकपणानेच मिळवले, याचाही ठोस पुरावा नसतो.

नवीन वर्षाच्या प्रारंभाला आम्ही या जगाचे सर्वंकष नव्हे, पण ओझरते दर्शन घडवतोय. ते घडवण्याचा हेतू एकच, प्रत्येकाला आपले वास्तव आणि गर्भश्रीमंतांचे स्वप्नवत जग यातील अंतर कळावे, हे अंतर कमी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न जरूर करावे आणि तसे करताना आज जे स्वर्गसुखाचा आनंद उपभोगताहेत ते मनाने खरोखरच सुखी असतील का, हाही प्रश्न प्रत्येकाला आवर्जून पडावा.

एकूणच माणसाचं जगणं वैविध्य आणि विरोधाभासांनी भरलेलं असतं; परंतु या विरोधाभासी जगण्यातही अशा असंख्य जागा असतात ज्या जिज्ञासू मनाला सतत खुणावत असतात. त्या जागांचा निश्चयाने शोध घेतल्यावर जा‌णवतं, तिथे कधीही न संपणारी उमेद आहे, माहिती-ज्ञानाचे असंख्य अस्पर्शित स्रोत आहेत आणि मन सुखावणार्‍या आठवणींची समृद्ध अडगळही आहे. याचेच भान राखत नव्या वर्षाच्या "रसिक'मध्ये आम्ही ‘कामसूत्र’ या मौलिक ग्रंथाची निर्मिती करणार्‍या वात्स्यायनाच्या अपरिचित विचारविश्वाचे दर्शन घडवणार आहोत, जगण्याच्या स्पर्धेत स्वत:ला झोकून देताना व्यसनांच्या गर्तेत गेलेल्यांच्या आणि मुख्य म्हणजे त्यातून सावरलेल्यांच्या जगण्याचा वेध घेणार आहोत, निरोगी आयुष्यासाठी औषध साक्षरता जागवण्याचा जोरकस प्रयत्न करणार आहोत, मान्यवरांच्या मनात दबलेल्या अपराधी भावनांना व्यासपीठ मिळवून देणार आहोत, लेखक-प्रकाशक आणि वाचकांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या नामांकित ग्रंथ विक्रेत्यांच्या भावविश्वात डोकावणार आहोत, नव्या जगाची अभिव्यक्ती ठरलेल्या इंटरनेट विश्वाचा साकल्याने वेध घेणार आहोत, आयुष्याला नवा अर्थ देणार्‍या गजल या कलाप्रकारातले सौंदर्य जाणून घेणार आहोत आणि बॉलीवूड-हॉलीवूडपलीकडे वाहत असलेल्या सशक्त प्रवाहाची अभ्यासपूर्ण नोंदही घेणार आहोत.

एरवी, भारतीय समाजमन उत्सवप्रियता जपण्यात कमालीचे उत्सुक असते. याच गुणाचा जगाला हेवाही वाटत असतो. परंतु नव्या सत्ताधार्‍यांच्या प्रभावामुळे हेच समाजमन आता "इव्हेंट'प्रिय होऊ लागले आहे. निवडणूक प्रचारसभा असो, स्वच्छता अभियान असो वा मंत्रिमंडळाचा शपथविधी; प्रत्येक घटनेचा इव्हेंट करण्याकडे राज्यकर्ते आणि त्यांच्या समर्थकांचा कल दिसत आहे. प्रत्येक गोष्टीचा सक्सेसफुल इव्हेंट केला की, नेते खुश होतात, हा घातक संदेश तळागाळापर्यंत पोहोचत आहे. या पार्श्वभूमीवर नव्या वर्षाची सुरुवात मुंबईत ३ ते ७ जानेवारीदरम्यान भरणार्‍या १०२व्या इंडियन सायन्स काँग्रेसने होत आहे. वर्षातली सगळ्यात मोठी आणि पहिली अशी ही घटना आहे. पुढच्यात महिन्यात म्हणजे २८ फेब्रुवारी रोजी

डॉ. सी. व्ही. रामन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय विज्ञानदिन म्हणून साजरा केला जाणार आहे. योगायोगाने दोन्ही उपक्रमांचे अंत:सूत्र समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, हे आहे. सध्याचा धार्मिक पातळीवरचा उन्माद पाहता सायन्स काँग्रेस आणि विज्ञानदिन हा अत्यंत गांभीर्याने विचारात घेण्याचा विषय आहे. मात्र, ज्या पद्धतीने सायन्स काँग्रेसच्या संदर्भात खाण्यापिण्याचे पदार्थ, विक्रमी आकाराचा शामियाना आदी विषयबाह्य गोष्टींची वायफळ चर्चा सुरू आहे, ते बघता याही उपक्रमाचा मेगाइव्हेंट होण्याची दाट शक्यता आहे. इतर वेळीसुद्धा समाज काय किंवा समाजाचे नेतृत्व करणारे पुढारी काय, विज्ञानाबाबत गंभीर असल्याचे जाणवत नाही. ते तसे गंभीर असते तर कर्मकांडाची मागणी करणार्‍या धर्माला बाजूला सारून विज्ञानधर्म सार्वजनिक जीवनात रुजवण्याची तसदी राज्यकर्त्यांच्या पातळीवर कधीच घेतली गेली असती, धर्माचे अवडंबर न माजवता, त्याच्या स्वीकार-अस्वीकाराचे स्वातंत्र्य शालेय पातळीपासून सामान्यजनांना (विशेषत: रूढी-परंपरांचे जोखड वाहणार्‍या स्त्रीवर्गाला) दिले गेले असते. आजवर हे घडलेले नाही. निदान नव्या वर्षात तरी कर्मकांडवादी धर्मामुळे बुद्धीला चढलेले मांद्य घटण्यास प्रारंभ व्हावा. म्हणजेच, शरीराची चरबी घटवण्यासाठी उपयुक्त ठरणार्‍या जिम्नॅशियमच्या जोडीला विज्ञानप्रसाराच्या उद्दिष्टाने बुद्धीच्या व्यायामशाळांचीही मोठ्या प्रमाणात रुजुवात व्हावी. किंबहुना, सायन्स काँग्रेसच्या निमित्ताने मिळालेला नववर्षाचा हाच महत्त्वाचा संकेत मानला जावा. याच विश्वासासह 'रसिक'च्या चोखंदळ वाचकांना नववर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!