आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कस्‍टमर नावाचे पुरूषी चेहरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यक्ती तितक्या प्रकृती, या उक्तीप्रमाणे हॉटेलच्या धंद्यात दिवसागणिक नमुनेदार लोक भेटतात, त्यातले फार मोजके तुमची कदर करतात, इतर बहुतेक सगळे पुरुषी रंग दाखवतात...
 
बार आणि रेस्टॉरंटमध्ये मंद पिवळसर उजेड पसरला होता. हळूहळू एकेक टेबल लागत होतं. तेवढ्यात बाहेर सिगारेट आणायला गेलेला लक्ष्मण पळत आला. त्यानं अंबादासच्या कानात काहीतरी सांगितलं. तसा अंबादास हुशार झाला. बारमधल्या दोन्ही वेटरनं बाहेर दोन चकरा टाकल्या. त्यांच्या सगळ्यांच्या नजरा बाहेरून येणाऱ्या कस्टमरकडे रोखल्या. काउंटरवरसुद्धा कोणी येत असल्याची चाहूल लागली. एवढ्यात एक जाडजूड कस्टमर आतमध्ये आला. त्याला पाहताच अंबादास पुढं होऊन ‘गुड इव्हिनिंग सर’ म्हणाला. त्याचा आवाज ऐकताच अनिलशेठनं बाहेर येऊन हस्तांदोलन केलं. मी अंबादासला विचारलं, तर म्हणाला ‘हे दारू परीक्षण अधिकारी आहेत.’
 
आठ-पंधरा दिवसाला हा अधिकारी न चुकता हॉटेलमध्ये यायचा. सोबत चार-पाच मित्र. मनसोक्त प्यायचा. पोटभर खायचा. पण बिल उधार ठेवणं, त्याच्या स्वभावात नव्हतं. त्यामुळे त्याच्या टेबलला सर्व्हिस देणाऱ्या वेटरलाही पाचसहाशे रुपये टीप हमखास मिळायची. साहेबानं आपल्या टेबलवर बसावं, असं प्रत्येक वेटरला वाटायचं. एका भेटीत हजारो रुपये वाटणारा हा माणूस वेटर, हेल्परला देवासारखा भासायचा. वेटरला तो सतत सांगायचा. ‘टीपचे खरे हक्कदार हेल्पर आहेत. कस्टमरला पाणी देणं, टेबल साफ करणं, खरकटं उचलणं, हे सगळं हेल्पर करतात. त्यामुळे त्यांनाच टीप द्यायला पाहिजे.’
 
त्या दिवशी साहेब अंबादासच्या टेबलवर बसला होता. त्याच्या हाताखाली रेस्टॉरंटमध्ये मी होतो. साहेबांना ग्लास देण्यापासून ते डिनर प्लेट लावण्यापर्यंत सगळी सर्व्हिस माझ्या हातातून झाली. साहेबाला काही कमी पडायला नको. असं अंबादासनं बजावलं होतं. मुलगा चांगली सर्व्हिस देतो, साहेबानं असं म्हटल्यावर अंबादास म्हणाला ‘साहेब, तो नोकरी करून शिकतोय.’ हे ऐकून त्यांना माझ्याबद्दल खूप अभिमान वाटला. जेवण झाल्यावर अधिकारी प्रत्येक वेटर, हेल्परला टीप देत होता. मी बाजूला उभा होतो. मला जवळ बोलवलं आणि तीनशे रुपये देत म्हणाला
‘ही तुझी टीप.’
‘.......’ मी फक्त बघत होतो.
अधिकारी माझ्या हातात तीनशे रुपये देत होता. मी काहीच बोलत नव्हतो. पैसेही घेत नव्हतो. हे पाहून साहेब म्हणाला
‘घे ना. हे तुझं बक्षीस आहे.’
मला स्टेशन रोडवरचं अण्णाचं साऊथ इंडियन हॉटेल आठवलं. तिथं मी टीप न घेतल्यानं घडलेल्या प्रसंगामुळं शेठनं मला नोकरीवरून काढून टाकलं होतं...
साहेबाला मी नम्रपणे नकार दिला. हे पाहून अंबादास मध्ये पडला.
‘साहेब तो कधीच कोणाकडून टीप घेत नाही.’
‘कशामुळं तू कस्टमरकडून टीप घेत नाही?’
‘साहेब, मला स्वाभिमानानं जगायला आवडतं. मी जे काम करतो, त्याचा शेठ मला पगार देतो, मग तुमच्याकडून मी का म्हणून पैसे घ्यावेत?’
तुझी सर्व्हिस मला आवडली, त्याचं हे बक्षीस. यावर तुझा अधिकार आहे.’
‘नको. यामुळं मला बक्षिसाची सवय लागेल. जास्त टीप देणाऱ्यालाच मी कदाचित चांगली सर्व्हिस देईन. मग इतरांचं काय? इथं आलेल्या प्रत्येक कस्टमरला मी वेळेवर व चांगली सर्व्हिस द्यायला हवी. त्या मोबदल्यात टीप मिळो अथवा न मिळो.’
साहेब शांतपणे ऐकत होता. माझ्या उत्तरानं त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचे भाव उमटले. मग मला समजावण्याच्या सुरात साहेब सांगू लागला, ‘तू इथं शिकण्यासाठी आलास. तुझ्याकडं कधी पैसे आहेत किंवा नाहीत. मग? शिकताना वही, पुस्तके, पेन याला पैसे लागतात. टीपच्या पैशातून या वस्तू विकत घ्यायच्या. मिळणारा पगार थोडा थोडा बाजूला ठेवायचा. मी सांगतो म्हणून आजपासून कोणतीही लाज, कमीपणा न वाटू देता टीप घे.’ एवढा मोठा अधिकारी सगळ्यांसमोर मला टीप घ्यायला सांगत होता. भविष्यातील प्रश्न उलगडून दाखवत होता. शेवटी, मी त्याचा मान राखत टीप घेण्याचा श्रीगणेशा केला! त्या दिवसापासून अंबादासही मला त्याच्या टीपमधून दोन-पाच रुपये देऊ लागला. पण तो रोजच द्यायचा, असे नाही. मी त्याला स्वतःहून मागत नव्हतो...
...ठाकूर वस्ताद कांदा कापत होता. मोरीवाल्या बायका अजून आल्या नव्हत्या. आज मी खाली जरा लवकरच आलो होतो. वॉटर कूलरला पाण्याचे जग लावून वस्तादजवळ उभा होतो. तेवढ्यात हॉटेलच्या पायऱ्या उतरून येताना शेळकेसाहेब दिसला. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात हा माणूस काम करायचा. संध्याकाळी सहानंतर न चुकता यायचा. डी.एस.पी. हा त्याचा ब्रँड! चुकूनही कधी रागवायचा नाही. शेळकेसाहेब आल्यावर आधी बेसिनवर जाऊन प्रेश व्हायचा. दोन मिनिटं थांबून नमस्कार वगैरे झाल्यावर क्वार्टर सांगायचा. साहेबाच्या मोकळ्या स्वभावानं माझी त्यांच्याशी चांगली ओळख झाली होती. एक दिवस त्यांनी मला कितवीपर्यंत शिकला? म्हणून प्रश्न विचारला. एवढ्या दिवसात, प्रथमच हॉटेलमध्ये कोण्या कस्टमरनं माझ्या भावनेला हात घातला होता.
‘मी अकरावीत शिकतोय.’
‘कोणत्या कॉलेजला?’
‘मेहरसिंग नाईक कॉलेज.’
‘नोकरी करून शिकतोस, खूप मोठी गोष्ट आहे. मग वाचनाची आवड आहे का?’
‘थोडफार वाचलंय. काही कवितासुद्धा लिहिल्या आहेत.’
माझ्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसेना. मी अंबादासला आवाज दिला. मागे एकदा अजिंठा पेपरमध्ये छापून आलेली माझी एक कविता, त्याला दाखवली होती. अंबादासनं सांगितल्यावर शेळकेसाहेबानं माझं खूप कौतुक केलं. खूप खूप वाचन कर, म्हणूनही सांगितलं. रोज दोन रुपये टीप देणाऱ्या साहेबानं मला त्या दिवशी वीस रुपये दिले होते. त्यातून मी दोन वह्या, एक पेन विकत घेतला. शेळकेसाहेब आल्यावर नवीन काय वाचलं? विचारायचा. मला नोकरीमुळं बाहेर जाता येत नव्हतं. नवीन पुस्तक घेण्याची ऐपत नव्हती. एक दिवस साहेबानं घरी बोलवून मला ना.धों. महानोरांचा ‘रानातल्या कविता’ हा कवितासंग्रह भेट दिला. येथून माझी वाचनाची भूक वाढत गेली...
रेस्टॉरंटमधील चौघांचं खजुराओ व नंबर वन व्हिस्कीचं कॉकटेल जोरदार रंगलं होतं. त्यांच्यातील जोक्स, हसणं काउंटरपर्यंत ऐकायला येत होतं. निरमा संपल्यानं मोरीवाल्याबाईनं मला बारच्या दरवाजातून आवाज दिला. तिला पाहताच चौघेजण कुजबुजू लागले. एकाने तर टेबल वाजवून ‘वेटर ऽऽऽ ए वेटर ऽऽऽ’ म्हणत आवाज दिला. काय झालं म्हणून, मी पळत गेलो. त्यातील जोक्स सांगणारा मोरीवाल्या बाईबद्दल विचारू लागला. मी काहीच बोललो नाही. परत तेच ते विचारल्यावर
‘मालूम नहीं साहब।’ असे सांगून मी तिथून काढता पाय घेतला. शेठला सांगितल्यावर ‘तिकडं जाऊ नको.’ म्हणाले. थोड्या वेळानं पुन्हा आवाज आला. शेठ म्हणाले, ‘फक्त काय म्हणतात ते ऐकून घे. काही बोलू नकोस. कॉकटेल चढलंय साल्यांना.’
मी घाबरतच टेबलकडं गेलो. मला पाहताच एक जण सर्व्हिस चांगली नाही, म्हणून बोलू लागला; तर दुसरा ‘नहीं! नहीं! बहुत अच्छी है, सर्व्हिस!’ म्हणत कौतुक करू लागला. त्यानं एक घोट पिऊन ग्लास खाली ठेवला. मला जवळ बोलवत म्हणाला
‘तुम्हारी मोरीवाली किधर रहती है?’
‘--------’ मी एकही शब्द बोललो नाही.
त्यानं खिशातून शंभर रुपयांच्या नोटा काढल्या. मला दाखवत म्हणाला
‘तू पैसे बोल, कितने लगते? तुझे भी दूंगा यार! बहुत पैसे हैं अपने पास।’
त्यानं असं म्हणताच माझी तळपायाची आग मस्तकात गेली. आणि न राहून मी पटकन बोललो, ‘आपको माँ-बहन नहीं क्या साहब?’
माझं बोलणं त्या सगळ्यांच्याच काळजाला चिरून गेलं.
‘क्या बोला तू?’ ए अनिल, ये तेरा वेटर देख क्या, बोल रहा है?’
उठताना टेबलवरच्या दोन बाटल्या खाली पडल्या. आवाज ऐकून अनिलशेठ आले. अगोदर मला आत घेऊन गेले. बाहेर येऊ नकोस म्हणाले.
बराच वेळ बाहेर नुसता धिंगाणा चालला होता. त्यांना समजावण्यात शेठला नाकी नऊ आले होते.
नशेत ताठरलेले लाल डोळे
मला हळूच विचारतात...
‘क्यूं बे तुम्हारी मोरीवाली किधर रहती है?’
मी अस्वस्थ होतो, रक्तबंबाळ होतो
आणि वेटरची कवचकुंडले उतरवून
डोळ्याला डोळा भिडवत म्हणतो
‘क्यूं साहब आपको माँ-बहन नहीं क्या?’
मला कस्टमर नावाच्या माणसांचा एकेक पुरुषी चेहरा सापडत होता...
 
- रमेश रावळकर
rameshrawalkar@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९४०३०६७८२४
बातम्या आणखी आहेत...