आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मित्रों..!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदींचे परदेश दौरे, त्यांच्या भाषणातल्या चुका, लोकांना दिसणार नाही अशा रीतीने ठेवलेला टेलिप्रॉप्टर, मोदींचे कॅमेरा प्रेम (जय कॅम), त्यांची विविध हस्ताक्षरे, मोदींची निवडणूक प्रचारादरम्यानची टोलेजंग आश्वासने व आता मारलेली पलटी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केलेला १५ लाख रुपयांचा वायदा, दाऊद इब्राहमच्या ठावठिकाण्यावरून सरकारचे झालेले हसे, भ्रष्टाचार रोखण्यात मोदींना आलेले अपयश, सर्व लोकशाही यंत्रणांची झालेली गळचेपी व हिंदुत्व शक्तींनी घातलेले बेछूट थैमान अशा विषयांनी सोशल मीडिया अक्षरश: ढवळून निघत आहे.

ज्या सोशल मीडियाच्या बळावर मोदी निवडून बहुमताने सत्तेवर आले, त्याच सोशल मीडियाने मोदी सरकारची प्रत्येक विषयावर पोलखोल करण्याची संधी सोडलेली नाही. फेसबुकवरील काही अकाउंट मोदी सरकारच्या एकूण कामगिरीवर अक्षरश: डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत आहेत. अशा अकाउंटना नेटिझनकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मोदींच्या नुकत्याच आटोपलेल्या चीन, मंगोलिया व द. कोरिया दौर्‍याचीही येथेच्छ रेवडी उडवण्यात आली. द. कोरियात भारतीय समुदायासमोर भाषण करताना मोदींच्या जिभेचा ताबा सुटला व ‘आधी अनिवासी भारतीयांना आपल्या भारतीय असल्याची लाज वाटायची, आता ते अभिमानाने भारतीय असल्याचं सांगतात...’ असं वक्तव्य त्यांनी केल्यामुळे ट्वीटर व फेसबुकवर मोदींवर सर्वच सामाजिक थरातून घणाघाती टीका झाली. या प्रतिक्रिया अशा उमटल्या…

- मोदींची भाषणबाजी हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे; त्याच्याशी पक्षाचा संबंध नाही, असा खुलासा भाजपाने व्यक्त केला पाहिजे.
- मोदी आमच्या पैशातून परदेश दौरे करतात व आमच्या देशाच्या नागरिकांबद्दल, संस्कृतीबद्दल बरळतात?... असा कसा आमचा पंतप्रधान?
- पंतप्रधान झाल्यापासून काही महिनेच देशात राहिलेल्या मोदींना आपला जन्म भारतात झाला आहे, याची शरम वाटतेय काय..?

सोशल मीडियात अशा तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटत असल्या तरी या वर्षभरात सीरियस चर्चाही दिसून येत असल्याने हे माध्यम अन्य माध्यमांपेक्षा अधिक सशक्त, प्रतिक्रियावादी झालेले दिसले. टीव्ही, वर्तमानपत्रे यामध्ये वाचकांचा सहभाग मर्यादित असतो, ही अडचण सोशल मीडियात नसल्याने चर्चा चौफेर व बहुअंगाने होत असतात. त्यामुळे या माध्यमातून सामाजिक, राजकीय, आर्थिक विषयांवर सशक्त चर्चा करणार्‍यांकडून विविध विषयांवरचे लेख, मते यांचे आदानप्रदान दिसून येत आहे.

इतिहासातील मढी पुन:पुन्हा उकरण्याचे धंदे येथे चालतातच; पण वैचारिक दृष्टिकोनातूनही धर्म, अर्थाच्या चिकित्सा जोरकसपणे होताना दिसतात. जुने रेफरन्स, पुस्तकांमधील पॅरेग्राफ असे पुरावे देऊन प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्याचे उद्योग येथे अहोरात्र सुरू असतात. गेल्या वर्षी याच काळात लोकसभा निवडणुकांच्या प्रचारानिमित्ताने सोशल मीडियावर बनावट अकाउंटचा सुळसुळाट झालेला दिसत होता. अशा अनेक अकाउंटद्वारे इतिहास व सत्य घटनांचे विपर्यस्तीकरण केले जात होते. हा खोटा प्रचार बर्‍याच अंशी थंडावलेला दिसून येत आहे. पण आगामी वर्ष नव्या सरकारसाठी अधिक महत्त्वाचे आहे. मोदी सरकारचा हनिमून संपून संसाराला सुरुवात झाली आहे. जनता अपत्याची वाट पाहात आहे.

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यातून कर्नाटक हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर सोशल मीडियात तुफान टीका झाली. या टीकेचा हा संबंधित फोटो फिरत होता. त्यात जयललिता यांची भेट घेतल्यानंतर मोदी त्यांना म्हणतात...‘मला पण तुमच्यासारखी क्लिन चीट मिळाली होती व त्यानंतर मी God is Great असं म्हणत हे सगळे मला गोवण्याचे राजकीय षड‌्यंत्र आहे, असा आरोप केला होता.’

गेल्या आठवड्यात अनुराग कश्यप याच्या बहुचर्चित ‘बॉम्बे वेलवेट’ या चित्रपटाने अनेकांच्या आशा धुळीस मिळवल्या. अनुरागचे चाहतेही या फसलेल्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’वर नाराज होते. या नाराज रसिकांना ट्विटरवरील टीकेचा प्रचंड भडिमार स्वीकारावा लागला. बॉम्बे वेलवेटचा रिव्हू एका वाक्यात लिहिणार्‍यांचे उधाण आले होते. त्यापैकी या काही पोस्ट...
- ‘बॉम्बे वेलवेट’चे अनेक मिक्स रिव्ह्यू मी वाचले व माझ्या मनात एक प्रश्न आला…. ये मुव्ही टीव्ही पे कब आयेगी?
- आजपर्यंत ‘कॉफी विथ करन’मधील करन जोहरचा रोल मला निगेटिव्ह वाटत होता; पण आता ‘बॉम्बे वेलवेट’ पाहून मत बदललं.
#BombayVelvet is more like coarse jute than velvet.
तरणाबांड रणबीर व रडकी अनुष्का... तुम्हाला मृत्यूच्या जवळ घेऊन जाईल.
बातम्या आणखी आहेत...