Home »Magazine »Rasik» Rasik Article About Rahul Gandhi

पप्‍पु कॅन डान्‍स नाऊ!

सचिन परब | Sep 24, 2017, 00:25 AM IST

भारतीय जनतेला केवळ मोठ्या मोठ्या बाताच मारणारा नव्हे, तर मोठ्या मनाचा, मोठ्या मनाने स्वत:च्या आणि पक्षाच्या चुका मान्य करणारा, आत्मटीका करण्यास न कचरणारा नेता आवडतो. राहुल गांधी नेमकं हेच साधत आहेत. ‘पप्पू’ इमेज ही जाणीवपूर्वक, राजकीय हेतूंनी तयार झालेली इमेज झटकू पाहताहेत...

राहुल गांधी दोन आठवड्यांच्या अमेरिका दौऱ्यावर होते. आधी बर्कले युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद. नंतर प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीत वुड्रो विल्सन सभागृहात शिवाजी शाहू नावाच्या प्राध्यापकाने विद्यार्थ्यांसह विचारलेले प्रश्न. परवाच ‘टाइम्स स्क्वेअर’मध्ये एनआरआय श्रोत्यांसमोर केलेलं भाषण. हे अमेरिकेत घडत असलं, तरी आता ऑनलाइन पाहता येतं. त्याचे यूट्यूब व्हिडिअो, तर अर्ध्या-अर्ध्या तासापेक्षाही छोटे आहेत. ते पाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मेडिसन स्क्वेअरमधलं भाषण आठवल्याशिवाय राहत नाही.

पंतप्रधान बनल्यावर नरेंद्र मोदी यांचा तो पहिला अमेरिका दौरा होता. गुजरात दंगलींनंतर ज्या अमेरिकेने त्यांना व्हिसा नाकारला होता, तीच अमेरिका (अनिवासी भारतीय खरं तर) त्यांचं स्वागत (?) करत होती. मेडिसन स्क्वेअरवरचं भाषण, हा त्या दौऱ्याचा क्लायमॅक्स होता. एखाद्या रॉकस्टारला साजेसा तामझाम होता. ‘एनआरआय’ची ही गर्दी. त्यांच्या घोषणा. फडकणारे तिरंगे. देशभक्तीला आलेलं उधाण. ओबामांच्या निवडणुकांच्या पोस्टरची कॉपीपेस्ट मोदींची पोस्टरं. सुरत किंवा राजकोटच्या प्रचारसभेत शोभावं तसंच खणखणीत भाषण. ‘भारतमाता की जय’ अशी केलेली भाषणाची सुरुवात आणि त्यानंतर दाखवलेली मोठमोठाली स्वप्नं.

आता बरोबर तीन वर्षांनंतर ती सारी स्वप्नं मातीमोल होत असताना राहुल गांधी त्याच अमेरिकेत बोलताहेत. हा योगायोग आहे की राजकीय चातुर्याने साधलेला कार्यक्रम यावर खल करायला लोकांकडे फुरसत खूप आहे. मात्र, मोदींच्या तुलनेत त्यांचा रुबाब काहीच नाही. साधं इव्हेंट मॅनेजमेंटही नाही. छोटी संवादी भाषणं. त्यात मोदी, भाजप यांच्यावर थेट टीका नाही. सोबत भारतातून पत्रकारांचा नेलेला लवाजमाही नाही. त्यामुळे टीव्हीवर लाइव्ह नाही. पेपरांत हेडलाइन्स नाहीत. पुढच्या वेळेस सेल्फी काढू, असं जाहीर भाषणांत सांगितल्यामुळे सोशल मीडियावर चर्चाही नाही. तरीही राहुल गांधींनी अनेकांना इम्प्रेस केलंय. विशेषतः इंटलेक्च्युअल्सना. आदित्य सिन्हा त्यातले एक. जानेमाने पत्रकार. ‘डीएनए’चे माजी मुख्य संपादक. अभ्यासून प्रकटणारे लेखकही. आता भाजपचे आणि काँग्रेसचेही टीकाकार. काँग्रेसने त्यांच्यावर दोन अब्रुनुकसानीच्या केस घातल्यात, इतकं त्यांना बोचणारं लिहिणारे. त्याच सिन्हांनी राहुल गांधींबद्दलचं आपलं मत का बदललंय, असं सांगणारं स्फुट लिहिलंय. ते प्रातिनिधिक मानायला हरकत नाही.

राहुल गांधींच्या भाषणांविषयी अमेरिकेतल्या श्रोत्यांची भावना आश्चर्याची आहे. आम्हाला माहीतच नव्हतं, राहुल गांधी इतकं चांगलं बोलतात. आम्ही त्यांना ‘पप्पू’च समजत होतो, वगैरे प्रतिक्रिया आहेत. राहुल गांधी ‘पप्पू’ असतील किंवा नसतील, त्यांना पप्पू ठरवणं भाजपसाठी गरजेचंच होतं. नाहीतर त्यांच्यासमोर मोदींची प्रतिमा ‘लार्जर दॅन लाइफ’ करताच आली नसती. त्यामुळे राहुलच्या प्रत्येक कृतीला, बोलण्याला टार्गेट करण्यात आलं. फक्त राहुलची सोशल मीडियावर बदनामी करण्यासाठी महिन्याकाठी गडगंज पगार घेणाऱ्या ट्रोलरनी आपलं काम इमानेइतबारे पार पाडलं. त्यांनी राहुलच्या प्रतिमेचा साफ चेंदामेंदा केला. अर्थात राहुलही त्यासाठी कच्चा माल पुरवण्याचं काम तितक्याच तत्परतेने करत होते. किंबहुना, ते स्वतःच ट्रोलिंगच्या प्रभावात वावरत होते. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान बनण्यात सर्वात मोठं योगदान राहुल गांधींचंच होतं.
योग्यता नसताना राहुल केवळ गांधी घराण्याचे वारसदार म्हणून राजकारणात आहेत. ते गरिबांशी, दलितांशी जोडलं जाण्याची केवळ नाटकंच करतात. मैत्रिणीला भेटण्यासाठी ते परदेशी जात असतात. अडचणीत आले की ते गायब होतात. ते जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाहीत. इथपासून त्यांनी बलात्कार केल्यापर्यंतचे कित्येक मेसेज आपण गेली दहा वर्षं तरी वाचत, ऐकत, चर्चा करत आलोत. ही प्रतिमा तोडणं राहुल गांधींसमोर सर्वात मोठं आव्हान आहे.

या ट्रोलरना पोसणाऱ्या भाजपवाल्यांना राहुल गांधी नको होते. तसंच तेव्हा सत्तेची पदं सांभाळणाऱ्या काँग्रेसवाल्यांनाही ते नको होते. इंदिरांच्या खुनानंतर राजीव गांधी काँग्रेसवाल्यांवर अचानक आदळले होते. त्यांचं भजं करायला काँग्रेसवाल्यांना वेळ लागला. पण राहुल गांधींनी स्वतःच काँग्रेसवाल्यांना भरपूर वेळ दिला. चलाख काँग्रेसवाल्यांनी राहुलना कधीच स्थिर होऊ दिलं नाही. आता मात्र मोदींसमोर कुणाचंच काही चालत नसताना राहुलशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडेही नाहीय. नितीशकुमार भाजपच्या वळचणीला गेल्यामुळे राहुलचाही रस्ता साफ झालाय. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत आपणच पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार असल्याचं त्यांनी बर्कलेला जवळपास स्पष्टच केलंय. पुढच्या महिन्यात काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी ते तयार झालेत. तिथेही त्यांना कुणी प्रतिस्पर्धी उरलेला नाही.

राहुल हाच आपला दुश्मन नंबर एक आहे, हे भाजपनेही अप्रत्यक्ष मान्य केलंय. राहुल गांधी यांच्या बर्कलेच्या भाषणानंतर उत्तर देण्यासाठी भाजपने पहिल्याच दिवशी २६ नेते उतरवल्याची मोजदाद विनोद दुआंनी केलीय. आताही राहुलना उत्तर देणं सुरूच आहे. अरुण जेटली ते अमित शहा, अशी भाजपची सगळी टॉपची फळीही राहुल गांधींच्या भाषणाविषयी बोलतेय. उद्या मोदीही बोलतील. सोशल मीडियावरची ट्रोलिंग आर्मी पुन्हा एकदा सक्रिय झालीय. राहुल यांच्या काँग्रेसकडे मात्र त्याला तोडीस तोड उत्तर देणारं फारसं कुणी दिसत नाही. राहुलना त्यांचाही विश्वास कमवायचा असावा अजून.
‘काँग्रेस वजा गांधी घराणं’ हेच मोदींना उत्तर असू शकतं, अशी मांडणी रामचंद्र गुहा सातत्याने करत आहेत. ती तात्त्विकदृष्ट्या बरोबरच आहे. पण ती व्यावहारिक उरलेली नाही. त्यापेक्षा ‘राहुल गांधी वजा घराणेशाहीचा माज’ हे नवं समीकरण त्यात बसू शकतं. राहुलची वाटचाल त्या दिशेने आहे. निदान राहुलची भाषणं तरी तेच सांगतं. राहुल आपल्या चुका मान्य करत आहेत. मोदींच्या वक्तृत्वाचं कौतुक करत आहेत. आपण काँग्रेसचं नाही, तर देशाच्या हजारो वर्षं जुन्या उदारमतवादी संस्कृतीचं प्रतिनिधी करत असल्याचं सांगत आहेत.

मोदींना त्यांच्या प्रतलात जाऊन उत्तर देण्याचं राहुल टाळत आहेत. मोदींना प्रश्न विचारणं कुणालाच शक्य नाही. त्यांचेच खासदार आता सांगू लागलेत की, मंत्रीही त्यांना घाबरतात आणि प्रश्न विचारणाऱ्यांना खडसावलं जातं. मात्र दुसरीकडे राहुल कॉलेजच्या मुलांच्या प्रश्नांनाही उत्तरं देत आहेत. निवडणुकांच्या आधीचा मोदींचा विकासाचा मुद्दा राहुल आपल्याकडे घेऊ इच्छित आहेत. ते तरुणांच्या रोजगाराची समस्या सगळ्यात मोठी असल्याचं सांगत आहेत. मोदी मोठ्या उद्योजकांचंच भलं करत असल्याचा आरोप करताना ते शेतकरी, लघुउद्योजकांचे प्रश्न मांडत आहेत. ते काँग्रेसची सहिष्णुतेची आणि परस्परसौहार्दाची विचारधारा अमेरिकेत अधोरेखित करत आहेत.

राहुल गांधींनी हे सारं अमेरिकेत सांगितलं, ते बरंच केलं. मधल्या काळात भाजपने अनिवासी मतदारांना गळाला लावण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर कार्यक्रम हाती घेतले होते. काँग्रेसनेही काही महिन्यांवर अमेरिका पातळीवरच्या संघटनेची मोर्चेबांधणी केली होती. आता हेच अशाच प्रकारे देशातही सांगायला हवंय. खाटा पसरून सभा घेण्याची थेरं आता खपून जाणारी नाहीत. इतर कुणाहीपेक्षा काँग्रेसच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना हे सांगण्याची सर्वात जास्त गरज आहे. लोक स्वतःहून सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरत आहेत. तीन वर्षांत पहिल्यांदाच सरकारविरुद्ध बोलू लागले आहेत. काँग्रेस मात्र त्यांच्यासोबत दिसत नाहीय. राहुलकडे त्यावर काही उपाय आहे का, हा या क्षणी महत्त्वाचा प्रश्न आहे.

काँग्रेसच्या खुर्च्या उबवणाऱ्या म्हाताऱ्यांना धक्का देण्याची हिंमत त्यांच्यात आहे का? नवं प्रादेशिक नेतृत्व उभं करण्याचं मोठं मन त्यांच्याकडे आहे का? पण हे खरंच, पप्पू कॅन डान्स, हे अमेरिकेतल्या भाषणांत सिद्ध झालंय. पण ते आता इथे भारतातल्या कृतीत सिद्ध होऊ शकेल का?
- सचिन परब
ssparab@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९९८७०३६८०५

Next Article

Recommended