Home | Magazine | Rasik | Rasik Article About Remembering grandmother ...

आठवणींचा मनोहारी गोफ

डॉ. सुरेश सावंत | Update - Sep 24, 2017, 12:25 AM IST

मोबाइलने ग्रासलेल्या या डिजिटल जमान्यात महानगरीय नातीने आपल्या आजींविषयीच्या भावनेने ओथंबलेल्या आठवणी लिहून ग्रंथरूपाने

 • Rasik Article About Remembering grandmother ...
  मोबाइलने ग्रासलेल्या या डिजिटल जमान्यात महानगरीय नातीने आपल्या आजींविषयीच्या भावनेने ओथंबलेल्या आठवणी लिहून ग्रंथरूपाने प्रकाशित केल्याची उदाहरणे अभावानेच आढळतात. त्याला धारा भांड-मालुंजकरलिखित प्रस्तुत पुस्तक सुखद असा अपवाद ठरतं...

  आईला समजून घेण्यापेक्षा आजीला समजून घेणे हे अधिक अवघड असते. कारण आईशी आपले थेट आतड्याचे नाते असते आणि आजी-नातवंडांमध्ये दोन पिढ्यांचे अंतर असते. जिथे काळाचे अंतर असते, तिथे समजून घेण्यातही अंतर पडणारच! दुसऱ्या बाजूने आजोबा-आजींच्या नजरेत आपली मुलं ही दूध असतात, तर नातवंडं ही ‘दुधावरची साय’ असते. सायीचे महत्त्व दुधापेक्षा अधिकच असते. इतकी प्रस्तावना करण्याचे प्रयोजन हे, की धारा भांड-मालुंजकर यांचे ‘आजी आठवताना...’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकातील लेखन अतिशय उत्कटतेने उतरले आहे.
  धारा ही ज्येष्ठ लेखक व प्रकाशक तथा म.रा. साहित्य संस्कृती मंडळाचे विद्यमान अध्यक्ष बाबा भांड यांची सुकन्या. त्यांनी या लेखनाच्या माध्यमातून मानवी जीवनातील दु:खाची, सोशिकतेची, करुणेची, असह्य तगमगीची कितीतरी रूपं वाचकांसमोर आणली आहेत. मोठेपणाचा डिंडिम न वाजवता लेखिकेने जसे घडले, तसे सांगितल्यामुळे या लेखनातून नितळपणाचा सुखद प्रत्यय येतो आहे.

  बाबा भांड यांच्या मातोश्री आणि लेखिकेच्या आजी मंडाबाई (वास्तविक मंडोधरी) यांच्याशी निगडित आठवणींचा हा मनोहारी गोफ आहे. या आठवणींमध्ये आजीला अकाली आलेले वैधव्य, त्यांचे धीराने आणि हिमतीने, चारित्र्य सांभाळून वैधव्याला सामोरे जाणे, पतिनिधनानंतर चार लेकरांचे संगोपन व शिक्षण, कौटुंबिक आघातांच्या प्रसंगी खंबीर भूमिकेत वावरणे, इतरांना धीर देणे, आईवडिलांच्या अनुपस्थितीत नातवंडांचा प्रेमाने सांभाळ करणे, त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे आदी पैलूंवर नातीने जिवीच्या जिव्हाळ्याने प्रकाश टाकला आहे. या पुस्तकाची पाठराखण करताना डॉ. रमेश वरखेडे यांनी ‘आजी-नातीचं नातं हे एक सांस्कृतिक लेणं आहे’, असं म्हटलं आहे.

  मंडाबाई यांच्या आयुष्यातील लग्नापूर्वीची १६ वर्षे माहेरी जयपूर या खेड्यात आणि लग्नानंतरची ३३ वर्षे पैठण तालुक्यातील वडजी या गावी गेली. कृषिसंस्कृतीत त्यांचे आयुष्य तावूनसुलाखून निघाले. अकाली वैधव्य आले, तरी त्यांनी लेकरांकडे पाहून स्वत:ला सावरले. ‘कळणाकोंडा खाऊ, पण पोराला शाळेत घालू’ ही त्यांची शिक्षणविषयक निष्ठा होती. पुढे पुरुषाच्या हिमतीने कष्टाची सर्व प्रकारची कामे करत शेतशिवार सांभाळले. त्या काळात त्या घोड्यावर बसून शेतात जायच्या. एकदा तर त्यांनी शेतात शिरलेल्या भुरट्या चोरांना हिमतीने पळवून लावले होते. परिस्थितीनेच त्यांना खंबीर बनविले होते. त्यांच्या जीवनविषयक सकारात्मक दृष्टिकोनाचे संस्कार मुला-नातवंडांवर होत गेले. बाबा औरंगाबादेत स्थिरस्थावर झाल्यावर आणि शेताशिवाराची जबाबदारी गावाकडच्या मुलांनी सांभाळल्यावर त्या औरंगाबादेत राहायला आल्या. आयुष्याचा सर्वाधिक काळ ग्रामीण संस्कृतीत, शेतीमातीत व्यतीत झाला असला, तरी उर्वरित काळात (३५ वर्षे) नागरी संस्कृतीत चांगल्याच रुळल्या. ग्रामीण संस्कार न सोडताही त्यांनी शहरी संस्कृतीशी बेमालूमपणे जुळवून घेतले.

  अर्थात, हे करताना सासू-सून, आजी-नात असे संघर्षाचे अनेक प्रसंग उद्भवत. आपली नात मित्रांच्या सहवासात बिघडू नये, यासाठी आजी दक्ष असे. हे मांडताना, आई-वडिलांकडून मिळणारी मित्रत्वाची वागणूक आणि आजीची प्रभुत्वाची वागणूक यात लेखिकेची कुचंबणा होत असे लेखिकेने प्रांजळपणे सांगितले आहे. आजीचे व आमचे विचार करण्याच्या पातळीवर कधीच एकमत होत नसे. असे असले तरी ‘आजी म्हणजे आमच्या कुटुंबाचा भक्कम आधारस्तंभ होत्या’, असे लेखिकेने कृतज्ञतापूर्वक कबूलही केले आहे. इतके हे लेखन प्रांजळ आणि पारदर्शी झाले आहे. आपली आजी ही सामान्य सांसारिक स्त्री आहे, हे माहीत असल्यामुळे लेखिकेने प्रेमांधळेपणाने कुठेही आजीचे अवाजवी उदात्तीकरण किंवा गौरवीकरण केलेले नाही, हे या लेखनाचे बलस्थान आहे.

  ‘बुलडाणा प्रकरण’ हा भांड आणि साकेत परिवाराच्या आयुष्यातील काळाकुट्ट कालखंड. ‘मान सांगावा जनाला आणि अपमान सांगावा मनाला’ अशी एक लोकोक्ती आहे. सामान्यत: अपमानाचे प्रसंग विस्मरणाच्या तळाशी गाढून टाकण्याचा मानवी स्वभाव असतो. परंतु हा काळा कोळसाही लेखिकेने धीटपणे उगाळला आहे. या प्रकरणात भांड परिवाराने आणि साकेत परिवाराने अनुभवलेली अस्वस्थता आणि माध्यम प्रतिनिधींचे हिडीस दर्शन वाचकांपर्यंत पोचविण्यात लेखिका कमालीची यशस्वी झाली आहे. या संदर्भात आजीच्या संस्कारांचे मोल अधोरेखित करताना लेखिका लिहिते, ‘आमच्याजवळ त्या वेळेस जर आजी नसत्या, तर कदाचित परिस्थिती खूप वेगळी राहिली असती. मला आजींचा भक्कम मानसिक आधार मिळाला नसता. मी कदाचित त्या परिस्थितीत सैरभैर पण झाले असते. .’

  लौकिकार्थाने निरक्षर असलेल्या आजींच्या तोंडची बोली भाषेतील वाक्ये पुस्तकात सुभाषितासारखी आली आहेत : उदा. ‘आयुष्यात संकटं, दु:खं हे येतच असत्यात. त्याला आपण थांबवू शकत नाही. वादळं एका जागी थांबत नसत्यात. मंग आपून का म्हून एका जागी थांबायचं ?’ ‘... आता याच हिमतीनं जगाचा सामना करायचा. लोकासनी नजर मिळवता आली पाहिजे. नाहीतर हे जग रडणाऱ्याला अजून रडवायला बसलं हाई. आपून धीट झालं, की जगच आपल्याला घाबरतया.’
  आजीच्या अनुभवातून आलेल्या या जीवनविषयक तत्त्वज्ञानाबद्दल आणि जगाविषयीच्या स्वच्छ आकलनाबद्दल लेखिका धारा भांड लिहितात : ‘जे आम्ही एस.एस.वाय.च्या वर्गामध्ये फी देऊन शिकलो होतो, ते आजी आयुष्यातील कटुगोड अनुभवातून शिकल्या होत्या. त्यांच्या आयुष्याच्या शब्दकोशात ‘घाबरणे’ हा शब्द नव्हताच. आपण घाबरलो, की जग आपल्याला घाबरवते, हा मोठा संस्कार आजींनी माझ्यावर लहानपणापासून बिंबविला होता.’

  ‘आजी म्हणजे भांड परिवाराचा दीपस्तंभ होत्या.’ (पृ. ३१९) हे या ग्रंथातील भरतवाक्य होय. आजीचा शेवटचा आजार, त्यांनी मृत्यूशी दिलेली झुंज, नातेवाइकांची अस्वस्थता आणि हतबलता वाचकाला अस्वस्थ करून जाते.

  मोबाइलने ग्रासलेल्या या डिजिटल जमान्यात महानगरीय नातीने आपल्या आजींविषयीच्या भावनेने ओथंबलेल्या आठवणी लिहून ग्रंथरूपाने प्रकाशित केल्याची उदाहरणे अभावानेच आढळतात. एका उच्चशिक्षित नातीने आपल्या आजीच्या आत्मीयतेने लिहिलेल्या ‘आठवणी’ असल्या, तरी या केवळ ‘आजीच्या आठवणी’ नाहीत; तर या लेखनातून ग्रामीण स्त्रीजीवन, ग्रामीण आणि शहरी जीवनशैलीतील तफावत, नातेसंबंध, आधुनिक युगातील तरुण मुलामुलींचे आस्थाविषय, आवडीनिवडी, मुलामुलींच्या नात्यांतील मोकळेपणा, खाद्यसंस्कृती, ग्रामीण रूढी, प्रथा, परंपरा, सण-उत्सव, संकेत, विधी, वृद्धांची मानसिकता, आदींवर लेखिकेने लख्ख प्रकाश टाकला आहे. लेखिकेने आजींच्या व्यक्तिमत्त्वाचे रेखाटन आणि स्वभावचित्रण तर हुबेहूब केले आहेच; नायिकाप्रधान कादंबरीतल्याप्रमाणे आजीची व्यक्तिरेखा उठावदार झाली आहे. या हृदयस्पर्शी लेखनाला अनेक उज्ज्वल पैलू आहेत आणि जरतारी पदरही आहेत.

  बाबा भांड यांनी या पुस्तकाला ‘बाईविषयी’ या शीर्षकाखाली सात पानांची प्रस्तावना लिहिली आहे. तिला ‘प्रस्तावना’ म्हणण्यापेक्षा ‘पाठराखण’ म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. अश्रुचिंब आणि भावोत्कट अशा या लेकीच्या लेखनाला बाबांनी ‘संस्कारांची शिदोरी’ म्हटले आहे. धारा भांड यांची लेखनशैली जशी त्यांच्या स्वभावासारखीच अल्लड, लडिवाळ आणि खेळकर आहे, तशीच ती प्रसंगी प्रगल्भही होते. या लेखनावर कुणाचाही प्रभाव नाही किंवा कुणाचे अनुकरणही नाही. ३२८ पृष्ठांचे हे ओघवते लेखन करताना लेखिकेने आठवणींचे खोदकाम आणि बांधकाम फार निष्ठापूर्वक केले आहे, असे जाणवते. मुखपृष्ठावरील सुदर्शन मकवाना (अहमदाबाद) यांनी काढलेले रेखाटन अतिशय बोलके आहे.

  आठवणीवजा आत्मकथनामध्ये लेखकाला नवनिर्मितीला फारसा वाव नसतो, परंतु येथे लेखिकेने बरीचशी नवनिर्मिती केली आहे, हे आपल्या लक्षात येते. वरकरणी वाचकाला ही एका कुटुंबाची गोष्ट वाटत असली, तरी व्यापक अर्थाने स्थित्यंतराला सामोऱ्या जात असलेल्या बहुजन समाजाची ही विलक्षण भावस्पर्शी अशी प्रातिनिधिक गोष्ट आहे. ‘हम दो, हमारे दो’च्या आजच्या व्यक्तिस्वातंत्र्यवादी कालखंडात ‘आजी’ ही अडगळीची वस्तू होत असताना समरसतेने लिहिलेल्या आजीविषयीच्या आठवणी ही मराठी साहित्यातील विरळा कलाकृती असावी. म्हणून या साहित्यकृतीचे मोल अधिक आहे.

  - ‘आजी आठवताना’ (आठवणी)
  - लेखिका : धारा भांड-मालुंजकर
  - साकेत प्रकाशन, औरंगाबाद
  - पृष्ठे : ३२८, Á किंमत रू. ३२५/-

  - डॉ. सुरेश सावंत
  sureshsawant2011@yahoo.com

Trending