आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गब्बरची जादू रुपेरी पडदा ते मॅनेजमेंट क्लासेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१५ ऑगस्ट १९७५ रोजी रमेश सिप्पी यांनी आपला बहुचर्चित चित्रपट "शोले' प्रदर्शित केला. दोन कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने पहिले दोन आठवडे प्रेक्षकाविना घालवले. मात्र त्यानंतर या चित्रपटाने प्रेक्षकांना अशी भुरळ घातली, जी आजही कायम आहे. आजही या चित्रपटातले संवाद बोलले जातात आणि आजही मुख्य खलनायक गब्बर सिंगची आठवण काढली जाते. बॉलीवूडच्या इतिहासातील कदाचित हा पहिलाच चित्रपट असेल ज्याच्या खलनायकाची प्रचंड चर्चा झाली आणि केवळ जाहिरातीच नव्हे तर मॅनेजमेंट क्लासेसमध्येही त्याच्या नेतृत्वाचे दाखले दिले जातात. शोले ४० वर्षांनंतर ३ डी मध्येही आणला जातो आणि पाकिस्तानातही प्रदर्शित केला जातो. त्याची रिमेक केली जाते. अशा या शोलेच्या निमित्ताने त्याच्याशी संबंधित काही विशेष घटनांवर एक नजर-

जाहिरातीत आलेला पहिला खलनायक
खलनायक म्हणजे वाईट प्रवृत्तीची व्यक्ती. नायकाकडून मार आणि प्रेक्षकांकडून शिव्या खाणारा. शोलेमधला गब्बर म्हणजे तर खलप्रवृत्तीचा कळस. अशा या गब्बरला घेऊन लहान मुलांच्या बिस्किटाची जाहिरात करणे म्हणजे अकल्पनीय. परंतु कैलाश सुरेंद्रनाथ यांनी ग्लुकोज डीच्या जाहिरातीसाठी गब्बरची निवड केली आणि जाहिरात क्षेत्रात खळबळ उडाली. लिंटास मीडियामध्ये काम करणाऱ्या दिवंगत मुबी इस्माइल यांची ही मूळ कल्पना. खरे तर तेव्हा कलाकार जाहिरातींमध्ये जास्त दिसत नसत, त्यातही खलनायक घेण्याची तर कल्पनाही कोणी केली नव्हती. अशा वेळी अमजद खानला गब्बरचेच रूप देऊन ग्लुकोज डीची जाहिरात करण्यात आली, जी प्रचंड लोकप्रिय झाली आणि ग्लुकोज डीच्या खपातही वाढ झाली. केवळ ५० हजार रुपयांत ही जाहिरात तयार करण्यात आली होती आणि अमजद खानने त्याला जाहिरातीसाठी मिळालेले पैसे एका संस्थेला दान म्हणून देऊन टाकले होते.

गब्बर पहिला मॅनेजमेंट गुरू
गब्बर खलनायक होता, परंतु अगदी "कितने आदमी थे'पासून "बसंती को गांववाले कौनसी चक्की का आटा खिलाते हैं'पर्यंत त्याचे सर्व संवाद प्रचंड गाजले. मॅनेजमेंट गुरुंनी त्याच्या या संवादातून कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना शिकवण देणे सुरू केले. गब्बरच्या प्रत्येक वाक्याचा खोलवर जाऊन त्यांनी अर्थ काढला आणि त्यातून अधिकाऱ्यांना धडे दिले. मॅनेजमेंट क्लासमध्ये गब्बरचे संवाद दाखवून त्याचे विश्लेषण केले जाते. नोकरी करायची असेल आणि पुढे जायचे असेल तर साहस हवे, टीम छोटी असेल तरीही ती मोठे काम करू शकते, स्वतःच स्वतःची ब्रॅन्ड निर्मिती करणे आणि प्रमोट करणे, वेळप्रसंगी कठोर निर्णय घ्या, आपले उत्पादन आणण्यापूर्वी बाजाराचा अभ्यास करा, इत्यादी धडे आजही दिले जातात.

शोले ३ डी
शोलेची लोकप्रियता लक्षात घेऊन गेल्या वर्षी शेमारू कंपनीने केतन मेहता यांच्या माया स्टुडियोच्या मदतीने शोलेचा ३ डी अवतार प्रदर्शित केला. मूळ शोले ज्यांनी पाहिला होता, त्यांनी त्याचा ३ डी अवतार पाहायला गर्दी केली, तर शोलेबाबत अनेक वेळा ऐकलेल्या नवीन पिढीनेही ३ डी रूप पाहण्यासाठी गर्दी केली आणि पुन्हा एकदा शोलेने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

पाकिस्तानातही झाला प्रदर्शित
भारतात प्रदर्शित झाल्यानंतर गेल्या वर्षी म्हणजे ३९ वर्षांनंतर शोले पाकिस्तानात प्रदर्शित झाला. पाकिस्तानमध्ये शोलेबाबत प्रचंड क्रेज होती, परंतु अनेकांना मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहता आला नव्हता. त्यामुळे पाकिस्तानमध्ये आबालवृद्धांच्या शोलेवर उड्या पडल्या आणि पाकिस्तानी वितरकाची तिजोरी पैशाने भरून गेली.

शोलेची रिमेक
भारतातील अनेक दिग्दर्शकांचे शोलेसारखा भव्य चित्रपट बनवण्याचे स्वप्न असते. परंतु शोले पुन्हा बनणे शक्य नाही, हे रामगोपाल वर्माच्या २००५च्या "आग' चित्रपटाने दाखवून दिले. गब्बर सिंगच्या भूमिकेच्या प्रेमात अमिताभ बच्चन होता, त्यामुळे त्याने रामगोपाल वर्माच्या "आग'मध्ये गब्बर सिंगची भूमिका साकारली. परंतु नंतर आपली ही चूक झाल्याचे त्याने कबूल केले. त्यापूर्वी शोलेची रिमेक अनेकांनी केलीही होती, परंतु एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. सुभाष घई यांचा "कर्मा'ही याच थीमवर आधारित होता, तर श्रीदेवीचा "आर्मी'ही शोलेवरच आधारित होता.

गब्बरवर पुस्तक
शोलेच्या लोकप्रियतेने चित्रपटातील सर्व कलाकार प्रेक्षकांपर्यंत पोहोचले होते. परंतु गब्बर जरा जास्तच. त्यामुळेच गब्बरच्या जीवनावर एक कॉमिक पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. शोले-गब्बर या पुस्तकात गब्बरचा लहानपणापासूनचा जीवनप्रवास मांडण्यात आला. लहान मुलगा मोठेपणी इतका क्रूर कसा होऊ शकला, याचे काल्पनिक चित्रण या पुस्तकात करण्यात आले होते. इंग्रजी आणि हिंदीतील हे पुस्तक चांगलेच लोकप्रिय झाले होते. गब्बरप्रमाणेच शोलेची संपूर्ण कथाही शोले- द ग्राफिक नॉव्हेल कॉमिकच्या रूपात आणण्यात आली होती. अनुपमा चोप्राने "शोले- द मेकिंग ऑफ अ क्लासिक' पुस्तक लिहून शोलेचे मेकिंग वाचकांपर्यंत पोहोचवले.

गब्बर इज बॅक
गब्बरच्या लोकप्रियतेने अक्षयकुमारलाही भुरळ घातली आणि त्याने नायकासाठी गब्बरचे नाव घेतले आणि "गब्बर इज बॅक' नावाचा चित्रपट केला. समाजातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी गब्बरचे नाव कसे वापरता येईल, असा सकारात्मक संदेश अक्षयकुमारने चित्रपटात दिला होता.

शनिवारी पुन्हा येणार गाणी आणि संवादाची ध्वनीफीत
शोलेचे संवाद आणि गाणी प्रचंड लोकप्रिय झाल्याने युनिव्हर्सल स्टुडियो शनिवार १५ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा चित्रपटातील संवाद आणि गाण्यांची नवी ध्वनीफीत बाजारात आणणार आहे. कंपनीला विश्वास आहे की, या ध्वनीफितीला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभेल.