आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'शोले' नावाच्या चमत्काराची थरारक गोष्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनिश्चितता हा तर जगण्याचा स्थायीभाव. म्हणूनच शिस्तीचं आयुष्य जगूनही नाकासमोर चालणाऱ्या माणसाला आयुष्यातली अनिश्चितता चुकवता येत नाही. हिंदी चित्रपटसृष्टी (किमान चाळीस वर्षांपूर्वीची तरी) ही तर मुलखाची बेशिस्त जागा. इथला सगळा व्यवहार ‘दिमाग से ज्यादा दिल’ प्रकारातला, म्हणजेच मेंदूपेक्षा मनाचा कौल घेऊन चालणारा. म्हणूनच अगदी व्यावसायिक यशाची सगळी गणितं मांडूनही कधी कुठल्या क्षणी कुणाच्या पदरात दान (अपात्री-सत्पात्री असे दोन्हीही) पडेल, कधी कोण निराशेच्या खाईत लोटला जाईल आणि कधी कोण जीवनातून उद्ध्वस्त होऊन जाईल, याचा नेम नसतो. कलावंत लहान असो मोठा असो, लोकप्रिय असो नाकारलेला असो, अहंकाराची आग तर इथे सदोदित पेटलेली असते. त्यामुळे या आगीत कधी कोण भस्मसात होऊन जाईल, याचीही शाश्वती नसते. निर्माता-दिग्दर्शक-नट-नट्या-तंत्रज्ञ या सगळ्यांच्या तऱ्हा निराळ्या असतात, मूड निराळे असतात, अपेक्षा आणि आकांक्षाही निराळ्या असतात.

या सगळ्या उपर या लोकांवर असलेले दृश्य-अदृश्य स्वरूपाचे सामाजिक-राजकीय दबाव अनिश्चितता कमी करण्याऐवजी ती वाढवतच असतात. त्यामुळे निर्माता-दिग्दर्शकापासून तंत्रज्ञांपर्यंत सगळेच लोक व्यावसायिकदृष्ट्या गॅरंटेड वर्गात मोडणारे असले, किंवा सृजनाच्या पातळीवर कितीही थोर असले, तरीही एखादी गोष्ट पूर्णत्वास जाईलच, याची अखेरपर्यंत काहीही शाश्वती नसते. तशी शाश्वती कुणी शहाणा माणूस देतही नसतो. देण्याची हिंमत करत नसतो. मात्र, प्रारंभापासून शेवटापर्यंत सगळंच दोलायमान असतानाही चमत्कार होत असतात. या चमत्कारांकडे किंवा अशा प्रकारच्या परिस्थितीत आकारास येणाऱ्या कलाकृतींकडे खूप संयमाने आणि प्रगल्भपणे पाहायला हवं, त्यातले सहसा नजरेस न पडणारे ताणे-बाणे समजून घ्यायला हवेत, कलावंत-तंत्रज्ञांच्या मनात चाललेली खळबळ, संघर्ष समजून घ्यायला हवा, याचं भान ज्येष्ठ पत्रकार-लेखिका अनुपमा चोप्रा यांचं ‘शोले-दि मेकिंग ऑफ क्लासिक’ हे पुस्तक देतं. खरं तर हे पुस्तक प्रकाशित झालं, सन २०००मध्ये. परंतु १५ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची उजळ‌णी "शोले'च्या चार दशकपूर्तीचा क्षण अनुभवताना रंजक ठरावी.
तसं पाहता "शोले' हा अॅक्शन-इमोशन्स-ड्रामा असं सगळं मिश्रण असलेला तद्दन मसालापट. तो आकारास येताना जाणवलेले सिनेमांशी संबंधित कलावंतांचे स्वभाव-विभाव, सामर्थ्य-उणिवा लेखिका बारकाव्यांनिशी टिपते.

निर्माता-दिग्दर्शकांची जिद्द, हट्ट आणि ध्येयनिष्ठा यातून अधोरेखित होते. तडजोडीचे अनेक प्रसंग आणि संकटं येऊनही त्यांचा अविचल स्वभाव लक्ष वेधून घेतो. यातून शोले पडद्यावरच नव्हे तर पडद्याबाहेरही (बंगलोरजवळच्या रामनगरममध्ये तात्पुरतं वसवलेलं गाव) प्रतिसृष्टी निर्माण करणारा सिनेमा होता, याचं भान वाचक म्हणून आपल्याला येतं. म्हणजे, एखादा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर वेग घेणारं अर्थचक्र साधारणपणे आपल्याला ठाऊक असतं, पण शोलेसारखा सिनेमा निर्मिती अवस्थेत असतानाही वेगवेग‌ळ्या पातळ्यांवर अर्थचक्राला कसा गती देत असतो, अनाहूतपणे अनेकांपुढ्यात रोजगाराचा पर्याय उपलब्ध करून देत नवी नवी ध्येय-उद्दिष्ट रचत असतो, हेही लेखिका चोप्रा या पुस्तकातून अधोरेखित करत जाते. प्रेक्षकांना किस्से, कहाण्यांमध्ये रमायला आवडतं. पुस्तकात पानोपानी आश्चर्याचा सुखद धक्का देणारे आपल्या माहिती आणि ज्ञानात (कला दिग्दर्शक राम येडेकर आणि संकलक माधवराव शिंदे यांच्याबद्दलची माहिती आणि शोलेच्या निर्मितीतला त्यांचा वाटा आपल्याला सुखावून जातो.) मोलाची भर घालणारे असंख्य किस्से वाचायला मिळतात. पण या किश्श्यांपेक्षाही लक्ष वेधून घेतात ते अनिश्चितता अधोरेखित करणारे प्रसंग. म्हणजे, सलीम-जावेद शोलेची कथा लिहितात तिथपासून या अनिश्चिततेला प्रारंभ होतो आणि प्रीमियरच्या दिवशी ७० एमएमची प्रिंट कस्टम खात्याने विमानतळावरच रोखून धरण्यापर्यंत ती सोबत करत असते.

आपण तर काय पाच-पंचवीस रुपयांत शोले बघितला, परंतु शोले आपण जसा बघितला तसा दिसण्यासाठी दिग्दर्शक रमेश सिप्पीने वे‌ळोवेळी दाखवलेला मॅडनेस या पुस्तकातून आपल्यापर्यंत पोहोचतो. जे सीन पाहून आपण थरारून गेलो होतो, ते पडद्यावर साकारण्यासाठी निर्माता-दिग्दर्शकांनी खास लंडनहून अॅक्शन डायरेक्टर पाचारण केले होते. जो स्टिरिओफोनिक साऊंड ऐकून आपण वेडावून गेलो होतो, जो ७० एमएमचा भव्यदिव्य पडदा बघून आपण खलास झालो होतो, ते सगळं साधण्यासाठी दिग्दर्शकाला त्या काळी नोकरशाहीच्या किती चौकटी भेदाव्या लागल्या होत्या, प्रत्येक पावलागणिक किती संघर्ष करावा लागला होता, याचा पुरता अंदाज देताना लेखिका इथल्या राजकीय-सामाजिक व्यवस्थेवर, निबर नोकरशाहीवर अप्रत्यक्ष भाष्यही या पुस्तकातून करते.
शोले प्रदर्शित झाला, तो काळ आणीबाणीचा होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी, सार्वजनिक अस्तित्वावर कडक निर्बंध, सेन्सॉरचा अमर्याद हस्तक्षेप या सगळ्याला तोंड देताना अनिश्चितता आणि असुरक्षितताच केवळ निर्माता-दिग्दर्शकाला सोबत करत होती, हे वास्तवही पुस्तकातून पुन:पुन्हा अधोरेखित होतं. आज ४० वर्षांनंतर शोलेचं मूल्यांकन करताना आपण सहज म्हणून जातो, सगळंच कसं छान जुळून आलं होतं यात! परंतु पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला पुरतं उमगतं की, "शोले' हा टोकाच्या अनिश्चिततेतून जन्माला आलेला अनेक पिढ्यांच्या जगण्यात आनंद पेरणारा पुन्हा कधीही न साधणारा सुखद चमत्कार होता…

पुस्तकाचे नाव : शोले दी मेकिंग ऑफ क्लासिक
लेखिका : अनुपमा चोप्रा
प्रकाशक : पेंग्विन बुक्स
किंमत : ~ २९९/-