आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ रणकंदन!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसबुक-ट्विटरसारख्या ज्वलनशील सोशल मीडियात २०१४मधील घटनांचे अवलोकन केले जात असतानाच अचानक राजकुमार हिराणी दिग्दर्शित व आमिर खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘पीके’ या चित्रपटावरून, संघ परिवाराच्या घरवापसी या मुद्द्यावरून आणि महेंद्रसिंह धोनी याच्या कसोटी क्रिकेटमधील अकाली निवृत्तीवरून रणकंदन माजलेले दिसत होते.

‘पीके’चे समर्थक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, मतस्वातंत्र्याचा व धर्मचिकित्सेचा आग्रह धरत होते; पण ‘पीके’ हा चित्रपट हिंदू धर्मालाच टार्गेट करण्याचा सेक्युलरवाद्यांचा उद्योग असल्याचा आरोप कडव्या हिंदुत्ववाद्यांकडून होत होता. हा चित्रपट रिलीज झाल्या झाल्या दोन्ही बाजू सांगणारे मेसेज सोशल मीडियातून फिरत होते. ‘पीके’वर फोटोशॉप केलेले फोटो फिरत होते. काही चहाटळांनी ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीचा दाखला देत ‘पीके’वर पी के म्हणजे, तर्र होऊन टीका करणार्‍यांचा समाचार घेतला होता.

या विषयावर मध्यममार्ग स्वीकारणार्‍या काहींनी फेसबुकवर ‘पीके’ची तुलना ‘ओ माय गॉड’ या चित्रपटाशी केली. ‘पीके’ची कथा ‘ओएमजी’ला ओलांडूनही गेली नाही, असे काहींचे मत होते. एकाने पीकेच्या समर्थनार्थ पाकिस्तानी चित्रपट ‘खुदा के लिए’चा दाखला दिला. त्याच्या मते, ‘खुदा के लिए’ हा पाकिस्तानी चित्रपट होता व त्यामध्ये दाढी ठेवण्याबद्दल व महिलांनी बुरखा घालण्यावर टीका करण्यात आली होती; पण या चित्रपटाला ना पाकिस्तानी प्रेक्षकांनी नाकारले, ना भारतीय प्रेक्षकांनी. मुख्य म्हणजे, या चित्रपटात नसिरुद्दीन शाह यांनी विशेष भूमिका वठवली होती; पण दोन्ही देशांच्या लोकांनी थिएटर बंद पाडले नाही की पोस्टर्स फाडली नाहीत. मराठी विश्वातही पीकेची साधकबाधक चर्चा होताना धर्माभिमान्यांवर ताशेरे ओढण्यात बरीच अहमहमिका सुरू होती. कवी सौमित्र यांची एक कविता या विषयावरचे व्यापक भाष्य होते.

देव अल्ला गॉड फक्त
एवढेच शब्द लिहू लागतिल
मुलं आता हळूहळू
शाळेत जायला भिऊ लागतिल

एक होती शाळा अशीच
गोष्ट आता सांगतिल लोक
हसून खेळून वरवर बोल्तिल
मनात आता पांगतील लोक

अडगळितले धर्मग्रंथ
हळूहळू उघडले जातिल
गुपचूप काळोखात पालक
शिकवताना पकडले जातील

कशासाठी ठेवू नये
त्याने शाळेत आता पाय
मारला गेलाय त्याचा मित्र
म्हणजे नक्की झालंय काय

माझ्या ओंजळित उरलंय
त्यात एकच शुभ्र कबूतर
गिधाडांनी आभाळ आणि
गच्च भरून आलंय वर
फेसबुकवर एका पोस्टकर्त्याने असगर वजाहत यांच्या ‘जिस लाहोर देख्या’ (मराठी अनुवाद– दूर घर माझे - शफाअत खान) या नाटकाचा उल्लेख केला. फाळणीनंतर पाकिस्तानात परतलेला एक मध्यमवर्गीय मुस्लिम व पाकिस्तानात राहण्याचा निर्णय घेतलेली, एका हवेलीची हिंदू वृद्ध मालकीण यांच्यातील हा संघर्ष नाटक दाखवते. अखेरीस मानवतावादी शायर व धर्मवेडा यांच्यातील विद्वेषाची धार बोथट होत जाते, ही दोन्ही कुटुंबे एक होतात. एकंदरीत मोदी सरकार केंद्रात आल्यानंतर धर्म आणि धर्माची मानवतेच्या दृष्टीतून चिकित्सा करणार्‍यांमधील विसंवाद वाढत असल्याचे दिसून येते.

या विषयावरची पुढील उक्ती, ‘हिन्दू को मुसलमान या मुसलमान को हिन्दू बनाने से कुछ नहीं होगा, दोनों समुदायों में छिपे हैवान को इंसान बना दो, तो सबका भला होगा’, सार्थ ठरावी अशी होती. पीके, घरवापसीच्या धुरळ्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची अकाली निवृत्ती फेसबुक, ट्विटरवर गदारोळ उडवून देणारी होती. कोहलीचे समर्थक R.I.P. धोनी म्हणून त्याच्या निवृत्तीची टर उडवत होते, तर धोनीचे समर्थक धोनीच्या कूल कोशंटची चर्चा करत होते. भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून धोनीची प्रशंसा करणार्‍या अनेक चर्चा फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अ‍ॅपवर फिरत होत्या...