Home | Magazine | Rasik | Rasik Article About Strength of America

सामर्थ्य आहे अमेरिकेचे...

डॉ. प्रमोद चाफळकर | Update - Sep 24, 2017, 12:22 AM IST

नैसर्गिक साधन संपत्ती, अतिउच्च पातळी गाठलेली भांडवलशाही, आर्थिक नववसाहतवाद, लष्करी वर्चस्व आणि परराष्ट्र धोरण ही

 • Rasik Article About Strength of America
  नैसर्गिक साधन संपत्ती, अतिउच्च पातळी गाठलेली भांडवलशाही, आर्थिक नववसाहतवाद, लष्करी वर्चस्व आणि परराष्ट्र धोरण ही अमेरिकेला सामर्थ्यवान बनवणारी महत्वाची कारणे आहेतच. पण या विशिष्ट संदर्भातच अमेरिका यशस्वी का आहे? याचे स्पष्ट उत्तर "नाही' असेच आहे...

  मागील तीन आठवड्यात आपण अमेरिकन संस्कृतीतील नैतिकता, अमेरिकी जनतेचा जीवन दृष्टिकोन आणि शिक्षण हे विषय हाताळले. या तीन गोष्टींचा आणि अमेरिका शक्तिशाली असण्याचा काही संबंध आहे का? तर याचे उत्तर अंशतः होकारार्थी आहे. नैसर्गिक साधन संपत्ती, अतिउच्च पातळी गाठलेली भांडवलशाही, आर्थिक नववसाहतवाद, लष्करी वर्चस्व आणि परराष्ट्र धोरण ही अमेरिकेला सामर्थ्यवान बनवणारी महत्वाची कारणे आहेतच. यातील भांडवलशाही ही कार्यक्षम, उत्पादक होण्यात, इतर कारणांबरोबर, सांस्कृतिक आणि त्यातही ख्रिश्चन धर्मासारख्या लहान मोठ्या घटकांचा महत्वाचा वाटा आहे. पण या विशिष्ट संदर्भातच अमेरिका यशस्वी का आहे?

  कॅथलिक पंथ हा, इतर गोष्टींबरोबर, गरिबांप्रती कणव करतो, गरिबांना मदत करण्यावर भर देतो. तर प्रोटेस्टंट हे, इतर गोष्टींबरोबर, ऐहिक व्यवहाराला धार्मिक रंग देतात.अमेरिकेतील बहुसंख्य ख्रिश्चन हे प्रोटेस्टंट आहेत. मॅक्स वेबरने प्रोटेस्टंट असणे आणि उद्योगात असणे, यातला संबंध अधोरेखित केला होता. नफा हा अंतिम उद्देश आहे, आणि नफा मिळवणे हा सद््गुण आहे, अशी इथल्या भांडवलशाहीची वृत्ती असते. अर्थात, जरी भांडवलशाहीची उत्पत्ती ही समाजाच्या आर्थिक इतिहासात असली, तरीही त्यात विचारांचाही काही प्रमाणात भाग असतो. मॅक्स वेबरने युक्तिवाद केला आहे, की प्रोटेस्टंट विचारांनी भांडवलशाही निर्माण केली नसली, तरी त्यांनी भांडवलशाही येण्याला मदत नक्कीच केली. असो.

  अमेरिकेतील बहुसंख्य प्रोटेस्टंट लोकांना गरिबीकडे लक्ष न देता नफ्याला प्राधान्य देणे लाजास्पद वाटत नाही. अमेरीकेतील भांडवलशाहीच्या या चेतनेचा अमेरिकेच्या यशात वाटा आहे. प्रोटेस्टंटमधील एक पंथ, कॅल्व्हिनिझम हा तर याच्याही कितीतरी पुढे जातो. त्याच्या म्हणण्यानुसार काही लोक देवांनी निवडलेले असतात. देवांची ही निवड या निवडक लोकांच्या उद्योगातील यश आणि श्रीमंती यातून दिसते. या वृत्तीने उद्योगपती इथे व्यवसाय करतात.

  लक्षवेधी बाब म्हणजे, अमेरिकन लोक प्रचंड धार्मिक आहेत. अर्थातच प्रोटेस्टंट आणि कॅल्व्हिनिझम यांची वृत्ती आणि नैतिकता अमेरिकेत खोलवर रुजली आहे. त्यामुळे, इतर कारणांबरोबर, या गोष्टीसुद्धा उद्यमशीलता, श्रीमंती यांना कारणीभूत आहे.

  याच जोडीला अमेरिकी कार्य संस्कृतीत प्रामुख्याने लक्ष वेधून घेतात ते म्हणजे, स्पष्टपणे लिहिलेल्या जॉब प्रोसिजर्स, अर्थात‘कार्य प्रक्रिया’. यानुसार यात प्रशिक्षण घेऊन कुणालाही लवकरात लवकर काम करता येते. कर्मचाऱ्यांच्या कामात लवचिकपणा येतो. ‘वर्क एथिक्स’मुळे प्रोसिजर्स काटेकोरपणे पाळल्या जातात. शिवाय बऱ्याच शक्यता गृहित धरून प्रोसिजर्समध्ये लवचिकता आणली जाते. कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी स्वतंत्रता जपावी, खंबीरपणे मते मांडावीत, योग्य ठिकाणी मतभिन्नता नमूद करावी, कल्पकता दाखवावी या अपेक्षा असतात. शाळेपासून हे गुण जोपासले जातात. या सर्वांमुळे कॉर्पोरेशन्स कार्यक्षम होण्यात मदत होते.

  साहजिकच भांडवलशाही प्रगत अवस्थेत नेण्यात कॉर्पोरेशन्सचा मोठा हातभार राहिला आहे. आज घडीला जगात सर्वात जास्त कॉर्पोरेशन्स अमेरिकेत आहेत. व्यवस्थापन शास्त्रातील दर्जेदार विद्यापीठे अमेरिकेत आहेत. सूत्रबद्ध नियोजन, दूरदृष्टी, बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचे महत्व ओळखणे या बाबतीत कॉर्पोरेशन्स खूप पुढे आहेत. फायनान्सच्या हुशारीत, मला नाही वाटत कुठला देश अमेरिकेच्या तोडीचा आहे. विज्ञान आणि गणित विषयापेक्षा अमेरिकी लोक बिझनेस आणि फायनान्समध्ये जास्त हुशार आहेत. मागच्या लेखात बघितले, त्याप्रमाणे विद्यापीठात मुख्य शाखेबरोबरच विविध विषयातील वर्ग घ्यावे लागतात. यामुळे विद्यार्थी बहुश्रुत असतो. बाकी इतर गोष्टींबरोबर, हे सर्वांगीण आणि दर्जेदार व्यवस्थापनाचे शिक्षण यांचा कॉर्पोरेशन्सच्या यशात वाटा आहे.

  अमेरिकेत विद्यापीठे आणि संशोधनावर प्रचंड पैसे गुंतवले जातात. मोठ्या कंपन्या आणि सायन्स फौंडेशन विद्यापीठातील संशोधनाला पैसे पुरवतात. संशोधनासाठी मोठ्या खाजगी कंपन्यात वेगळी खाती असतात. त्यात भविष्यकालीन योजना आखल्या जातात. आपण शिक्षणावर प्रकाशझोत टाकताना बघितले की, प्रोजेक्ट करताना एकच उत्तर नसते, एकच डिझाइन नसते. त्यामुळे कल्पकतेने विविध डिझाइन आकाराला येतात. कल्पकतेला आणि स्वतःहून माहिती शोधायाला, अगदी शाळेपासून प्रोत्साहन मिळते. संशोधन आणि कल्पकतेने आज अमेरिकेत मोठ्या प्रमाणात पेटंट्स आहेत. पेटंट्स अमेरिकेच्या यशातील महत्वाचा घटक आहेत.

  थोडक्यात सांगायचे म्हणजे,प्रोटेस्टंट धर्म, समृद्ध कार्यसंस्कृती, शाळेपासून जोपासलेली कल्पकता, स्वतंत्र विचारपद्धती, विद्यापीठे, संशोधनातील गुंतवणूक, कार्यक्षम कॉर्पोरेशन्स, व्यवस्थापन आणि फायनान्समधील हुशारी यामुळे अमेरिकेची भांडवलशाही ही प्रगत आहे. लष्करी प्रभुत्वाबरोबरच ही गोष्ट अमेरिकेच्या यशाला कारणीभूत ठरली आहे. म्हणूनच अमेरिकेचे मोठेपण केवळ लष्करी सामर्थ्यामुळे नव्हे तर शोध-संशोधन, जतन-संवर्धन या मुळे अधिक आहे.

  -डॉ. प्रमोद चाफळकर
  Pramod.Chaphalkar@gmail.com
 • Rasik Article About Strength of America
 • Rasik Article About Strength of America

Trending