आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंधमुक्तीचे प्रतीक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिढ्यान‌् पिढ्या प्रवाहाबाहेर राहिलेल्या घटकसमूहांसाठी बदलती जीवनशैली बंधमुक्तीचा जणू जाहीरनामाच बनली आहे. याच जीवनशैलीच्या प्रभावाने एका बाजूला साधनसंपत्तीचे बीभत्स दर्शनही घडले आहे, आणि दुसऱ्या बाजूला असीम प्रेम आणि त्यागाचा आविष्कारही घडला आहे...

लाखो वर्षांपूर्वी अन्न-पाणी आणि सुरक्षित आसऱ्याच्या शोधात होमोसेपियन नावाचा मनुष्यप्राणी आफ्रिका खंडाबाहेर पडला. तो केवळ मानवी स्थलांतराच्या अविरत प्रक्रियेचाच नव्हे, तर जागतिकीकरण आणि पाठोपाठ विकसित होत जाणाऱ्या मानवी जीवन आणि शैलीच्या जन्माचाही आरंभबिंदू होता. म्हणजे, आधी जीवन आणि मग शैली विकसित झाली.
तशी ती विकसित होण्यातही हजारो वर्षं सरली. माणूस टोळी करून राहात असताना शैली आणि शरमेपेक्षा तग धरून राहणंच महत्त्वाचं होतं; पण शेतीचा जन्म झाला आणि पुढे कुटुंब आणि समाजव्यवस्था रुजत गेली. शेतीतून आलेल्या समृद्धीने जीवनशैलीस आकार येत गेला.
इंग्लंडमध्ये अठराव्या शतकात झालेल्या औद्योगिक क्रांतीने माणसाच्याच नव्हे तर इतरही सजीवांच्या जगण्याला निर्णायक, प्रसंगी घातक वळणही दिले. या वळणावर सामील झालेल्यांना एकाच वेळी ऐहिक आणि शरीर-मनाच्या सुख-समृद्धीची आस होती.
विशिष्ट जीवनशैलीसाठी केला जाणारा सोस होता. हा सोस येण्यामागेही पुन्हा ज्याला आपण ‘मार्केट फोर्सेस’ म्हणतो, त्या बाजारपेठा होत्या. आता देशोदेशी बलवान होऊ पाहात असलेल्या या भांडवलशाही बाजारपेठाच समूहांच्या गरजा ठरवू लागल्या आहेत.
जीवनशैली निश्चित करू लागल्या आहेत. जीवनशैलीच्या प्रभावामुळे समूह एकाच वेळी सवयीचे गुलामही होऊ लागले आहेत आणि स्वातंत्र्यही अनुभवू लागले आहेत. पिढ्यान‌् पिढ्या प्रवाहाबाहेर राहिलेल्या घटकसमूहांसाठी बदलती जीवनशैली एका अर्थाने बंधमुक्तीचे जणू प्रतीक बनली आहे.
याच जीवनशैलीच्या प्रभावाने एका बाजूला साधनसंपत्तीचे बीभत्स दर्शनही घडले आहे, आणि दुसऱ्या बाजूला असीम प्रेम आणि त्यागाचा आविष्कारही घडला आहे. याच दोलायमान अवस्थेचा माग काढणारा, जीवनशैलींच्या विविध क्षेत्रावरील प्रभाव आणि परिणामांचे एका तरल पातळीवर मूल्यांकन करणारा हा तिसरा दिवाळी स्पेशल अंक वाचकांच्या पसंतीस उतरेल, ही मनोमन खात्री.
- रसिक टीम