आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रामसे युग'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानसशास्त्रात ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ नावाची संकल्पना आहे. म्हणजे, अपहरण झालेली व्यक्ती अपहरणकर्त्यांकडे किंवा दुष्कृत्य करणाऱ्या व्यक्तीकडेच आकर्षित होणे... भारतातल्या काही पिढ्या आणि रामसे बंधूंचे हॉररपट यात या मनोवस्थेच्या छटा आहेत...

एखादा ब्रँड तयार होतो, म्हणजे नेमकं काय होतं? थोडक्यात आणि ढोबळपणे सांगायचं तर एखाद्या उत्पादनाचं नावच उत्पादनाची ओळख बनून जात. उदाहरणार्थ लोखंडी कपाटाला आपल्याकडे ‘गोदरेज’च कपाट म्हणण्याचा प्रघात पडून गेला आहे. ‘छायांकित प्रत करा’ असं कुणी म्हणत नाही तर ‘अहो, जरा याची ‘झेरॉक्स’ द्या’ असं आपण म्हणतो. तसंच भारतामधल्या हॉरर चित्रपटांशी एक नाव जोडलं गेलं आहे. ते नाव आहे रामसे परिवाराचं. कित्येक रामगोपाल वर्मा आले नि गेले, कित्येक विक्रम भट अजूनही झगडत आहेत, पण भारतीय भयपट आणि रामसे बंधू हे जे अद्वैत ‘बेंच मार्किंग’ आहे ते अजूनही बदलत नाहीये.
एफ. यू. रामसे हे कराचीमधले मोठे प्रस्थ. फाळणीनंतर हे कुटुंब सात मुलं आणि मोठा जामानिमा घेऊन सर्व चंबुगबाळं आवरून मुंबईला आले. उत्तम बिझनेसमन असणाऱ्या रामसे परिवाराने मुंबईत चांगला जम बसवला. रामसे यांना चित्रपटांचा मोठा शौक होता. त्यांनी ‘शहीद ए आझम भगतसिंग’, ‘रुस्तुम सोहराब’सारख्या मोठ्या बजेटची चित्रपट निर्मिती केली; पण दैवाचे फासे फिरले. हे चित्रपट पडले. दिवाळखोरीची वेळ आली. कर्जाचा डोंगर उभा राहिला. यातून मार्ग कसा काढायचा? रामसेंनी प्रोड्यूस केलेल्या ‘एक नन्ही मुन्नी लडकी थी’ चित्रपटात एक प्रसंग होता. चित्रपटात मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत असणारे पृथ्वीराज कपूर एक भीतिदायक मुखवटा घालून चोरी करतात आणि मुमताज या अभिनेत्रीला घाबरवतात, असा प्रसंग त्या चित्रपटात होता. या ‘भयानक’ प्रसंगातून रामसेंना प्रेरणा मिळाली. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अढळ स्थान मिळवलेला आणि नंतर ‘कल्ट’ झालेल्या ‘दो गज जमीन के नीचे’ या भयपटाची निर्मिती केली.
केवळ पंधरा लोकांच्या टीमने हा चित्रपट अवघ्या एका महिन्यात हातावेगळा केला. तिकिट खिडकीवर चित्रपट धो धो चालला आणि बी ग्रेड फिल्म्समधले ‘रामसे युग’ सुरू झाले. नंतर रामसे बंधूंनी ‘दरवाजा’सारखे तब्बल ३० लो बजेट भयपट तयार केले. १९८४ ते १९९३ हा काळ रामसे बंधूसाठी सुवर्णकाळ होता. ‘पुराना मंदिर’, ‘महाकाल’, ‘वीराना’ या चित्रपटांनी जोरदार धंदा केला. एफ. यू. रामसे यांची सातही मुले आज सिनेमाच्या धंद्यात आहेत. गंगू रामसे हा सिनेमॅटोग्राफर आहे. तुलसी आणि श्याम रामसे दिग्दर्शनाची धुरा सांभाळतात. अर्जुन रामसे हा संकलनाची धुरा सांभाळतो. कुमार रामसे हा लेखक आहे, तर किरण रामसेकडे ध्वनी संयोजन खातं आहे. सगळ्यात शेवटचा, केशु रामसे. हा निर्मितीची जबाबदारी सांभाळायचा. पण ही धाकटी पाती बाकी बंधूपेक्षा वेगळी निघाली. घराण्याच्या विशिष्ट चौकटीत राहणं केशु रामसेला मंजूर नव्हतं. केशुनं स्वतःची वेगळी चूल मांडली. राजकुमार संतोषी आणि उमेश मेहरा यांच्यासारख्या तत्कालीन यशस्वी दिग्दर्शकांना घेऊन, मोठ्या स्टार्ससोबत चित्रपटनिर्मिती याने केली. अक्षयकुमारला ‘खिलाडी’ हा खिताब मिळवून देणाऱ्या आणि शीर्षकात आवर्जून खिलाडी हे नाव असणाऱ्या चित्रपटांसाठी केशु रामसे प्रसिद्ध आहे. केशु रामसेने फक्त वेगळी चूलच नाही थाटली, तर आपल्या प्रसिद्ध रामसे आडनावाला सुद्धा सोडचिठ्ठी दिली. आपल्या आडनावाचं ओझं त्याला नको होतं. मोठी स्वप्न बघणाऱ्या चाणाक्ष केशुला आपलं रामसे हे आडनाव आपल्या स्वप्नपूर्तीच्या आड येईल असं वाटत होतं. म्हणून पत्रकारांना मुलाखती देताना, केशु पत्रकारांना आडनाव न छापण्याची विनंती करायचा.
रामसे बंधूंचे चित्रपट काही लोकांना हास्यास्पद वाटतात, तर काही लोकांना भयानक. पण रामसे बंधूंचे चित्रपट त्याच्यातल्या हॉट सीन्समुळे जास्त गाजले. त्यांच्या चित्रपटांच्या निर्मितीमूल्यांची यथेच्छ थट्टा झाली. त्यांच्या चित्रपटात खरे स्टार्स भुताचा रोल बजावणारे नट होते. एका चित्रपटात भूत आदिदासचे बूट घालून येतो. या प्रकाराला लोक कितीही हसत असले तरी आपल्यापैकी बहुतेकांना, रामसे बंधूंच्या चित्रपटांनी आयुष्याच्या एका टप्प्यावर नक्की घाबरवलंय हे कबूल करायला हवं. टीव्हीवर ‘झी हॉरर शो’ नवीन सुरू झाला, असताना डोक्यावरून पांघरूण घेऊन एका फटीतून तो शो बघण्याचं थ्रील अनेकांनी लहानपणी अनुभवलं असेल. ‘झी हॉरर शो’च्या निमित्ताने रामसे बंधूंनी फक्त चित्रपटगृहात अनुभवायला मिळणारी भीती, लोकांच्या बेडरूममध्ये पोहोचवली. त्या अर्थाने, सध्या विशीत आणि तिशीत असणाऱ्या पिढीच्या अनेक लोकांच्या नॉस्टाल्जियाचा ते भाग आहेत. दिग्दर्शक श्याम रामसे एका मुलाखतीत म्हणाला होता, “देशाच्या ज्या भागात रेल्वे थांबत नाही, त्या भागात आम्ही सिनेमा आणि टीव्हीच्या माध्यमातून पोहोचलो आहोत.’’ एकदम मार्मिक विधान आहे, ना? जिथे भले भले राजकारणी आणि सेलिब्रिटी पोहोचू शकत नाहीत, तिथे रामसे हा ब्रँड पोहोचला आहे.
कालौघात भारतीय चित्रपट बदलला. रामसे बंधूंना नवीन बदलांशी जुळवून घेणं जमत नाहीये. सुभाष घई, धर्मेश दर्शन वैगेरे मंडळीना तरी कुठं जमलं? रामसे बंधूंनी मध्यंतरी काही चित्रपट बनवले. पण ते कधी आले आणि कधी गेले, ते कळलं नाही. मोठ्या निर्मिती संस्थेचे पाठबळ असणाऱ्या एकेकाळच्या दिग्गज सुभाष घईने दिग्दर्शनाला रामराम ठोकल्यात जमा आहे. पण रामसे बंधू अजूनही हिम्मत हरायला तयार नाहीत. रामसे घराण्याची पुढची पिढी सिनेमाच्या धंद्यात उतरली आहे, हा त्याचा ताजा पुरावा.
मानसशास्त्रात ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ नावाची संकल्पना आहे. अपहरण झालेली व्यक्ती अपहरणकर्त्याकडे आकर्षित होणे, किंवा एखाद्या दुष्कृत्याला बळी पडलेली व्यक्ती हे कृत्य करणाऱ्याकडेच आकर्षित होणे, याला मानसशास्त्रात ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ म्हणतात. म्हणजे, रामसे बंधूंचे हॉरर चित्रपट प्रेक्षकाला घाबरवतात, मध्येच झोपेतून दचकवून उठवतात. अनेक प्रकारे मानसिक छळही करतात. पण लोक अजूनही टीव्हीवर रामसे बंधूचे चित्रपट आवर्जून बघतात. भारतातल्या काही पिढ्या आणि रामसे बंधू यांच्यात मला, या ‘स्टॉकहोम सिंड्रोम’च्या छटा आढळतात. त्या शिवाय रामसे बंधूना मिळालेल्या घवघवीत, यशाचं स्पष्टीकरण कसं देता येणार?
amoludgirkar@gmail.com