आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रहाटणे त्या ऐसे ! अहिंसा नाम !!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैराने या जगात वैर कधीच शमत नाही, त्याचा उपशम केवळ अवैराने म्हणजेच प्रेमाने, मैत्री भावनेने होऊ शकतो. अवैर म्हणजेच प्रेम हाच सनातन धम्म आहे. या बुद्ध वचनानुसार वैराचे निराकरण वैरत्वाने होत नसून ते केवळ अवैराने म्हणजेच अहिंसेने आणि प्रेमाने होऊ शकते. विशेष म्हणजे, यामध्ये अहिंसा हे मूल्य अवैर अशा अभाव दर्शविणाऱ्या रूपात प्रकट झाले आहे. ठकत्वास ठकत्वाने विरोध केला तर ठकत्व कमी होत नाही, उलट ते वाढते. परंतु सत्याने त्याचा विरोध केला तर त्याचे निराकरण होते. गांधीजींचा विचार हा बुद्ध तत्त्वज्ञानावरच आधारित आहे. मात्र आजच्या घडीला विचारांची जागा वैराने घेतली आहे. हे वैर जाती-जातींमध्ये, धर्म-पंथांमध्ये, देशा-देशांमध्ये उफाळून आले आहे. त्याचेच दृश्य परिणाम यंदाच्या गांधी जयंतीला ठळकपणे पुढे आले आहेत. देश युद्धसदृश वातावरणात गांधी जयंती साजरी करणार आहे...
भारतभूमीतील जैन, बुद्ध आणि हिंदू या तिन्ही धर्मातील मूलतत्त्व म्हणून मान्यता पावलेले ‘अहिंसा’ हे मूल्य आधुनिक काळात महात्मा गांधींनी सामाजिक आणि राजकीय तत्त्वज्ञान म्हणून जगासमोर मांडले. अहिंसा हे निव्वळ अद्वैतमूल्य नसून त्याचा भावार्थ त्यासोबत प्रकट होणाऱ्या इतर मूल्यांच्या आधारे स्पष्ट होतो, जो अहिंसेला अधिक व्यापकता प्रदान करतो. अहिंसा हा भारतीयांचा प्रमुख संस्कार असून पतंजलीने त्याच्या योगासूत्रामध्ये ‘अहिंसा प्रतिष्ठिया। तत्स्य न्निधौ वैरत्याग:।।’ म्हणजेच अंतःकरणात अहिंसेची प्राणप्रतिष्ठापना झाली तर संपर्कात येणाऱ्याच्या अंतःकरणातील वैरभावना नाहीशी होते, असे अहिंसेचे वर्णन केले आहे. याशिवाय हटयोग प्रदीपिका या ग्रंथात ‘अहिंसा’ म्हणजे ‘हिंसेपासून स्वतःला रोखण्यासाठी आवश्यक असणारा संयम’ म्हणून परिभाषित केली आहे! छांदोग्य उपनिषदानुसार ‘अहिंसा’ पुरुषरुपी यज्ञाची दक्षिणा आहे. महाभारतातील नारायण्योपख्यानात उपरीचर राजाने पशूसंहार टाळून यज्ञ केला असल्याचा उल्लेख असून शांतिपर्वात भगवान नारायणाने देवांना असाच यज्ञ करण्याची आज्ञा केली होती,
यत्र वेदाश्च संयुक्तः तपः सत्यं दमस्तभा ।
अहिंसा धर्म संयुक्तः प्रचरेयू सुदोत्तमः ।।
‘वेद, यज्ञ, तप, सत्य, दम यांचे पालन अहिंसा धर्माने होत असेल अशा देशात आपण वास्तव्य करावे’ असेही म्हटले आहे. अहिंसा हा शब्द अभावात्मक आहे. ज्यामध्ये हिंसेचा अभाव म्हणजे प्रेम, असा अर्थ प्रतीत होतो. मात्र अहिंसा या शब्दात अनेक अर्थ दडलेले आहेत! ऋग्वेदात ‘अहिंसा’ हा शब्द इंद्रदेवाची स्तुती या अर्थाने, तर यजुर्वेदात आणि शतपथ ब्राह्मणात अहिंसा हा शब्द ‘इजा न करणे’ या अनुषंगाने वापरण्यात आला आहे. शांडील्य उपनिषदात सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, दया, क्षमा यासोबत अहिंसा हा सद‌्गुण असल्याचे म्हटले आहे. महाभारताच्या महाप्रस्थनिका पर्वात ‘अहिंसा परमोधर्म’ या अर्थाने अहिंसा हा ‘सर्वोच्च धर्म’ म्हणून वर्णन केला आहे. रामायणातील राज्यकारभाराच्या सूत्रात अहिंसा हे तत्त्व सत्य, दातृत्व आणि परोपकार यासमवेत प्रकट झाले आहे. राम वनवासात असताना रामाची भेट घेऊन रामास पुन्हा अयोध्यानगरीत येऊन राज्यकारभार करावा, अशी विनंती भरताने केली होती. मात्र पितृवचन मोडणे नाही म्हणून रामाने त्यास विरोध केला. राम म्हणतो, ‘सत्यव्रत माणसाने धर्माप्रमाणे वागले पाहिजे. कारण धर्म सत्यावर आधारित आहे. वेद प्रमाण मानून अहिंसा, सत्य, दान, परोपकार याचा अवलंब करून वेदोक्त धर्म आचरावा.’ वैदिक धर्मातील यज्ञसंस्थेतील हिंसेची प्रतिक्रिया म्हणून पूर्णतः यज्ञसंस्थेला त्याज्य मानणारे आणि अहिंसेला धर्माचा मूलाधार मानणारे जैन आणि बुद्ध हे दोन धर्मविचार उदयास आले. ज्यामध्ये अहिंसा हे तत्त्व ‘जीवहत्येस प्रतिबंध’ या स्वरूपात प्रथम प्रकट झाले. जैन धर्मातील सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह या तत्त्वांच्या आधारे आणि बुद्ध धर्मातील प्रज्ञा, शील आणि करुणा- ज्या करुणेमध्ये अहिंसा अनुस्यूत आहे- या त्रिरत्नांच्या आधारावर सामाजिक पुनरुत्थान झाले. ही सर्वच मूल्ये मानवतावादी असून अहिंसेच्या व्यावहारिक अर्थात त्यांचा अर्थ अनुस्यूत आहे. जैन धर्मातील तत्त्वज्ञानात ‘सौख्य त्याग आणि आत्मक्लेश’ हा भाव अंतर्भूत असल्यामुळे ‘अन्न-वस्त्राचा त्याग’ या बाबीही अहिंसा तत्त्वाशी निगडित मानल्या जातात. गांधीजींची उपोषणे या अनुषंगाने पाहावी लागतात. जातककथांमधून अहिंसा हे तत्त्व व्यावहारिक पातळीवर क्षमाशीलता आणि संयमी वृत्तीच्या रूपात मांडले गेले. अंगुलीमाल हा मूळचा दरोडेखोर. बुद्ध तत्त्वज्ञानामुळे तो भिक्षू बनला. तो भिक्षू झाल्याचे वर्तमान श्रावस्ती नगरीमधील लोकांस समजले. एके दिवशी तो भिक्षेस जात असताना लोकांनी त्याच्यावर दगडांनी आणि काठ्यांनी हल्ला केला. त्याचे डोके फुटून रक्त वाहू लागले.
बुद्धाने त्यास हे हल्ले सहन करण्याचा उपदेश केला. तो म्हणाला, ‘हा तुझ्या पूर्वायुष्यातील क्रूर कर्माचा विपाक आहे, त्याचेच फळ तू भोगत आहेस. लोकांकडून झालेल्या अपमानाने आणि शरीरास झालेल्या वेदनांनी मन विचलित होऊ देऊ नकोस, धम्माचा अवलंब कर तरच हिंसेपासून मुक्त होशील!’ अंगुलीमालाची ही कथा बुद्धाच्या अहिंसक मार्गाचे उदाहरण म्हणून सांगितली जाते. बुद्धाने अंगुलीमालास अहिंसक प्रतिकार कसा करावा, याचा आदर्श दिला. पूर्वाश्रमीच्या कर्मामुळे लोकांनी त्याच्यावर हिंसक हल्ले केले, त्या वेळी त्याने ते हल्ले शांतपणे सहन करून निर्वेरवृत्ती कायम ठेवली. अहिंसेचा मूळ अभिप्रेत असलेला अर्थ हाच आहे. महात्मा गांधींनी आयुष्यात, समाजजीवनात आणि राजकारणातदेखील हेच तत्त्व अंगीकारले. ‘शठं प्रति शाठ्यं’ हे धोरण म्हणजे ठकांचा नाश सज्जनत्वाने नव्हे तर ठकत्वानेच करता येईल. मात्र गांधीजी म्हणतात, ठकत्वास ठकत्वाने विरोध केला तर ठकत्व कमी होत नाही, उलट ते वाढते. परंतु सत्याने त्याचा विरोध केला तर त्याचे निराकरण होते. गांधीजींचा विचार हा बुद्ध तत्त्वज्ञानावरच आधारित आहे.
नहि वेरेन वेरानी सम्मन्तिध कुदाचनम ।
अवेरेन च सम्मति एस धम्मो सनातनो ।
- ‘सुत्तपिटक’
वैराने या जगात वैर कधीच शमत नाही, त्याचा उपशम केवळ अवैराने म्हणजेच प्रेमाने, मैत्री भावनेने होऊ शकतो. अवैर म्हणजेच प्रेम हाच सनातन धम्म आहे. या बुद्ध वचनानुसार वैराचे निराकरण वैरत्वाने होत नसून ते केवळ अवैराने म्हणजेच अहिंसेने आणि प्रेमाने होऊ शकते. विशेष म्हणजे, यामध्ये अहिंसा हे मूल्य अवैर अशा अभाव दर्शविणाऱ्या रूपात प्रकट झाले आहे. भगवतगीता म्हणजे वस्तुतः युद्धापासून परावृत्त होणाऱ्या अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करणारी श्रीकृष्णाची वचने! गीतेची अशी व्याख्या घेतली तर स्पष्टपणे गीता ही युद्धाला म्हणजेच हिंसेला प्रेरित करणारी दिसून येते. परंतु तात्त्विक पातळीवर गीता ही योग्य व अयोग्य हिंसा अशी विभागणी करते आणि अहिंसा हे तत्त्व योग्य हिंसा या स्वरूपात स्पष्ट करते. मात्र गांधीजी युद्ध कोणत्याही परिस्थितीत रोखले पाहिजे, या अनुषंगाने गीतेतील अहिंसेचे तत्त्वज्ञान आणि त्याचे महत्त्व अधोरेखित करतात. गीतेवरील ‘भावार्थ दीपिका’ या ग्रंथात ज्ञानेश्वर अहिंसेवर भाष्य करताना म्हणतात,
जगाचिया सुखोद्देशे । काया वाचे मानसे ।
रहाटणे त्या ऐसे । अहिंसा नाम ।।
आपल्या काया, वाचा, मनाकडून जगाला सुख व्हावे, या दृष्टीने होणाऱ्या वर्तनाला ज्ञानेश्वर अहिंसा म्हणतात. ज्ञानेश्वर यांनी भगवद गीतेतील ‘आत्मौपम्य’ म्हणजेच ‘आपणा सारखेच इतरांनाही समजणे, अनुभवणे या वर्तनाला अहिंसा म्हटले आहे. नितीविना व्यापार, विवेकाविना आनंद, तत्त्वाविना राजकारण, चारित्र्याविना ज्ञान, मानवतेविना विज्ञान, कष्टाविना संपत्ती आणि त्यागाशिवाय केलेली पूजा, या सात वर्तनाला गांधीजींनी पाप असे मानून हिंसेचा प्रचार आणि प्रसार रोखणे म्हणजे खरा धर्म मांडणे, अशी भूमिका घेतली. गांधीजींचे पहिले चरित्र रेव्हरंड जोसेफ डोक या दक्षिण आफ्रिकी धर्मगुरूने १९०९मध्ये ‘दि पोट्रेट ऑफ अॅन इंडियन पेट्रियॉट’ म्हणून प्रकशित केले. गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात सत्य-अहिंसेचे तत्त्वज्ञान स्वीकारून त्यास संयम, क्षमा, शांती आणि साधन सूचितेची जोड दिली. त्यातून नव्या करारातील ‘सर्मन ऑन दि माउन्ट’मध्ये येशूने दिलेल्या मानवतावादी शिकवणीची आठवण येते, असे डोक यांनी लिहिले. डोक यांना गांधीजींच्या अहिंसेच्या विचारात येशू दिसत होता. एवढेच नव्हे तर गांधीजींच्या हत्येनंतर युरोपातील अनेक विचारवंतांनी आणि तत्त्ववेत्त्यांनी गांधी हत्येला दुसऱ्या क्रूसरोहनाची उपमा दिली. यातूनच गांधीजी हे आधुनिक कालखंडातील अहिंसेचे व्यापक मानवतावादी तत्त्वज्ञान जागतिक स्तरावर मांडणारे प्रमुख तत्त्वचिंतक म्हणून ओळखले गेले.
मुंबईमध्ये २००४मध्ये भरलेल्या वर्ल्ड सोशल फोरममध्ये इराणमधील मानवाधिकार कार्यकर्त्या व नोबेल विजेत्या शिरीन इबादी यांनी गांधीजींच्या स्मृतिदिनानिमित्त ३० जानेवारीला ‘विश्व अहिंसा दिवस’ जगभर पाळण्यात यावा, अशी कल्पना सर्वप्रथम मांडली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या काही नेत्यांनी ही कल्पना २००७मध्ये दिल्लीत आयोजित केलेल्या ‘सत्याग्रह परिषदेत’ मांडून ३० जानेवारी ऐवजी २ ऑक्टोबर हा गांधीजींचा
जन्मदिवस विश्व अहिंसा दिवस म्हणून जाहीर करावा, असा प्रस्ताव पारित केला. त्याच अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील आर्च बिशप डेसमंड टूटू यांनी याबाबत संयुक्त राष्ट्रसंघाला निवेदन दिले. त्यानुसार संयुक्त राष्ट्र आमसभेतर्फे ५ जून २००७ रोजी महात्मा गांधी यांचा जन्मदिवस म्हणजेच, २ ऑक्टोबर हा दिवस ‘विश्व अहिंसा दिन’ म्हणून घोषित करण्यात आला. गांधीजींचे स्मरण करताना ‘अहिंसा’ हा केवळ तीन अक्षरांचा शब्द नसून या प्राचीन भारतीय मूल्याचा भावार्थ विश्वव्यापक असल्याचा प्रत्यय वारंवार येतो.
बातम्या आणखी आहेत...