आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोटल रिकॉल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी मित्राची डायरी वाचत होते... ‘‘त्या माणसाच्या विलक्षण नीटनेटकेपणाने मी प्रभावित झालो होतो. एका अनोळखी लहान गावात जाण्याचा योग आला होता. अशा जागी राहणारे अतिसाधेसरळ, कमीत कमी सोयीत राहणारे असणार हा माझा कयास होता. माणसेही तशीच, शिकलेली असली तरी थोडी अजागळ; पण भैयासाहेबांकडे गेलो तेव्हा हा समज खोटा ठरला. घरात दोन नोकरांसह राहणारा हा ‘माणूस चांगला आहे’, एवढेच ऐकलेले. दोन दिवसांच्या मुक्कामात पूर्ण परिचित असल्यासारखा झाला. पूर्वीची ओळख असल्यासारख्या आत्मीयतेने ते वागले...
पत्नीचे निधन, मुलगा आणि सून दूरदेशी. त्यांनी नोकरीत स्वत:ला बुडवून टाकले. त्यातच रमवून घेतले असले तरी ते पुरेसे नव्हते, हे त्यांनीच सांगितले. त्यांची लहानपणापासूनची आवड त्यांना यातून बाहेर काढायला उपयोगी पडली. वाचन आणि संशोधन. म्हणजे सिव्हिल इंजिनिअर झाले नसते तर ते कला शाखेत जाऊन इतिहास विषय घेऊ शकले असते.
पण आपल्या समाजात अशी लाखो माणसे आहेत, ज्यांना स्वत:च्या मनाप्रमाणे जगता येत नाही. जगण्याचा सगळा भाग अर्थकारणाशी जोडला गेलेला. घरची गरिबी आवडीचा विचार करू देत नव्हती. ते नोकरीला म्हणजे, संशोधन आणि आवड सोडून पैशाला बांधले गेले. तेव्हा स्वप्नांचा एक मनोरा कोसळला, असे ते म्हणाले. त्यांची कल्पना आवडण्यासारखीच होती; पण खरी गोष्ट अशी की, मनोरे बांधणे आपण सोडत नाही. नव्या मनोºयांमध्ये आपण गुंतत जातो. पडून गेलेल्याचा विचार प्रयत्नपूर्वक मागे टाकतो; पण तो विचार पूर्णपणे कधीच पुसला जात नाही. भैयासाहेबांनी वाचन चालू केले होते- इतिहासाचे, पुराणांचे, वैदिक ग्रंथांचे. त्यातून टिपणं काढणे, ते व्यवस्थित फाइल करणे सुरूठेवले. अर्थात वाचनाचा वेग त्यांच्या व्यवहारिक आयुष्यातून मिळणाºया वेळेवर अवलंबून होता. निवृत्तीनंतर आपण हे काम पूर्णवेळ करणार असे त्यांनी जाहीर केले आणि परदेशी असलेल्या मुलाकडे राहायला गेल्यावरही तौलनिक अभ्यासाचा निर्णयही सांगितला.
या गोष्टीला पंधरा-वीस वर्षे उलटली. माझ्या गोष्टीमध्ये मी इतका गुरफटलो की भैयासाहेबांची आठवणही मागे पडली होती. परवा ते अचानक भेटले. शहरातल्या सरदारकी असलेल्या एक माजी सरदार वंशानं एक म्युझियम उघडलं तिथे त्यांनी मला ओळखणं शक्य नव्हतं. कारण काळाच्या खुणा सुटलेले पोट आणि टकलाच्या रूपाने माझ्यावर उमटल्या होत्या. ते मात्र फारसे बदलले नव्हते. चांगला जाड चष्मा मात्र लागला होता. त्यांना बघून मला आनंद झाला. पुन्हा नव्याने येणाºया पालवीच्या उत्साहाने मी त्यांना भेटलो.
मी भेटलो त्या दिवशी ते अगदी एकटे होते. चेहरा उदास होता, पिवळसर पडलेली काही कागदपत्रे आणि पुस्तके त्यांच्या पुढ्यात होती. त्या जुन्या वस्तुसंग्रहालयातली शांतता, जुनेपणा. त्यांना एका प्लास्टिकच्या खुर्चीवर तसे पाहून मला वाईट वाटले. एवढा इंजिनिअर माणूस एकेकाळी किती अ‍ॅक्टिव्ह होता! हाताखाली नोकर, जीप, सगळ्या सुविधांसह रुबाबात राहत होता; पण हे सगळे विरून गेल्यासारखे आता झालेले. फुलाच्या पाकळ्या झडून गेल्यावर उरलेल्या मधल्या डोवºयासारखे. पोटात ढवळून आले.
ते सांगत होते, ‘निवृत्त झालो तेव्हा मनात कुठलीही गोष्ट योजून ठेवली नव्हती. मला इतिहासाचा नाद होता. वेळ कसा जाईल हा प्रश्न नव्हता आणि मुलाकडे जाण्याबद्दल उत्सुक नसलो तरी जावे तर लागणारच, ही जाणीव होती; पण मन मोठे गंमतशीर असते. आपण कामातून मुक्त झालोत, हे अजिबात मान्य करीत नाही. त्यात मुलाबाळांच्या संसारात ज्येष्ठांची मदत होणे हा काळ मागे पडलाय. तेव्हा तो दरवाजा सगळ्यात आधी बंद होतो. मला मुलगा म्हणाला की, ‘मी शारीरिकदृष्ट्या अजून फिट आहे. हातीपायी धड म्हणजे विनाअपंग आणि मानसिकदृष्ट्या ठीक आहे. मी काहीतरी काम चालू ठेवावे.’ हा सल्ला कमी, सक्ती जास्त होती.
मी कमी पगारावर एका बिल्डरकडे काम सुरू केले. त्यात साइटवर जावे लागे. कामात कटकटी नव्या नसल्या तरी जन्मभर कटकटींना तोंड दिल्यानंतरचा कंटाळा मनात होता. त्यात शारीरिक हालचालींचा वेग कमी झाल्याचे जाणवत होते. मुलाला म्हटले, तर तुम्ही इतके अनुभवी आहात, अशा सिच्युएशन्स तुम्हाला सांभाळता आल्याच पाहिजेत, असा सल्ला देऊन, आजच्या स्पर्धेच्या जगात तरुण पिढीला कसे संघर्षाला तोंड द्यावे लागतेय हे ऐकावे लागायचे. कारण मुलगा आर्थिक मंदीमुळे परत मायदेशी आलेला. घरात किंवा कामाच्या जागेवरही ‘कोणी पुसत नाही’ ही अवस्था. मालकाला कुठलाही सल्ला चालत नव्हता. घरी मुलगा मालक - तिथेही तीच अवस्था. जन्मभर स्वत: निर्णय घेण्याची सवय लागलेली. आपला निर्णय ऐकला गेला नाही हे दु:ख तर होतेच; पण सल्लाही ऐकला जात नाही हे क्लेशकारक झाले. नोकरी सोडून दिली. संशोधनापायी एक छोटी संस्था काढली होती. तिच्यात लक्ष घालू म्हटले तर ज्या माणसाला ती चालवायला दिली होती, तो बाजूला हटेना. मी बाजूला राहून त्याला फक्त योग्य मार्गदर्शन करत गेलो. या विचाराने की कधी काळी इथे काम करू, संशोधन करू वगैरे म्हणून. तिथे मला प्रवेश करायला फटही सापडेना. वरकरणी अत्यंत आदराने मला ‘तुम्ही कधीही या, संस्था तुमचीच आहे’, वगैरे म्हणायचे; पण या मंडळींना आपण पुरे पडणार नाही, याची जाणीव झाली. तिथे जाणे कमी झाले. घरीच बसून काम सुरू केले. उठून गं्रथालयात जायचे तर अंतर खूप. शिवाय घरातली कामे करावीत, ही सुनेची अपेक्षा आणि तिची मुलाची कारणे. या सगळ्याने मी आजारी झालो. बघायला कुणाकडे वेळ नाही. विलक्षण एकटा झालो. एकटाच रडायचो. पूर्ण निराश झालो. मानसोपाचार सुरू झाले. डॉक्टरांना भेटायचो तेवढा दिवस ठीक. उपचारामुळे झोप यायची. विचार कमी व्हायचे. एकदा झोपलं की उठण्याची इच्छाच व्हायची नाही. दिवसाच्या कोणत्याही प्रहरात मी झोपणे सुरू केले. मरणाची तीव्र इच्छा व्हायची. झोपेच्या गोळ्या घेतल्या; पण मेलो नाही. उलट मुलाच्या रागाला कारण ठरलो. तो राग सातत्याने जाणवत होता. पूर्ण निराशेच्या गर्तेत असताना नातवंडं जवळची वाटायची; पण त्यांना वेळ नव्हता. त्यांना त्यांचा अभ्यास किंवा खेळ होता. उरलेल्या वेळेत टीव्ही आणि मित्र होते. एका खुर्चीत निर्हेतुक तासन्तास बसायचे किंवा झोपायचे एवढे उरले.
आणि तेवढ्यात हे सरदारसाहेब आले. त्यांना हे वस्तुसंग्रहालय करायचे होते. त्यांनी काम बघाल का विचारले. मनात कोलाहल होता. आत्मविश्वास संपला होता. ‘बघतो’ म्हणलो, पण त्यांनी पत्र पाठवले. मन एकदम उत्साहित झाले, आनंदी झाले. आपली आजही कुणाला तरी गरज वाटतेय, आपले काम कुणाच्या तरी उपयोगाचे होऊ शकते, याचा आनंद झाला. मरू घातलेल्या आयुष्याला कोणी बोलावतेय असे वाटले. तुम्हाला वाटेल किती क्षुल्लक गोष्ट! एका संग्रहालयातील एक वॉचमनसारखी फडतूस बाब; पण माझ्यासाठी ती जीवदान ठरलीये. हा आयुष्याला घातलेला ‘टोटल रिकॉल’ आहे. रिकॉल, हे परत बोलावणे म्हणजे अगदी ख्रिस्तासारखं पुनरुत्थान (रिसरक्शन) नाहीये माझ्यासाठी; पण जोपर्यंत शरीराबरोबर मन आहे तोपर्यंत ते नक्कीच पुनरुत्थानाइतके महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्याकडून परतताना दोन वर्षांनी आपणही निवृत्त होणार आहोत एवढी एकच जाणीव मला होती...’’
मी डायरी मिटली. जगण्याचा झगडा वेगळा. जगण्यासाठीची आर्त आच आणि ऊर्मी वेगळी. ती ऊर्जा कुठून येईल, कोणाला कशी जाणवेल सांगणे अवघड आहे...