आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचं विनोदी नाटक हाच एक ‘फार्स’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वी एका वर्तमानपत्रात एका प्रेक्षकाचे एक विनोदी कलाकृती पाहून एक पत्र आले होते. ते पत्र मराठी रंगभूमी आणि चित्रपटातल्या एका अग्रगण्य नटाला निर्देशून होते. त्यात त्या प्रेक्षकाने असे स्पष्ट लिहिले होते की, विनोदी नाटकाला वा सिनेमाला प्रेक्षक डोके घरी ठेवून येतो असे समजूनच नाटक वा सिनेमा केला जातो, हे पटण्यासारखे आहे, पण आम्हा प्रेक्षकांना डोकेच नाही असे समजून केलेल्या तुमच्या कलाकृतीमुळे संताप आला आहे. गेल्या अनेक वर्षांत मराठी नाटकांचा घसरता दर्जा यावर खूप चर्वितचर्वण होताना दिसत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने हीन अभिरुचीच्या विनोदी नाटकांना जबाबदार धरलेले दिसते. हे विनोदी नाटक मराठी रंगभूमीवर नक्की कधी सुरू झाले? या हीन अभिरुचीच्या विनोदाचा इतिहास बघितला तर नक्कीच अचंबित व्हायला होईल.
1851 ते 1863 विष्णुदासांची पौराणिक नाटके महाराष्टÑातील अनेक गावागावांत, खेड्यापाड्यांत सादर झाली. या नव्या कलेचा संसर्ग झाला नसता, तरच नवल होते. ठिकठिकाणी असलेल्या लोककलांचे अस्तित्व लक्षात घेता ही बाब सहज शक्य होती; आणि त्यामुळेच अनेक नाट्यसंस्था उदयास आल्या. इचलकरंजीकर नाटक मंडळी, कोल्हापूरकर नाटक मंडळी, पुणेकर नाटक मंडळी, आळतेकर नाटक मंडळी या आणि यांसारख्या अनेक चित्रविचित्र नावांच्या नाटक कंपन्या सुरू झाल्या. स्वाभाविकपणे सादरीकरणाचा आदर्श हा विष्णुदासी शैलीचाच होता. फक्त जो तो आपापल्या आवडीने पौराणिक विषय सादर करू लागला. इचलकरंजी नाटक मंडळीचे बाबाजीशास्त्री दातार उत्तम काव्ये रचत. त्यांनी रचलेली पदे व काव्ये काव्यगुणांच्या आणि नाट्यगुणांच्या तुलनेत विष्णुदासांपेक्षा उत्तम आणि सरस ठरल्याचे दाखले पूर्वीच्या लिखाणात उपलब्ध आहेत. पण त्याच पद्धतीच्या पौराणिक नाटकांनी कंटाळा आणला असण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच अमरचंद वाडीकर या नाटकमंडळीने 1856मध्ये प्रथमच सामाजिक कथा फार्सच्या रूपात सादर केली.
त्या काळच्या मुंबईची आजच्या काळाच्या तुलनेत अत्यंत हलाखीची परिस्थिती होती. कित्येक भागात दलदलीचे साम्राज्य असल्याने रोगराई मोठ्या प्रमाणात पसरत असे. त्यामुळे तत्कालीन इंग्रज अधिकाºयांपैकी मुंबई मुलखात उच्चाधिकारी येण्यास तयार नसत. त्यामुळे निम्नस्तरीय ब्रिटिशांची मुंबई मुलखात रवानगी होत असे. कला, शिक्षण, संस्कृती बाबतीत विशेष दर्जा नसलेल्या या ब्रिटिश अधिकाºयांचे मनोरंजनाचे साधन म्हणजे केवळ फार्सच होते. पाश्चिमात्य नाट्यपरंपरेत हे फार्स सादर करण्याची परंपरा होती. गंभीर विषयांच्या नाटकांच्या सुरुवातीला ‘कर्टन रेझर’ म्हणून वा दोन अंकांच्या मध्ये ‘interlude’ म्हणून, वा मुख्य नाटकाच्या नंतर छोट्या प्रमाणात हे फार्स सादर होत. फार्स हा मूळचा लॅटिन शब्द ह्यां१२४२ह्ण असा आहे. ह्यां१२४२ह्णचा मूळ अर्थ ‘पुरण’ अथवा ‘पेंढा भरणे’ असा आहे. नाटकामध्ये दोन अंकाच्या मध्ये वा सुरुवातीला गंभीर विषयातून प्रेक्षकांना विरंगुळा म्हणून हसता यावे, उशिरा येणाºया प्रेक्षकांची सुरुवात चुकू नये म्हणून, अशा पद्धतीचा नाटकात ‘पेंढा’ भरण्याची पद्धत म्हणजे फार्स. पण हळूहळू हे फार्सच मूळ नाटकांपेक्षा अधिक लोकप्रिय झाले. तर, त्या काळच्या ब्रिटिश अधिकाºयांना या फार्सची चटकच लागली होती. हे फार्स म्हणजे बीभत्स शाब्दिक विनोद, अंगविक्षेप, अतिशयोक्ती इ. अनेक घटकांनी भरलेले असत. त्या काळात ब्रिटिशांनी शेक्सपिअरसारख्या महान नाटककाराचे नाटक इथे केल्याचा उल्लेख नाही.
या फार्सांचा मराठी नाटकांवर प्रभाव पडणे अगदीच स्वाभाविक होते. पण जितक्या प्रमाणात इंग्लिश फार्स अश्लील, बीभत्स असत, त्या प्रमाणात मराठी फार्स अश्लील वा बीभत्स नसत. आपल्या फार्समध्ये टवाळी, उपहास, शाब्दिक विनोद, चित्रविचित्र पात्रांची निवड आणि तत्कालीन चालीरीती, रिवाज वा रूढींवर उपहासात्मक टीका आणि त्या निमित्ताने हलकेच प्रबोधन, अशी काहीशी या फार्सांची धारणा बनत गेली. म्हणून मराठी रंगभूमीवरही गंभीर प्रकृतीच्या पौराणिक कथांनंतर पुरवणीसदृश फार्स सादर केले जात. मराठीतील दिग्गज अभिनेते गणपतराव जोशी, शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’च्या गोपाळ गणेश आगरकरांनी भाषांतरित केलेल्या ‘विकारविलसित’मध्ये चंद्रसेनाची भूमिका करत असत. या नाटकाचा व भूमिकेचा प्रेक्षकांवर इतका परिणाम होत असे, की नाटकानंतर प्रेक्षक बराच वेळ प्रेक्षागृहातच सुन्न होऊन बसत असत. एकदा एका प्रेक्षकाने सांगितले, की अशा व्यथित आणि शोकाकुल अवस्थेत घरी जाववत नाही. त्यावर गणपतराव जोशी म्हणाले होते की, माझा प्रेक्षक माझ्या नाटकानंतर आनंदित आणि प्रसन्न मुद्रेने बाहेर पडला पाहिजे; म्हणून स्वत: गणपतराव जोशीसुद्धा विकारविलसितनंतर फार्स सादर करू लागले. ‘नारायणवधाचा फार्स’ हा त्या वेळी खूप गाजलेला फार्स होता. आणि केवळ त्यातल्या भूमिकेसाठी गोपाळराव दाते हे नट प्रचंड लोकप्रिय झाले होते. 1870 ते 1890 या काळात फार्सची प्रचंड लाट आली. या कालावधीमध्ये 125 फार्स सादर झाल्याचे उल्लेख आहेत. पैकी नारायणरावाच्या वधाचा फार्स, अफझलखानाच्या वधाचा फार्स, ढेरपोट्याचा फजिता, दंपतिकलह प्रहसन, बासुंदी पुरीचा फार्स, शेंदाड शिपायाचा फार्स, रावबहादूर पर्वत्या, मोर एलएलबी प्रहसन, संगीत दांभिक प्रहसन, ढोंगी बैराग्याचा फार्स, विचार दौर्बल्य, फटफजितीचा कळस वगैरे अनेक फार्स गाजले. आणि कालांतराने ही फार्सची लाट लुप्त झाली.
पण आज तर व्यावसायिक रंगभूमीचे सगळे अर्थकारणच जगण्याच्या अनेक समस्यांमध्ये या पेंढा भरण्यावरच अवलंबून राहिलेले दिसते आहे. त्यात टीव्हीवरचे हसण्यासाठीचे कार्यक्रम म्हणजे त्यांना का फार्स म्हणायचे, हे वेगळे सांगायला नको. पण हॅ हॅ ही ही हू हू करताना जगण्याचे पुन्हा नवीन प्रश्न उभे राहताहेत, त्यानुसार भविष्यात रंगभूमी पुन्हा काय नवीन वळण घेते, ते एक कोडेच आहे...
rishijo@gmail.com