आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉम्रेड, तू परत भेटशील का?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉम्रेड, आज पहाटेच तुझी आठवण आली. डोळे पाणावले. उशी थोडी भिजकी झाली. प्रथम भेटला होतास बार्शीत. आम्ही शाळकरी मुले होतो. बिडी कामगारांच्या, गिरणी कामगारांच्या मोर्चात तू सगळी शक्ती एकवटून ओरडत होतास. बार्शीत अशा गलितगात्र, गरीब लोकांचे मोर्चे निघायचे. पन्नालाल सुराणांच्या मार्गदर्शनाखाली दीड-दोन किलोमीटर लांबीचा असा मोर्चा शिस्तीत निघायचा. कोणाच्या अंगावर धड कपडा नसायचा, तर कोणाला चप्पल. डोक्याला तेल नाही, चेहºयावर तेज नाही. इथे गरिबीचे प्रदर्शन त्यांना करायचे नव्हते; पण त्यांच्या हक्काचे काही त्यांना हवे होते. त्यांना वाटायचे, तुझ्यासारखे कॉम्रेड त्यांना काहीतरी मिळवून देतील. अन्याय नष्ट करतील. कॉम्रेड, तुलाही खात्री होती की, आपण यांच्या जीवनात बदल घडवून आणू.
कॉम्रेड, तू पुन्हा भेटलास, मी नगरला शिकायला आलो तेव्हा. कॉम्रेड राम रत्नाकरांच्या कामगार चळवळीत. इथेही होते बिडी कामगार, हातमाग कामगार, सुताचा रंग देणारे कामगार आणि अनेक दरिद्री लोक. कोणी शेतमजूर होते, कोणी हमाल होते, उच्चभ्रू समाजातले, पण घरात कमी मिळकत असलेले. सगळ्यांची जात एकच होती ती म्हणजे दारिद्र्य.
कॉम्रेड, तू पेटून उठत होतास. तुला शोषण थांबवायचे होते. तुला अन्याय थांबवायचा होता, तुला श्रीमंतांची गुर्मी उतरावयाची होती. तू रात्रंदिवस तडफडत होतास. मोर्चातल्या बायकांच्या कडेवर आणि पुरुषांच्या खांद्यावर मुडदूससारखा रोग झालेली कुपोषित मुलं होती. डाव्या पायात एका रंगाची चप्पल, तर उजव्या पायात दुसºया रंगाची, तर कोणी अनवाणीच. कॉम्रेड, तू ओरडत होतास, अन्यायाविरुद्ध मोर्चातले लोक एकजुटीचा आवाज देत होते. दीनदुबळ्यांना वाटत होते, कॉम्रेड आम्हाला नवे जीवन देईल, संकटातून बाहेर काढेल.
कॉम्रेड, तू हेच स्वप्न दाखवत होतास सगळ्यांना. तू क्रांतीची भाषा बोलत होतास. तुझ्या डोळ्यात निखार होता. तुझ्या झेंड्यासारखेच ते लाल दिसायचे. कॉम्रेड, तू कधी चौकातल्या हॉटेलात चहा घेताना दिसायचास. गळ्यात शबनम, तोंडात सिगारेट, शबनममध्ये पत्रके, नियतकालिके, आणखी बरेच काही. तुझे काही मित्र खूप बौद्धिक गप्पा मारायचे. साम्यवादाचे व्रत तुम्ही सगळ्यांनी अंगीकारले होते.
कॉम्रेड, तुला माइक मिळाला नाही तर कर्णा तोंडासमोर धरून बोलायचास. त्या सभेत मीही कधी बसायचो. तू दारिद्र्याचे, अन्यायाचे स्वरूप सांगायचास तेव्हा पोटातली आतडी तुटायची. खूप पिळवटल्यासारखे वाटायचे. कॉम्रेड, तू भावनेलाच हात घालायचास यार! समाजाचे हे दु:ख तुझ्या भाषणातून सांगायचास, ते ऐकल्यावर त्या रात्री झोप येत नसायची. तुझ्या आठवणीने आज उशी भिजली. तसाच रडायचो; पण कॉम्रेड, कधी तू इतकी आवेशपूर्ण भाषणे करायचास, पेटून उठायचो मी. रक्त गरम व्हायचे. कानशिले तापायची. हातात शस्त्र घ्यावे वाटायचे. वाटायचे, आता उठावे आणि सपासप वार करावेत आमचे रक्तशोषण करणाºयांवर. तुला क्रांती हवी होती. तुला जग बदलायचे होते, मग दुसरा काय पर्याय होता? कॉम्रेड, तू लढलास, खूप लढलास.
गावोगाव तुझे कॉम्रेड लढले. देशभर उद्योगधंदे वाढत होते अन् जागोजाग तुझे लाल झेंडे लागत होते. गरिबांच्या रॉकेलसाठी तू लढत होतास, रेशनकार्डवर ‘मिलो’ (70च्या दशकात अमेरिकेतून आयात केलेले धान्य) मिळत नाही, म्हणून तू लढत होतास, दुष्काळात वाटल्या जाणाºया सुकडीत भ्रष्टाचार होतोय, त्याच्यासाठी तू लढत होतास. कारखान्यांच्या भोंग्यांनी तुझी धास्ती घेतली होती. मोठमोठ्या राजकारण्यांनी तुझी धास्ती घेतली होती. तू गरिबांचा, मजुरांचाच नव्हे, तर ज्या कोणावर अन्याय होतोय त्या सर्वांना आधार होतास.
कॉम्रेड, पण मध्येच तू कुठे गेलास? बरेच दिवसांत दिसलाच नाहीस. तुला कोणी संपवले? पळवून नेले? का तू मेलास? मलाही तुझी का बरे आठवण आली नाही मधल्या काळात कोण जाणे! पण परवा आली - गेले काही महिने रोज येतेय - मी पाहिले. काही मुले चालली होती - रस्त्याने. रांगेत - कॉम्रेड तुझ्या मोर्चात चालावे तशी - शिस्तीत. त्यांच्या हातात मेणबत्त्या होत्या, त्यांच्या डोक्यावर गांधी टोपी होती. त्यांना बदल हवा होता, त्यांना वाटले कोणीतरी असाच आवाज केलाय, भ्रष्टाचार, अन्याय, शोषण आता संपेल. ती मुले चालली होती ना, त्यांच्या मनात खूप अपेक्षा आहेत; पण भ्रमनिरास झाला. कॉम्रेड तू ठिणगीशिवाय माणसे पेटवत होतास, ह्यांच्या हातात मेणबत्ती होती - पण ना ते स्वत: पेटले ना इतरांना पेटवले. कॉम्रेड, तुझी आठवण आली, तू असायला हवा होतास, या तरुणांच्या शरीरात, नसानसात रक्त आपल्या पूर्वजांचे आहे. जीन्स असतात ना, अरे 42च्या लढ्यात लढलेल्यांचे, आणीबाणीत लढलेल्यांचे! बदल, प्रांती, सत्ताबदल हे त्या आधीच्या रक्तातूनच त्यांच्यात आलेय; पण आता त्यांना वाटते आम्ही नव्हतो 1942मध्ये, आम्ही नव्हतो आणीबाणीमध्ये; पण आता आहोत, काही करावंसं वाटतंय त्यांना. पण, तुझ्यासारखा कॉम्रेड त्यांना भेटायला हवा. अरे कॉम्रेड, तू कोठे आहेस? प्रवासाच्या खर्चापेक्षा टोल जास्ती भरावा लागतोय, गावात सतरा-सतरा तास वीज नाही, पेट्रोल दर वाढताहेत, दर वाढताहेत गॅसचे, दुधाचे, धान्याचे, भाजीपाल्यांचे अन् आमची ही लेकरे आयटी का फायटी तिथं काम करतात, सोळा-सोळा तास. कॉम्रेड, तूच लढला होतास, कामगारांसाठी - सोळा-सतरा तास गुलामासारखे पिळवटून घ्यायचे त्यांना. तू लढलास अन् सगळ्यांचे कामाचे आठ तास केलेस. एक आयटीवाला मालक म्हणाला, ‘आम्ही पाच वर्षांत एका माणसाकडून पंधरा वर्षांचे काम करून घेतो. तो चाळीस वर्षांचा झाला की हाकलून देतो. त्याच्यात काही दम राहत नाही.’ इथं शिक्षणसम्राट झालेत, लाखाच्या थैल्या ओतल्याशिवाय शिकता येत नाही.
कॉम्रेड, काय चाललंय हे अन् तू कुठं गेला आहेस? खूप खूप आठवण येतेय तुझी. तू रागावला असशील. तुझे संप मोडले. तुझे मोर्चे चिरडले, तुझ्यावर खोटे आरोप करून तुरुंगात डांबले, तुझ्यात आणि तुझ्या साथीदारांत भांडणे लावून दिली. तू कसा संपशील हेच पाहिले. म्हणून तू रुसलास? निघून गेलास? परत ये, खूप अन्याय होतोय. आज सकाळी तुझ्या आठवणीनं असा अस्वस्थ झालो, रडलो. कॉम्रेड, तू ये-तू आता कधी भेटशील?
arunjakhade@padmagandha.com