आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिरबलाचे वंशज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बघा हं, जऽऽरास्सा तिरकस विचार करून पाहू या. समजा, बादशहा दरबारात आला आणि फळ्यावर खडूने एक रेषा काढून त्याने मिश्कील अधिक छद्मी चेहऱ्याने तो विख्यात कूटप्रश्न टाकला- कोण बरे माझ्या या रेषेला लहान करून दाखवेल? आधी सेनापती वगैरे गणंगांनी डस्टरने ती रेषा पुसायचा प्रयत्न करताच जास्तच छद्मीपणे बादशहा म्हणाला, नाही नाही, महाशय, अट अशी आहे, की तुम्ही माझ्या या रेषेला स्पर्श नाही करायचा. आपण ऐकलेल्या गोष्टीत तर आपले बिरबलमहाराज चटकन शेजारी एक अधिक मोठी रेषा काढतात आणि बादशहाची रेषा क्षणार्धात लहान होते. मला तर ही गोष्ट म्हणजे, आइन्स्टाइनच्या त्या विश्वविख्यात ‘रिलेटिव्हिटी’ उर्फ ‘सापेक्षतावादा’चे मूळ वाटते. (गमतीत म्हणायचे, तर न्यूटनला जसे झाडावरून पडणारे सफरचंद पाहून गुरुत्वाकर्षणाचे गूढ उकलले, तसे आइन्स्टाइनला लहानपणी ऐकलेली बिरबलाची ही गोष्ट ऐकूनच सापेक्षतावाद सुचला असावा! बिरबल जणू म्हणाला असेल, यू सी, बादशहा, युवर रेषा इज ‘रिलेटिव्हली’ स्मॉल नाऊ...! ) पण ते असो. इथे कहानी में ट्विस्ट असा, की समजा बिरबलाने शेजारी अधिक मोठी रेषा काढून बादशहाची रेषा लहान केलीच नसती, तर काय झाले असते? रेषेला स्पर्श न करता कोणत्याही रेषेला लहान करता येत नाही, असे बादशहाने जाहीर करून टाकले असते? म्हणजे, या जगात तथाकथित मोठ्या रेषा कायम मोठ्याच राहिल्या असत्या? बादशहाला स्वत:ला बिरबलाने सुचवलेला तोडगा माहीत असण्याची शक्यता धूसर आहे, कारण बिरबल-बादशहाच्या इतर बहुतेक गोष्टींत बादशहा काही तितकासा बुद्धिमान असल्याची चिन्हे नाहीत. हे घडलेच नसते, तर मग राजकारण, कॉर्पोरेट विश्व, क्रीडाजगत इतकेच काय घराघरांत चालणारे राजकारण कसे चालले असते? कारण आपली रेषा मोठी करून दुसऱ्याची रेषा लहान असल्याचे दाखवणे किंवा दुसऱ्याची रेषा लहान करून आपली आहे तीच रेषा कशी भली मोठ्ठी आहे ते इतरांच्या मनावर ठसवणे, हा तर पॉलिटिक्ससकट सर्वच क्षेत्रांतल्या राजकारणाचा पाया असतो, ना हो?

हे सगळे आठवायचे कारण काय? सांगतो.
निमित्त झाले पुणे आकाशवाणी केंद्रावर ‘मराठीतले दिवाळी अंक’ या विषयावर बोलण्यासाठी मी तयारी करत होतो, त्याचे. नुकतेच मी पुण्यात पौड रोडवर आयडियल कॉलनीत ‘पुस्तक पेठ’ हे पुस्तकाचे दुकान सुरू केले माधवराव वैशंपायन यांच्याबरोबर. तिथे यंदा आम्ही दिवाळी अंकांचे प्रदर्शन आणि विक्री केली. भरपूर विक्री झाली. मस्त प्रतिसाद मिळाला. या भाषणाच्या निमित्ताने मी पंधरा दिवसांत झालेल्या दिवाळी अंकांच्या विक्रीचे संख्याशास्त्रीय विश्लेषण करायला बसलो, तेव्हा फारच इंटरेस्टिंग माहिती समोर आली. मी सर्वाधिक खपलेले दिवाळी अंक शोधून काढले तर चक्क सर्वाधिक खपाच्या यादीत वरच्या स्थानावर होते मौज, दीपावली, अक्षर, हंस, लोकसत्ता, मटा, अनुभव, अंतर्नाद, ललित यांसारखे निखळ वाङ‌्मयीन अंक! बिलीव्ह मी. आणि आपल्याला वाटते, नेहमी आवाज, जत्रा वगैरे विनोदी अंक किंवा ग्रहसंकेत, राशिभविष्य वगैरेचेच अंक खपतात. मला चटकन बिरबलाची गोष्टच आठवली. चांगल्या आणि साहित्यिक अंकांनी कष्टाने आपली गुणवत्तेची रेषा मोठी केली, तर इतर रेषा आपोआप लहान होऊ लागतात.

आता ही शक्यता आहे, की आमच्या परिसरातले फक्त हे चित्र असेल. शक्य आहे. पण हे होणे शक्य आहे, ही बाबच उभारी देणारी नाही का? मग हेच समीकरण एकंदर साहित्य क्षेत्राला, खरे तर एकूणच सांस्कृतिक क्षेत्राला लावायला काय हरकत आहे? बघा हं विचार करून. लेखक, प्रकाशक, विक्रेते आणि वाचक या चार खांबांनी तोलून धरलेले हे साहित्यशारदेचे मंदिर असते. चारही खांब अधिकाधिक मजबूत होतील, तर या मंदिराला कसलाही धोका नाही. सतत आपलं ‘टीव्ही आणि कॉम्प्युटर आणि मोबाइलच्या आक्रमणाने वाचनसंस्कृती लयाला गेली होऽऽऽ’ असे रडत बसण्यापेक्षा या चार घटकांनी आपली रेषा मोठी केली, तर नुसतीच वाचनसंस्कृती वाढणार नाही, तर समाजाची सरासरी अभिरुचीदेखील उन्नत होत राहील. उंचावत राहील.

विचार करा सज्जनहो, तुम्ही या चारपैकी एका गटात नक्कीच असाल. बहुसंख्य जण वाचक तर नक्कीच असतील. काही जण लेखक असतील, प्रकाशक असतील, विक्रेते असतील. तुम्ही हा लेख वाचत असाल तेव्हा नाशिकमध्ये ‘दिव्य मराठी’ तर्फेच नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या सहकार्याने एक भव्य ‘साहित्यिक महोत्सव’ चालू झालेला असेल. सज्जनहो, बिरबलाने केले ते नेमके हेच. आपली रेषा मोठी केली. खिशातल्या पाकिटातल्या, पर्समधल्या हिरव्या-निळ्या कागदांपेक्षा काळी अक्षरे उमटलेल्या पुस्तकाच्या पांढऱ्या कागदावर आपले अधिक प्रेम असेल आणि आपल्या या पुस्तकप्रेमी जमातीने सातत्याने आपली ही रेषा मोठी केली तर टीव्ही, मोबाइल आणि कॉम्प्युटर वगैरे रेषा आपोआप किरकोळ होतील.

प्रश्न आहे तो, रेषा मोठी करायची म्हणजे नेमके काय करायचे? यासाठी मी अगदी सोपी पण प्रभावी चतु:सूत्री देतो बघा. या चार गोष्टी करणे म्हणजेच, आपली पुस्तकप्रेमींची रेषा मोठी करणे.
तर ती चार सूत्रे अशी :
१) १०० टक्के हेतुशूचिता मनात ठेवून टोकाची साधनशूचिता न बाळगता प्रतिस्पर्ध्याने वापरलेले कोणतेही मार्ग बिनधास्त वापरणे. इथे एक अट फक्त पाळायची, अवैध आणि अनैतिक मार्ग नेहमीच वर्ज्य करायचे आणि मग बेलाशक आधुनिक मार्गांनी बाजारपेठेवर कब्जा करायचा. त्यासाठी प्रसंगी जनमानसात देवत्वाला पोहोचलेले अभिनेते, खेळाडू यांच्या प्रतिमेचा वापर करावा लागला, तरी हरकत नाही. टोकाचे गमतीदार उदाहरण द्यायचे, तर एखादे अतिशय चांगले पुस्तक जर प्रकाशनाला सलमान खानला बोलावून हातोहात खपणार असेल, आणि आवृत्त्यांवर आवृत्त्या निघणार असतील, तर तेही अब्रह्मण्यम मानायचे कारण नाही!!

२) सर्वप्रथम मनातला न्यूनगंड फेकून द्यायचा. (मी हा लेख लिहून नेमके तेच करत आहे.) म्हणजे, आता कुणाला वेळ आहे हो वाचायला? कोणी वाचत नाही आता... असली रडगाणी गाणे प्रथम बंद करायचे. कमॉन गाइज, बी कॉन्फिडंट !

३) एरवी समाजात जन्माधारित जातीपातींचा प्रखर विरोध आणि निषेध करायचाच, पण ‘पुस्तकप्रेमी’ या जातीचा विषय निघाला की, जबरदस्त एकी दाखवायची. आपल्या या जातीसाठी वेळप्रसंगी पदराला खार लावून आपल्या पुस्तकप्रेमी जातीच्या वाढीचा विचार करायचा. निदान दरमहा आपल्या उत्पन्नापैकी काही भाग पुस्तकावर खर्च करून जातीचे अर्थकारण मजबूत करायचे. शेवटी, कोणतीही चळवळ भक्कम अर्थकारणावर चालते. भरपूर पुस्तके विकणे आणि विकत घेणे ही चळवळीच्या यशाची मूलभूत अट आहे.

४) चौथे आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे, आपल्या जमातीत मुलांना सर्वाधिक संख्येने जोडून घ्यायचे. लक्षात ठेवा, जितकी मुले आणि तरुण आपल्या या पुस्तकप्रेमी जमातीचे अभिमानी सदस्य बनतील, तितके आपले यश पक्के होत जाईल. मी पहिल्या सूत्रात जे म्हणालो, त्याचा प्रत्यय इथे येईल. या मुलांना, तरुणांना जोडून घेण्यासाठी आजचे, नवे आणि आकर्षक मार्ग अमलात आणावे लागतील.

मी स्वत: नाशिकच्या साहित्य महोत्सवात जात आहेच. जिथे महाकुंभमेळा भरतो, तिथे साहित्याचा हा महामहोत्सव भरणे, मोठेच औचित्याचे आहे. असे मेळे गावोगावी भरवू या. जोमाने आपली रेषा मोठी करू या, बादशहा होण्यापेक्षा बिरबल होऊ या... हे जमेल, संभाविता?
दिवाळी अंकांच्या विक्रीचे संख्याशास्त्रीय विश्लेषण करायला बसलो तेव्हा फारच इंटरेस्टिंग माहिती समोर आली. मला चटकन बिरबलाची गोष्टच आठवली. चांगल्या आणि साहित्यिक अंकांनी कष्टाने आपली गुणवत्तेची रेषा मोठी केली, तर इतर रेषा आपोआप लहान होऊ लागतात.

खिशातल्या पाकिटातल्या, पर्समधल्या हिरव्या निळ्या कागदांपेक्षा काळी अक्षरे उमटलेल्या पुस्तकाच्या पांढऱ्या कागदावर आपले अधिक प्रेम असेल आणि आपल्या या पुस्तकप्रेमी जमातीने सातत्याने आपली ही रेषा मोठी केली तर टीव्ही, मोबाइल आणि कॉम्प्युटर वगैरे रेषा आपोआप किरकोळ होतील.
संभाविताचा सल्ला : विश्वास ठेवा, नकारात्मकता ही सकारात्मकतेचा नियम सिद्ध करणाऱ्या अपवादासारखी असते. तिला त्याहून जास्त मोठे स्थान देऊ नका किंवा महत्त्व तर मुळीच देऊ नका. जे जातीपातींबाबत तेच धर्माबाबत. धार्मिकतेच्या नावाखाली ज्या अन्याय्य रूढी-परंपरांमुळे स्त्रिया, दलित वगैरेंवर अनन्वित अत्याचार झाले, त्या अंधश्रद्धा आणि रूढींचा प्रखर विरोध आणि निषेध करतानाच ‘वाचन’ हा मात्र आपला धर्म मानून नित्य वाचन या रूढीचे प्राणपणाने जतन करू या. मी या लेखाद्वारे ‘दिव्य मराठी’ला जाहीर अावाहन करतो, की जसा महासाहित्य मेळा नाशिकमध्ये भरवताय तसा गावोगावी भरवा. आमच्या पुस्तकप्रेमी जमातीचे भाविक सदस्य आपल्या स्वागताला उत्सुक आहेत. ‘वाचाल तर वाचाल’ वगैरे सुभाषितांचीदेखील आम्हाला आता गरज नाही, कारण जे संकटात असतात त्यांना ‘वाचायची’ म्हणजे बचावाची ओढ असते, आम्ही बिरबलाचे चतुर वंशज आमच्या तथाकथित प्रतिस्पर्ध्यांना संकटात टाकायला निघालो आहोत. टीव्ही, कॉम्प्युटर आणि मोबाइलच्या बारक्यासारक्या रेषांना स्पर्शदेखील न करता आपली ही वाचनप्रेमाची रेषा विषुववृत्ताची लांबी मोजायला कामी येईल, एवढी मोठी करू या!
संजय भास्कर जोशी
sanjaybhaskarj@gmail.com
९८२२००३४११
बातम्या आणखी आहेत...