आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाई भरारी... वादळी पर्वात...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महान ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो म्हणायचा की, एक वेळ अशी येईल जेव्हा प्रत्येक मनुष्य हा संपूर्ण जगाचा नागरिक असेल. ती वेळ अजून आली नसेल कदाचित; पण आज सगळे जग खूप जवळ आले आहे हे निश्चित! आज जगातल्या एका कोप-यातील उत्पादनच नव्हे, तर संस्कृतीसुद्धा दुस-या कोप-यात पोहोचून स्थिरावली आहे. ही देवाणघेवाण शक्य झाली आहे, ती मुख्यत: जगभरातल्या विमान वाहतूक सेवांमुळे! जगभरातल्या प्रवाशांना एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पोहोचवणारा विमान वाहतूक व्यवसाय हा कदाचित जगातला पहिला जागतिकीकरण झालेला उद्योग असावा. विमान वाहतुकीला व्यावसायिक स्वरूप देऊन त्याचे औद्योगिकीकरण करण्याचा पहिला प्रयत्न रूपस पोर्टर आणि फ्रेडरिक मॅरियर या अमेरिकन नागरिकांनी केला. त्यांनी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर न्यूयॉर्क ते कॅलिफोर्निया या मार्गावर विमान वाहतूक सेवा सुरू केली; परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत. त्या वेळी विमान हे यंत्रच अगदी नवीन होते आणि हेच त्यांच्या अपयशाचे मुख्य कारण होते. एकदा विमान पाहायला जमलेल्या लोकांनी अति उत्साहाच्या भरात त्यांच्या विमानाचीच मोडतोड केली. त्यानंतर ती वाहतूक सेवा बंदच पडली.
पुढे 1909 मध्ये जर्मनीमध्ये जगातली पहिली व्यावसायिक विमान वाहतूक कंपनी स्थापन झाली. तिचे नाव होते डॉइश लुफ्ताशिफार्टस- अ‍ॅक्टिनो जेसलशिफार्ट््स. या कंपनीच्या स्थापनेसाठी जर्मन सरकारने भरीव साहाय्य केले होते. त्यानंतर 1920च्या आसपास कॉटस (आॅस्ट्रिया), केएलम (नेदरलँड््स), अ‍ॅव्हानिका (कोलंबिया) आणि झेक एअरलाइन्स (झेक रिपब्लिक) या व्यावसायिक विमान वाहतूक कंपन्यांची सुरुवात झाली.
भारतातसुद्धा विमान वाहतूक व्यवसायाची सुरुवात त्या मानाने खूपच लवकर म्हणजे, 1932 मध्ये झाली. त्याचे संपूर्ण श्रेय जे.आर.डी. टाटांना जाते. त्यांनी टाटा एअरलाइन्स या कंपनीची स्थापना केली. पुढे त्यांनी या कंपनीचे मर्यादित कंपनीत रूपांतर केले. तिला नाव दिले, एअर इंडिया! स्वातंत्र्यानंतर 1948 मध्ये भारत सरकारने या कंपनीच्या 49 टक्के भागभांडवलावर ताबा मिळवला. त्यानंतर हळूहळू या कंपनीचा कारभार सरकारी तत्त्वावर चालू लागला. एअर इंडियाखेरीज वायुदूत, दमानिया, मोदीलुफ्त यांसारख्या इतरही काही विमान कंपन्या सुरू झाल्या; पण त्या फार काळ तग धरू शकल्या नाहीत.
नरेश गोयल यांनी 1993 मध्ये जेट एअरवेजची स्थापना केली. या कंपनीला सुरुवातीलाच खूप यश मिळाले. या यशात कंपनीच्या व्यावसायिक व्यवस्थापनाचा जेवढा हात होता, तेवढाच हात त्या वेळी बदलत असलेल्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचा होता. त्या वेळी भारताने नुकताच आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात स्थिरावायचा प्रयत्न करत होत्या. या कंपन्यांच्या अधिकारी वर्गाला अत्यंत वक्तशीर आणि आरामदायक प्रवासाची हमी देणा-या विमानसेवेची गरज होती. त्याच वेळी भारतातल्या उच्च मध्यमवर्गाचे विमान प्रवासाचे प्रमाण वाढत होते आणि मध्यमवर्गसुद्धा विमान प्रवासाकडे आकर्षित होऊ लागला होता. यामुळे भारतात विमान वाहतूक व्यवसायाला उज्ज्वल भवितव्य आहे, अशी चिन्हे स्पष्ट दिसू लागली होती. या बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेत ‘लिकर बॅरन’ विजय मल्ल्या यांनी विमान वाहतूक सेवा व्यवसायात पदार्पण केले. लोकप्रिय असणा-या बिअरचे ‘किंगफिशर’ हेच ब्रँडनेम आपल्या विमान कंपनीला देत त्यांनी 2005 मध्ये ‘किंगफिशर एअरलाइन्स’ची स्थापना केली. विजय मल्ल्या यांनी ‘किंगफिशर एअरलाइन्स’ची सुरुवात आपल्या लौकिकाला साजेशी केली. त्यासाठी एअरबस 380 या अद्ययावत विमानांचा ताफा खरेदी करण्यात आला. या विमानांमध्ये प्रत्येक प्रवाशांसाठी वैयक्तिक टेलिव्हिजन स्क्रीन्स होते. त्यावर प्रवासी आपल्या आवडीचा कार्यक्रम पाहू शकत होता. भारतीय विमान वाहतूक सेवेत हा क्रांतिकारी बदल होता. किंगफिशर एअरलाइन्सच्या या यशामुळे प्रेरित होऊन इतरही काही उद्योग समूह उदा. कलानिधी मारन समूह (स्पाइस जेट), नस्ली वाडिया समूह (गो एअर), राकेश गंगवाल-राहुल भाटिया समूह (इंडिगो) विमान वाहतूक व्यवसायात उतरले. मध्यमवर्गाला आकर्षित करण्याच्या नादात या कंपन्यांनी प्रवासभाड्यात प्रचंड कपात केली. इथेच विमान कंपन्यांची आर्थिक गणिते चुकायला सुरुवात झाली. विमानाने प्रवास करणारे प्रवासी वाढले; पण विमान प्रवास देणा-या कंपन्यांची संख्या आणि क्षमता त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात वाढली. घटते प्रवासभाडे, वाढती स्पर्धा आणि सतत वाढणा-या इंधनाच्या किमती यामुळे सगळ्याच विमान कंपन्या तोट्यात जाऊ लागल्या. या परिस्थितीचा सर्वात मोठा फटका ‘लक्झुरिअस’ ‘किंगफिशर एअरलाइन्स’ला बसला. आज किंगफिशर एअरलाइन्सवर सुमारे 7 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. गेल्या आठ महिन्यांत कंपनीचे जवळपास अडीच हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यातून सावरण्यासाठी मल्ल्यांनी आपल्या साम्राज्यातील इतर कंपन्यांकडून ‘किंगफिशर एअरलाइन्स’ला पैसे दिले. आजपर्यंत युनायटेड ब्रुअरीज उद्योग समूहातल्या इतर कंपन्यांनी ‘किंगफिशर एअरलाइन्स’ला सुमारे दोन हजार कोटी रुपये उसने दिले आहेत. त्यापैकी साडेसातशे कोटी रुपये गेल्या एका वर्षात दिले आहेत. अशीच परिस्थिती चालू राहिली, तर युनायटेड ब्रुअरीज हा संपूर्ण उद्योग समूहच तोट्यात जाऊ शकतो.
या सगळ्या परिस्थितीमुळे मल्ल्यांनी शेवटी सरकारकडे मदतीसाठी धाव घेतली; पण ती खासगी कंपनी असल्यामुळे सरकारने कोणतीही मदत किंवा सवलती देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. त्यामुळे आता एखाद्या मोठ्या वित्तीय संस्थेकडून आर्थिक मदत घेणे, हाच एक मार्ग किंगफिशरसमोर उरला आहे. आर्थिक मदतीच्या बदल्यात ती वित्तीय संस्था ‘किंगफिशर एअरलाइन्स’चा संपूर्ण ताबासुद्धा घेऊ शकते!
भरभराट होऊ घातली असतानाच अचानक अस्तित्वासाठी संघर्ष करण्याची पाळी येणे, ही किंगफिशरची अवस्था हे सध्याच्या विमान वाहतूक सेवा व्यवसायाचे प्रातिनिधिक स्वरूप आहे. यातून हेच स्पष्ट होते की, कधी कधी एखाद्या व्यवसायाची झालेली वाढ ही ग्राहकांसाठी फायद्याची ठरली तरी त्या व्यवसायातल्या कंपन्यांसाठी आणि त्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणा-या गुंतवणूकदारांसाठी सहन करता येणार नाही इतक्या तोट्याची ठरू शकते!