आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीत सरितेचा खान्देशी प्रवाह

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तसे पाहिले तर जळगाव हे काही अगदीच अरसिक नव्हते. ज्या बालगंधर्वांच्या नावाने हा महोत्सव गेली 10 वर्षे दर्जेदारपणे या शहरात होतो आहे, ते बालगंधर्व अर्थात नारायणराव राजहंस सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी याच जळगावच्या मातीत वाढत होते आणि संगीताचे धडे घेत होते हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. जळगाव हे त्यांचे आजोळ. या शहराचे एकेकाळी नगराध्यक्ष राहिलेले अ‍ॅडव्होकेट आबाजी राघो म्हाळस हे बालगंधर्वांचे मामा. त्यांच्याच बळीरामपेठेतल्या घरी सन 1895 ते 1905 अशी सुमारे 10 वर्षे बालगंधर्वांची गेली. या काळात त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडेही इथेच घेतले. पुढे जळगावात प्लेगची साथ आली आणि म्हाळस कुटुंबाने नारायणची रवानगी पुण्याला केली. याच स्मृतींना अजरामर करण्यासाठी जळगाव नगरपालिकेने 1960 मध्ये आपल्या खुल्या रंगमंदिराला बालगंधर्वांचे नाव दिले आहे.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या तीन दिवसांत बालगंधर्वांच्या नावाने भारतीय शास्त्रीय संगीताचा असा महोत्सव सुरू करायची कल्पना पुढे आली ती जळगावचे शास्त्रीय गायक वसंतराव चांदोरकर यांच्या निधनानंतर (2001) झालेल्या श्रद्धांजली सभेत. या कल्पनेला मूर्त रूप आले ते वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या 2003 च्या पहिल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाने. तिथून सुरू झालेला हा संगीतसरितेचा प्रवाह नुकत्याच संपलेल्या दहाव्या महोत्सवापर्यंत अखंडपणे सुरू आहे. प्रत्येक महोत्सवात संगीतातील पांडित्य मिळवलेले, देश-विदेशात नावलौकिक असलेले सुमारे 30 ते 35 कलाकार जळगावकरांना भेटत आले आहेत.
पहिल्या संगीत महोत्सवाच्या उद्घाटनाला आलेले कुमार केतकर यांनी, शास्त्रीय संगीत महोत्सवानिमित्त हे बालगंधर्वांचे खरे आणि त्या अर्थाने पहिले स्मारक जळगावात उभे राहत असल्याचा आनंद व्यक्त केला होता. बालगंधर्वांच्या नावाने संस्था, इमारती उभ्या राहिल्या असतीलही; पण ज्या शास्त्रीय संगीतासाठी नारायणराव राजहंस अर्थात बालगंधर्वांनी आयुष्य पणाला लावले त्याच शास्त्रीय संगीताची आराधना करणारा हा महोत्सवच बालगंधर्वांचे खरे स्मारक होऊ शकते, ही निश्चितच यथार्थ दाद आहे. हा महोत्सव सुरू करण्यामागे नव्या पिढीची ओढ कमी होत चाललेल्या शास्त्रीय संगीताचे जतन आणि संक्रमण करणे हा स्व. वसंतराव चांदोरकरांचे चिरंजीव दीपक यांचा मुख्य हेतू होता. त्यातून वसंतरावांच्याही स्मृती जपल्या जातात हा त्यांचा आणखी एक हेतू. वडिलांच्या स्मृती जपायच्याच तर दीपक चांदोरकरांना त्यांचा एखादा पुतळा तयार करवून घेता आला असता किंवा एखाद्या इमारतीला वसंतरावांचे नाव देऊनही ते साध्य करता आले असते; पण त्यामुळे जळगावकरांना या अभिजात कलेच्या दिग्गज उपासकांचे दर्शनही कधी झाले नसते हे उघड आहे.
गेल्या 10 वर्षांत या महोत्सवात कोण-कोण येऊन गेले असे विचारण्याऐवजी कोण नाही आले, असे विचारणेच संयुक्तिक ठरावे. पंडित शैलेश भागवत (शहनाई), डॉ. सुचेता भिडे, शर्वरी जमेनीस (नृत्य), पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडिता आशा खाडिलकर, पंडित रोणू मुजुमदार, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित भवानीशंकर, राजन-साजन मिश्रा, पंडित नयन घोष, आनंद भाटे, अर्चना जोगळेकर, अमजद अली खान, भुवनेश कोमकली, उस्ताद शुजात हुसेन खान, शौनक अभिषेकी यांच्यापासून थेट नुकत्याच येऊन गेलेल्या पंडिता किशोरी अमोणकर यांच्यापर्यंत असंख्य नावे घेता येतील; ज्यांनी जळगावकरांच्या कानाचे पारणे फेडले आहे. हा महोत्सव नसता तर यांना ऐकण्याचे तर सोडाच; पण पाहण्याचे भाग्यही किती रसिक जळगावकरांना मिळाले असते?
आपल्या संगीतपूजक पित्याच्या स्मृती जपण्यासाठी बालगंधर्वांच्या नावाने संगीत महोत्सव जळगावसारख्या शहरात सुरू करणे, तोही शास्त्रीय संगीताचा महोत्सव करणे हे धाडस करणारे दीपक चांदोरकर आणि त्यांच्या पत्नी दीपिका म्हणजे सर्वसाधारण मध्यमवर्गीय दांपत्य. त्यामुळे असा तोलामोलाचा महोत्सव आयोजित करणे आपल्याला जमणार आहे का, असा प्रश्न त्यांनाही पडला होताच. अनेक हितचिंतकांनीही त्यांना सावध केले; पण चांदोरकरांचा, विशेषत: दीपकजींचा निर्धार पक्का होता. या महोत्सवाच्या आयोजनासाठी लागणारे लाखो रुपये उभे करण्यासाठी प्रायोजक मिळवणे, तिकीट विक्रीसाठी दारोदार फिरणे, दिग्गज कलावंतांना मानधन कमी करण्याची विनंती करणे, ही धडपड तेव्हापासून सुरू झाली; ती अजूनही सुरूच आहे. गेल्या 10 वर्षांत जळगावकरांचे कान तयार झाले आहेत. त्यामुळे तिकीट विक्रीसाठी पहिल्याइतके कष्ट घ्यावे लागत नाहीत, हे खरे; पण प्रायोजक मिळविण्यासाठीची धडपड आजही कमी झालेली नाही. त्यातच संगीताचा गंधही नसलेल्यांकडून येणारे अडथळे, होणारी टीका यामुळे हे दांपत्य कधी-कधी उद्विग्नही होत होते. दुसºयांना संगीताची मेजवानी मिळावी म्हणून अनेकांकडे मदतीचे हात पसरण्याचा हा उद्योग आपण का करतो आहोत, असा प्रश्न त्यांना पडला नसेल तरच नवल. अर्थात, या प्रश्नाने त्यांना निरुत्साही मात्र केले नाही. म्हणून तर दशकाचा एक टप्पा पूर्ण करण्याइतपत यश या महोत्सवाला लाभले आहे.
चार-पाचशे रसिकांच्या उपस्थितीने सुरू झालेला हा महोत्सव पूर्वी जिल्हा सहकारी बँकेच्या सभागृहात होत असे. आता हजार रसिकांच्या उपस्थितीमुळे बालगंधर्व खुल्या रंगमंदिरातच त्याचे आयोजन होत आहे. दुर्दैव असे की, आजूबाजूला असलेल्या वस्तीमुळे कलाकारांची तंद्री भंगते, ते अस्वस्थ होतात. त्यांचा आणि रसिक श्रोत्यांचाही रसभंग होतो. त्यामुळे या शहरात बंदिस्त रंगमंदिर नाही याची खंत या महोत्सवाच्या निमित्ताने प्रकर्षाने जाणवते आहे. अर्थात, आता वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठाननेच संकल्प केला आहे एक उत्तम बंदिस्त नाट्यगृह उभारण्याचा. तसे झाले तर या संगीत महोत्सवाची रंगत नक्कीच कितीतरी पटींनी वाढणार आहे. तो दिवस लवकर यावा, ही समस्त खान्देशवासीयांची मनोमन इच्छा आहे.
deepak.patwe@mh.bhaskarnet.com