आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाषांची मांदियाळी! (कुमार केतकर)

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडे ‘न्यू सायंटिस्ट’ या जगप्रसिद्ध वैज्ञानिक नियतकालिकात (14 डिसेंबर 2011) भाषाविषयक चिंतन व संशोधन करणारा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. लेखकाने म्हटले आहे की, माणसाला भाषा का व कशी निर्माण करावीशी वाटली आणि मुळात भाषा जन्मालाच कशी आली याबद्दल बरेच वाद प्रचलित झाले आहेत. विश्वाच्या जन्माविषयी जितके वाद असतील तितकेच हे वाद असावेत! विश्वजन्माइतकेच भाषाजन्माबद्दलचे गूढ आहे. भाषा जन्माचे गूढ शोधायला तशी अगदी काही वर्षांपूर्वीच सुरुवात झाली आहे. म्हणजे हे गूढ बरीच वर्षे भाषातज्ज्ञांनी चिंतनविषय केलेले असले तरी जीवशास्त्रीय-शरीरशास्त्रीय-उत्क्रांती-शास्त्रीय आणि गुणसूत्रशास्त्रीय संशोधन होत नव्हते. मानसशास्त्र आणि काही प्रमाणात समाजशास्त्रीय विचार झाला होता; पण ज्याला ‘न्यूरो-बायो-सोशल’ वा ‘जेनेटिक-बिहेवियरल’ शास्त्र म्हणून ओळखले जाते, त्या दृष्टीने भाषेचे गूढ उलगडण्याचा प्रयत्न झाला नव्हता. आता भाषाविचारात याही शास्त्रांनी संशोधनात्मक पुढाकार घेतल्यामुळे या संबंधात नवीन मुद्दे पुढे येत आहेत.

एक सहज लक्षात न येणारा पण कूट प्रश्न असा आहे की- अगोदर इतक्या भाषा का जन्माला याव्या? माणसाचे शरीर (आणि मन!), त्याला लागणारी भूक, तहान, त्याची पुनरुत्पादन पद्धती (नर-मादी विशेष) या जर सगळ्या समान आहेत तर भाषा ही सर्वत्र ‘एकच’ का निर्माण झाली नाही? अगदी घनदाट जंगलात, एखाद्या दुर्गम बेटावर वा एखाद्या पर्वतराशींमध्ये राहणा-या टोळ्या, जमाती, समाज असले आणि त्यांची संख्या लहान असली तरी त्यांची एक ‘स्वत:ची’ भाषा तयार होते. इतकेच नव्हे, तर ती भाषा, त्या टोळीतील सर्वांना समजते आणि तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर कुणालाही (विशेष अभ्यास व प्रयत्नाशिवाय) ती समजत नाही ही बाबसुद्धा विलक्षणच म्हणावी लागेल. आपण ज्यांना ‘नागा’ टोळ्या/ जमाती/ समाज म्हणून ओळखतो त्या नागालँडमध्ये किमान 16 भाषा/ बोली आहेत आणि त्या, त्या भागातील इतर समाजांना/ टोळ्यांना समजत नाहीत. याचबरोबर आणखीही एक गोष्ट आहे. सर्व भाषा, बोली, उपभाषा/उपबोलींना एक स्वत:ची अशी स्वायत्त संरचना असते. त्या भाषेचे एक व्याकरण असते. वाक्प्रचार, शब्दयोजना, हेल, आघात असतात. ते सर्व त्या भाषेचे वैशिष्ट्य असते. त्याचबरोबर हेही तितकेच महत्त्वाचे आहे की एका भाषेतील संवाद वा साहित्य निदान 90 टक्के भाषांतरित होऊ शकते.
भाषांतर करताना व्याकरण काहीसे बदलते आणि शब्दयोजना व वाक्यरचना बदलते; पण आशय मात्र दुस-या भाषेत नेता येतो. जर भाषांतर अशक्य असते तर पृथ्वीवरील सर्व टोळ्या, सर्व समाज, सर्व भाषा इतक्या स्वायत्त व सार्वभौम राहिल्या असत्या की माणसामाणसातील संवादच शक्य झाला नसता. भाषेमुळे विसंवाद होतो, माणसे दुखावली जातात, मारामा-या वा संघर्ष होतात हे जितके खरे, तितकेच हेही खरे की संवादाचे, सामंजस्याचे, सहजीवनाचे माध्यमही भाषा हेच आहे.
भाषा ही व्यवहारातून, सामूहिक गरजेतून, प्रतिकूल परिस्थितीत कराव्या लागणा-या जगण्याच्या संघर्षातून निर्माण झाली आहे. किंबहुना भाषेच्या मर्यादा समजावून सांगायलाही भाषाच लागते. गणितात भाषा नव्हे तर चिन्ह, संकल्पना, भाषाहीन तत्त्वचिंतन हेच महत्त्वाचे असते. बहुतेक गणिती त्यांच्या संख्याविवात वा अमूर्त प्रमेयांमध्ये आणि नि:शब्द सूत्रांमध्ये इतके मग्न असतात की त्यांना आजूबाजूच्या जगाची शुद्धही नसते. तरीही गणिताची एक भाषा असतेच, असे सर्व गणिती एकमेकांशी चर्चा करताना गृहीत धरतातच. प्राणिसृष्टीत संवाद साधण्याची भाषा म्हणजे ध्वनी, गंध, हावभाव, स्पंदने, कंपने, नजर, देहबोली- असे आविष्कार असले तरी माणसांप्रमाणेच त्यांच्या भाषा विकसित झाल्या नाहीत. (गणित, संगीत, चित्रकला, शिल्पकला इत्यादी गोष्टी तर प्राणिसृष्टीची ‘भाषाहीन’ जगात येणेच शक्य नाही.) जर भाषा विकसित झाली नसती तर ‘सिव्हिलायझेशन’च निर्माण झाले नसते.
सध्या मुख्य वैश्विक संशोधन चालू आहे की अन्य कुठे माणूससदृश अज्ञा/बुद्धिसंपन्न सृष्टी आहे का? असल्यास, त्या ‘माणसाशी’ कसा आणि कोणत्या भाषेत संपर्क साधायचा? या विश्वात कोट्यवधी पृथ्वीसदृश ग्रह आहेत आणि कदाचित तेथेही ‘इंटेलिजंट लाइफ’ असू शकेल, म्हणूनच या घडीला आघाडीवर चालू असलेले ‘कॉन्शसनेस’संबंधातील संशोधन हे भाषा-संशोधन आहे. स्मृती, संवेदना, बौद्धिकता, भावभावना या सर्वांचा प्रथम भाषेशी आणि मग लिपीशी! मुके-बहिरे बोलू व ऐकू शकत नाहीत, पण वाचू व लिहू शकतात आणि आंधळे पाहू शकत नाहीत; पण बोलू-ऐकू आणि ब्रेलद्वारे वाचूही वा लिहू शकतात. म्हणजेच त्यांचेही माध्यम शब्द-भाषा हे असते.
यांपैकी स्वरयंत्र-नियंत्रित ध्वनी अनेक प्राणी-पक्षी-सामुद्री जीव यांच्याकडे असतात. पण बोली, शब्द, भाषा लिपी व त्यांचे एक अर्थपूर्ण संवादी संकुल हे फक्त माणसालाच अवगत आहे. काही भाषा आहेत की फक्त बोली, याबाबत वाद आहेत. (आपल्याकडे याच चालीवरचा वाद मराठी व कोकणीसंबंधीचा होता.) ज्यांना स्वायत्त असे समाजसंवादाचे स्थान आहे, अशा हजारो वापरात असाव्यात. कित्येक भाषा अनेक बोली माध्यमातून व्यक्त होतात, पण त्यांना लिपी नसते. बहुतेक भाषा संशोधक मानतात की, दर 25-30 किलोमीटर्सवर बोली, भाषेचा हेल, उच्चार यात फरक पडतो. अगदी ढोबळ उदाहरण घ्यायचे तर रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील कोकणी बाज वेगवेगळी आहेत, ज्याप्रमाणे सातारा, सांगली, कोल्हापुरी बाज वेगवेगळे आहेत. शिवाय ‘सदाशिवपेठी’ मराठी आणि ‘मालवणी-कोकणी’ मराठीच असल्या तरी त्यांच्या अस्मिता सार्वभौम आहेत. तीच गोष्ट विदर्भात, खान्देशात, मराठवाड्यात. अशी विविधता आणि अस्मिता जगभर सर्वत्र आहे. अर्थात भारताइतक्या बोली, भाषा, लिप्या आणि अस्मिता जगात कुठेच नाहीत. म्हणूनच भारताचे एकत्व आपल्या वैविध्यातून व्यक्त होते, असे पंडित नेहरू म्हणत असत.
तर या सर्व बोली, भाषा व लिप्यांद्वारे जगभरचे सगळे लोक सतत बोलत असतात. ज्या वेळेस ते बोलत नसतात तेव्हा ते टीव्हीचे कार्यक्रम पाहात-ऐकत असातत, एसएमएस वा ट्विटरद्वारे ‘कनेक्टेड’ असतात किंवा वर्तमानपत्रे, नियतकालिके, पुस्तके वाचत असतात. शब्दांचा इतका महास्फोट यापूर्वी कधीही झालेला नव्हता.
माणूसप्राणी बोलायला लागला (निरनिराळ्या ठिकाणी- निरनिराळ्या बोलींमधून) त्याला साधारणपणे दीड लाख वर्षे झाली, असे मानववंशशास्त्रज्ञ मानतात. (त्यांना ‘बोली’ म्हणण्यापेक्षा ‘स्वरयंत्र-नियंत्रित ध्वनी’इतपत स्थान होते.) त्या ध्वनींमधून संवादी-संदेशवाहक शब्द निर्माण व्हायला आणखीही बरीच वर्षे गेली असावीत. त्या शब्दांना प्राथमिक चित्रलिपीचे रूप 22 हजार वर्षांपूर्वी आले असे मानले जाते; परंतु त्या चित्रलिपीतून रीतसर अक्षरे, शब्द, स्थूल अशी वाक्यरचना हे सर्व जास्तीत जास्त पाच ते सहा हजार वर्षांपूर्वीचेच आहे. त्या वेळच्या जीवनशैली शब्दांचा व भाषेचा उपयोग फक्त व्यावाहिक होता.
भावना, विचार, तत्त्वचिंतन, वाद, मतभेद, गैरसमज हे सर्व होण्याइतकी भाषा प्रगल्भ झालेली नव्हती. त्यामुळे एकूण शब्दसंख्याही अतिशय कमी होती. मग ते शब्द चिनी असोत वा अन्य कुठच्या तरी सिव्हिलायझेशनमधील. अंदाजानुसार ती एकूण शब्दसंख्या चार-पाचशेच्या वर नसावी.
‘द स्टोरी ऑफ इंग्लिश’ या बीबीसीने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, दोन हजार वर्षांपूर्वी ज्युलियस सीझर ब्रिटनमध्ये साम्राज्यविस्तारासाठी अवतरला तेव्हा इंग्रजी ही भाषाच नव्हती, परंतु बहुतेक सुशिक्षित (आणि अशिक्षितही!) मंडळींना वाटते की, ज्युलियस सीझर, क्लिओपात्रा, इतकेच काय, येशू ख्रिस्तही इंग्रजीतच बोलत असणार. वस्तुत: प्राचीन इटलीची भाषा लॅटिन हीच रोम प्रजासत्ताकाची, रोमन साम्राज्याची आणि रोमन कॅथलिक चर्चही आणि नंतरच्या काळात युरोपची सांस्कृतिक भाषा होती. अगदी 1500 वर्षांपूर्वीही इंग्रजी भाषा फक्त काही पाच-सात हजार माणसांना येत होती. ‘इंग्रजीचा प्रभाव’ वगैरेचा प्रश्नच नव्हता. इतकेच काय शेक्सपिअर (1564-1616) त्याची नाटके लिहीत होता तेव्हा फार तर जगात फार तर 50 ते 60 लाख लोक इंग्रजी भाषा बोलू शकत होते; परंतु त्यांच्यापैकी बहुसंख्य लिहू वा वाचू शकत नव्हते कारण लिपी-साक्षरता तेवढी नव्हती. इंग्रजी भाषेचा विस्तार, प्रसार व प्रभाव हा मुख्यत: गेल्या चारशे वर्षांतला, म्हणजे त्यांच्या साम्राज्य विस्ताराबरोबर झाला आहे.
गणेश देवी या जगद्विख्यात भाषा संशोधकाच्या अंदाजानुसार गेल्या सुमारे 50 ते 100 वर्षांत जगातून हजारो भाषा लुप्त झाल्या आहेत आणि आजही दरवर्षी कित्येक भाषा निष्काळजीपणामुळे नाहीशा होत आहेत. त्या भाषांबरोबर लोप पावत आहे त्या समाजाचा जीवनविषयक दृष्टिकोन, त्यांची संस्कृती आणि त्यांची जीवनशैली. देवींच्या महाप्रकल्पामधून ‘भाषा-वसुधा’या संस्थेच्या माध्यमातून त्या भाषा-बोली म्हणजेच ती संस्कृती जपण्याचा प्रयत्न होत आहे.
ketkarkumar@gmail.com