आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कूर्गचा निसर्गसहवास

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कूर्ग हा कर्नाटक राज्याच्या नैऋत्य कोप-यात लपलेला छोटासा जिल्हा आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उंच उंच सिल्व्हर ओकचे वृक्ष, त्यावर चढवलेले मि-याचे वेल, विविधरंगी रानफुले आणि लालचुटुक कौलांची छपरे भान विसरून पाहताना छोटासा घाट आपल्याला क्षणात मडिकेरी गावात आणतो. तांबडी माती आणि निळे डोंगर ही दक्षिणेची वैशिष्ट्ये इथेही दिसतात. अनवट निसर्ग सौंदर्याने नटलेली छोटीशी खेडी आपल्या कायम स्मरणात राहतात. येथील मूळ रहिवासी असलेल्या कोडावा जमातीचे स्त्री-पुरुष उंचेपुरे, गोरेपान आणि देखणे दिसतात. कोडावा स्त्रीचा पारंपरिक पेहराव म्हणजे कुर्गी पद्धतीने नेसलेली भारतीय साडी. यात साडीच्या नि-या पाठीकडे असतात. जनरल थिमय्या, फिल्ड मार्शल करिअप्पा, अश्विनी नाचप्पा, रोहन बोपन्ना या प्रसिद्ध व्यक्ती कोडावा समाजातील आहेत. तांदूळ व तांदळाचे विविध पदार्थ आणि नारळ, फणस, आंबा, केळी, अन्य भाज्यांचा कुर्गी पदार्थांत समावेश असतो, तसेच येथील मांसाहारी पदार्थदेखील प्रसिद्ध आहेत.
पर्यटकांसाठी कूर्गमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. निसर्गदर्शन, ट्रेकिंग, वॉटर राफ्टिंग, जंगल सफारी, नौकानयन, सायकलिंग, मासेमारी असे अनेक मनोरंजन पर्याय येथे आपणास मिळतात. पायी फिरण्याची आवड असणा-यांसाठी येथे अनेक पर्याय आहेत. हिरवाईने नटलेल्या टेकड्या आपल्या स्वागतासाठी सदैव सज्ज असतात. कूर्गमध्ये कॉफी, वेलची, मिरे, संत्री, तांदूळ आणि व्हॅनिला ही पिके येतात. येथील कॉफीचे मळे पाहणे आणि त्यात वास्तव्य करणे हा निर्विवादपणे सुंदर अनुभव आहे. एरवी नोकरीनिमित्त सिमेंटच्या जंगलात राहणा-या आपणास कॉफीच्या शुभ्र फुलांनी बहरलेल्या मळ्यातील वास्तव्य स्वर्गासम भासते. पक्षीप्रेमींसाठीदेखील कूर्ग म्हणजे एक पर्वणीच. येथे 300 प्रकारचे विविध पक्षी आढळतात. गिरीप्रेमींसाठी येथे ताडियांडमोल, पुष्पगिरी आणि ब्रह्मगिरी ही तीन शिखरे आहेत. तुम्ही गोल्फची आवड जोपासणारे असाल तर येथे तीन गोल्फ कोर्स आहेत.
अनेक पर्यटक पाऊस अनुभवण्यासाठी कूर्गला येतात. कॉफीच्या मळ्यात फिरताना अवचित बरसलेल्या पावसात भिजणे किंवा पाऊस पडताना बघणे कुणाला आवडणार नाही? तसा तर संपूर्ण कूर्ग प्रांतच हिरवाईने नटून थंड हवेचे वरदान मिळवलेला आहे; परंतु काही जागा पर्यटकांना विशेष प्रिय आहेत. मडिकेरी किल्ला - 17व्या शतकातील हा किल्ला टिपू सुलतानाने पुनर्बांधणी करून सजवला. याच्या प्रवेशद्वारात दोन अजस्र हत्तींचे पुतळे आहेत. किल्ल्याच्या आत तुरुंग, एक म्युझियम, मंदिर आणि अनेक कार्यालये आहेत. ‘राजाज सीट’ ही जागा सुंदर दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे बसून पर्यटक निसर्गसुंदर डोंगर, द-या व सूर्योदय तसेच सूर्यास्त पाहतात. पूर्वी कूर्गचे राजे येथे येऊन बसायचे, म्हणून या जागेचे नाव राजाज सीट! तलकावेरी या निसर्गरम्य स्थानी कावेरी नदीचा उगम होतो. येथे जाण्याचा रस्ता दाट अरण्य आणि कॉफी व मि-यांच्या इस्टेटमधून जातो. एक तासाचा झोकदार घाटातून होणारा हा प्रवास आपणास बागमांडला येथे घेऊन जातो. येथे कावेरी, कनिका व सुज्योती या नद्यांचा संगम आहे. येथून पहाडात खोदलेल्या 300 पाय-या चढण्याचे परिश्रम आपल्या डोळ्यांचे पारणे फेडतात. पहाडाच्या माथ्यावर पोहोचून आसपासची पाचूची जंगले, द-या पाहणे अद््भुत वाटते. दुबारे येथील जंगलात फिरताना सोबतची बच्चेकंपनी हत्तींना स्नान घालत असतानाचा अनुभव घेऊ शकते. हत्तीवर बसून रपेट, हत्तींना स्नान तसेच खाऊ घालणे, वॉटर राफ्टिंग यात संपूर्ण कुटुंब रमते. कावेरी नदीतीरावरील निसर्गधाम ही आणखी एक चित्तवेधक कलाकृती. येथे जाताना आपणास एका झुलत्या पुलावरून जाण्याचा थरारक अनुभव येतो. पुलाखाली काही फुटांवर कावेरी नदी उसळत वाहत असते! येथे असंख्य हरणे आणि हत्तीचे कळप दिसतात. बैलाकुप्पे येथे आपण तिबेटन मॉनेस्ट्री, तिबेटन कलाकृतीच्या वस्तू, कार्पेट फॅक्टरी पाहतो. भडक लाल-पिवळ्या वस्त्रांतील मंत्रपठण करणारे लामा आपले लक्ष वेधून घेतात. मॉनेस्ट्रीच्या उपाहारगृहात अतिशय उत्कृष्ट तिबेटन मोमो हा खाद्यप्रकार मिळतो. कूर्गमधील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणजे अ‍ॅबी फॉल्स. हा एक भव्य दिसणारा जलप्रपात आपली चाहूल फार दुरूनच देतो. धीरगंभीर नादाची चाहूल घेत घेत कॉफी आणि मि-याच्या लागवडीमधून रस्ता काढत आपण अचानक अ‍ॅबी फॉल्स पाहतो व अचंबित होतो. सर्वदूर हिरवाई, वातावरणातील ओलसर गारवा आणि समोर कोसळणारी अखंड जलराशी!
ओंकारेश्वर हे गॉथिक, इस्लामिक व हिंदू शैलीत बांधलेले एक सुंदर शिवमंदिर सदैव गजबजलेले असते. कूर्गमध्ये वास्तव्यासाठी अनेक हॉटेल्स उपलब्ध आहेत; पण आपणास कुर्गी संस्कृती अनुभवायची असेल तर कुर्गी कुटुंबासोबत राहण्याला पर्याय नाही. येथेच आपणाला खास कुर्गी पदार्थ मिळू शकतात; जसे बांबूच्या कोवळ्या कोंबांची भाजी, बांबूचे लोणचे इ. कूर्ग हे कॉफी प्लँटेशन्समध्ये असल्याने येथील वास्तव्यामुळे पर्यटकांना एक वेगळा अनुभव मिळतो, तसेच कुर्गी जीवन जाणून घेण्याची संधी मिळते.
कसे जाल ? :      
नजीकचा विमानतळ -
मंगलोर 135 कि.मी.      
बंगलोर 250 कि.मी.
नजीकचे रेल्वेस्थानक - मैसूर 120 कि.मी.
     कूर्ग हे उत्कृष्ट रस्त्यांनी कर्नाटकमधील सर्व मोठ्या शहरांना जोडले आहे.
     भेट देण्यास सर्वोत्तम काळ - वर्षभर.