आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिरे झाकोळले, माणिक झळाळले!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकारण, मग ते गावकीचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे, राज्याचे वा केंद्रीय पातळीवरचे असो, बदल हा अपरिहार्य असतो. किंबहुना तो तसा घडला नाही तर साचलेपण येऊ लागते. या सदराच्या पहिल्या लेखामध्ये ‘बदल’ या विषयाला स्पर्श करताना राजकीय पटलावरील कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही प्रमुख घराण्यांच्या राजकीय कारकीर्दीचा उल्लेख आवर्जून केला होता. कर्मवीरांचे कर्तृत्व एवढे प्रचंड होते की त्या तुलनेत त्यांच्या नव्या पिढीने सपशेल भ्रमनिरासच केला. या उलट नंदुरबार जिल्ह्यातील माणिकराव गावित यांच्या घराण्याची वाटचाल ही आस्ते कदम असली तरी दमदार म्हणता येईल अशी आहे. माणिकरावांनी काँग्रेसची कास धरत खासदार म्हणून नंदुरबार लोकसभा मतदारसंघावरचे वर्चस्व तीन दशकांहून अधिक काळ राखले आहे. त्यांच्यावर मतदारसंघातून विस्थापित होण्याची पाळी अजून तरी आलेली नाही; पण मुलगा भरत त्यांची गादी चालवण्याच्या दृष्टीने एक एक पाऊल टाकत आहे. कन्या निर्मलाताई गावित यांनी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी विधानसभा मतदारसंघ काबीज केला आहे.
येथील काही घराणी काळाच्या ओघात चर्चेत आली अन् अल्पावधीनंतर चर्चेतून बाददेखील झाली. त्याच धाटणीतील एक उदाहरण आहे, डॉ. आहेर यांचे. भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रवादीत दाखल झालेले माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर भाजपत असताना आमदारकीची हॅट्ट्रिक व खासदार अशी पदे त्यांच्या पदरात पडली. डॉक्टरबाबांनी जवळपास दोन दशके नाशिक शहरावर राज्य केले खरे; पण अचानक पक्षात घुसमट होऊ लागल्याची त्यांना तीव्र जाणीवही झाली. राष्ट्रवादीचा दरवाजा खुला होताच. मग काय, बाबांची स्वारी तेथे डेरेदाखल झाली. तापी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद अन् अनायासे राज्यमंत्रिपदाचा दर्जा अर्थात लाल दिव्याची गाडी मिळाली; पण थोड्याच दिवसांत राजकीय विजनवास पदरी आला. नंतर आपल्या डॉक्टर मुलाला नाशिक शहरातील एका वॉर्डातून नगरसेवकपदासाठी उमेदवारी मिळावी म्हणून धडपड करण्याची पाळी या मातब्बर नेत्यावर आली.
कर्मवीर विद्यार्थी अवस्थेत असतानाच सामाजिक व राजकीय कार्यात भाग घेऊ लागल्याने तेथूनच कारकीर्दीला सुरुवात झाली होती. शिक्षणासोबतच सत्यशोधक चळवळ, महापूर संकट निवारणाचे कार्य, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, कोयना योजना, शेतकी परिषद यामध्ये सहभाग घेत देश व प्रदेश पातळीवर राजकीय मशागतीचे काम त्यांनी सुरू ठेवले. महसूलमंत्री असताना कुळ कायदा अमलात आणला. ‘कसेल त्याची जमीन’ या न्यायाने सामाजिक समतेचा संदेश देण्याचे महत्तम कार्य त्यांच्या हातून झाले. कर्मवीरांनी निर्माण करून ठेवलेला हा उदात्त वारसा टिकवताना पुढच्या पिढीला प्रचंड कसरत करावी लागत आहे. एवढी की, भाऊसाहेबांच्या पुण्याईने जोपासली गेलेली मालेगाव तालुक्यातील दाभाडी विधानसभा मतदारसंघाची जागाही या पिढीला आलेली नाही.
कर्मवीरांप्रमाणेच खासदार माणिकराव गावित यांची राजकीय कारकीर्द काँग्रेसी परंपरेतच फुलत गेली. फरक एवढाच की, कर्मवीरांनंतर लोकनेते स्व. व्यंकटराव, डॉ. बळीराम, पुष्पाताई आणि प्रशांत हिरे यांच्या माध्यमातून परंपरा सुरू राहिली अन् खंडितदेखील झाली. पण, माणिकरावांच्या घराण्याची परंपरा एकखांबी तंबूगत आजही सुरू आहे. काँग्रेसच्या हाताचा आधार घेत 1965मध्ये नवापूर ग्रामपंचायतीचे सदस्य, त्यानंतरच्या काळात नवापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी आणि सलगपणे सात वेळा म्हणजेच आजतागायत नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. या काळात अनेक राजकीय वादळे निर्माण झाली, काँग्रेस पक्षाला सत्ताच्युत व्हावे लागले; पण माणिकराव या सगळ्या पडझडीतही काँग्रेसच्याच बळावर सहीसलामत राहिले. गत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने नंदुरबार मतदारसंघात पर्यायाने माणिकरावांना शह देण्याच्या दृष्टीने डॉ. विजयकुमार गावित यांच्या शिडात हवा भरण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी होऊ शकला नाही. विकासाचे काम होवो ना होवो, आदिवासींच्या मुलांच्या कुपोषण समस्येचे पूर्णपणे उच्चाटन होवो ना होवो, गाव-पाड्यावरील आदिवासींशी जोडली गेलेली नाळ तुटणार नाही याची पुरेपूर दक्षता माणिकरावांनी घेतली. कुणी निंदो वा वंदो, खासदार महोदय लोकांनी लोकसंपर्क खंडित होऊ दिला नाही. पण, राष्ट्रवादीची मध्यंतरीची चाल लक्षात घेऊन माणिकरावांनी मुलगा भरत आणि कन्या निर्मला यांना गावित घराण्याचे वारसदार म्हणून एक एक घर पुढे सरकवण्यास सुरुवात केली आहे. भरत हा नंदुरबार जिल्हा परिषदेचा सदस्य, नवापूरस्थित आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा उपाध्यक्ष यासह विसरवाडी एज्युकेशन सोसायटीचा अध्यक्ष अशी पदे भूषवत आहे. त्या शिवाय कन्या निर्मला रमेश गावित यांनी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मतदारसंघाची नुसतीच बांधणी न करता अल्पावधीत तो मतदारसंघ काँग्रेस पक्षाच्याच आशीर्वादाने काबीजही केला. तात्पर्य एवढेच, की सत्ता किंवा सत्ताधारी होणे हे सर्वस्वी मतदारांवर अवलंबून असते. त्या मतदारांचा विसर पडला वा सत्तेची मस्ती डोक्यात गेली, की ज्या लोकांनी डोक्यावर घेऊन मिरवलेले असते, ती मंडळी मग पायदळी तुडवायला मागेपुढे पाहात नाहीत. अशा स्थितीत मग राजकीय वारसा वा राजकीय परंपरेचा काडीमात्र उपयोग होत नाही. उदात्त राजकीय घराण्याचा वारसा लाभलेल्या नव्या वारसदारांकरवी नेमकी हीच बाब दुर्लक्षित झाली, अन् ही घराणी कालौघात वळचणीला जाऊन पडली.
jaiprakash.p@mh.bhaskarnet.com