आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rasik Article Manohar Sonawne Book Sadra Badaleli Manse

वावटळीत हरवलेल्या माणसांच्या कथा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या देशाची एक विचित्र गोची झाली आहे. प्राचीन काळापासून आपल्याकडे अध्यात्माच्या विचाराने नियतीवादाचा विळखा आपल्या आयुष्याला घातला आणि ऐहिकतेऐवजी पारलौकिकाची चिंता करण्याची शिकवण दिली. श्रीमंतीचा तर आपल्याला कायमच तिटकारा वाटत आला आहे. ती आपल्याकडे नाही, हेही त्याचे खरे कारण असू शकेल कदाचित. पण ते काहीही असो, नंतरच्या काळात या असल्या गोष्टींनी आपली चांगलीच पंचाईत केली. स्वातंत्र्यानंतरच्या काळात नेहरूंच्या समाजवादी मिश्र अर्थव्यवस्थेने इथल्या लोकांना केवळ अभावाचेच जगणे दिले. कोटा आणि लायसन्स राजच्या अमलात सामान्यांचे जगणे होरपळून निघाले. नंतर त्यावर उपाय म्हणून नव्वदच्या दशकात जागतिकीकरण व उदारीकरणाचा उतारा काढण्यात आला; पण याही वेळेस कुठेतरी काहीतरी चुकले.
देशात पैसा आला खरा; पण माणसे श्रीमंत झाली नाहीत. ग्लोबलायझेशनच्या झगमगाटात गरिबी उजळून निघू शकली नाही. अचानक पैशाला आलेल्या महत्त्वाला सामोरे कसे जायचे, हेच कित्येकांना कळले नाही. जगण्यासाठी पैसा इतका अपरिहार्य कसा झाला, हेही त्यांना समजले नाही. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा पैशाला आलेले हे महत्त्व त्यांच्या आजवरच्या समजुतींना, कल्पनांना, विचारांना धक्का देणारे होते. ही माणसे या अचानक आलेल्या बदलांच्या वावटळीत आधी आपला भवताल हरवून बसली, मग आपली मूल्ये आणि शेवटी स्वत:लाच. मनोहर सोनवणे यांचे ‘सदरा बदललेली माणसं’ हे पुस्तक आधुनिकीकरणाच्या वादळात सत्त्व आणि स्वत्व गमावून बसलेल्या अशाच माणसांच्या कथा सांगते. सोनवणे कवी आहेत आणि कवी जेव्हा गद्यलेखन करतो, तेव्हा त्यात त्याच्या तरल संवेदनाही उमटत असतात. त्यामुळेच या लिखाणाचे आशयमूल्य हे अधिकच वृद्धिंगत झालेले असते. सोनवणे यांनी त्यांच्या बदलत गेलेल्या भवतालाचा, माणसांच्या हरवलेपणातून आणि वस्तूंच्या नाहीशा होण्यातून घेतलेला हा वेध आहे. हे बदल, ज्यात दररोज काहीतरी ‘आधी असलेले’ नाहीसे होते आणि त्याच्या जागी काहीतरी ‘पूर्वी नसलेले’ येते, त्याच्याशी मिळवून घेताना माणसांची होणारी तगमग या ललित लेखांमध्ये भरलेली आहे. हे लेख साधे आहेत; पण या कहाण्या खºया आहेत व म्हणूनच त्या अंगावर चाल करून येतात, मनात भिनतात आणि डोक्यात शिरतात. इथे जे काही जग सोनवणेंनी मांडले आहे, ते आपल्याला अपरिचित नाही; पण त्याकडे आपण सोयीस्कर दुर्लक्ष केलेले असते. कारण त्याची दाहकता आपल्याला सोसवत नाही. सूर्याचे तेज सहन होत नाही म्हणून त्याच्याकडे पाठ फिरवून राहण्यासारखेच आहे हे; पण इथे या लेखांमधून सोनवणे आपली पाठ फिरवून त्या वास्तवाकडे आपल्याला नेतात आणि मग त्याच्या दर्शनाने आपण अस्वस्थ होतो. मग जीवनाचे आणि जगण्याचे अनेक अनोळखी पदर या कथांमधून उकलत जातात. जमिनीला माणसांपेक्षा जास्त आलेले मोल व त्यापायी स्क्वेअर फुटांमधून माणुसकी मोजण्याची निघालेली मापे आपल्याला अस्वस्थ करतात. पोटापाण्याच्या लढाईत घाण्याला जुंपलेल्या बैलासारखीच आपली स्थिती होते. मेट्रोच्या सान्निध्यात माणुसकीला जागा नसते, याचे भान पुन्हा एकदा येते. माणुसकी सुटली तरी जात सुटायला तयार नाही, हे कडवट वास्तव पचवणे अवघड जाते. एकमेकांच्या सुखदु:खांचा हिशेब करून स्वत:च्या समाधानाच्या व्याख्या इथे आजही केल्या जातात. शहरीकरणाच्या धबडग्यात रस्ते रुंद होत जातात; पण माणसे मात्र अरुंद होत जातात. जगताना ना अत्र ना तत्र अशा परिस्थितीत माणसांचा अर्जुन बनतो; पण त्याला त्याचा श्रीकृष्ण मात्र गवसत नाही. समूहाची संख्या वाढत जाते आणि माणसांचे एकाकीपणही. आणि हे अजब कसे घडते तेही कळत नाही. अंगातला सदरा बदलावा इतक्या सहजपणे हे बदल अलीकडच्या काळात सर्वच क्षेत्रांत घडले आहेत, घडत आहेत; पण इतक्या सहजपणे ते आपल्याला पचवता मात्र आलेले नाहीत. काहींनी त्याच्यापुढे सरळ शरणागती पत्करली, तर काहींनी त्याच्याशी लढताना स्वत:चे अस्तित्वच गमावले. काही मात्र जुळवून घेत पुढे गेले. पण जे मागे राहिले त्यांचे काय? बदल हा अपरिहार्य भाग असतो जीवनाचा. हे असे व्हायलाच हवे का? याचे उत्तर देणे कठीण आहे, पण त्याचा शोध घेण्याचा एक प्रयत्न करायलाच हवा. सोनवणे यांचे हे पुस्तक असाच एक प्रयत्न आहे. एका कविमनाने टिपलेली जगण्याची ही स्पंदने आहेत. ज्यात गतकाळाच्या आठवणी आहेत, वर्तमानाच्या व्यथा आहेत, तशाच भविष्याच्या चिंताही आहेत.
सदरा बदललेली माणसं , लेखक - मनोहर सोनवणे,
प्रकाशक - समकालीन प्रकाशन, मूल्य - 125 रु.