आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल्लामा इक्बाल तेरी याद में...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखंड भारत अस्तित्वात असताना आपल्या शायरीच्या माध्यमातून ज्यांनी समाज परिवर्तनाचे सफल प्रयत्न केले, त्यात विचारवंत सर अल्लामा महमद इक्बाल यांचे नाव अग्रभागी होते. सर अल्लामा इक्बाल 1873 मध्ये पंजाबच्या सियालकोटमध्ये जन्माला आले. वडिलांचे नाव शेख नूरमहंमद. बालपणातच वडिलांनी त्यांना सियालकोटच्या एका ज्ञानी मौलाना मीर हसन यांच्या स्वाधीन केले. तेथेच इक्बाल यांनी उर्दू-फारशीत प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांची इंग्लंडला रवानगी झाली. पुढे त्यांनी तेथेच बॅरिस्टरची पदवीही मिळवली.
इंग्लंडच्या एका माजी पंतप्रधानांनी म्हटले होते की, ‘तुम्ही तुमच्या राष्ट्रातील युवकांच्या ओठांवर असणारे गीत मला सांगा, मी तुम्हाला तुमच्या राष्ट्राचे भविष्य सागेन.’ त्यांना अर्थातच हे सुचवायचे होते की, राष्ट्रांची प्रगती त्या देशाच्या युवकाचे चरित्र, त्याची हिंमत व जिद्दीवर अवलंबून असते. कोणत्याही चळवळीचे भवितव्य युवकांच्या विचारधारेवर अवलंबून असते. अशा वेळी युवा पिढीला प्रेरणा देण्याचे काम नि:संशय इक्बाल यांनी केले. इक्बाल यांनी भारतीय युवकांना शाहीन म्हणजेच गरुडाची उपमा दिली. एका शेरमध्ये ते म्हणतात,
नहिं तेरा नशेमन कसरे, सुलतानी के गुंबद पर।
तु शाहीन हे बसेरा कर पहाडो की चट्टानो पर।।
आपल्या भावना व्यक्त करताना अल्लामा इक्बाल यांनी ज्ञान, साहित्य, संस्कार, माणुसकी, राजकारण, सामाजिक एकता, जातपात, स्त्री-पुरुष, सौंदर्य, स्वाभिमान आदी विषयांवर हृदयाला स्पर्श करणारे विचार मांडले आहेत.
खुदी को कर बुलंद इतना, के हर तकदीर से पहले
खुदा बन्दे से खुद पुछे, बता तेरी रजा क्या है।।
मरगळलेल्या मनांना प्रेरणा देणा-या या कानमंत्राचे निर्मातेसुद्धा इक्बालच! अल्लामा इक्बाल यांनी स्त्री जातीचे केलेले चित्रणही हृदयाला भिडणारे आहे. एका कवितेत ते लिहितात
वजूदे जन से है, तस्वीरे काइनात में रंग
उसी के साज से है, जिन्दगी के सोजे दरू
शरफते बढकर युरय्या से मूशते खाक उसकी
के हर शर्फ है इसी दर्ज का दरे मकनू
मकालीमाते फलातू ना लिख सकी लेकीन
उसी शोले से तूटा शरारे अफलातून।।
अर्थात केवळ काव्य करून ते थांबले नव्हते, तर त्यांनी स्त्री शिक्षणाचीही जोरकसपणे पाठराखण केली होती. स्त्री शिकली तर समाज प्रगतीच्या मार्गावर येईल. समाजात पसरलेल्या अंधविश्वासाची लागलेली जाळी दूर होतील. अंधविचाराच्या बंधनातून समाज मुक्त होईल, हेही त्यांनी त्या वेळी समाजाला ठासून सांगितले होते.
इकबाल यांची ही खासियत होती की, ज्या वेळी ते जगाशी संवाद साधत तेव्हा धर्मात दिलेल्या चौकटीबद्दल बोलत; पण त्याच वेळी माणुसकी, प्रेमधर्म व समानतेबद्दल आग्रही राहत. अल्लामा इक्बाल यांनी आपल्या मनात उद््भवत असलेल्या प्रश्नांना अनुसरून जेव्हा खुदाला संबोधित केले तेव्हा त्यांच्या विरोधात फतवा काढला गेला. इक्बाल यांनी आपल्या विचारलेल्या त्या प्रश्नांची उत्तरे खुदाच्या वतीने दिली, तेव्हा तो फतवा मागे घेण्यात आला. केवळ मुस्लिम समाजच नव्हे, तर अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी अखंड प्रयत्नशील राहिलेल्या इक्बाल यांना ‘हकिमूल उम्मत’ हा किताबही देण्यात आला.
यथावकाश इक्बाल काव्य-प्रतिभेच्या बळावर साहित्य शिखरावर पोहोचले. ब्रिटिश सरकारने त्यांना ‘सर’ हा किताब देण्याचा प्रस्ताव मांडला. तेव्हा इक्बाल यांनी ब्रिटिश सरकारसमोर एक अट ठेवली की, आधी तुम्ही माझे गुरू मौलाना मीर हसन यांचा सन्मान करावा. त्या वेळी ब्रिटिश सरकारने विचारणा केली की, मौलाना मीर हसन यांचे साहित्यात असे काय योगदान आहे की, त्यामुळे जगात त्यांची ओळख झालेली आहे. त्यावर इक्बाल यांनी उत्तर दिले की, तुमच्यासमोर साक्षात त्यांचा शाहकार अल्लामा इक्बाल या नावाने उभा आहे. सरकार निरुत्तर झाले. मौलाना मीर हसन यांना शमशुल उल्मा (ज्ञानाचा सूर्य) हा किताब देण्यात आला व त्यानंतरचे इक्बाल यांनी ‘सर’ हा किताब सन्मानपूर्वक स्वीकारला.
इक्बाल यांनी अखंड भारताचा गौरव करणारे ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’ हे गीत ज्या श्रद्धेने लिहिले त्याची आम्ही केवळ कल्पनाच करू शकतो. भारतीय समाजात आस्था आणि संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या कामी इक्बाल यांचे योगदानही मोठे आहे. त्यांनी लिहिलेली एक प्रार्थना जी आजही उर्दू शाळांमध्ये प्राथनेच्या वेळी गायली जाते, त्या प्रार्थनेत सोप्या शब्दांत देशप्रेम, दीनदुबळ्यांची सेवा करणे आदी विचारांना प्राधान्य दिले आहे.
लब पे आती है दुवा बनके तमन्ना मेरी
जिन्दगी शम्मा की सुरत हो खुदाया मेरी
हो मेरे दम से यूंही मेरे वतन की जिनत
जीस त-हा फुल से होती है चमन की जीनत
जिन्दगी हो मेरी परवाने की सुरत यारब
इल्म की शम्मा से हो मुझको मोहब्बत यारब
हो मेरा काम गरीबो की हिमायत करना
दर्दमन्दो से जइफोसे मुहब्बत करना
मेरे अल्लाह बुराई से बचाना मुझको
नेक जो राह हो उसराह पर चलाना मुझको
21 एप्रिल 1938 रोजी वयाच्या 65 व्या वर्षी, अल्लामा इक्बाल जगातून निघून गेले. त्यांच्या शायरीला सन्मान करत पाकिस्तानने त्यांना आपल्या देशाचे ‘कौमी शायर’ घोषित केले. म्हटले तर एक प्रकारे स्वत:लाच सन्मानित करून घेतले. अशा वेळी ज्याने ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’ हे गीत लिहून भारताचा गौरव राखला अशा थोर मानवतावादी कवीचे नाव एखाद्या चौकाला किंवा रस्त्यास देऊन त्यांच्या कार्याचा उचित सन्मान करावा, इतकासुद्धा त्यांच्यावर आमचा अधिकार नाही का? किंबहुना, साहित्याच्या माध्यमातून आपले जीवन समृद्ध करणा-या तुलसीदास, कबीर, मुन्शी प्रेमचंद, सादत हसन मंटो आदी दिग्गजांच्या स्मृती जपणे आपले आद्य कर्तव्य नसावे का?