आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बहुगुणी बाटली..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अगदी लहान असतानाच आपली सांगड बाटलीशी घातली जाते ती दुधाच्या निमित्ताने. पाण्यासाठी आपण नेहमी बाटलीवरच विसंबून असतो. पण त्याबरोबरच मद्य असो की अत्तर शौकिनांसाठी बाटली खूप महत्त्वाची ठरते... दुधापासून मद्यापर्यंत अन् अत्तरापासून अ‍ॅसिडपर्यंत सर्व प्रकारच्या द्रव्यांना आपल्यात सामावून घेणारी बाटली अनेकार्थांनी खासच. दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून गेलेल्या या बाटलीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आज अत्यंत सामान्य अन् सहज असला तरी तिच्या जडणघडणीला अनेक टप्प्यांतून पार व्हावे लागले आहे. भोपळा वा तत्सम मोठी फळे किंवा प्राण्यांच्या कातडीपासून घडत गेलेला बाटलीचा साचा तळ, पोट, मान, तोंड, बूच अशी अनेक वळणे घेत प्रमाणबद्ध होत गेला. ही प्रमाणबद्धता अथवा आकार म्हणजे बाटलीचे अंगभूत वैशिष्ट्य असले तरी तिला असा ‘आकार’ प्राप्त होण्यासाठी शेकडोच नव्हे तर हजारो वर्षांचा कालावधी जावा लागला आहे. त्यातूनच मग बुधला, बरणी, शिसी, कुपी अशी तिची अनेकविध रूपे तयार झाली. त्यासाठी माती, काच, धातू, प्लास्टिक आदी अनेक घटकांचा वापर होत असला तरी बाटलीची सांगड मुख्यत: घातली जाते ती काचेशीच. पण पारदर्शकता, रंगसंगती, सौंदर्य या सा-या बाबींना ज्या काचेमुळे शोभा प्राप्त होते, त्याच काचेमुळे बाटलीला भंगुरतेचा शापही लागला आहे. अर्थात, बाटलीची उपयोगिता त्याहून कित्येक पटींनी अधिक असल्याने भंगुरता किंवा टिकाऊपणाचे निकष तिच्यासाठी फारसे महत्त्वाचे ठरत नाहीत. पर्यायाने कालौघात बाटली अधिकाधिक बहुगुणी ठरू लागली आहे. अन्नधान्य असो वा अन्य कोणत्याही स्वरूपाचा घनरूप पदार्थ, त्याची साठवणूक करणे तसे फारसे जिकिरीचे नसते. पण एखादा द्रवरूप पदार्थ साठवायचा कसा आणि त्यासाठी साधन ते काय वापरावे हा प्रश्न माणसाला अगदी सुरुवातीलाच पडला असणार, तो पाण्याच्या संदर्भाने. पाणवठ्यावरचे पाणी आपली गुहा अथवा राहत्या ठिकाणापर्यंत कसे आणावे, याच्या विचारात तो असतानाच त्याला पोकळ स्वरूपाची वस्तू त्यासाठी उपयुक्त ठरू शकते, ही कल्पना सुचली असावी. त्यानुसार भोपळा किंवा तशाच प्रकारचे एखादे मोठे, वाळलेले आणि पोकळ साधन त्याच्या हाती आले असणार. तेथूनच मग बाटलीचा आकार त्याच्या मनात साकारू लागला. केवळ पाणीच नव्हे तर इतरही अनेक द्रवरूप पदार्थ अशाप्रकारे साठवण्याची वा एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेण्याची गरज हळूहळू वाढत गेली तशी बाटलीची निकडसुद्धा अधिक तीव्रतेने भासायला लागली. अगदी पूर्वी भोपळे, शंख यासारख्या नैसर्गिक साधनांचाच उपयोग बाटली म्हणून केला जात असे. कालांतराने प्राण्यांची कातडी शिवून तयार केलेल्या पिशव्यांचा वापर बाटल्यांप्रमाणे सुरू झाला. इजिप्त, ग्रीस या ठिकाणी तर सुरुवातीला बक-याच्या कातड्यांचे बुधले तयार केले जात. पोकळ स्वरूपातल्या या कातडीमध्ये मुख्यत: मद्य साठवले जात असे. त्यामध्ये दारू भरण्या-ओतण्याकरता पायाच्या निमुळत्या भागांचा उपयोग केला जात असे. पण आपल्याला हवे तसे आणि अधिक टिकाऊ साधन असावे, या खटपटीअंती त्याने ओबडधोबड स्वरूपाची बाटली बनवली ती मातीपासून. तिचा आकार आतापेक्षा बराच मोठा म्हणजे बुधल्यासारखा होता. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी झाडांचे ओंडके कोरून त्याचा वापरसुद्धा द्रव पदार्थ साठवण्यासाठी केला जात असे. विशेषत: तुर्कस्थानात पाईन वृक्षांचे ओंडके कोरून तोटी असलेल्या अगदी प्राथमिक प्रकारच्या बाटल्या प्राचीन काळी बनवल्या जात असत. बाटल्यांबाबतची जुनी नोंद पाहायची म्हटले तर थेट इसवीसनाच्याही तब्बल आठ हजार वर्षे मागे जावे लागते. त्या काळच्या अनेक संस्कृतींमध्ये दारू, तेल वगैरे साठवण्यासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपातील बाटल्या उपयोगात आणल्या जात. इजिप्त, सीरिया वगैरे भागात इसवीसन पूर्व दीड हजार वर्षांपासून काचपात्र वापरात होते. अर्थात, असे वेगवेगळे प्रयोग सुरू असले तरी बाटलीला साधारणपणे आजच्यासारखा आकार यायला लागला तो इसवीसन पूर्व पहिल्या शतकापासून. त्या काळात फुंकनळीच्या साहाय्याने व साच्याद्वारे बाटलीसदृश काचपात्रे बनवायला प्रारंभ झाला. आपल्याकडे तक्षशीला येथील उत्खननात अशा स्वरूपाच्या काचेच्या बाटल्या आढळल्या आहेत. फुंकनळीच्या साहाय्याने बाटल्या बनवण्याची ही प्रक्रिया त्यानंतर अनेक शतके सुरू होती. ही पद्धत तशी जिकिरीची असल्याने बाटल्यांचा वापर मर्यादित होता. पण, 1608मध्ये अमेरिकेच्या व्हर्जिनियामध्ये बाटली निर्मितीची पहिली फॅक्टरी कार्यान्वित झाली. त्याच सुमारास जेम्सटाऊन येथे काचभट्टी सुरूझाली अन् बाटल्यांच्या निर्मितीला वेग आला. इंग्लंडमध्ये सतराव्या शतकात काचेच्या बाटल्यांचा उद्योग आणि व्यापार मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. स्वयंचलित यांत्रिक पद्धतीने बाटल्यांचे उत्पादन करण्याचे श्रेय मायकेल ओवेन्सला जाते. त्यानंतरच ख-या अर्थाने बाटली हातोहाती सामावली जाऊ लागली. कालांतराने प्लास्टिकचा वापरसुद्धा बाटली निर्मितीसाठी सर्रास केला जाऊ लागला. आज तर काचेपेक्षासुद्धा प्लास्टिकच्या बाटल्यांची सर्वत्र चलती दिसून येते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे बाटलीच्या रूप, रंगात प्रचंड वैविध्य आले असले तरी आकार आणि प्रमाणबद्धता हाच आजदेखील तिचा मूलाधार आहे. विशिष्ट स्वरूपाचा तळ, त्यानंतर येणारा पोटाचा रुंद भाग, वरती निमुळती होत जाणारी पोटाच्या तुलनेत खूपच अरुंद असलेली मान, त्यावर परत थोड्या मोठ्या आकाराचे तोंड, त्याला उघड-बंद करता येण्याजोगे झाकण असा साज असलेली बाटली खरोखरच आपल्याला पदोपदी साथ करत असते. अगदी लहान असतानाच आपली सांगड बाटलीशी घातली जाते ती दुधाच्या निमित्ताने. पाण्यासाठी आपण नेहमी बाटलीवरच विसंबून असतो. पण, त्याबरोबरच मद्य असो की अत्तर शौकिनांसाठी बाटली खूप महत्त्वाची ठरते. मद्याच्या विविध आकार, प्रकार, रंगांच्या बाटल्या म्हणजे त्या त्या शौकिनांसाठी जणू स्टेटस सिंबॉल बनून जातात. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या अत्तराच्या कुप्यांनीसुद्धा आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याबरोबरच अगदी विष साठवायचे असो की अ‍ॅसिड, त्यासाठी लागते बाटलीच. दुसरीकडे जीवनोपयोगी वा आरोग्यदायी औषधे साठवण्यासाठीसुद्धा मुख्यत: स्वच्छ पारदर्शक अथवा अंबर रंगाच्या बाटल्याच कामी येत असल्याने एकंदर पाहता बाटलीला पर्याय नाही, हेच खरे! (संदर्भ : मराठी विश्वकोश,www.madehow.com,www.wisedude.com) abhikul10@gmail.com