आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका अवलियाचं नाटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दारिओ फो हा अंतर्बाह्य अवलिया होता. रंगभाषेवर, प्रेक्षकांवर त्याची पकड होतीच, परंतु सत्तांध व्यवस्थेवरही त्याचा विलक्षण वचक होता. आपल्याकडे टीव्हीवर रामायण-महाभारत सुरू झाले की, रस्ते ओस पडत; तिकडे फो यांची नाटके टीव्हीवर लागली की बाजारपेठा ओस पडत...

फुटबॉलच्या ग्राऊंडवर हजारोंच्या गर्दीसमोर खेळाडूंऐवजी एक नट आपल्या अभिनय कौशल्याने दर्शकांना गुंगवून टाकतो, असे कुणी म्हटले तर लोकांना ती रंगवलेली गोष्ट वाटेल. पण, दारिओ फो या इटालियन नटाबाबत ते खरं होतं. रंगभाषेचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा थेट पुरस्कार करणारे दारिओ फो सर्कशीच्या तंबूतल्या हजारोंच्या गर्दीला आपल्या विदूषकी अदाकारीने खुलवत असत. खुलवता खुलवता टोचत असत. विचार करायला भाग पाडत असत. त्यांची नाटके सुरू झाली किंवा ती टीव्हीवर प्रसारित होऊ लागली की आसपासच्या बाजारपेठेवर, टॅक्सीचालकांच्या धंद्यावर परिणाम होई! १९९८च्या नववर्षाच्या रात्री टीव्हीवरचा अर्ध्या तासाचा नाट्यप्रयोग तब्बल ३.५ अब्ज दर्शकांनी पाहिला. नाटकाचा प्रयोग कुठल्याही जागी असू दे. बिन-प्रॉपर्टीचे, बिन-कॉस्च्युम्सचे नाटक. सत्ताधाऱ्यांपासून ते उच्चपदावर विराजमान असलेल्या पोपपर्यंत सर्वांचे धिंडवडे फोंच्या विलक्षण रंगमंचीय अाविष्कारातून निघत असत.

२४ मार्च १९२६ रोजी उत्तर इटलीतल्या एका खेडेगावात स्टेशनमास्तरच्या घरी फोंचा जन्म झाला. वडील छोटी-मोठी कामे करणारे नटही होते. दारिओ फो स्मगलर्स आणि कोळ्यांच्या वस्तीत वाढले. “तिथल्या माणसांच्या नजरेचा प्रभाव नट म्हणून माझ्या नाटकांवर पडला”, फो सांगत. तरुणपणी फोंना आर्ट स्कूलमधे अ‍ॅडमिशन घ्यायची होती. पण महायुद्ध सुरू झाले आणि वडलांबरोबर दारूगोळ्याची ने-आण करण्यात आर्ट स्कूल राहून गेले. पुढे मिलानमधे एका आर्ट गॅलरीला जोडून असलेल्या शाळेत शिकायला लागले, पण थिएटरकडेच ओढा राहिला. मध्ये ते रोमलाही पटकथाकार होण्यासाठी गेले. पण, तिथे जमले नाही. नाटकाकडे परतले.

दारिओ फोंच्या नाटकीय कारकिर्दीची सुरुवात एकपात्री अभिनयाच्या संहिता लिहिण्यातून झाली. गमतीजमती करत, नाचगाणे करत लोकांना हसवत गावोगावी नाटक करण्यासाठी त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला. दारिओ फो यांनी लेखनावर प्रभाव टाकणारे म्हणून मोलिएर आणि सोळाव्या शतकातील इटलीचा नाटककार अॅग्नेलो बेओल्को यांचे ऋण मानले आहे. ‘कॉमेडी द लार्त’चा जनक मानल्या जाणाऱ्या बेओल्कोने इटलीतील ग्रामीण जीवनावर आधारित, त्यांच्याच पडूआ भाषेत लोकप्रिय विनोदी नाटकं लिहिली. त्याच स्थानिक भाषेत दारिओ फोनींही आपली काही नाटके केली.

एकूणच, मध्ययुगीन संस्कृतीचा प्रभाव दारिओ फोंच्या थिएटरवर होता. उदाहरणार्थ, गरीब माणसाच्या आयुष्याचे चित्रण करणारी ‘बिचारा बुटका’ ही त्यांची विनोदी एकपात्री नाट्याची मालिका इटलीतल्या राष्ट्रीय रेडिओ केंद्रावरून प्रसारित झाली. नाटकातल्या ‘बिचाऱ्या’ला बायबलमधल्या गोष्टी सांगायला आवडतात. तो त्या गोष्टी सांगतो. पण एकदम चुकीच्या! शो एकदम हिट झाला. पुढे त्यांनी आपली स्वतःची नाटक कंपनी सुरू केली. कंपनीत फ्रँका रामे सामील झाल्या. इटलीतल्या कलाकारांच्या घराण्यात रामेचा जन्म. १९५४मध्ये दारिओ फोंची पत्नी झालेल्या फ्रँका रामे यांची कलाकार म्हणून रंगभूमीच्या इतिहासात स्वतःची अशी ओळख आहे. दोघांनी मिळून केलेली नाटके राजकीय सत्ताकारण आणि शोषणव्यवस्थेत स्त्री-चळवळीने दिलेल्या योगदानाचा महत्त्वाचा वस्तुपाठ मानली जातात. दोघांनी विचारांची भव्यता, अभिनय आणि सामाजिक भाष्य याची सांगड घालून आपल्या नाटकातून सत्तेला हादरवून टाकले.

दारिओ फोंनी ‘नौवा सिना’ ही सहकारी तत्त्वावर चालणारी नाट्यसंस्था काढली. या संस्थेद्वारे फक्त कारखाने, कामगार संघटना आणि कार्यकर्त्यांच्या क्लबसाठी नाटके सादर केली जात. ज्यांनी कधीच नाटक पाहिले नसेल, त्यांच्यासाठी नाटक करणे फोंना महत्त्वाचे वाटले. ‘अ मॅडहाउस फॉर सेन’ या नाटकाने समकालीन इटलीतल्या राजकारणावर जोरदार आसूड ओढले आणि सत्तांध नेत्यांना त्याची जागा दाखवून दिली. सत्ताधिकारी रागावले. नाट्यसंहितेत अनेक बदल सुचवले गेले. सरकारने मान्य केलेली संहिताच फो सादर करतायत का आणखी कुठली, हे पाहायला पोलिस आधिकाऱ्यांची पाळत ठेवली गेली. त्यांच्या प्रत्येक नाटकावर पोलिसांची पाळत ठरलेली असायची. दारिओ फोंच्या प्रत्येक नाटकात श्रीमंत आणि सत्ताधाऱ्यांवर प्रहार करणारा एखादा तरी सीन असतो. शोषित समाजाचे प्रतिनिधित्व करणारे म्हणून त्यांना सत्ताधीशांच्या रोषाला नेहमीच तोंड द्यावे लागले. त्यांच्यावर, त्यांच्या पत्नीवर शारीरिक आणि मानसिक हल्ले झाले. पण ते डगमगले नाहीत.

‘Mistero Buffo’ हे फोंचे गाजलेले एकपात्री नाटक. मध्ययुगातल्या रस्त्यावरच्या गमत्याचे नाटक. नाटकाचे नाव व्लादिमीर मायकोवस्कीच्या लेखनातून घेतलेले होते. फो मायकोवस्कीचे चाहते होते. हे गॉस्पेलची तोडमोड करत परत गोष्ट सांगण्याचं नाटक. यामधील एक तुकडा असा आहे की, एका पायाने अधू असलेल्या माणसाला ख्रिस्ताच्या वचनांनी चमत्काराने बरे होण्यापेक्षा धडग्या लोकांच्या वस्तीबाहेर राहायलाच आवडतं. या एकपात्री नाटकातील छोटासा भाग त्या नाटकाचे स्वरूप काय होते, याचा अंदाज येण्यासाठी मी भाषांतरित केलाय.

‘प्रत्येक जण तिकडं कुठं चाललाय मला इथंच असं रस्त्यावर सोडून? माझ्याशिवाय अजून कुठली मिरवणूक चाललीय? कुणाची मिरवणूक? येशू? कोण येशू? (विचार केल्यावर लक्षात येते) आ हा, येशू ख्रिस्त! नावाने माझा गोंधळ उडाला? कोण तो? काय अवस्था झालीय त्याची! अंगभर रक्त-रक्त झालंय हो! अंगभर काटे! त्याच्यावर थुंकतायत ते! (प्रेक्षकांकडे पाहात) आता मला कळतंय, ते त्याला गरीब बिचारा ख्रिस्त का म्हणतात ते. तुम्ही त्याच्याकडे बघू शकत नाही. ते सगळे म्हणतायत, ‘त्याला शरण जा.’ का? प्रत्येक जण म्हणतंय, ‘त्या माणसाकडे बघा.’ देवाला आणि चर्चला असे फटकारे मारत असताना हसावे की गप्प बसावे, हेच प्रेक्षकांना समजत नाही. फार्स, कॉमेडी करताना त्याला शोकांतिकेचे परिमाण द्यायचे, ही फो यांची खासियत. याशिवाय, ‘एकपात्री’ नाटकाच्या रूपालाच त्यांनी नवे परिमाण दिले. त्यांचे नाटक ‘एकपात्री’ असले तरी अख्खा समाज, इतिहास आणि संस्कृती रंगमंचावर आणण्याचा तुफानी करिश्मा त्यांनी दाखवला.

युरोपातील मध्ययुगीन संस्कृती आणि परंपरांचे आरपार भान असणारा हा किमयागार ख्रिस्ताचे आयुष्य आणि चर्चमधील विधी-परंपरांचा पाया असलेल्या मिस्ट्री आणि मिरॅकल नाटकांचे समकालीन राजकीय संदर्भात नव्याने सादरीकरण करत असे. यापैकी, ‘Mistero Buffo’ या नाटकाने इतिहास घडवला. मूकनाट्य परंपरा आणि मध्ययुगीन इटलीतील फार्सिकल नाट्यपरंपरेशी नाते सांगणाऱ्या ग्रामॅलॉट या रंगभाषेची पुनर्मांडणी केली. या नाटकाचे हजारो प्रयोग झाले. १९७७मध्ये या नाटकाचा प्रयोग टेलिव्हिजनवर दाखवला गेला. व्हेटिकन चर्चने टेलिव्हिजनच्या इतिहासातले सर्वात निंदनीय नाटक म्हणून त्यावर टीका केली. पण चर्च काही म्हणायच्या आधी, जगभरातल्या ४० अब्ज दर्शकांनी हा टीव्ही शो बघितला होता!

फोंची जी काही नाटके इंटरनेटवर उपलब्ध आहेत, ती इटालियन भाषेत आहेत, इंग्रजीत नाहीत. काही डॉक्युमेंटरीज आहेत. नाटकांची पुस्तके जगभरातल्या विविध भाषांत आहेत. वेगवेगळ्या भाषांत त्यांची नाटके सादर होतात. १९९७मध्ये नोबेल सन्मान मिळाला, तेव्हा नोबेलवाल्यांनी त्यांना तीन-एक आठवड्यांपूर्वी त्यांचे भाषण पाठवायला सांगितले होते. कारण, नोबेलच्या व्यासपीठावरून काही बोलतील, याची भीती. पण, फोंनी नोबेलवाल्यांना भाषणाऐवजी त्यांनी काढलेली स्केचेस पाठविली. नोबेलच्या छोट्या, उत्स्फूर्त, आपल्या मातृभाषेतल्या भाषणात फोंनी आयुष्याची रडगाणी वा गोडगाणी सांगून स्मरणरंजनात रमून सहानुभूती मिळविली नाही, तर हसतखेळत स्वीडिश राणीचे कर्तृत्व सांगत-सांगत राजेरजवाड्यांनी आणि समाजाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान केला पाहिजे, याची जाणीव करून दिली.

फो सक्रिय राजकारणापासून फटकून राहिले नाहीत. ऑक्टोबर २००५मध्ये वयाच्या ७९व्या वर्षी, मिलानच्या महापौरपदासाठी निवडणूक लढले आणि हरलेही.
दुर्दैवाने, भारतात राहणाऱ्या बऱ्याच जणांना दारिओ फोंचा जिवंत रंगाविष्कार पाहायला मिळालेला नाही. पण, त्यांनी लिहून ठेवलेली ‘कान्ट पे! वोन्ट पे!’, ‘अॅक्सिडेंटल डेथ ऑफ अॅन अॅनार्किस्ट’, ‘Mistero Buffo’ याशिवाय, फ्रँका रामे या आपल्या सहकारी कलाकारासाठी आणि लढवय्या पत्नीसाठी त्यांनी लिहिलेली नाटके बऱ्याच भाषांतून केली जातात. दारिओ फोंच्या लेखनाशी माझी पहिल्यांदा ओळख झाली, ती माया पंडित यांनी भाषांतरित केलेल्या ‘अॅक्सिडेंटल डेथ ऑफ अॅन अॅनार्किस्ट’ या नाटकाने. सोलापूरच्या नाट्यसंस्थेने कोल्हापुरात केलेला या नाटकाचा प्रयोग ओघवती भाषा आणि नटांच्या सहज अभिनयामुळे लक्षात राहिला. पुढे, ‘द मदर’ या दारिओ फो लिखित एकपात्री नाट्यसंहितेचे मी केलेले भाषांतर ‘स्त्रग्धरा’ दिवाळी अंकात छापून आले. नाशिकच्या बाबाज थिएटरने मंचीतही केले. याशिवाय, मी पाहिलेली फोंची काही महत्त्वाची नाटके म्हणजे विनोद लव्हेकर या पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्याने केलेला ‘वाघाची गोष्ट’चा प्रयोग, अहमदाबादच्या दक्षिण बजरंगे याने छारा वसाहतीतील कलाकारांना घेऊन केलेले ‘अॅक्सिडेंटल डेथ ऑफ अॅन अॅनार्किस्ट’, भोपाळच्या बन्सी कौलनी ‘रंग विदूषक’ या संस्थेच्या कलाकारांबरोबर केलेले नाट्यप्रयोग फोंच्या रंगभाषेचा प्रभाव दाखवतात.

लेखकानं काय लिहावं, कुठला सिनेमा दाखवावा, टीव्हीवर काय बोलावं आणि टीव्हीवर कुणी काय दाखवावं याचे नियम सरकारने घालून द्यायचे, अशा जगात राहणार आपण. आता फक्त आमच्या घरात येऊन काय खावं आणि काय करायचं, हे सरकारनं ठरवायचं राहिलंय. शिवाय, सरकाराच्या सोबतीला त्यांच्या एजन्सीज आहेतच. अशा वेळेला, सत्तांध व्यवस्थेचे नियम समाजावर अंकुश ठेवू शकत नाहीत, हे मोठ्या धाडसाने सांगणाऱ्या दारिओ फोसारख्या अवलिया गमत्याला आपण मिस करू.

जनसामान्यांच्या लढ्यातूनच सुंदर समाजाची निर्मिती होईल, यावर नितांत श्रद्धा असणारं दारिओ फोंचं थेटर. म्हणूनच, सुंदर समाजाचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाला दारिओ फोचं नाटक जवळचं वाटत राहील.
आशुतोष पोतदार
potdar.ashutosh@gmail.com
बातम्या आणखी आहेत...