आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोष हा कुणाचा ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्त जगण्याचा माझ्या मुलीचा प्रश्नच अनाकलनीय. शाळा ते महाविद्यालय या प्रवासात ती हवं तशी जगलेली असते. शाळेत सहलींना जाणे, प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेणे, खूप खेळणे, खेळून दमणे... असे शाळा आणि तिचे जग तिच्याबरोबरच आम्ही एन्जॉय केलेले असते. पण महाविद्यालयाच्या दारापाशी ती आम्हाला सोडून देते. शाळेतला क्षण घरादाराला माहीत असणारा; तर कॉलेजमधला एखादाच क्षण घरादाराला माहीत होतो... हे का? तिचे मुक्त जगणे इथे सुरू होते. तिला घरात बर्‍याच गोष्टी सांगाव्याशा वाटत नाहीत. तिच्या मैत्रिणी कोण? मित्र कोण? या प्रश्नांवर ‘मला सारखे सारखे प्रश्न नको विचारू.’ हे तिचे उत्तर. तिला सांगायचे नसते. सांगण्यासारखे असून बोलायचे नसते. तिची मैत्री कोणाशी, हे जाणण्याचा आमचा हक्क नि आग्रह तिला तिडीक येण्याजोगा का होतो? या प्रश्नाचा आम्हीच विचार करू लागतो... ऋजुताची आई ही उत्तम शिकलेली. त्यामुळे ही गोष्ट गांभीर्याने तिला घ्यावीशी वाटते. तिला सापडणारी उत्तरे मात्र काहींना पटणारी किंवा न पटणारी. ऋजुताच्या हातात मराठी, इंग्रजी वृत्तपत्रे अगदी लहानपणापासून पडलेली असतात. माध्यमक्षेत्रात झालेला चकचकीत बदल तिने न्याहाळलेला असतो. वर्तमानपत्रांच्या गुळगुळीत पानांवर तिच्या पिढीसाठी खूप सारा मजकूर असतो. तिच्यासारख्या तमाम षोडशा मुलींनी दंडावर टॅटू कसा काढावा, नखं कशी रंगवावीत, कलर करताना; स्ट्रेटनिंग करताना काय करावं, वगैरे. मुळात त्यांना आवाहनच केलेलं असतं त्यात... फोटो पाठवा... सुंदर सुंदर... छान... केस मोकळे सोडलेले... बिनधास्त... मस्त मूडमधले... तिच्यासाठीच्या पुरवण्यांमध्ये कोणत्या वस्तू वापराव्यात, कसे राहावे याच्या टिप्स... कुपीत जपाव्या अशा सगळ्या भावभावनांना थेट थेट पानांवर उतरवलेले असते. काहीच लपवायचे नाही अशी ती भाषा. ते वाचताना, ती स्वत:च्या दिसण्याचा विचार करू लागली... तेव्हा आईने विरोध केला... पैसा खर्च करण्यावर... पार्लरमध्ये जाऊन केसाची, त्वचेची नासाडी करण्यावर... आईला समजावून सांगणे ऋजुताला अवघड वाटले. हे छोटे प्रश्न सोडवायचे असतील तर घराची दारे या प्रश्नांना बंद. एवढे नखरे करून पेपरमध्ये फोटो छापून काय मिळणार? या प्रश्नाचे उत्तर तिच्याजवळ नव्हतेच. पण नखरे करायचेच होते, फोटो पाठवायचा होता. तसा तो छापूनही आला. आईचे म्हणणे, शेवटी ती तिच्या मनासारखी वागली. मॉडेल वगैरे होणे ही तिची पॅशन नव्हती; नाही. पण या बंड करण्याच्या वृत्तीमुळे घरात ती चांगली वागत नाही. आमचा परस्परांशी संवाद नाही. ऋजुताला हवे ते वाचू दिले, पाहू दिले, पैसा दिला, स्वातंत्र्य दिले, तिने उपभोगले... पण आज ना ती आनंदी, ना आम्ही...
असं का?
तरुणांची मानसिकता नेमकी कशी असते, हे ठरवण्यासाठी वृत्तपत्र वा इतर दृक्श्राव्य माध्यमांमध्ये काही जणांना सर्वेक्षण करायला सांगतात. कधी सर्वेक्षणाच्या आधारावर तर कधी स्वत:ची काही पॉलिसी ठरवत माध्यमकर्मी योजना आखतात. तरुणांना ब्रँडेड काय आवडते? त्यांचा पेहराव, मेकअप यावर रकानेच्या रकाने भरले जातात. प्रत्यक्षात, आपण प्रसिद्ध केलेला मजकूर तल्लीनतेने, गांभीर्याने अनेक जण वाचतात; त्याप्रमाणे जगण्याला आकार देतात; हे दुर्दैवाने दुर्लक्षित होते. ऋजुतासारख्या अनेक जणी आत्मविश्वास मिळवण्यासाठी वाचन करण्यापेक्षा गोरेपणाची क्रीम्स खरेदी करण्याकडे, अमुक एका ब्रँडचे कपडे घालण्याकडे, केशरचनेकडे, थोडक्यात ‘मेकओव्हर’कडेच लक्ष केंद्रित करतात, हे लक्षात येत नाही. जगण्याचे ध्येय सुंदर व आकर्षक दिसणे, हेच ठायी ठायी सांगणारे छापील माध्यम त्यांना खरे वाटू लागते. अर्थात, यावर ‘ऋजुता मूर्खासारखा विचार करते ही तिची चूक’, असे म्हणणे सोपे असले तरी त्यांच्या विचारांना थोपवायचे कसे, हाच महत्त्वाचा प्रश्न. अजूनही अनेक तरुणी प्रवाहाबरोबर वाहत आहेत, त्यांना त्यांचा विचार नाही. शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेऊनही पुस्तकांपेक्षा त्यांचा विश्वास मुद्रित माध्यमातल्या एखाद्या पानावरच टिकून आहे. त्यांना मुक्त जगणे म्हणजे हव्या त्या ब्रँडच्या वस्तू वापरणे असेच वाटते. त्या न देणार्‍या/ पुरवणार्‍या आईवडलांवर हल्ला करण्याइतपत बेडर होणार्‍यांना दोष द्यावा; की त्यांना समजून घ्यावे?
bhargavevrinda9@gmail.com