आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताठ कण्याची... शाबूत मणक्यांची!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गैबान्या याचा अर्थ वेगळा. ऑड. शंभरातल्या नव्याण्णवासारखा नसलेला. अजित अभंग यांची कवितासुद्धा अशीच नखशिखांत वेगळेपणाची गुणवैशिष्ट्ये जपलेली... ताठ कण्याची... शाबूत मणक्यांची...

अजित अभंग यांच्या कवितासंग्रहाचं ‘गैबान्यावानाचं’ हे शीर्षक लक्षणीय आहे. त्याचा अर्थ-वेगळा. म्हणजे डेव्हिएन्ट. १८व्या शतकात असे ‘डेव्हिएन्ट’ कोण असतात, हे ठरवलं गेलं होतं. जे नॉर्मल नाहीत, जे शंभरातल्या नव्याण्णवांसारखे नाहीत, ते ‘डेव्हिएन्ट’. हे असं ठरवण्यातून काही संस्थांची मानवी इतिहासात कायमची स्थापना झाली. वेड्यांसाठीची (मानसिक अपंगत्व असलेल्यांची) निवारा केंद्रं, रुग्णालयं, तुरुंग. नंतर विसाव्या शतकात फ्रेंच तत्त्वज्ञ मिशेल फुकोनं याचा सविस्तर अभ्यासच केला. यातच त्यानं शाळा, सैनिक यांनाही समाविष्ट केलं. समाजाला सततच एका विशिष्ट प्रकारच्या शिस्तीची अपेक्षा असते. ही अपेक्षा अप्रत्यक्ष सत्तेच्या नियंत्रण करत राहण्याच्या क्रौर्यातून आलेली असते. त्यातूनच यंत्रवत हालचाली कवायत करणारे, केवळ दिलेला आदेश पाळणारे सैनिक हे आदर्श ठरवले जातात आणि त्यांच्याबद्दल अभिमानाची गौरवगीतं गायला शिकवलं जातं. शाळांमधून कवायती करायला लावणं, गणवेशात रांगांमधून मुलांना शिस्तीत यंत्रवत हालचाली करायला लावणं हे त्यातून आलेलं असतं. कानून मोडणारे डेव्हिएन्ट असतात. त्यांना ‘सुधारून’ ‘वळण’ लावण्यासाठी या संस्था उभ्या केल्या जातात.

‘पोएट्रीवाला’ प्रकाशनानं आजपर्यंत संतोष पवार, वर्जेश सोलंकी, गणेश वसईकर, मंगेश काळे, मीनाक्षी पाटील, संजीव खांडेकर यांच्यासारख्या लक्षणीय कवींचे कवितासंग्रह प्रकाशित केलेले आहेत. याच मालिकेत आता अजित अभंग यांचा प्रस्तुत कवितासंग्रह प्रकाशित झालेला आहे. अजित अभंग आज ज्या काळात लिहीत आहेत, त्या काळात कवितेसाठी उत्साहवर्धक वातावरण आणि कवितेसाठीचं पोषक आशयद्रव्य आपल्या आसपास उपलब्ध आहे, असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे.

अजित अभंग यांच्या पिढीतल्या कवींचे ३०-३५ कवितासंग्रह बारकाईनं पाहिल्यास एक लक्षात येतं की, विविध वर्गांतल्या, विविध जगण्यांतल्या बहुमिती या कवितांमध्ये येण्याची धडपड करताहेत. भाषेच्या पातळीवर मात्र त्यांना आहे ती भाषा पुरेशी वाटतेय की काय, अशी शंका आहे. लॉग-इन कर, पासवर्ड कोणताय, मेमरी फुल्ल, डेटा करप्ट, फॉरमॅट कर, हार्ड डिस्क सारख्या वाक्प्रचारांनी मधल्या काळात वात आणला होता. त्याचं प्रेम हळूहळू ओसरतंय, ही कवितेसाठी चांगली गोष्ट आहे. केवळ भौतिक जगातल्याच नव्हे तर नेणिवेतल्या अनेक गोष्टी या नव्या कवितांमधून पृष्ठभागावर येत आहेत. झॅक लाकान म्हणतो, तसं आपली नेणीव ही भाषेसारखीच संचित असते. भाषापूर्व अवस्थेकडे जाण्याचा आपला कल असतो. कारण भाषा पुरत नाही, असं वारंवार म्हटलं जातं. ही भाषा पुरत नसण्याची तडफड या कवितांमधूनही दिसेल, अशी आशा वाटण्यासाठी यामुळेच जागा आहे.

असं असलं तरी आजच्या प्रचंड प्रमाणात लिहिल्या जाणाऱ्या कवितेला दुसरीही बाजू आहे, आणि ती जास्त खतरनाक आहे. चांगली वाटावी पण सरळसरळ कृतक असलेली ही कविता वाईट कविता आहे, असं म्हणता येईल आणि या कवितेनं चांगल्या कवितेला झाकोळून टाकलंय. चांगल्या-वाईट कवितेची बेमालून सरमिसळ होत आहे. यात नियमित नवी कविता वाचत असणाऱ्या माझ्यासारख्या कवीला आणि वाचकालाही पहिल्यांदा चकायला होत आहे. या कवितेत चलाखी आहे, उचलेगिरी आहे, ओढून-ताणून ‘रचणं’ आहे. या परिस्थितीला सगळेच जबाबदार आहेत. स्वतः कवी, त्यांच्या कवितासंग्रहांसाठी पाठराखण करणारे पाठराखे, अचानक पावसाळी छत्र्यांसारखे उगवून आलेले पुरस्कार आणि अलीकडे स्वस्त झालेल्या प्रचारयंत्रणा आणि सुलभ प्रश्नसंच सोडवल्यासारखे केले जाणारे अनुवाद. आता वाईट कवितेच्या गठ्ठ्यांमधून चांगली कविता शोधून काढणं हे खरं तर सोपं काम आहे. पण ते सार्वजनिक हितासाठी कुणी करणार नाही, हे उघड आहे. अजित अभंग यांची भाषा, आजच्या जगण्याचं त्यांच्या भाषेत आलेलं साररूप, हे त्यांचं आहे. दृष्टांतकथेसारखी तात्पर्यं त्याच्या कवितांमधल्या ओळींतून चित्रांसारखी आपल्याला पाहता येतात. दोन अंकी जगण्याच्या पसाऱ्यावर ते पिंजाऱ्याची मोनोटोनस दरिद्री गोष्ट फक्त सांगत नाही, तर जगण्याशी होड घेणं प्रसंगी स्वतःला नपुंसक, अनुकंपनीय वाटायला लावणारं ते थेटपणे सांगताहेत. कविता रिक्ततेला कसं सामावून घेते, यावरही तिची महत्ता ठरत असते, आणि प्रस्तुत संग्रहातली कविता ते करते.

‘अपरंपार कष्टत असताना जगणं कधी संपत आलं, हेच न कळलेले वडील’ आणि ‘आसपासच्या परिसरातच कन्ट्री पिऊन खोपडीकांडात मेलेल्या लोकांना भरपाईही मिळणार नाही’ याची कवी स्वतःला स्टॅच्युटरी वॉर्निंग देतो. रोजच्या जगण्यात शरणागतीचे प्रसंग आहेत, आत्महत्येचे विचार आहेत, पण पाय टेकायला जागा मिळाली, तर जगायला उभारी देणारं आत्मबळही आहे. महानगरांच्या ग्रेव्हयार्डात (पान २२) एकटेपण असलं, तरी ते वाटून घ्यायला कुणीतरी आहे, ही जाणीव त्याला आहे. एकूणातच आत्महीनतेकडून, आत्मनाशाच्या प्रेरणेकडून जगण्याकडे खेचण्याचा खेळ मांडणारी ही कविता आहे. जगण्यासाठीची प्रेरणा, विजिगीषा त्यांना साध्या साध्या गोष्टींतूनही मिळते. भूतकाळातलं अपयश, निराशा जगणं नव्यानं समजून घेण्यासाठीचा पायाच असतात, हे सांगणाऱ्या अॅन्थनी रॉबिन्सच्या ओळींनी खूश होऊन त्याचा दिवस ढिंच्याक होऊन जातो. त्यासाठी त्याला घर शोधावंसं वाटतं, रोपटं लावावंसं वाटतं, पाणी घालावंसं वाटतं. मिळालेल्या या रिचार्जमधून हसणं आणि जगणं परत मिळवावंसं वाटतं.

जगण्यातल्या हताश क्षणांना पराकोटीच्या तीव्रतेनं मांडताना, या कवितांमधून आत्मश्लाघा/आत्मटीका येते, पण तिचा स्वर तीव्र उपरोधाचा आहे. आपलं जगणं ही ‘अजागळाची शोभायात्रा’ आहे, ‘गांडूळासारखं जगणं आहे’ असं म्हणता-म्हणता त्यांच्या कवितेत प्रश्न येतो, ‘कोणत्या यडझव्यानं पैसा बनवला?

मी शोधलं, पण सालं त्याचं पेटंट घेतलंच नाही कुणी’ (३३) हा प्रश्न कार्ल मार्क्सनंसुद्धा विचारला होता. मार्क्सबद्दलचं ते प्रसिद्ध वाक्य इथं आठवतं- ‘इतक्या वर्षांनंतर मार्क्सच्या सिद्धांतांनंतरही विषमता काही कमी झाली नाही, पण विषमतेची कारणं आणि स्रोत नक्कीच कळले आहेत.’ ही जी जाणीव आहे, ती आजच्या वर्तमानात इतकी ढळढळीत आहे की, ती पेडर रोडवरच्या ‘अन्टिला’पासून धारावीपर्यंत एक रेषा ओढली, तरी त्या रेषेवर आपल्याला लख्ख लिहिलेली दिसेल.
आरशात पाहून स्वतःला प्रश्न करणं, आपण बरोबर की चूक अशी सतत शंका घेणं, ‘लहानपणी आपण गू चिवडत असू तर आता शब्द चिवडतो आहोत का?’ असा ‘तर्कटखोर दिवाळिया’ प्रश्न करणं, या निरंतर अस्वस्थ करणाऱ्या संवादाची ही कविता आहे. यात काही ठिकाणी चमकून जावं, अशा तात्त्विक ओळी येतात. बदलत्या काळातले, बदलते कायदेकानू, तमीज कवी स्वतःशी घोकतो-
काही विचारल्यास चेहरा ग्लोबल गरीबवाणा ठेव
गुर्मिकार चेहरा माणसाला सबगोलंकारी ठरवतो
घे वसा वसा टाक...
सहीसलामत सूट
टाकला वसा घे
घेतला वसा टाक
सरळ थेट घास
सॉरीला अंगवळणी पाड
दबाव घेऊ नकोस पण दाखव
जगायचं आहे. आणि जगायचं असेल तर तर ही नवी तहजीब शिकायची आहे आणि हा उपरोधही आहे.
वर्तमान काळात वाङ‌्मयव्यवहार असतील किंवा सार्वजनिक जगणं असेल, तुम्हाला अल्याड किंवा पल्याड असं रोखठोक व्हावं लागतंच. हे फारसं फायद्याचं नसतं. पण नैतिकता तुम्हाला तुम्ही जिवंत असाल तर डिवचत असते. हे अजित अभंग त्यांच्या संग्रहातल्या अखेरच्या भागात असलेल्या एका कवितेत मांडतात. त्यातल्या दोन ओळी -
सब की कह के लेले
भारतीय परिप्रेक्ष्यात सब अल्बेल है
भूमिका घेणं अपराध फक्त
पण तू कॅरिकेचर नाहीस, माईंडिट्ट,
अजित अभंग त्यांच्या कवितेतून आणि असण्यातून काही एक ठाम भूमिका घेत राहतील आणि आपण कॅरिकेचर नाही आहोत, हे सिद्ध करतील, अशी आशा या सगळ्या कविता वाचताना वाटते. त्यामुळे त्यांच्या कवितेचा कणा ताठ राहील आणि त्याचे मणकेही शाबूत राहतील, ही खात्री आहे.

आपली नेणीव ही भाषेसारखीच संचित असते. भाषापूर्व अवस्थेकडे जाण्याचा आपला कल असतो, कारण भाषा पुरत नाही, असं वारंवार म्हटलं जातं.

पुस्तकाचे नाव : गैबान्यावानाचं
कवी : अजित अभंग
प्रकाशक : पोएट्रीप्रिमेरो, मुंबई
किंमत ः ~ १५०/-
गणेश विसपुते
s@gmail.com
बातम्या आणखी आहेत...