आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉप्युलेशन एक्सप्लोजन

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक देशाला एक प्रश्न विचारला जातो की त्याने जगाला काय दिले? जर्मनीने महायुद्ध दिले. जपानने राखेतून उभारणे दिले, तंत्रविज्ञानही दिले. अमेरिकेने आधुनिकता, ब्रिटनने पारंपरिकता दिली. लोकसंख्येचा उद्रेक अनुभवलेल्या भारताने जगाला काय दिले, तर ‘इमिग्रेशन’ दिले...

जगात सगळ्यांनी आठ आश्चर्ये ठरवली आहेत. पण अशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्या ‘आश्चर्य’या विभागात मोडतील. जगातल्या सगळ्यात उंच पर्वताची उंची, समुद्राची खोली, सगळ्यात बुटका माणूस, सगळ्यात उंच माणूस, लठ्ठपणाचा बादशहा, जमिनीखालची गुहा... याच मालिकेत असेच एक आश्चर्य म्हणजे, आपली आणि चीनची लोकसंख्या. लहानपणापासून हे शिकतेय की सगळ्या देशांना मागे टाकत हे देश लोकसंख्येच्या बाबतीत एकमेकांशी स्पर्धा करताहेत. निदान शालेय आयुष्यापासून तरी आपण हेच ऐकतोय. पॉप्युलेशन एक्सप्लोजन - लोकसंख्येचा उद्रेक हा शब्द किंवा लोकसंख्येचा फुटलेला ज्वालामुखी अशी संज्ञा भारतीय कर्तृत्वाशिवाय अस्तित्वातच आली नसती!
मधल्या काळात म्हणजे जागतिकीकरण, उदारीकरण वगैरे खूपच जोरात मुसंडी मारून येत होते, त्या वेळी आपला देश हा मोठा पुरवठा करणारा देश होऊ शकेल, असे वाटत होते. आपण मानवी पुरवठा केंद्र होऊन कमी लोकसंख्या असलेल्या देशांचे प्रश्न सोडवू शकू, असे माझ्या भाबड्या बुद्धीला वाटले होते. किंबहुना आम्ही तीन-चार जण असे होतो. आपली वाढलेली लोकसंख्या हा आपला रोग नसून निरोगी देशाचे अस्त्र आहे, असे आमचे मत होते.
दोन महायुद्धांत आणि नंतरच्या अनेक युद्धांत आपापसात सैन्याची देवाणघेवाण झाली. आजही मित्र म्हणून किंवा आपणहून जागतिक संरक्षणाची जबाबदारी स्वीकारलेले अमेरिकेसारखे राष्ट्र इतर देशांत सैन्य पाठवते. आपल्या लोकसंख्येतून अशा सैनिकी तुकड्या तयार केल्या तर आपण भाडेतत्त्वावर त्या इतर देशांना देऊ शकतो. एरवी कामाच्या शोधात आणि त्या निमित्ताने अनेक भारतीय अशा भाडेतत्त्वावरच मोठमोठ्या देशांत नोक-या करतात. मोठमोठेच देश नव्हे, तर अगदी लहानातल्या लहान एकाकी बेटावरही तुम्हाला भारतीय माणसे भेटतात. त्यांचे एखादे दुकान, एखादे हॉटेल आणि रेस्टॉरंटही त्या लहान जागेवर दिसते, तेव्हा आपल्या ‘सर्वव्यापकतेची’ कल्पना येते.
वीस वर्षांपूर्वी ब्रिटनच्या हीथ्रो विमानतळावर उतरले, तेव्हा नवा देश-प्रगत देश किंवा जेता देश किंवा आपला एकेकाळचा ताबेदार देश या कल्पनेने मी भांबावले होते. त्यांच्या वैभवाने व्यथितही झाले होते. त्या गो-यांच्या देशात आपला निभाव कसा लागणार, ही धास्ती होती. स्वत:चा देश, स्वत:ची माणसे, नातीगोती दूर राहिल्याचे दु:ख होते. ‘होमसिकनेस’ होता. पण फे्रशरूमकडे वळले आणि एकदम दोन-तीन स्त्रिया आपल्या रंगाच्या दिसल्या. त्यांनी जरी जीन्स घातल्या होत्या तरी एकीचा कुर्ता वरच्या कोटातून खाली आलेला दिसत होता. मुख्य म्हणजे त्या हिंदीत बोलत होत्या. मला एकदम छान वाटले. हायसे वाटले. न संकोचता एक हसू मी त्यांच्या दिशेला टाकले. प्रतिक्रिया मिळाली. त्यांनी हात हलवला ‘हॅलो’ सारखा.
‘आपला भारतीय माणूस जगात कुठेही जा, भेटतोच. आपली संख्याच इतकी आहे की देशात वाहून बाहेर सांडतेय.’ मित्र म्हणाला तेव्हा माझ्या डोळ्यासमोर देशाच्या जमिनीवर एकमेकांना खेटून उभे राहिलेले बांधव दिसले. अर्थातच भूभागावर एवढी संख्या मावणारच नाही. वर असंख्य मजले एकावर एक उभे करावे लागतील, अशी गमतीशीर सूचना मनात आली आणि अशी थप्प्या लावल्यासारखी माणसे थोडी सांडणारच, असेही वाटले.
स्वित्झर्लंडमध्ये ‘माउंट टिटिलीस’वर जाताना मोठ्या केबल कारची चालिका भारतीय मुलगी होती. सावळी. स्मार्ट. उत्तम म्हणण्यापेक्षा इंग्रज वाटावी इतक्या सहजतेने उच्चार करणारी आणि हेमामालिनीला दिसण्यात मागे टाकेल अशी. तिने तिच्या ‘नेटिव्ह’ असण्याचा गंध येऊ दिला नाही, तरी आम्हा वीस-पंचवीस जणांमध्ये तिच्याबद्दल आपुलकी तयार झालीच.
पर्वतावर टिटिलीसच्या बर्फात बर्फाची गोळेफेक आणि ‘धडपडत’पेक्षा जास्त ‘पडत-पडत’ स्केटिंग केल्यावर ‘पावभाजी अ‍ॅव्हेलेबल’चा बोर्ड केवढा सुखावणारा होता आणि ती स्वित्झर्लंडची अतिमहाग पावभाजी अजिबात भारतातल्यासारखी नसतानाही आवडून गेली.
मित्राच्या या बोलण्यावर वाटले, जास्त लोकसंख्येमुळे पोटापाण्यासाठी बाहेर पडलेल्या भारतीयांमुळे परकीय भूमीवरसुद्धा आपुलकीचा हॅलोचा हात किंवा पावभाजी शक्य झाली, हे केवढे सुख! एकीकडे मुंबई आणि कोलकात्याला माणसांची पेवं फुटलीत असे वाटते. वारुळातून भसभस मुंग्या बाहेर पडतात तशी लोकलच्या स्टेशन्समधून माणसे बाहेर पडतात. बाजारांमध्ये किंवा रस्त्यावरसुद्धा अगदी एकापाठी दुसरा अशी गर्दी असते. एखाद्याची गती कमी झाली तर मागच्याचा पाय त्याच्या चपलेत निश्चित अडकणार किंवा लक्ष नसेल तर तो पुढच्यावर धडकणारही. हे पाहताना वैयक्तिक ओळख, पर्सनल आयडेंटिटी गमावलेली माणसे अशी त्यांची नवी ओळख क्लेशकारक रीतीने जाणवते. ही नवी ओळख किंवा चेहरा गमावलेली माणसे घडली कशी, याचे उत्तर सामूहिकता असे आले तरी खरे उत्तर लोकसंख्याच आहे.
वास्तविक प्रत्येक माणसाच्या मनात आपली ओळख असते. पण इच्छा मात्र असते ती लोकांनी आपल्याला ओळखावे अशी! म्हणून तर रस्त्याने कोणी हात उंचावला किंवा नमस्कार केला तर छाती नकळत फुगते. अगदी हसून मान लवली तरीही त्या ओळखीने अहं सुखावतो. पण इतक्या माणसांमध्ये हे घडावे कसे?
मग ओळख विकत घ्यावी लागते. यात प्रसिद्धिमाध्यमांचा मोठा वाटा येतो. वर्तमानपत्रात एखादा फोटो यावाच यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे लाखो लोक आहेत आणि फोटो आल्यावर तो फक्त फ्रेम करून लावता येत नाही एवढा भाग सोडला, तर निदान तेवढा दिवस तरी ‘स्व-कौतुकात’ पार पडतो. यात रोज दहा लोकांचे फोटो त्यांच्या एखाद्या विषयावरच्या छोट्या प्रतिक्रियेसह दिले तर एक हजारभर पेपर खपायला हरकत नाही. अर्थात ही शक्कल नव्या मार्केटिंग टेक्निकमुळे घडते. पण ही गरज तयार झालीय संख्येमुळे, हे विसरून भागणार नाही.
अतिलोकसंख्येमुळे कित्येक वाईट गोष्टी जन्माला घातल्या जाताहेत. अन्न, पाणी, निवा-याची कमतरता, त्यातून उद्भवणारा भ्रष्टाचार, शिक्षणाच्या आग्रहामुळे बजबजणारी शाळा-कॉलेजेस, भूछत्र्यांसारखे कोचिंग क्लासेस, पैसे देऊन नोक-या, लोकनेत्यांच्या मदतीची अपेक्षा, सरकारचे कोसळते व्यवस्थापन - कितीतरी.
त्यात महत्त्वाचे वाटते की या कोटी कोटी लोकांमध्ये प्रत्येकाच्या इच्छा-आकांक्षांचा विचार केला तर केवढा तरी केआॅटिक प्रकार आहे! इतक्या आकांक्षा पूर्ण न होण्याचे कारणही बहुधा संख्याच असेल.